Login

सामर्थ्य भक्तीचे : वेळ पुनर्मिलनाची - भाग पाचवा

खंडोबावर अगाध श्रद्धा असलेले म्हाळसा आणि सदाशिव एका दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे एकमेकांपासून वेगळे होतात आणि भगवंताच्या एका कार्यासाठी पुन्हा जन्म घेतात. या जन्मात म्हाळसा आणि सदाशिव एक होतील का? काय असेल त्यांचे कार्य? हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचत रहा!
तारा पिंगलाक्ष यांच्या बोलणे आठवून विचारात पडली होती. ‘लाल बटव्यातला भंडारा आणि हिरव्या बटव्यातील भंडारा हा सारखाच तर आहे. हिरव्या बटव्यातील भंडारा जर मी मार्तंडला लावू शकते तर लाल बटव्यातील भंडाराही मी लावू शकते ना?’ अनेक विचार तिच्या मनात सुरु असतात. तितक्यात मार्तंडला घेऊन रखमाबाई तिच्या खोलीत येतात.


रखमाबाई : तारा, हा उठला बघ. याला दूध पाजून घे. मी तोवर तुझ्यासाठी नाश्ता पाठवते आणि हो मी आज जरा सुमनकडे जाऊन येते.


तारा : हो आजीसाहेब, तुम्ही जाऊन या. बरेच दिवस झाले ती आजारीच आहे.


रखमाबाई मार्तंडला ताराच्या हातात देऊन निघून जातात. लेकाचा चेहरा पाहिल्यावर तारा मात्र मनातील सर्व विचार झटकून देते आणि त्याला दूध पाजते.


पिंगलाक्ष त्यांना नाश्त्यासाठी बोलावायला आलेल्या श्यामाला ते काही वेळासाठी बाहेर जाणार असल्याचे सांगतात व ते इथे नसताना कोणती काळजी घ्यायची हे समजावून सांगतात. ते त्याच्याही हातात भंडाऱ्याचा बटवा देतात. तो पाहून श्यामाच्या मनात “असे किती प्रकारचे बटवे आहेत आणि हा भंडारा तोच असेल का जो मार्तंडच्या जन्माच्या वेळेस दिला यांनी?” असा प्रश्न येतो.


पिंगलाक्ष : श्यामा, माझ्याकडे असे अनेक बटवे आहेत आणि त्या प्रत्येक बटव्यात भंडारा आहे पण मार्तंडजवळ असलेला भंडारा आहे जिचा आहे ती अजून यायची आहे त्यामुळे तो तूच काय पण मीसुद्धा वापरू शकत नाही.


श्यामा : म्हणजे?


पिंगलाक्ष : नंतर केव्हा तरी उलगडून सांगेन. सध्या हा भंडारा ठेव आणि सांगितलेले लक्षात ठेव. मी निघालो कि काही वेळाने सुभाना येईलच इथे.


श्यामा : ठीके. तुम्ही चला आता नाहीतर नाश्ता गार व्हायचा.


पिंगलाक्ष : हो चल.


काही वेळाने दादासाहेब आणि रखमाबाईंचा निरोप घेऊन पिंगलाक्ष शूलपाणी यांना ठरलेल्या ठिकाणी भेटायला निघतात.


—---------------------------------------------------------------------------------------------------------------------------


सुभान दम खात जनाबाईंच्या म्हणजेच भैरवीच्या घरापर्यंत पोहोचतो. त्याला असे धावत आलेले पाहून भोसल्यांच्या घरात गडी म्हणून काम करणारा धनंजय पुढे येतो आणि त्याला अडवतो.


धनंजय : ए थांब तिथेच! कुठे आत चालला आहेस? परवानगीशिवाय तुला आत जाता येणार नाही समजलं!


सुभान : नमस्कार धनादादा,


धनंजय : ए तुला माझं नाव कसं माहिती आहे रे? कोण आहेस तू?


सुभान : माझं नाव सुभान आहे आणि मला शूलपाणि बाबांना भेटायचं आहे. त्यांच्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे.


शूलपाणि यांचे नाव ऐकून धनंजय सावध होतो आणि त्याला घराबाहेर थांबण्याचा इशारा करत लागलीच घरात धाव घेतो.


काही क्षणांनंतर, शुलपाणि स्वतः सुभानाला घरात येण्याचा इशारा करतात. गुरुआज्ञेचे पालन करण्याहेतू सुभान त्या घरात पाऊल ठेवतो व शूलपाणि यांच्या मागोमाग चालत जातो.


शूलपाणि : बोल सुभाना, इतक्या तातडीचा आलास?


सुभान : बाबा, ते मोठ्या बाबांनी तुम्हाला तातडीने भेटायला बोलावलं आहे आणि तेही आजच!


शूलपाणि : ठीक आहे. तू थांब चहा नाश्ता करून जा.


सुभान : नको बाबा, मला मोठ्या बाबांनी लगेच तिथे यायला सांगितलं आहे. तुम्हाला निरोप दिला. आता मी निघतो.


शूलपाणि : ठीके पण इथे कोण येणार आहे माझ्या मदतीला?


सुभान : भामा येईल आज दुपारपर्यंत! तुम्ही इथे तसे सांगून ठेवा. येतो मी.


तो वाऱ्यासारखा आला आणि गेलाही हे पाहून शूलपाणि यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरते. आपले शिष्य कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देत असल्याचे पाहून त्यांना समाधान वाटते. पिंगलाक्ष यांनी भेटायला का बोलावले असेल याचा विचार करत ते त्यांच्या बॅगेत महत्त्वाचे सामान भरतात आणि तसेच जनाबाईंच्या खोलीत जातात.


