मध्यरात्री अचानक जगतापांच्या वाड्याचा दरवाजा वाजू लागला. तसे सगळेच झोपेतून दचकून उठले तर, पिंगलाक्ष सावध झाले. कोणीतरी त्यांच्यासाठी सांगावा घेऊन आल्याचे त्यांना मनोमन जाणवले पण दुसऱ्याच्या दारात राहताना पटकन कसं जायचं? विचार त्यांच्या मनाला सतावत होता. मात्र मार्तंडचा विचार येताच ते घाईतच बाहेर गेले पण त्यांच्याआधीच घरातील नोकर, श्यामाने दरवाजा उघडला होता. दाराबाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला डोक्यापासून ते पायापर्यंत न्याहाळल्याने श्यामा काही विचारणार इतक्यात तीच व्यक्ती बोलायला सुरुवात करते.
“दादासाहेब आहेत का घरात? माझं फार महत्त्वाचं काम होतं त्यांच्याकडे” ती व्यक्ती.
“हो आहे पण तुम्ही कोण म्हणायचे?” श्यामा.
“ते मी त्यांनाच सांगेन. तुम्ही त्यांना बोलवता का?” ती व्यक्ती.
त्या व्यक्तीचा आवाज ऐकून पिंगलाक्ष पुढे काही बोलणार इतक्यात तिथे दादासाहेब आणि विश्वजित येतात. त्या व्यक्तीला पाहून ही व्यक्ती पिंगलाक्ष यांना भेटायला आल्याचा अंदाज येताच दादासाहेब “विश्वा, तुम्ही जाऊन खोलीत आराम करा. यांना आम्ही ओळखतो आम्ही यांना भेटून घेतो.” असे म्हणतात. फडत्या फळाची आज्ञा घेऊन विश्वजित आल्या पावलीच त्याच्या खोलीत जातो.
“श्यामा, चहा बनवशील का रे? माफ कर तुला इतक्या रात्रीचे सांगतो आहे.” दादासाहेब.
“माफी कसली मागताय मोठे मालक? मी लगेच घेऊन येतो.” श्यामा.
“पिंगलाक्ष यांच्या खोलीत घेऊन ये.” दादासाहेब.
“हो” श्यामा.
“तुम्ही अजून दारात का थांबला आहात. घरात या.” दादासाहेब.
“हो” ती व्यक्ती.
त्या व्यक्तीने घरात पाऊल टाकताच सर्वत्र सकारात्मक लहरी वाहू लागल्याचे दादासाहेबांना जाणवते. ती व्यक्ती अलगद पाऊले टाकत पिंगलाक्ष व दादासाहेबांच्या मागे खोलीत जाते व पिंगलाक्ष यांनी इशारा केलेल्या घोंगडीवर बसते. त्या दोघांना जमिनीवर बसलेले पाहून दादासाहेबही जमिनीवर बसतात.
“दादासाहेब, तुमची ओळख करून देतो. हा सुभान आमच्यासारखाच देवाचा माणूस आहे. शेजारच्या गावात राहतो. खंडोबाचा निस्सीम भक्त आहे अगदी तुमच्यासारखा!” पिंगलाक्ष.
“ते देवाचा माणूस आहेत हे मी त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजानेच ओळखलं आहे.” दादासाहेबांनी हे बोलायला आणि श्यामाने खोलीत यायला एकच वेळ झाली. आधी तर त्याने सगळ्यांना चहा दिला आणि त्यानंतर सरळ सुभानाच्या पायावर डोके ठेवले. हे पाहून सुभान गांगरून पिंगलाक्ष यांच्याकडे पाहू लागला.
“अहो, दादा तुम्ही माझ्या पाया का पडताय तेही माझ्या गुरुंसमोर!” सुभान.
“तुमचे गुरु?” श्यामा.
“पिंगलाक्ष” सुभान.
त्यावर लगेचच पिंगलाक्ष यांना लोटांगण घालण्याच्या तयारीत असलेल्या श्यामाला ते रोखतात आणि त्यांच्या बाजूला बसवतात.
