सुमेधाच्या दोन्ही भावांची एव्हाना लग्न झालेली होती. नीलिमा ताईंचा जीव सुमेधासाठी तीळ तीळ तुटत होता. एकुलती एक मुलगी. तिचं लग्न विना जगणं नीलिमाताईंना बरं दिसत नव्हतं. तरीपण लेकीच्या हट्टा पायी त्यांनी मनावरचं ओझं कमी करण्यासाठी तिच्या अशा विधायक कार्याला साथ द्यायचं ठरविलं.
ती आता लहान बालकांमध्ये चांगलीच रूळली. लहान बालकांचं खाणं पिणं, रहाणे, त्यांचे कपडे इत्यादीसाठी लागणारे आर्थिक बळ तिच्याकडे होतंच. तसंही तिच्या सहकाऱ्यांची तिला भरपूर साथ होती. लहान बालकांची आंघोळ घालून देण्यापासून तर त्यांना खाऊ पिऊ घालण्यापासून सर्व कामे ती कधीकधी स्वतः करायची. तिने बालकांना सांभाळण्यासाठी पूर्णवेळ एक बाई ठेवली. सुंदर सुंदर कपडे घालायला मिळाल्यामुळे ही लहान बालके आपलं आदिवासी पाड्यावरचं जगणं विसरून गेलीत.
तिने सोबतीला एक सुरक्षारक्षक म्हणून रघुनाथ काकांना ठेवले. रघुनाथ काका तिच्या बाबांचे मित्र होते. तिचे बाबा गेल्यापासून त्यांनीच तिला अंग खांद्यावर खेळवलं होतं.
बालगृहात आता भरपूर बालकांचा गोतावळा तयार झाला . तिथे तिने समाजप्रतिनिधींच्या मदतीने पाण्याची सोय, स्वयंपाक गृह, मुलांना खेळण्यासाठी भरपूर खेळण्याचं साहित्य इत्यादी सर्व सोयी करवून घेतल्या.
तिने आता आपल्या आयुष्याचं संपूर्ण समर्पण या बालकांसाठीच देण्याचं ठरवलं. तिने शिक्षिकेची नोकरी सोडली. आणि बालकांच्या सेवेत संपूर्ण वेळ घालवू लागली.
बालकांच्या शिक्षणाची सोय तिने शेजारीच असलेल्या शाळेत करवून घेतली. त्या शाळेतील सर्व शिक्षिका तिच्या मैत्रिणी झाल्या. सर्व शिक्षिका तिला आपला आदर्श मानत.
शाळेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी बालगृहातील मुले नटून-थटून जात. तेव्हा तिला खूप आनंद होई. ती त्यांना अनेक बालगीतं शिकवीत असे. त्यामुळे बालके खूप आनंदी होऊन त्यांच्या आनंदाचा मोर थुई थुई नाचायचा.
अनेक भटक्या आदिवासींची मने जिंकून त्यांची छोटी छोटी बालके तिने बालगृहात आणली.
तिला सर्व बालके "माऊली" म्हणत.
एकदा एका छोट्या दोन वर्षाच्या बालकाच्या अंगात खूप ताप भरला. ताप काही केल्या उतरेना. ते बालक सतत माऊ माऊ म्हणून हाक मारत होतं.
त्या बालकाला त्याच्याच पेक्षा मोठ्या बहिणीने शाळेत नेलं होतं. ते बाळ खेळत खेळत शाळेच्या गेट जवळ गेलं. आणि तिथेच उन्हातच झोपी गेलं. शाळेतील शिक्षकांचं दुर्लक्ष झाल्यामुळे त्या बालकाच्या अंगात ताप भरला. नंतर एका शिक्षिकेने त्याला उचलून सुमेधाच्या स्वाधीन केलं.
त्या दिवशी तिने रात्रभर रडत त्या बाळा च्या उशाशी बसून त्याची सुश्रुषा केली. डॉक्टरांकडून उपचार करवून घेऊन त्याला बरे केले. अशी सर्व लेकरांची माय झाल्यामुळे सर्व बालके तिच्या अवतीभोवतीच खेळत.
