Login

सामर्थ्य भक्तीचे : वेळ पुनर्मिलनाची : भाग दुसरा

खंडोबावर अगाध श्रद्धा असलेले म्हाळसा आणि सदाशिव एका दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे एकमेकांपासून वेगळे होतात आणि भगवंताच्या एका कार्यासाठी पुन्हा जन्म घेतात. या जन्मात म्हाळसा आणि सदाशिव एक होतील का? काय असेल त्यांचे कार्य? हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचत रहा!
सन : १९८८

वेळ : मध्यरात्रीची

स्थळ : जेजुरीमधील एक गाव.

दादासाहेब जगतापांच्या घरात सध्या चिंतेचे वातावरण होते. त्यांची सून, ताराला प्रसूतीकळा सुरु झाल्या होत्या. तिला इस्पितळात नेणे गरजेचे होते मात्र दादासाहेबांच्या आईच्या हट्टामुळे त्यांना तिचे बाळंतपण घरीच करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक अख्ख इस्पितळच वाड्याच्या वरच्या भागात तयार केलं होतं. का तर त्यांच्या सुनेला काहीच कमी पडू नये. ते आणि त्यांचा मुलगा ओटीवर बसले होते तर, त्यांची आई त्यांची नात सून आणि बाळ सुखरूप सुटू दे असे खंडोबाला साकडं घालत होती. बराच होऊनही काही खबरबात न आल्याने दादासाहेबांच्या आईने, रखमाबाईंनी सखूला हाक मारली.

“जी आईसाहेब तुम्ही, हाक मारलीत का?” सखू अगदी अदबीने त्यांना विचारू लागली तसे त्या कापऱ्या आवाजात म्हणाल्या, “अगं किती वेळ लागतो आहे? काही अडचण तर नाही ना? मला आता भीतीच वाटू लागली आहे.”
“आईसाहेब थोडा आणखी धीर धरा. ताराबाईसाहेब थकल्या आहेत त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. तुम्ही काळजी नका करू, तो खंडोबा आहे ना सगळं नीट करेल. मी आहे वर. काही लागलं तर हाक मारा.” असे सांगून सखू तिच्या कामाला जाते.

दादासाहेब मात्र दारावर नजर लावून होते. कुणाच्या तरी येण्याची वाट ते पाहत होते. त्यांना दोन दिवसापूर्वीचा प्रसंग जशाच्या तसा आठवत होता. त्या दिवशी ते जेजुरीला गेले होते आणि तिथे त्यांची भेट एका व्यक्तीशी झाली. त्या व्यक्तीने केलेले भाकीत ऐकून त्यांना धक्काच बसला होता. मात्र आपल्या नातवावर खंडोबाचा वरदहस्त असेल याचा त्यांना आनंद झाला होता. त्यांनी त्या व्यक्तीला त्याची ओळख विचारली पण ती व्यक्ती अचानक गायबच झाली. ती व्यक्ती “तुमच्या सुनेच्या प्रसूतीच्या वेळी येईन. मी आलो की मगच तिची सुटका आणि त्याचा जन्म होईल. त्याच्यावर खंडोबाचा वरदहस्त आहे आणि मागच्या जन्मी उरलेले कार्य करायला त्याला जन्म घ्यावाच लागेल. त्यामुळे निवांत रहा आणि हा भंडारा तुमच्या सुनेला लावायला सांगा. त्याच्या जन्माच्यावेळेपासून ते नंतर मी कायम त्याच्यासोबतच असेन.” असे भाकीत करून कुठे गायब झाली हे त्यांना समजेनाच. जेजुरीत सगळीकडे शोध घेतला त्यांनी पण ती व्यक्ती कुठे न सापडल्याने त्यांनी घरचा रस्ता धरला. दोन वाजून गेले तरी तारा अजूनही मोकळी झाली नव्हती. त्यामुळे ते देवघरात आले. तिथे आधीपासूनच त्यांच्या आईसह बसलेला त्यांचा मुलगा, विश्वजित त्यांना दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण त्यांना दिसून येत होता. त्याचे आणि ताराचा प्रेमविवाह होता. त्यांनी तारालाही स्वतःच्या मुलीप्रमाणेच जपले होते. तिचा विचार येताच त्यांनी खंडोबासमोर हात जोडले आणि ती व्यक्ती लवकर येऊ दे जेणेकरून तारा मोकळी होईल. त्यांनी ही अशी प्रार्थना करताच दारात घुंगरांचा आवाज आला. त्यांनी लागलीच धाव घेतली हे पाहून विश्वजित व रखमाबाईंही त्यांच्या पाठोपाठ गेल्या.

