Login

समर्थांची लेक भाग ७

Story Of A Female Ghostbusters
समर्थांची लेक भाग ७



मागील भागात आपण पाहिले कि अक्षता पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत गेली होती. आता ती आली आहे सहलीला.. इथे काही वेगळे होणार कि तिची सहल सामान्यच असणार?


       बसमधून उतरल्या उतरल्या बाईंनी मुलांना सांगितले,"आपण सगळे त्या समोरच्या नवीन इमारतीत राहणार होतो. पण काल तिथे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वीज नाहीये. म्हणून त्यांनी आपली सोय या वाड्यात केली आहे. पण कोणीही मस्ती करायची नाही. कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. कबूल?"
" हो बाई." सगळे एकसुरात ओरडले. सगळेच त्या जुन्या वाड्यात राहण्यास उत्सुक होते. सगळ्यांनाच आत जायची घाई होती. त्याच गडबडीत कोणाचातरी अक्षताला जोरात धक्का लागला आणि ती धडपडली. उंबरठ्यावर तिला जोरात ठेच लागून रक्त यायला लागले. हे पाहून सगळे, आता बाईंचा ओरडा मिळणार म्हणून घाबरले. पण अक्षताने सावरून घेतले. 
       तो वाडा म्हणजे वाडाच होता. मोठी मोठी दालने. तिथे लावलेली तैलचित्रे. सगळी मुले हरखून गेली होती. मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळी दालने होती. दिवसभर झालेल्या प्रवासाने सगळेच दमले होते. त्यामुळे कधी एकदाचे जेवून झोपतोय असे प्रत्येकाला झाले होते. अक्षताला मात्र सतत कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे असे वाटत होते. पण झालेली दगदग आणि पायाला लागलेला मार यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष करून झोपायला जायचे ठरवले. ती झोपायला गेली खरी पण रात्रभर कोणीतरी तिला उठवत असल्याचा तिला भास होत होता.
         दुसर्‍या दिवशी तिकडचा प्रसिद्ध किल्ला बघायला जायचे ठरले होते. पण उठल्यानंतर अक्षताचा पाय भलामोठा सुजला होता. इथे तिच्या मदतीला आले तिचे जवळचे मित्र मैत्रीण मीत आणि सुपर्णा..
        " हे बघ अक्षू, तुला चालता येत नसेल तर आम्ही पण थांबतो तुझ्यासोबत. " मीत म्हणाला.
   " हो ना, तिथे टाईमपास करणार तो इथे करू. शेवटी आपण तिघे एकत्र असणे महत्त्वाचे." सुपर्णाने त्याची री ओढली.
   " नको, मला कसे तरी वाटते. एक काम करू. तुम्ही मला मदत करा. मी किल्ल्याच्या पायथ्याशी बसते. तुम्ही फिरून या नाहीतरी दिवसभर इथे थांबून आपण सगळेच कंटाळणार ." अक्षताने तोडगा काढला.
" ओके", असे म्हणत हे तिघे निघाले. मीत आणि सुपर्णा किल्ला बघायला गेले. अक्षता तिथेच एका हाॅटेलमध्ये बाईंना सांगून बसली. तिचा सुजलेला पाय आणि नंतर एवढ्या मुलांच्या जेवणाची ऑर्डर बघून मालकानेही काही आक्षेप घेतला नाही. थोडीशी शांतता आणि एकांत मिळाल्यावर परत अक्षताच्या डोक्यात कालचे विचार घोळू लागले. 'खरच कोणीतरी आपल्याला उठवत होते कि भास झाला? आणि हे सगळे या दोघांना सांगू कि नको?' गावात असलेले दत्त मंदिर आणि पंत जरी प्रसिद्ध असले तरी बाकीची माहिती खूप कमी जणांना होती. आणि अक्षता मीत आणि सुपर्णाशी बाकी सगळे बोलत असली तरिही हि गोष्ट मात्र गुपितच होती. विचार करूनही काहीच सुचेना तसा तिने घरी फोन लावला. पंतांचा कटाक्ष असल्यामुळे सगळेच मोबाईल वगैरे अगदीच गरजेपुरते वापरायचे.
  "हॅलो, आई मी पोचले इथे."
  "बरी आहेस ना?"
   " हो, पायाला थोडे लागले आहे. पण आता बरी आहे. ऐकना बाबा आहेत का तिथे?"
   " थांब देते."
    "बाबा," खरेतर अक्षता सांगू कि नको असा विचार करत होती. पण तिने सांगायचा निर्णय घेतला," मला ना काल इथे कोणीतरी सतत लक्ष ठेवून आहे असा भास होतो आहे."
 श्रीरंगपंत थोडेसे गंभीर झाले. त्यांना अक्षताच्या सहाव्या इंद्रियाची कल्पना होती. म्हणूनच ते तिला एकटीला कुठे पाठवायला तयार नसत.
  " बेटा , मी तिथे यायची गरज आहे का?"
  " गरज अजून तरी वाटत नाही मला."
   "ठिक आहे. पण ती माळ सतत सोबत ठेवत जा आणि गुरूदेव सतत पाठिशी आहेत हे लक्षात ठेव."
  " हो बाबा. ठेवू आता फोन? हे सगळे आले आहेत. "
   पंतांनी फोन ठेवला, पण कसल्यातरी संकटाची चाहूल लागल्यासारखे त्यांना झाले. त्यांनी लगेच मंदिरात जाऊन ध्यान करायला सुरुवात केली.