"मातीमध्ये मायेचा, पाण्यामध्ये औदार्याचा, आणि बर्फात शितलतेचा गुण असतो."
तिचा स्वभाव असाच बनला होता. बर्फा सारखी शीतल असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तिचा आदर करीत.
बालगृहात अनेक सण सुद्धा साजरे होत. त्यानिमित्ताने सर्व मुलं मुली अंगणात पाणी शिंपून रांगोळ्या काढित. बालगृह सजवित. राखी पौर्णिमेला ही छोट्या बालकांसाठी ती सुंदरशा आकर्षक राख्या आणायची. बालकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून ती सुद्धा खूप आनंदी व्हायची.
यात बालगृह चे रघुनाथ काका सुद्धा आवडीने भाग घेत. दिवाळी हा सण तर खूपच धुमधडाक्यात साजरा होई. ती स्वतःच्या हाताने सर्व बालकांच्या अंगाला उटणे लावून आंघोळ घालीत असे.
एकदा वसुबारस च्या दिवशी च एका बालकाचा वाढदिवस आला. त्या दिवशी तिने सर्वांना एके ठिकाणी एकत्र बसविले. वसुबारस विषयी तिने मुलांना एक गोष्ट सांगितली.
बाळांनो, तुमचे सर्वांचे नाव ,आई तुम्हाला पाळण्यात घालून ठेवते ना!
सर्वांचे नाव तुमच्या आईने ठेवले. तुम्हाला पाळण्यात घातले. तुमची आई तुमच्यासाठी अंगाई म्हणते. त्याचप्रमाणे आपण गाईच्या वासरांचेही बारसे करतो. त्याला वसुबारस म्हणतात.
मग तिने मुलांना गाई विषयी ओव्या म्हणायला सांगितल्या.
ये ग ये ग गाई, चरुनी वरुनी!
तान्या बाळाला म्हणूनी, दूध देई!
गाई ग चरती, कोवळी कणसे
तान्या बाळाला छान छान, दूध पाजू!
गायी ग चरती, कोवळा चारा,
दुधाच्या चारीधारा, वासरांना!
अशा छान छान ओळी म्हणत लेकरांचा दिवस आनंदात जाई.
बालगृहात नवीन नवीन छोटी छोटी बालक बालिका येत. त्यांना शासनाच्या परवानगीने दाखल करून घेतल्या जात असे. अशी मुले प्रथम खूप त्रास द्यायची. परंतु ती आईच्या मायेने त्यांना आपलंसं करीत असे. आईची माया मिळाल्यामुळे बालकांना सुरक्षित वाटत असे.
बालकांना सुरक्षित स्पर्श कळतअसतो. असुरक्षित वाटल्यामुळे ती रडत असतात. त्यामुळे शिशु मनाचे अनेक पैलू, अनुभवाने तिला कळले होते. तिच्या सोबतच्या सहकाऱ्यांना सुद्धा या सर्व गोष्टींची सवय झालेली होती. बाळ रडत असलं की
त्याला कसं शांत करायचं, असं सवयीन त्यांना ज्ञात झालं होतं.
रघुनाथ काका आपलं सुरक्षारक्षकाचं काम चोख पार पाडीत असत. त्यांच्या गावाकडे त्यांची शेती होती. शेतीमध्ये मशागत करायला मधून मधून ते गावी जात.
एकदा ते शेतात ज्वारीची कणसे मशीन मधून काढत होते. काढतांना अचानक त्यांचा हात त्या मशीन मध्ये गेला. आणि ते कायमचे एका हाताने अधू झाले. कसेतरी त्यांचे प्राण वाचले.
अशा परिस्थितीत तिला आधाराची गरज असल्यामुळे तिने आईला आपल्याजवळ ठेवून घेतले. आई सुद्धा आनंदाने तिच्या बालगृहात येऊन तिच्यासोबत राहू लागली.
