Login

सामर्थ्य भक्तीचे : वेळ पुनर्मिलनाची : भाग सात

खंडोबावर अगाध श्रद्धा असलेले म्हाळसा आणि सदाशिव एका दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे एकमेकांपासून वेगळे होतात आणि भगवंताच्या एका कार्यासाठी पुन्हा जन्म घेतात. या जन्मात म्हाळसा आणि सदाशिव एक होतील का? काय असेल त्यांचे कार्य? हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचत रहा! लेखिका : प्रणाली प्रदीप.
नेहमीपेक्षा सकाळी लवकरच उठलेले पिंगलाक्ष प्रातर्विधी आटोपून देवघरात येतात. आज त्यांना जरा थोडं अस्वस्थच वाटत होतं. त्यामुळे त्यांनी देवघरात खंडोबाच्या मूर्तीसमोर बसण्याचा विचार केला. ते ध्यानमग्न अवस्थेत असतानाच तारा देवाला लांबूनच पाया पडते आणि ती तिथेच पिंगलाक्ष यांची वाट पाहत ओटीवर बसते.

देवाच्या पाया पडून त्याच्याशी गुजगोष्टी करून पिंगलाक्ष ओटीवर बसलेल्या ताराच्या बाजूला बसतात.

पिंगलाक्ष : कसला विचार करते आहेस तारा?

तारा : विचार असा नाही पण दादा, मनावर मळभ आल्यासारखे जाणवते आहे आज! काहीतरी अशुभ घडेल असे वाटते आहे.

पिंगलाक्ष : आज मलाही जरा अस्वस्थ वाटते आहे आणि कदाचित मला त्याचे कारण ठाऊक आहे.

तारा : काय आहे ते कारण?

पिंगलाक्ष : तारा मी काही तुझ्यापासून लपवणार नाही पण सूर्यभानचा जन्म हा वेळेआधीच झाला आहे. जन्मचक्रानुसार तो जन्म मार्तंडच्या जन्मानंतर होणार होता. मात्र त्याने मार्तंडच्या आधी जन्म घेतला आहे आणि सध्या हीच चिंतेची बाब आहे..

तारा : पण आपण यात काही हस्तक्षेप करू शकत नाही का?

पिंगलाक्ष : देवाने योजलेल्या गोष्टींमध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही तारा! मुलांचे विधिलिखित आहे ते आपण बदलू शकणार नाही.

तारा : त्याने कुठे जन्म घेतला आहे हे माहिती असेल ना तुम्हाला?

पिंगलाक्ष : कदाचित हो!

तारा : आपण जास्त सतर्क राहायला हवं आहे ना आता?

पिंगलाक्ष : हो, खासकरून तू! तुला मार्तंडजवळ येणाऱ्या किंवा त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवायची आहे आणि बाकीच्या गोष्टी सांभाळून घ्यायला मी आहेच! सगळ्यात म्हणजे प्रत्यक्ष खंडोबा त्यांच्या पाठीशी आहे. मग आपण सगळं त्याच्यावरच सोडून देऊ काय?

तारा : हो! कधी हे सुवेराचे दिवस संपतील असे झाले आहे मला!

पिंगलाक्ष : अजून नऊ दिवस! मीपण तर त्याचीच वाट पाहतो आहे.

ताराशी बोलून पिंगलाक्ष नेहमीप्रमाणे आजही जगतापांच्या वाड्याभोवती रक्षा कवचाची आखणी करतात आणि त्यानंतर एकदा आकाशाकडे नजर वळवून कसल्याशा गोष्टीचा अंदाज बांधतात. तिथे बाहेर उभ्या असलेल्या सुभानाला नजरेने इशारा करत खोलीत बोलवतात. तो आत येताच त्याला खोलीचे दार लावायला सांगतात.

पिंगलाक्ष : आपले किती शिष्य तयार आहेत सध्याच्या घडीला?

सुभान : पंचवीस मुले आणि पंचवीस मुली असे मिळून पन्नास तरी आहेत.