डोक्यावर बांधलेला गुलाबी रंगाचा फेटा, गूढघ्यापर्यंतचे सफेद धोतर, पायात चांदीचे जाड असे तोडे, एका हातात जाडसर असा चांदीचा कडा, गळ्यात कवड्याची माळ, कपाळभर लावलेला भंडारा अशा अवतारातील माणसाला पाहून दादासाहेब गोंधळतात पण रखमाबाईंच्या नजरेतून त्या माणसाच्या चेहऱ्यावरील तेज काही सुटत नाही. त्या लागलीच त्याला आत येण्यास सांगतात. मात्र ती व्यक्ती आत यायच्या आधी “ही कवड्याची माळ, हे खुरपं आणि ही भंडाऱ्याची पिशवी तुमच्या सुनेच्या खोलीत नेऊन ठेवा. मगच मी घरात प्रवेश करेन.” असे सांगते. त्यामुळे त्या वस्तू घेऊन विश्वजित तातडीने ताराच्या खोलीजवळ जातो. अवघ्या १०व्या मिनिटाला तो परत प्रवेशद्वारापाशी येतो.
“ठेवून आलो मी सगळ्या वस्तू. तुम्ही आता या घरात” असे त्याने सांगताच ती व्यक्ती वाड्यात पहिले पाऊल टाकते आणि तेव्हाच बाळाच्या रडण्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमू लागतो. त्यासरशी रखमाबाई आणि दादासाहेब त्या व्यक्तीच्या पायाच पडतात.
“उठा तुम्ही दोघे आधी. तुम्ही तिघे आधी बाळाला बघून या. मग आपण निवांत बोलू आणि आतापासून मी इथेच असणार आह. जा बघू” त्या व्यक्तीने असे सांगताच ते तिघे आज्ञाधारक मुलाप्रमाणे ताराच्या खोलीत जातात.

विश्वजितने बाळाला हातात घेतल्यावर त्याचा ऊर आनंदाने भरून आला होता. बाळाच देखणं रूप पाहून सगळेच हरखून गेले होते. त्याच्या हातावर असलेली बेल पत्राची खूण तो खंडोबाचा अंश असल्याची ग्वाही देत होती. दादासाहेब त्या बाळाला घेऊन त्या व्यक्तीजवळ आले व त्यांच्या हातात बाळाला दिले.

“खंडोबाचा वरदहस्त कायम तुझ्यावर असणार आहे. त्या मागच्या जन्मातही होत्या आणि या जन्मातही असणार आहे. गेल्या जन्मी तुला आई-वडील, कुटुंब नसल्याची खंत होती. त्यामुळे या जन्मात खंडोबाने ती उणीव भरून काढली आहे. तुला तुझे कार्य तर पूर्ण करायचे आहेच पण ते तुझ्या अर्धांगिनीशिवाय शक्य नाही. गेल्या जन्मात अर्धवट राहिलेला संसार तुम्हाला या जन्मात पूर्ण करायचा आहे. गेल्या जन्मी मिळालेल्या शक्ती, ताकद या जन्मीही तशाच अबाधित आहेत. गेल्या जन्मी ती अग्नी आणि तू पाणी होतास तर, या जन्मी तू अग्नी आणि ती पाणी असणार आहे. तुझा जन्म म्हणजे त्याचा अंत जवळ आला आहे. या संपूर्ण जेजुरीत तुझ्यासारखा भक्त शोधूनही सापडणार नाही. सदैव आनंदी रहा. शुभम भवतु!” असे बोलून ती व्यक्ती बाळाला विश्वजितकडे देते आणि “तुझ्या पदरी स्वतः भगवंताचा अंश आहे तेव्हा याला जप. याचा अर्थ त्याला डोक्यावर बसवायचं नाही तर, त्याला माणूस म्हणून घडवायचा आहे. तुमचे संस्कारच त्याला प्रत्येक वेळी योग्य मार्ग दाखवतील. आवश्यक तिथे प्रेम आणि शिस्त यावर भर द्या तुम्हा सगळ्यांनी” असा उपदेश त्याला करते.

विश्वजित बाळाला घेऊन गेल्यावर दादासाहेब त्या व्यक्तीला “तुम्ही कोण म्हणायचे?” असा प्रश्न विचारतात. त्यांच्या मनी सुरु असलेली घालमेल लक्षात घेऊन ती व्यक्ती “तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणार पण इथे अशी चारचौघात नाही.” असे बोलते व दादासाहेब त्या व्यक्तीला त्यांच्या स्टडीरुममध्ये घेऊन जातात.

“बसा दादासाहेब, इतकी काळजी करण्यासारखे काही नाही. उलट आता तुमच्या शत्रूंनी काळजी केली पाहिजे. तुमच्या व्यवसायाला चारचाँद लावणार आहे तुमचा नातू!” ती व्यक्ती.