तिचे निरीक्षण जबरदस्त होते. तशी ती अधून मधून शाळांमध्ये व्याख्यानाला जायची. कारण की आता एक जबाबदार समाजसुधारक, बालकांचे मन जाणणारी, शैक्षणिक वातावरण जाणणारी, अनुभवी शिक्षिका होती.
तिला शाळांमधले पारंपारिक शिक्षण जरा विचित्र वाटायचे. तिचं नेहमीच वाक्य होतं. की" जो शिकतो त्याला प्रश्न पडतात. मग प्रश्न कोणी विचारायचे? शिक्षकांनी की विद्यार्थ्यांनी."
तिला आता बऱ्यापैकी यश मिळालं होतं. तिच्या ध्येयाचं चीज झालं होतं. छोटी छोटी बालके तिच्यावर जीव ओवाळून टाकत होती.
एकदा तिला या यशाचं गमक काय? असं विचारण्यात आलं. तिने शाळेच्या सभागृहात बोलताना एक छोटी गोष्ट सांगितली.
एक माणूस समुद्राच्या किनाऱ्यावर उभा होता. समुद्रातून अनेक बोटीये जा करीत होत्या. तो प्रत्येक बोटीकडे पहात होता. जवळजवळ दिवसभर तो तसाच उभा होता.. संध्याकाळी बोटी बंद होत आल्या. हालचाल मंदावली. तेव्हा दिवसभर बोट चालवणाऱ्या माणसाने त्याला विचारलं, "अरे दिवसभर मी पाहतोय, तू किनाऱ्यावरच उभा आहेस. तुझं कोणी येणार आहे का?" तेव्हा तो म्हणाला, "कुणी येणार नाही. मलाच पलीकडे जायचं आहे." तसा तो नाविक म्हणाला, "अरे मग दिवस भर बोटी येत आहेत, जात आहेत. तू एकदाही सांगितलं का नाहीस!"
तो म्हणाला, "अहो, मला कोणी विचारलंच नाही." नाविक हसत म्हणाला, "वेड्या, जायचं तुला आहे. सांगायला तू हवस. सांगितलं नाहीस तर आयुष्यभर असाच उभा राहशील का?"
यशाच्या बोटीचंही असंच असतं. ती बोट स्वतःहून येत नसते. आपल्यालाच तिच्याकडे जावं लागतं.
आपली ध्येये, आपली स्वप्न पूर्णत्वास जावी म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला मदतीची, सहकार्याची गरज असते. अशी मदत करणाऱ्या व्यक्ती ही जवळपास असतात. पण बरेच लोक विचारतच नाहीत. मी जेव्हा बालगृह तयार करण्याचं जे ध्येय बाळगलं होतं, तेव्हा मी माझ्या शिक्षकांची मदत घेतलीच ना!
यशाच्या दारातून आत पोहोचण्यासाठी दारातच ताटकळत बसणं योग्य नाही. आपले विचार इतरांना सांगून कृती केली पाहिजे. मात्र आपले ध्येय गाठण्यासाठी आपण कृतीच केली नाही, तर यश गाठताच येणार नाही.
असे प्रबोधन केल्यामुळे सर्व शिक्षक, शिक्षिका, इतर लोक तिचा आदर करू लागले. बालगृहातील लोक तिला 'आऊ' म्हणत.
आऊने रघुनाथ काकांची काळजी घेऊन व सुश्रुषा करून त्यांना बरे केले. त्यांचा एक हात अधू झाला, तरी त्यांनी बालगृहातील छोटी मोठी काम करण्यात स्वतःला झोकून दिले.
तिने आईची सुद्धा खूप काळजी घेतली. बालगृहातील सर्व लहान बालके स्वतःचे घर समजून तिथे लहानाची मोठी होत होती.
अशातच एकदा दुचाकी ने एका महत्त्वाच्या कामासाठी ती जात असताना तिच्या समोर एक अपघात झाला.
आता पुढे सुमेधाने काय केले, पाहूया पुढच्या भागात.
©®छाया राऊत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा