समर्पण-एक प्रेमकथा भाग ९८

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ९८

मागील भागाचा सारांश: नीरव व नीरजा दोघे सोबत मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. दोघांच्या हसत खेळत गप्पा सुरू होत्या, पण अचानक नीरजा शांत झाली. मुक्ताने नीरवला नीरजाचा बायको म्हणून विचार कर असे सुचवले.

आता बघूया पुढे….

आपलं आवरल्यावर नीरव रुममधून बाहेर आला, तर नीरजा डायनिंग टेबलच्या इथे बसलेली होती. नीरवने तिच्याजवळ येऊन स्माईल दिली, पण नीरजाने त्याच्याकडे बघितलेही नाही. सरस्वतीने त्यांना नाश्ता आणून दिला. मुक्ताही नाश्ता करण्यासाठी येऊन बसली.

“मुक्ता, तुला क्लासला मी सोडवू का?” नीरजाने विचारले.

“नाही. मी बस किंवा रिक्षाने जाईल.” मुक्ताने उत्तर दिले.

“नीट जा. पुण्यात तुला एकटीला फिरायची सवय नाहीये. काही प्रॉब्लेम आला तर नीरव किंवा मला लगेच फोन करत जा.” नीरजा.

मुक्ताने होकारार्थी मान हलवली.

“नीरव, मी हॉस्पिटलमध्ये येण्याआधी स्नेहाला जाऊन भेटून आले तर चालेल का?” नीरजाने नीरवकडे बघून विचारले.

“हो चालेल. २ वाजता मी सगळ्या स्टाफची मिटींग ठेवली आहे सो त्याआधी हॉस्पिटलला येऊन माझी भेट घे. मिटींगच्या अजेंड्याबद्दल मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे.” नीरवने सांगितले.

“हो चालेल.” नीरजा.

“वहिनी, तुमच्या दोघांचं काही भांडण झालं आहे का?” मुक्ताने थेट मूळ प्रश्नच विचारला.

“आमचं आणि भांडण, नाही. पण तुला असं का वाटलं?” नीरजाने प्रतिप्रश्न केला.

“तुम्ही दोघे वॉक वरून आल्यापासून मी तुला बघतेय. तू जरा जास्तच शांत झाली आहेस. तुम्ही दोघे कामापुरतच बोलत आहात.” मुक्ता नीरजाकडे बघत म्हणाली.

“मुक्ता, मी एकदम नॉर्मल आहे. नीरजालाच काय झालं काय माहित.” नीरव.

“मला काहीही झालं नाहीये.” एवढं बोलून नीरजा डायनिंग टेबल वरून उठून आपल्या रूममध्ये निघून गेली.

मुक्ता व नीरव नीरजाकडे आश्चर्याने बघत होते.

“दादा, मी चुकीच्या वेळी हा प्रश्न विचारला का?” मुक्ताने नीरवला विचारले.

“काय माहीत. जाऊदेत, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला वेळ भेटल्यावर मीच तिच्याशी बोलेल.” नीरव म्हणाला.

नाश्ता झाल्यावर नीरव हॉस्पिटल साठी निघून गेला. मुक्ता आवरण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून गेली. नीरजा रूममधून बाहेर आली व गाडीत बसली.

“शिवानी, मला स्नेहाला भेटायला जायचं आहे, तर तुमच्या फ्लॅटवर गाडी घे.” नीरजाने गाडीत बसल्यावर शिवानीला सांगितले.

शिवानीने गाडी त्या दिशेने घेतली. नीरजाचा बोलण्याचा सूर वेगळाच असल्याने शिवानीने पुढे काहीच विचारले नाही. वाटेत गाडी थांबवून नीरजाने स्नेहासाठी तिचे आवडते सँडविच घेतले. बिल्डिंगच्या खाली जाऊन शिवानीने गाडी थांबवली. गाडीतून उतरताना नीरजा म्हणाली,

“शिवानी, तुला वर यायचं नाहीये का? मी तुझ्याच घरी तर जातेय.”

