समर्पण-एक प्रेमकथा भाग ९९

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ९९

मागील भागाचा सारांश: नीरजा आधीच डिस्टर्ब झालेली होती. स्नेहाला भेटणं आणि तिच्याकडे आपलं मन मोकळं करता येईल या हेतूने नीरजा स्नेहाकडे गेली. गौरवला स्नेहाच्या फ्लॅटवर बघून नीरजाला खूप जास्त राग आला. नीरजा तेथून लगेच निघाली. मंदिरात जाऊन स्वतःला जो त्रास होता तो तीने देवाला बोलून दाखवला.

आता बघूया पुढे….

हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर नीरजा आपल्या केबिनमध्ये जाऊन बसली. नीरजा हॉस्पिटलमध्ये आली आहे हे कळल्यावर नीरव तिच्या केबिनमध्ये गेला.

“ स्नेहा कशी आहे? आणि ती हॉस्पिटलमध्ये कधीपासून जॉईन होईल याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का?” नीरवने केबिनमध्ये जाऊन नीरजाला पहिला प्रश्न विचारला.

“तिची काळजी घ्यायला तिच्या आयुष्यात आता नवीन मित्र आहे. ती कशी आहे हेही मला माहित नाही आणि ती कधीपासून जॉईन होईल हेही मला माहित नाही, कदाचित ह्या प्रश्नांची उत्तरे तिचा नवीन मित्र देऊ शकेल.” नीरजाच्या चेहऱ्यावर स्नेहाबद्दल असणारी नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती.

“ स्नेहाचा नवीन मित्र म्हणजे कोण नेमकं तू कोणाबद्दल बोलत आहेस?” नीरवला नीरजाच्या बोलण्याचा अर्थ लागत नसल्याने त्याने विचारले.

“डॉ गौरव अग्रवाल.” नीरजाने उत्तर दिले.

“गौरवने स्नेहासोबत मैत्री केलीय? तू स्नेहाला त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही का? पहिले केलेल्या चुका तो परत करणार नाही असं स्पष्टपणे त्याने मला सांगितले होते.” नीरव म्हणाला.

“स्नेहाने डॉ गौरव सोबत मैत्री करताना एकदाही मला विचारले नाही किंवा त्यांच्याशी मैत्री झाली आहे हेही तिने मला सांगितलं नाही, तर मी तिच्याशी त्या विषयावर कधी आणि का बोलू?” नीरजा चिडलेली होती.

“बरं तो टॉपिक सध्या बाजूला ठेवू. पुढील दहा मिनिटात कॉन्फरन्स हॉलमध्ये ये. मी जवळपास सगळ्या स्टाफला बोलावलं आहे. मला काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे.” नीरव हे बोलून तेथून निघून गेला.

नीरजा फ्रेश झाली व तीही पुढील दहा मिनिटात कॉन्फरन्स हॉलकडे गेली. हॉल मध्ये घुसत असतानाच तिला गौरव दिसला आणि तिला पुन्हा त्याचा राग आला. आपला राग कंट्रोल करत नीरजा हॉल मध्ये जाऊन बसली. नीरव आधीच तिथे हजर होता.

हळूहळू सगळा स्टाफ आल्यावर नीरवने मिटींगचा अजेंडा त्यांच्या समोर मांडला. बऱ्याच मुद्द्यांवर सगळ्यांमध्ये चर्चा झाली. जवळपास दीड तासानंतर मिटींग संपली. सगळेजण आपापल्या कामाला गेले. नीरव त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला. दरवाजावर नॉक करून गौरव नीरवच्या केबिनमध्ये गेला,

“यस, डॉ गौरव. माझ्याकडे आपलं काही काम होत का?” नीरवने त्याच्याकडे बघून विचारले.

“हो, मघाशी मिटींग मध्ये झालेल्या एका मुद्द्यावर मला बोलायचं होतं.” गौरव म्हणाला.