“तुम्ही आता जे भाकीत करत आहेत ते खरं असेल ही पण तुम्ही नक्की कोण म्हणायचे? तुमची ओळख तरी कळू दे आम्हाला?” दादासाहेब.

“हो नक्कीच सांगणार मी. त्यासाठीच तर आलो आहे. तुमच्या आईलाही बोलावता का?” ती व्यक्ती.

दादासाहेब लागलीच रखमाबाईंना बोलवणे धाडतात. त्या येताच ती व्यक्ती बोलायला सुरुवात करते.

“मी कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर, मी देवाचा माणूस ही इतकी ओळख तुम्हाला पुरेशी आहे का?” ती व्यक्ती

“अहो तुम्ही देवाचा माणूस आहात हे मी केव्हाच ओळखले मात्र माझ्यासाठी ती पुरेशी नाही कारण प्रश्न माझ्या पणतूचा आणि त्याच्या भविष्याचा आहे.” रखमाबाई

“मी देवाचा माणूस, इथे तुमच्या जगात मी धनगर समाजात राहतो. माझा इथे यायचा उद्देश एकच म्हाळसा आणि सदाशिव! त्या दोघांना त्यांचा गतजन्म आठवेपर्यंत तुमच्या नातवाची म्हणजेच, मार्तंडची सुरक्षा करणे ही माझ्यावर असलेली जबाबदारी आहे आणि त्यासाठीच मी इथे आलो आहे. सध्यापुरतं माझं नाव पिंगलाक्ष” ती व्यक्ती.

“म्हाळसा आणि सदाशिव कोण आहेत? त्यांच्याविषयी आम्हाला तुम्ही काही सांगू शकाल का?” दादासाहेब.

“सगळंच नाही पण थोडक्यात सांगू शकतो.” पिंगलाक्ष

“चालेल आम्हाला” रखमाबाई

“म्हाळसा आणि सदाशिव दोन्ही खंडोबाची लेकरे. त्यांचा जनम कसा आणि कुठे झाला हे त्यांना कुणालाही ठाऊक नव्हते. अगदी त्यांना स्वतःला सुद्धा. म्हाळसाने तर स्वतःच स्वतःचे नाव ठेवले होते. प्रेम होतं तिचं खंडोबावर. तो देईल ते सर्वोत्तमच असेल हीच धारणा होती तिची आणि निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करत राहिली. तिच्याजवळ जन्मतःच काही शक्ती होत्या हे तिला स्वतःलाच वयाच्या १५व्या वर्षी उमगले. हे आपल्यालाच मिळालं आहे म्हणजे खंडोबाची विशेष मर्जी आहे आपल्यावर समजताच ती गावोगावी फिरत राहिली. त्यावेळी स्त्रीशिक्षणाला इतके महत्त्व नव्हते पण तिला वाचता-लिहिता येत होतं. हे मात्र आजतागायत कुणाला समजलं नाही. पुढे…” असं करत पिंगलाक्ष त्या दोघांविषयी सगळं सांगतात मात्र त्याबरोबरच हातचं राखूनही ठेवतात.

“म्हाळसाने जन्म घेतला असेल का?” दादासाहेब

“पृथ्वीवर यायच्या तयारीत आहे.” पिंगलाक्ष

“म्हणजे?” रखमाबाई

“उद्या तिचा जन्म होईल. मला तिकडेही जावे लागेल.” पिंगलाक्ष

“कुठे?” दादासाहेब

“ते मला आताच सांगता येणार नाही. मलाही काही मर्यादा आहेत.” पिंगलाक्ष

“तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी चहा पाठवते.” रखमाबाई

“नको, आता तुम्ही सगळ्यांनी थोडा आराम करा आणि मी जे सांगितलं ते ताराशिवाय कुणालाही सांगू नका.” पिंगलाक्ष

“तुम्हीच बोलाल का तिच्याशी?” रखमाबाई

“मला तर बोलावंच लागेल. मार्तंडला घडवण्यात तिचा आणि तुमचाच जास्त हातभार लागणार आहे. मला माझी खोली दाखवा मी जरा वेळ आराम करतो.” पिंगलाक्ष

“पण तुमची ओळख काय सांगू?” दादासाहेब

“तुमच्या मुलासाठी धनगर समाजातील देवाचा माणूस आणि इतरांसाठी ताराचा भाऊ.” पिंगलाक्ष

एकदा ताराच्या खोलीत डोकावून तिथे शांतपणे झोपलेल्या लहानग्या मार्तंडला पाहिल्यावर पिंगलाक्ष त्याला दिलेल्या खोलीत येतात. “मार्तंड तर आला मग आता भैरवी कशी राहील तीही येईल.” असा विचार मनोमन करून ते पलंगावर निजतात.