“हे बघ श्यामा, पाया देवाच्या पडायचं आमच्या नाही! आम्ही फक्त देवाच्या आज्ञेचे पालन करणारे आहोत.” पिंगलाक्ष
पिंगलाक्षच्या बोलण्यावर श्यामाने आपली मान होकारार्थी हलवली आणि अंग चोरून त्यांच्या बाजूला बसला.
“सुभानराव तुम्ही इतक्या रात्री आला आहात म्हणजे काहीतरी महत्त्वाचे असणार ना?” दादासाहेब.
सुभान एकदा पिंगलाक्ष यांच्याकडे बघून बोलायला सुरुवात करतो.
“दादासाहेब, मी तुमच्या मुलासारखा आहे तर, तुम्ही मला अहो जाहो न करता अरे तुरे करा. मी लहान आहे तुमच्यापेक्षा! मी बरोबर बोलतोय ना बाबा?” सुभान.
“होय लेका!” पिंगलाक्ष
“हा तुमचा मुलगा आहे का?” दादासाहेब.
“नाही पण अशी अनेक देवाची माणसे आहेत जी मला बाबा म्हणूनच हाक मारतात. अगदी मार्तंडही याच नावाने हाक मारेल. विषयांतर नको व्हायला. त्यामुळे सुभाना तू सांग का आलास?” पिंगलाक्ष.
“बाबा, कृपालला मार्तंड आणि भैरवीच्या जन्माविषयी समजलं आहे आणि त्याने मध्यंतरी कसलासा विधीही केला होता पण त्याविषयी फार काही माझ्या हाती लागलं नाही. आपल्याला सावध राहायला हवंय, हे सांगायला आलो आहे मी” सुभान.
“खरंतर मला याची कल्पना होतीच आणि मी त्याविषयी शूलपाणी यांच्याशी बोलून घेतलं आहे. त्यामुळे आपण सध्या तरी निवांत राहू. मार्तंडच बालपण अनुभवू.” पिंगलाक्ष.
“मला स्पष्ट करून सांगाल का?” दादासाहेब.
“कृपालदेव हा सूर्यभानचा गुरु आहे आणि इतकीवर्षे तो साधनेच्या जोरावर जिवंत राहिला आणि आता तो सूर्यभानच्या जन्माची वाट बघतो आहे. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून त्याने तो विधी केला असेल पण तो भैरवीला हात लावू शकणार नाही. मात्र मार्तंडबाबत आपण सावध राहायला हवंय.” पिंगलाक्ष.
“याचा अर्थ सूर्यभानचाही पुनर्जन्म निश्चित आहे?” दादासाहेब.
“हो! हे म्हाळसा, सदाशिव आणि सूर्यभानचा विधिलिखित आहे. जे आपण टाळू शकणार नाही.” पिंगलाक्ष.
“तो कुठे जन्म घेईल याचा शोध लावता येईल का आपल्याला? म्हणजे मुलांची सुरक्षा करता येईल ना!” दादासाहेब.
“दादासाहेब, तुम्ही आधी तर मुलांची काळजी करूच नका. सूर्यभान कुठे जन्म घेईल हे मला तुम्हाला सांगता येणार नाही कारण मलाही काही बंधने आहेत आणि ती मला पाळायलाच हवी पण खात्री बाळगा, मुलांच्या केसालाही धक्का लागणार नाही.” पिंगलाक्ष
“मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मार्तंडसाठी तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल याची मला खात्री आहे. तुम्हाला आमची काही मदत लागणार असेल तर सांगा.” दादासाहेब.
“दादासाहेब, मुलांना काही होणार नाही याची खात्री जरी असली तरी आपण सुरक्षेचे काही उपाय करायला हवेत. त्यात तुमचा व्यापारही वाढतो आहे तर तुम्ही सगळ्यात कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमा आणि माझ्यावर तारा आणि मार्तंडची सुरक्षा सोपवा. मी पहाटे वाड्याभोवती एक सुरक्षाचक्र लावतो. तुम्ही फक्त माझे ताराशी बोलणे करू द्या.” पिंगलाक्ष.
“हो मी पहाटेच तिला इथे घेऊन येतो आणि सुरक्षा रक्षकही उद्याच नेमतो.” दादासाहेब.
“बाबा, मलाही घ्या मदतीला! माझाही खारीचा वाटा लागू द्यात तुमच्या कार्याला!” श्यामा.