“नाही मॅम. आता सध्या मी ड्युटीवर आहे. तुमच्या सोबत कुठे येणं हे मला पटत नाही. शेवटी तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळायला हवी ना.” शिवानीने हसून उत्तर दिले.

नीरजा एकटीच स्नेहाकडे गेली. तिने दरवाजावरील बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला, पण दारात समोरील व्यक्तीला बघून नीरजा शॉक झाली.

“डॉ गौरव, आपण इकडे कसे?” नीरजाने थोड्या रागातच विचारले.

“हॉस्पिटलला जाण्याआधी स्नेहाची तब्येत कशी आहे हे बघायला आलो होतो. आज तशीही माझी शिफ्ट लेट होती.” गौरवने उत्तर दिले.

“नीरजा, दारातच उभी राहून बोलणार आहेस का? आत ये.” स्नेहा आतून ओरडून म्हणाली.

गौरव दरवाजातून बाजूला झाला आणि नीरजा आत गेली.

“गौरव सर माझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आले होते. माझ्या आवडते सँडविच त्यांनी आणले होते. तू थोडी आधी आली असती तर तुलाही खायला भेटले असते.” स्नेहा म्हणाली.

“मी पण तुझ्यासाठी सँडविच घेऊन आले होते. डॉ गौरवने तुझ्यासाठी सँडविच आणले होते हे मला माहीत असत तर मी घेऊन आले नसते.” नीरजा नाराजीच्या सुरात म्हणाली.

“मी थोड्या वेळाने गरम करून खाईल. तू काळजी करू नकोस. बरं तुम्ही दोघे उभे का आहात? बसा ना.” स्नेहा म्हणाली.

गौरव बाजूला असलेल्या खुर्चीत बसला. नीरजाला वाटले होते की, ती तिकडे आल्याने गौरव तेथून निघून जाईल, पण तो खुर्चीत बसलेला बघून नीरजाला खूप राग आला होता.

“तुझा पाय मुरगळला म्हणून मी तुला भेटायला आले होते. तू बरी आहेस हे डोळ्याने बघून छान वाटलं. मेन म्हणजे तुझी काळजी घेणारे नवीन मित्रही तुझ्या आयुष्यात आले आहेत हे बघून तर मला खूपच आनंद झाला आहे. मला हॉस्पिटलला जाऊन बरीच कामं करायची आहेत. मी निघते.” नीरजा असं बोलून दरवाजाच्या दिशेने जायला निघाली.

“नीरजा, मला वाटलं तू माझ्यासाठी थोडा वेळ काढून आली असशील. आपण कधीच्या निवांत गप्पाच मारल्या नाहीत.” स्नेहा बोलल्यावर नीरजा जागीच थबकली.

यावर नीरजा मिश्किल हसून म्हणाली,
“आज मी तुझ्यासाठी वेळ काढूनच आले होते, पण तू सध्या डॉ गौरव सोबत बिजी आहेस, तर गेलेलंच बर. उगाच तुम्ही माझ्यामुळे डिस्टर्ब व्हायला नको.”

“नीरजा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय.” स्नेहा म्हणाली.

“स्नेहा, मला खरंच आता काहीच बोलायचं नाहीये. आधीच माझ्या डोक्यात वेगळाच गोंधळ सुरू आहे. अजून त्यात वाढ करायची नाहीये, त्यापेक्षा मी इथून गेलेलच बरं.” नीरजा दरवाजा उघडून बाहेर पडली. दरवाजाचा आवाज ऐकून नीरजा किती रागात असेल याचा अंदाज स्नेहा व गौरवला आला होता.

“स्नेहा, माझ्यामुळे तुमच्या दोघींच्या मैत्रीत काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?” गौरवने स्नेहाकडे बघून विचारले.