      इकडे संध्याकाळी सगळ्या मुलांची धमाल चालली होती. गाणी, अंताक्षरी, शेकोटीभोवती डान्स सगळे करून झाले. दिवसभर फिरून पाहिलेला किल्ला, संध्याकाळचा हा कार्यक्रम सगळे अगदी दमले होते. त्यामुळे अंथरूणात पडल्या पडल्या सगळे झोपी गेले. अपवाद फक्त एक तो म्हणजे अक्षता. दिवसभर तसे काहीच न केल्याने तिला आज झोप येत नव्हती. पण आजूबाजूला सगळे झोपले असल्यामुळे तिला काय करावे हे सुचत नव्हते. आणि अचानक एक आवाज यायला लागला, " सोडव मला यातून, सोडवशील का?" तशी अक्षता भित्री नव्हती पण या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत काय करावे तिला सुचेना. तिला तिच्या बाबांचे शब्द आठवले आणि तिने माळ घेऊन जपाला सुरुवात केली....
         दुसर्‍या दिवशी धरण पाहायला जायचे होते. अक्षताने आज न जाण्याचे ठरवले होते. तिने मीत आणि सुपर्णाला तसे सांगितले. 
" अग, पण तू कंटाळशील एकटी."
"नाही कंटाळणार. माझ्याकडे माझी पुस्तके आहेत."
" पण तुला सोडून कसे जाऊ आम्ही?"
" हे पाहा तीन चार तासांचा प्रश्न आहे. तुम्ही जाऊन याल सुद्धा.माझी खरेच काळजी करू नका. तुम्ही थोडी तरी मजा करा."
जाताना बाईंनीही सांगितले," तू म्हणते आहेस म्हणून तुला एकटीला सोडतो आहोत. खाली त्या मावशी आहेत. तुला वाटले तर तिथे बस नाहीतर इथे थांब. त्या तुझे खाणेपिणे बघतील. काही लागले तर आमचे नंबर आहेतच. कधीही फोन कर."
      शेवटी सगळे गेले. मावशीही जाणार इतक्यात अक्षताने त्यांना थांबवले.
" मावशी वेळ आहे का थोडा तुमच्याकडे?"
" नाही ग , बरीच कामे पडली आहेत. तुला काही हवे का?"
" हवे असे नाही, पण थोडी उत्सुकता वाटली?"
" कसली ग पोरी?"
" बघा ना एवढा मोठा वाडा, एवढा जुना. मग त्याची काही तरी गोष्ट असेलच ना? शनिवारवाड्यासारखी?"
" बाई, बाई तु मुलगी आहेस कि कोण?"
" काय झाले मावशी?"
  "तुला भिती नाही का वाटत?"
" मावशी तुम्ही त्या दत्त मंदिरात गेला आहात का कधी?"
 " हा काय प्रश्न? ते मंदिर आणि पंत यांना ओळखते मी."
" मावशी , मी त्या पंतांची मुलगी."
" हो का? आधी तरी सांगायचे .. 
तुला गोष्टच ऐकायची ना वाड्याची. चल खाली. एका बाजूला माझी कामे करते दुसरीकडे सगळे सांगते." मावशींचा आवाज पटकन बदलला..
" हा वाडा ना दिडशे वर्षांपूर्वी बांधला आहे असे म्हणतात.. खूप माणसांची ये जा असायची इथे..एवढाला स्वयंपाक व्हायचा..अशी जुनी माणसे सांगतात.पण हळूहळू सगळे संपायला लागले. माणसे दूर जायला लागली. आता तर मालक पण इथे रहात नाहीत. कधीतरी येतात. घर नांदते रहावे म्हणून आम्ही राहतो. आणि गेले काही वर्ष काय म्हणता तसे हेरिटेज घर म्हणून राहायला देतो."
" अच्छा. पण मग एवढ्या मोठ्या वाड्यात कधी बाकीच्या गोष्टी नाही ऐकू आल्या?"
" आहेत ना.. असे म्हणतात कि मालकांचे एक कोणी तरी वाडवडिल होते. ते नेहमीच कसलीतरी अनुष्ठान करायचे. ते करता करताच एकदा ते नाहिसे झाले. त्यानंतर या वाड्यातून वेगवेगळे आवाज यायचे. तुझा विश्वास नाही बसणार , काही वर्ष वाडा ओस पडला होता. तेव्हा बहुतेक कोणीतरी त्यांचा बंदोबस्त केला. पण अजूनही एकट्या दुकट्याची इथे रात्री राहायची हिंमत होत नाही. "
 अक्षताला आता कोण तिच्याकडे बघत होते ते कळल्यासारखे वाटले.
"बर मावशी, माझा ना पाय थोडा दुखायला लागला आहे. मी वर जाऊन झोपते. थोड्या वेळाने जेवायला येते खाली."
" अग पण इथेच झोपतेस का? माझेपण लक्ष राहील."
" नको, मी वरती पुस्तक वाचत झोपते. "
"ठिक. . काही लागले तर सांग.."
   अक्षता दुखरा पाय घेऊन वर गेली. तिथे ती काय शोधत होती ते तिलाच माहीत नव्हते. हातात नेहमीची माळ होतीच. ती वरच्या दालनांमध्ये फिरायला लागली. परत तिला तोच आवाज येऊ लागला.. जसजशी ती त्या दिशेने जायला लागली तसतशी तो आवाज मोठा होऊ लागला. शेवटी ती एका बंद दालनासमोर आली. आधी तिला वाटले कि दालनाला कुलूप आहे, पण काळजीपूर्वक पाहिल्यावर दिसले कि त्याचा दरवाजावर असे नक्षीकाम केले होते कि कुलूप असावे. तिने मावशींचा कानोसा घेतला. कोणीही नाही पाहून तिने दरवाजा हलकेच ढकलला.......
 



पुढील भागात पाहू दरवाजाच्या पाठी काय आहे?

हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.. निव्वळ मनोरंजन हाच उद्देश आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही..

 कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका. 
सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all