“मग तिकडेच का नाही बोललात?” नीरवने अजून एक प्रश्न विचारला.

“मी आता काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये जॉईन झालोय, तर मला लगेच आपला मुद्दा तिथे मांडणे योग्य वाटले नाही.” गौरवने उत्तर दिले.

“ओके. आपण बसून बोलू शकता.” नीरवने आपल्या समोरील खुर्चीकडे बोट दाखवत सांगितले. इतक्या वेळ नीरव गौरवला बस म्हणाला नव्हता आणि गौरवही स्वतःहुन बसला नव्हता.

खुर्चीत बसल्यावर गौरव म्हणाला,
“आपल्या हॉस्पिटल मधील स्टाफ हुशार आणि हार्डवर्क करणारे आहेतच, पण त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीये. त्यांना प्रॉपर प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बऱ्याच स्टाफला साध्या साध्या गोष्टी माहीत नाहीयेत, त्या त्यांना शिकवल्या, तर नक्कीच त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीत बदल होईल.”

“डॉ गौरव, तुमचं म्हणणं मला पटतंय. मी बऱ्याचदा हॉस्पिटल रिलेटेड वर्कशॉप असेल तर स्टाफला वर्कशॉप अटेंड करण्याचा सल्ला देत असतो. काहीजण करतात, काहीजण नाही करत. आता सगळ्याच स्टाफला मी वर्कशॉप करण्यासाठी कम्पलशन आणि स्पॉन्सर नाही करू शकत.” नीरवने गौरवला त्याची अडचण सांगितली.

“वर्कशॉप आपल्या हॉस्पिटल मध्ये आणि फ्री मध्ये ठेवलं तर…” गौरव.

“ते कसं शक्य आहे. हॉस्पिटलमध्ये वर्कशॉप अरेंज करू शकतो, पण ते फ्री मध्ये घ्यायला कसं जमेल? वर्कशॉप कंडक्ट करणाऱ्या स्टाफला पेमेंट तर द्यावेच लागेल.” नीरवने त्याच्या मनातील शंका बोलून दाखवली.

“सहा महिन्यांपूर्वी मी काही वर्कशॉप अटेंड केले होते, तर मी पण वर्कशॉप घेऊ शकतो. आणि डोन्ट वरी मी पेमेंट घेणार नाही.” गौरव म्हणाला.

“आणि हे सगळं आपण का करणार?” नीरवला प्रश्न पडला होता.

“मला वर्कशॉप घ्यायला आवडेल. तसही पहिल्यापासून मला माझं नॉलेज सगळ्यांना द्यायला आवडतच.” गौरव हसून म्हणाला.

“ओके. तुम्ही कोणत्या टॉपिकवर वर्कशॉप घ्याल हे ठरवा. सुरुवातीला एक वर्कशॉप घेऊन बघा, त्याला कसा आणि किती रिस्पॉन्स मिळतो ते बघूयात, मग पुढचं सगळं प्लॅन करू.” नीरव म्हणाला.

“हो चालेल. मी प्रॉपर प्रेझेंटेशन बनवतो आणि मग तुला दाखवतो. तू मला अहो काहो करून परकं करत आहेस. प्लिज इतकं परकं करू नकोस. शेवटी काही झालं तरी आपण एक काळ खूप चांगले मित्र होतो.” गौरव.

“मित्र होतो आणि आता आपल्यात बॉस व एम्प्लॉईच नातं आहे. फरक तर आहेच ना.” नीरव चेहऱ्यावर मिश्किल स्माईल आणून म्हणाला.

“नीरव, यार प्लिज सोड ना हा राग. तुला चार शिव्या द्यायच्या असेल दे. माझ्या कानामागे लावायची असेल लाव पण असा राग धरून बसू नकोस.” गौरव हात जोडून म्हणाला.

“गौरव, तुझ्यावर माझा राग नाहीये. आपल्यात पुन्हा मैत्री होणार नाही हे मात्र तितकंच खरं. आणि एक मात्र सांगेल, तू पुन्हा त्याच मार्गाला जात आहेस. पुन्हा प्रेमाच्या चक्रव्यूहात अडकत आहेस. आधीच्या अनुभवापासून काही धडा घेतला नाहीसच ना.” नीरव थोड्या मोठ्याने म्हणाला.

यावर गौरव म्हणाला,
“नीरव, मी तुला आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय, प्रेम करणे ही चूक नाहीये. मी कामिनीवर प्रेम करून चूक केली नव्हती. कामिनीने वेळीच तिच्या आयुष्याचं सत्य मला सांगितलं होतं. मीच तिच्यात प्रमाणापेक्षा जास्त अडकलो होतो. मलाच तिच्यातून बाहेर पडायच नव्हतं. कामिनी प्रॅक्टिकल होती, तिनेही माझ्यावर प्रेम केलं होतंच पण ती आधीच एका बंधनात अडकलेली असल्याने ती ते सोडू शकत नव्हती.

या सगळ्यात तिची किंवा आमच्यातील प्रेमाची चूक नव्हती. आमच्या समोर परिस्थिती अशी येऊन उभी राहिली होती की, दोघांचा नाईलाज होता. कामिनी मधून बाहेर पडायला मला वेळ लागला, यात माझा दोष आहे. सगळ्या जगापासून मी लांब येतो, यात माझा मूर्खपणा होता.

आता लगेच मी पुन्हा कुठल्याही चक्रव्यूहात अडकत नाहीये. स्नेहा ही एक चांगली मुलगी आहे. आमच्यात निव्वळ मैत्री आहे आणि समजा पुढे जाऊन मला तिच्याबद्दल प्रेम वाटलही तरी यात गैर काहीच नाहीये.

मला प्रेमापासून लांब ठेवण्यापेक्षा एकदा स्वतःच्या बायकोकडे प्रेमाने बघ. तिला तुझ्या प्रेमाची आणि तुला तिच्या प्रेमाची नितांत गरज आहे. बिचारी तुझी आतुरतेने वाट बघतेय आणि तू इकडे प्रेम करणं हा गुन्हा आहे हा समज करून बसला आहेस.

एकदा शांतपणे बसून तिच्या मनाचा विचार कर. तू नशीबवान आहेस की, तुला नीरजा सारखी बायको मिळाली आहे. एकदा तिला मिठीत घेऊन बघ, जे समाधान तुला तिच्या मिठीत मिळेल ते कुठेच मिळणार नाहीये. आपल्यावर प्रेम करणार माणूस मिळायला भाग्य लागतं, पण तुला त्याचा उपभोग घेता येत नाहीये.

आता राहिला प्रश्न आपल्या मैत्रीचा. मी तुझ्याशी पुन्हा मैत्री करण्याचा विचार केला होता, पण तुझा तो विचार नाहीये. या क्षणापासून आपण दोघे फक्त बॉस आणि एम्प्लॉई असू. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीही करू, त्याबद्दल तुला बोलण्याचा अधिकार नाहीये. मी प्रेमात पडेल किंवा एखादीला फसवेल. हे माझं आयुष्य आहे, मला वाटेल ते करेल.

मी एक असा माणूस आहे, ज्याला मन आहे. माझ्या मनाला आणि शरीराला काही गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार, त्यात काही अयोग्य व चूक असं काही नसतं.

वर्कशॉपचं प्रेझेंटेशन तयार झालं की मग मी तुझी भेट घेतो.”

एवढं बोलून रागातच गौरव तेथून निघून गेला. नीरव शांतपणे गौरवच्या एकेक बोलण्याचा आणि वागण्याचा विचार करत बसला.

गौरवच्या बोलण्याने नीरव व नीरजाच्या नात्यात काही बदल होईल का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all