“अरे खारीचा का? तुझा तर सिंहाचा वाटा आहे या कार्यात!” पिंगलाक्ष.
“म्हणजे? मला समजले नाही.” दादासाहेब.
“अहो, आताच सगळं कसं सांगू पण देवाच्या कार्यात श्यामा, तुमचा, रखमाबाई, तारा आणि इतरही अशी काही व्यक्तित्व आहेत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. हळहळू सर्व कळलेच आणि श्यामा तुझ्यावर एक महत्त्वाची जबाबदारी आहे.“ पिंगलाक्ष.
“कोणती?” श्यामा.
“आम्ही घरात नसताना घरी कोण्या अनोळख्या व्यक्तीला घरात घ्यायचं नाही मग ती स्त्री असो किंवा पुरुष! त्यातही कोणी वेषांतर करून आलेच तर त्यावेळी काय करायचे हेही मी तुला सांगेन.समजले ना?” पिंगलाक्ष.
“हो!” श्यामा.
“दादासाहेब, सुभानाला इथे कामाला लावून घेऊ शकतो का? म्हणजे माझ्या अडीनडीला त्याची मदत होईल.” पिंगलाक्ष.
“पिंगलाक्ष नक्कीच आपण त्याला इथे नोकरीला ठेवू शकतो. सुभाना तू माझ्या सुरक्षारक्षकाच काम कर चालेल! म्हणजे इथेही कोणाला संशय यायला नकोय.” दादासाहेब.
“हो चालेल!” सुभान.
“बर चला मी येतो तुम्हीही आराम करा.” दादासाहेब.
“बाबा मीही येतो.” पिंगलाक्ष.
“सुभान, तू थोडावेळ आराम कर आणि लागलीच कोल्हापुरात जा.” पिंगलाक्ष.
“शूलबाबांना भेटायचं आहे का?” सुभान.
“हो, त्यांना निरोप दे मी तातडीने भेटायला बोलवलं आहे. दुपारच्या आत यायला सांग त्यांना गडावर” पिंगलाक्ष.
“बाबा, कसला विचार करत आहात?” सुभान.
“सूर्यभान जन्म घेणार आहे आणि तेही याच परिसरात!” पिंगलाक्ष.
“म्हणजे बाबा, आता नाही पण येणार काळ कठीण असेल का?” सुभान.
“हे मी आताच नाही सांगू शकत सुभाना पण मला त्या कृपालाचे मनसुबे काही ठीक वाटत नाहीयेत.तू अल्केशला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून आला आहेस ना?” पिंगलाक्ष.
“हो बाबा!” सुभान.
“आणि शूलच्या मदतीला तू कोणाला पाठवलं आहेस?” पिंगलाक्ष
“भामा जाणार आहे.” सुभान.
“योग्य व्यक्तीला पाठवलं आहेस तू! आता तू आराम कर आणि मग नाश्ता वैगरे करून शूलकडे जा. त्याला भेटून पुढची आखणी करायला हवी.” पिंगलाक्ष.
“ठीके” सुभान.
सुभान खोलीतच खांद्यावरची घोंगडी जमिनीवर अंतरून त्यावरच आडवा झाला. पिंगलाक्ष मात्र शुचिर्भूत व्हायला गेले. आजचा दिवस त्यांच्यासाठी खास तर होताच पण त्याहीपेक्षा अनपेक्षित वळण घेऊन ठरणाराही होता.
काही वेळाने ते महामृत्युंजय मंत्राचा जाप करत वाड्याभोवती भस्माचे आरेखन काढतात आणि देवघरात जातात. नेमके त्याचवेळी देवघरापासून लांब अंतरावर असलेली तारा त्यांना पाहते. या व्यक्तीला आपण कुठेतरी पहिले आहे पण कुठे हेच तिला आठवेना. ती विचारात हरवलेली असतानाच तिला पिंगलाक्ष पाहतात. तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहणाऱ्या पिंगलाक्षना पाहून तिच्या हृदयात मात्र कालवाकालव होते. तिची ही अवस्था लक्षात येताच पिंगलाक्ष तिला त्यांच्यामागे खोलीत येण्यास सांगतात. मार्तंडला तिने रखमाबाईंजवळ दिले होते. त्यामुळे तीही ते कोण आहेत हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने त्यांच्या खोलीत जाते.