“नाही. नीरजा तशी मॅच्युअर मुलगी आहे. तिच्या डोक्यात आधीच काहीतरी सुरू असेल. त्यात भर म्हणजे मी आपल्या फ्रेंडशीप बद्दल तिला काहीच सांगितलं नव्हतं. आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात नवीन मित्र मैत्रिणी आल्यावर आम्हा मुलींना ते पचायला वेळ लागतो, तसंच तिचं काहीतरी झालं असेल. मी हॉस्पिटलमध्ये यायला लागल्यावर तिची भेट घेऊन तिच्याशी बोलेल. तुम्ही काही काळजी करू नका. आमच्या मैत्रीला काही होत नसतं.” स्नेहाने सांगितले.

नीरजा झपझप पाऊले टाकत गाडीजवळ गेली. नीरजाच्या चेहेऱ्यावरील राग बघून शिवानीने तिला तिच्या मनातील प्रश्न विचारायचे टाळले. शिवानीने गाडी हॉस्पिटलच्या दिशेने घेतली.

“शिवानी, इकडे पुढे जे मंदिर आहे ना तिथे गाडी थांबवशील.” नीरजाने सांगितले.

मंदिराच्या परिसरात जाऊन शिवानीने गाडी थांबवली. नीरजा गाडीतून खाली उतरल्यावर शिवानी तिला म्हणाली,
“मॅडम, मी तुमच्या सोबत येऊ का? तुमची मनस्थिती ठीक दिसत नाहीये.”

“नाही नको. मला जरावेळ एकटीला रहायचं आहे, म्हणून मी मंदिरात आले आहे.” नीरजा.

नीरजाने मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. मंदिरामध्ये एक कोपऱ्यात नीरजा जाऊन बसली. डोळे मिटून ती जणू काही देवासोबत संवाद करू लागली,

‘हे देवा, आजवर तू माझ्या वाट्याला जे जे दिलं ते मी स्वीकारले. वाटेत जी संकटं आली त्यावर मी मात केली, पण आज मला आतून काहीतरी झालंय. मनावर मळभ आलंय. काहीच करण्याची इच्छा होत नाहीये. चहाच्या टपरीवर ते कपल बघितलं आणि तेव्हापासून मी नाराज झाले. मी नीरववर निरपेक्ष प्रेम केलं, पण माझ्यावरही कोणीतरी प्रेम करावं असं मलाही वाटत ना.

कदाचित त्या कपलच्या आयुष्यात अनेक अडचणी, संकटे असतीलही, पण तो क्षण ते ज्या पद्धतीने एन्जॉय करत होते ना तसा क्षण मलाही अनुभवायचा आहे. एकाच कपातून दोघेजण चहा पीत होते. हातात हात घालून वॉक करत होते. मी सत्य परिस्थिती स्विकारली आहे, पण तरीही ह्या मनाला कसं समजावू हेच कळत नाहीये.

आपलं मन मोकळं करायला स्नेहाकडे जावं म्हटलं तर तिथे डॉ गौरवला बघून अजून त्रास झाला. डॉ गौरव सोबत मैत्री करण्याआधी स्नेहाला एकदा माझ्याशी बोलावं वाटलं नाही का? बरं इतक्या कमी दिवसात एखादयाशी इतकी चांगली मैत्री कशी होईल हा तर वेगळाच प्रश्न आहे.

डॉ गौरवचा पास्ट नेमका काय होता ह्याची पूर्ण कल्पना मला नाहीये. स्नेहाला त्याबद्दल कितपत माहिती असेल हेही सांगता येत नाहीये. स्नेहाला डायरेक्ट डॉ गौरव पासून दूर रहा हेही सांगता येत नाहीये.

माझ्या मनात आधीच वेगळ वादळ सुरू आहे, त्यात स्नेहाच्या आयुष्यात चुकीचं काही घडू नाही हेही वाटत आहे, त्यापासून तिला कस सावध करावं हेच कळत नाहीये.’

नीरजाचा मोबाईल वाजला आणि तिची तंद्री भंग पावली. मोबाईलच्या स्क्रीनवर नीरवचं नाव बघून आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे याची तिला आठवण झाली. गाडीत बसून ती हॉस्पिटलच्या दिशेने मार्गस्थ झाली.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all