पिंगलाक्ष : आज सूर्यभान जन्म घेईल तेव्हा सुरक्षा दोन्ही बाजूची चोख ठेवायची जबाबदारी तुझी! यात मला जराही हलगर्जीपणा नकोय!

सुभान : बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी डोळ्यात तेल घालून इथे पहारा देईन आणि भैरवी माईकडे मी भामाला पाठवलं आहे.

पिंगलाक्ष : मला भैरवीची चिंता नाही पण मार्तंडची वाटते आहे. तू त्या झोपडीवर बारीक लक्ष ठेवून आहेस ना? तुला नवी काही माहिती मिळाली का?

सुभान : बाबा, आपली चार पोरं त्या झोपडीपाशी दिवसरात्र पहारा देऊन आहेत. मला एक कळत नाही गतजन्मात अगदी तालेवार असलेला सूर्यभान अशा झोपडीत का जन्म घेईल?

पिंगलाक्ष : सुभान, कृपाल इतका मूर्ख तर नक्कीच नाही. सूर्यभानचा असा जन्म होण्यामागे त्याचे काहीतरी प्रयोजन असणार आहे. कृपालवर कोणाला नजर ठेवायला सांगितली आहेस तू?

सुभान : बाबा, दौलत लक्ष ठेवून आहे.

पिंगलाक्ष : ठीके! तुम्ही कुठे भेटणार होतात? आणि किती वाजता?

सुभान : वाड्याच्या मागे जे खंडोबा मंदिर आहे. त्या मंदिराच्या थोडं मागे एक टेकडी आहे. त्या टेकडीवर सूर्य डोक्यावर आला की भेटायचं ठरलं आहे आमचं! तुम्ही येणार आहात का?

पिंगलाक्ष : तू इथेच पहाऱ्याला थांबायचं आहेस आणि मी दौलतला भेटायला जाईन.

सुभान : ठीके बाबा! मी जातो माझ्या कामाला काही लागलं तर सांगाल.


सुभान निघून गेल्यावर पिंगलाक्ष ध्यानाला बसतात.


—-----------------------------------------------------------------------------------------------

इकडे भोसल्यांच्या वाड्याच्या प्रवेशद्वारावर लाल रंगाच्या नऊवारीतील तरुण अशी महिला येते. तिला पाहून ती काम मागायला आलेली एखादी गरीब घरातील महिला असावी असा सुरक्षा रक्षक अंदाज लावतात व ते तिला निघून जाण्यास सांगतात. ती त्यांच्याशी यावरून वाद घालतानाच ते धनंजय पाहतो व तिथे येतो.

धनंजय : काय रे? एवढा कालवा का लावला आहेस?

सुरक्षा : दादा, ही मुलगी बोलतेय की हिला वाड्यात बोलावलं आहे कामासाठी! पण आम्हाला अशी कोणतीच सूचना आईसाहेबांनी दिली नाही मग हिला कसे आत सोडू?

धनंजय एकवार त्या नऊवारीतील मुलीला पाहतो आणि सगळा प्रकार त्याच्या लक्षात येतो. “शूलबाबा बहुतेक हिच्याबाबतच बोलत असावेत.” असा विचार करत तो त्यांना तिला आत सोडण्यास सांगतो व तिला वाड्यात नेतो. वाड्यात ओटीवर हिशोबाचे काम करणाऱ्या जनाबाई धनंजयच्या मागे चालणाऱ्या मुलीला अगदी निरखून पाहतात.

जनाबाई : धनंजय या कोण म्हणायच्या?

धनजंय : आईसाहेब, शूलबाबा बोलले होते ना की, त्यांच्या मदतीसाठी त्यांची शिष्या येणार आहे ती हीच!

जनाबाई एकवार तिच्याकडे पाहतात आणि तत्क्षणी कोणतीतरी देवता त्यांच्या वाड्यात प्रवेशल्याचा भास त्यांना होतो व त्या लगेचच त्याला खोलीत नेण्याचा इशारा करतात.