“बाळ, इथे बस आधी.” पिंगलाक्ष
त्यांचे हे प्रेमळ बोलणे ऐकून ताराला उगाचच गळा दाटून आल्यासारखे होते. काहीतरी बंध होते का तिचे त्यांच्याशी असा प्रश्नही तिच्या मनात येतो पण चेहऱ्यावर तसे न दाखवता त्यांनी पुढे केलेल्या एका खुर्चीत बसते. मात्र ते जमिनीवरच्या घोंगडीवर बसल्याने तिला अवघडल्यासारखे होते.
“बाळा, हळूहळू तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तोवर धीर धर आणि फार विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस.” पिंगलाक्ष.
“तुम्ही कोण आहात?” तारा.
“मी पिंगलाक्ष. एका विशिष्ट कार्यासाठी इथे या घरात आलो आहे मी. तुझ्याशी मी आडपडदा न ठेवता स्पष्ट बोलणार आहे मी. मी आधी बोलून घेऊ मग तुला काही शंका असतील तर त्या विचार” पिंगलाक्ष.
“हो चालेल.” तारा.
त्यानंतर म्हाळसा-सदाशिव ते आतापर्यंत मार्तंड भैरवीविषयी तिला सांगतात. हे सगळे ऐकतानाच आपल्या पोटी देवाचा अंश आल्याचे समाधान तिला वाटते.
“तारा, मार्तंडला आई म्हणून तूच चांगले धडे देऊ शकतेस आणि तुझ्यात ते सामर्थ्य आहे म्हणून तर देवाने तुझीही या कार्यासाठी निवड केली ना!” पिंगलाक्ष.
“माझ्या लक्षात आलं आहे दादा!” तारा.
ताराच्या तोंडून पिंगलाक्ष यांच्यासाठी दादा अशी हाक निघताच ती चकित होते. “आपण आतापर्यंत खंडोबाला आपला देव, आई, सखा, मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण आणि वडीलही मानले होते आणि अचानक यांच्यासाठी दादा ही हाक कशी निघाली तोंडून? आजी म्हणतात त्याप्रमाणे हे देवाचा माणूस आहेत म्हणून असेल का? हो तसेच असेल.” असा मनोमन विचार ती करते.
“तारा तू मला दादा म्हणू शकतेस.इतका विचार नको करुस.” पिंगलाक्ष.
“हो चालेल! आता मी काय करायचं हेही सांगा.” तारा.
एक हिरव्या रंगाचा बटवा तिच्या हाती देत “हा भंडारा कायम तुझ्याजवळ ठेवायचा” असे पिंगलाक्ष तिला सांगतात पण तिने तो घेताना हात मागे करताच ते अचंबित होतात.
“ते सुवेर आहे ना आता? आणि माझ्याकडे तुम्ही पाठवून दिलेला भंडारा आहे!” तारा.
“सुवेर आहे म्हणून काय झालं हा तुझ्या सुरक्षेसाठी आहे आणि जो बटवा मी आधी दिला आहे त्यातीला भंडाऱ्याला तू हात लावला नाहीस ना?” पिंगलाक्ष.
“म्हणजे फक्त बटवा उघडून पाहिला तर त्यात भंडारा दिसला पण हातात घेतला नाही.” तारा.
“आता हा भंडारा घे आणि मार्तंडला बारा दिवस झाले कि खंडोबाच्या देवळात घेऊन जा. मीही तुमच्यासोबत येईन आणि कायम लक्षात ठेव त्या भंडाऱ्याला हात लावायचा नाही.” पिंगलाक्ष.
पिंगलाक्ष यांच्याकडून भंडारा घेऊन तारा खोलीत येते आणि तिची नजर टेबलावर ठेवलेल्या खुरप्यावर आणि त्याच्या बाजूला असलेल्या लाल रंगाच्या बटव्या गेली. “दादा असं का म्हणाला की त्या भंडाऱ्याला हात लावायचा. मग मी मार्तंडला त्यातला भंडारा लावणार तरी कोण? मलाच लावावा लागेल ना? भंडाऱ्यासारखा भंडारा असेल ना तो मग?” असे अनेक विचार तिच्या डोक्यात फिरू लागतात.