शूलपाणि यांना खोलीत कोणीतरी येत असल्याची चाहूल लागताच ते ध्यानातून बाहेर येतात. ते उठून त्यांची घोंगडी करतानाच धनजंय व ती मुलगी त्यांच्या खोलीत येते. त्या मुलीला पाहताच त्यांना आनंद होतो.

शूलपाणि : भामा! कशी आहेस बाळा?

भामा : तुमच्या आशिर्वादाने अगदी ठणठणीत आहे बाबा!

शूलपाणि : धनंजय ही माझी सर्वात आवडती शिष्या आहे भामा!

शूलपाणि यांनी ओळख करून देताच धनंजय मामाकडे पाहतो. रंगाने सावली असलेल्या भामाच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र काही औरच होते. काळेभोर डोळे, दाट केसांचा बांधलेली घट्ट वेणी, कपाळावर भंडारा आणि त्यात मधोमध लाल कुंकू, गळ्यात रुद्राक्ष आणि हातात हिरव्या बांगड्या असा तीच पेहराव पाहताना धनंजयचे भान हरपते. हे शूलपाणि यांच्या लक्षात येताच ते घसा खाकरून धनंजयला भानावर आणतात.

धनंजय : बाबा मी येतो. काही लागलं तर आवाज द्याल.

शूलपाणि : धनंजय, हिच्या राहण्याची व्यवस्था वाड्यातच करशील.

धनंजय : जी! लागलीच करतो.

धनंजय गेल्याची खात्री होताच भामा सगळ्यात आधी शूलपाणि यांच्या पायावर मस्तक ठेवते.

शूलपाणि : बाळ तुला कितीतरी वेळा मी सांगितलं आहे की मुलगी ही लक्ष्मी असते तिने असं पाया पडणे शोभा देत नाही. तरीही तू नेहमी हेच करतेस.

भामा : बाबा! तुमच्या, पिंगाबाबा सोडला तर कोण आहे माझ्यासाठी? मी कोण कुठली हेही मला आठवत नाही तरी तुम्ही मला आसरा दिला आणि लहानाची मोठी केलीत मग तुमच्या पाया का नको पडू?

शूलपाणि : मी कितीतरी वेळा बोललो आहे तुला तू माझी मुलगी आहेस तरी, आज पुन्हा तेच बोललीस. बर, आता ते जाऊ दे! तुला सुभानाने सांगितलं ना की इथे तुझं काय काम असेल ते?

भामा : हो! भैरवीची सुरक्षा आणि तिला सगळ्या प्रकारच्या युद्धकला शिकविणे.
शूलपाणि : एकदम बरोबर पण त्यासोबतच तुला या वाड्याची सुरक्षा करायची आहे. सूर्यभानने वेळेआधी जन्म घेतला आहे तर आपण सावध राहणे फार गरजेचे आहे.

भामा : बाबा, तुम्ही काळजी करू नका! मी अगदी व्यवस्थित सांभाळ करेन भैरवीचा!

शूलपाणि : त्यात मला जराही शंका नाही. चल तुझी बाकीच्यांशी ओळख करून देतो.

शूलपाणि सगळ्यांची ओळख भामाशी करून देतानाच रुक्मिणी रडणाऱ्या भैरवीला खाली घेऊन येते.

रुक्मिणी : आईसाहेब, तुम्ही जरा हिला घेता का? मगापासून रडते आहे. मी किती शांत करायचा प्रयत्न करते पण तिचे रडणे काही थांबत नाहीयेय.

जनाबाई तिला हातात घेणार इतक्यात त्यांच्या मनात एक विचार येतो व त्या भैरवीला भामाला घेण्यास सांगतात. भामा तर हेच हवे असते. मामाच्या कुशीत येताच भैरवी अगदी शांत होते आणि हे पाहून रुक्मिणी अचंबित होते. जनाबाई मात्र गालातल्या गालात हसून शूलपाणि यांच्याकडे पाहतात. भामा मात्र भैरवीला निरखण्यात आणि तिचे लाड करण्यात गुंग होते तर, रुक्मिणीला अनेक प्रश्न पडतात.