जनाबाई : बाबा, मला बोलावयाचे ना? मी आले असते भेटायला? आणि हे काय तुम्ही कुठे निघालात?


शूलपाणि : हो हो, आई श्वास तर घ्या! माझं एक महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे मी पटकन जाऊन ते करून येतो. इथे भामा नावाची माझी शिष्या येईल. तिची राहण्याची व्यवस्था कराल का?


जनाबाई : हो करते पण तुम्ही इथे असताना काही धोका निर्माण झाला तर काय करू?


शूलपाणि : खरे तर इथे येण्याची कोणी हिंमत करणार नाही पण तुमच्या समाधानासाठी तुम्ही हा भंडारा सोबत ठेवा आणि काही वाटलंच तर याचा वापर करा.


जनाबाई : दुपारच्या जेवणापर्यंत याल ना?


शूलपाणि : प्रयत्न नक्की करेन पण वाट पाहू नका.


जनाबाई : ठीक आहे. सावकाश जा आणि सांभाळून रहा.


जनाबाईंचा निरोप घेऊन शूलपाणि पिंगलाक्ष सोबत ठरलेल्या भेटीच्या ठिकाणी निघतात. ‘पिंगलाक्षने का भेटायला बोलावले असेल?’ हा विचार त्यांच्या मनात सतत घोळत राहतो.


काही तासांनंतर,


पिंगलाक्ष एका उंच कठड्यावर उभे राहून समोर दिसणाऱ्या जेजुरी गडाचे निरीक्षण करण्यात गुंग असतात. दरम्यान, तिथे आलेले शूलपाणि त्यांना तसे पाहून हसतात आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात.


शूलपाणि : जेजुरी गडाचे निरीक्षण करणे हे तुझं आवडीचं काम असेल नाही का?


पिंगलाक्ष : हो! या गडाला कितीही पहिले तरी मन भरत नाही. नेहमीप्रमाणे मीच लवकर आलो.


शूलपाणि : काय करू? तुझा निरोपच मला उशिरा मिळाला. असो तू इतक्या तातडीने कशाला बोलावलंस?


पिंगलाक्ष : मार्तंड आणि भैरवीच्या जन्माबद्दल कृपालला कळलं आहे हे तुलाही समजले असेलच.


शूलपाणि : हो पण तो सूर्यभानचा जन्म झाल्याशिवाय काहीच करू शकणार नाहीयेय आणि त्याचा जन्म व्हायला अजून पाच दिवस तरी आहेत.


पिंगलाक्ष : खरी गोम इथेच आहे शूल.


शूलपाणि : म्हणजे?


पिंगलाक्ष : कृपालने सूर्यभानचा जन्म वेळेआधीच घडवून आणला आहे आणि कदाचित मार्तंडच्या जन्माआधीच सूर्यभान जन्माला आला आहे.


शूलपाणि : अष्टचक्र विधी?


पिंगलाक्ष : हो पण त्यासोबतही त्याने आणखी एक विधी केला आहे.


शूलपाणि : कोणता विधी केला आहे काही कळलं का त्याबद्दल?


पिंगलाक्ष : त्याविषयीची माहिती काही हाती अजून लागली नाही पण हा मार्तंडच्या जीव घेण्याचा तो प्रयत्न नक्की करू शकतो.


शूलपाणि : हे कसे शक्य आहे? सदाशिवला मिळालेला वर वाया जाईल का?


पिंगलाक्ष : शूल, भगवंताचा कोणताही वर वाया जात नाही याची प्रचिती आहे आपल्याला!


शूलपाणि : हो मान्य आहे मला पण मग कृपालमुळे मार्तंडला धोका निर्माण झाला आहे त्याचं काय मग?


पिंगलाक्ष : शूल, चिंतीत नको होऊस! खंडोबाची कृपा मार्तंड आणि भैरवीवर असल्याने कृपालचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही पण म्हणून आपण निवांत नको राहायला. हेच कानावर घालायला मी तुला इथे बोलावले आहे.


शूलपाणि : सूर्यभानने कुठे जन्म घेतला आहे?


पिंगलाक्ष : जेजुरीत!


शूलपाणि : काय???? विधिलिखीताप्रमाणे त्याला भैरवीच्या आसपासच जन्म घ्यावा लागेल. माझा ना गोंधळ उडाला आहे.


पिंगलाक्ष : तेच तर, कृपाल सगळं विधिलिखिताच्या उलटे वागतो आहे त्याची हीच खेळी माझ्या लक्षात येत नाहीयेय. त्याच्या या डावाबद्दल तातडीने माहिती करून घ्यायला हवी. भैरवीच्या सुरक्षेत मला कोणतीही चूक नकोय.


शूलपाणि : मी चक्रावून गेलो आहे. मार्तंडची सुरक्षा वाढावयाला हवी. त्याचा काही विचार केला आहेस तू? मुलांना निरोप पाठवला आहेस?


पिंगलाक्ष : हो निरोप धाडला आहे मी आणि सुभानाला पण मदतीला बोलावलं आहे. खरं तर मार्तंड सहा महिन्याचा होई तो त्याला धोका नसणार या विचाराने मी आखणी केली होती. एक काम कर तू भैरवी आणि मार्तंडची पत्रिका बनवून त्या नीट तपासून पहा. मार्तंड १५ दिवसांचा झाला की मी एक अनुष्ठान करतो जेणेकरून मार्तंड भैरवीला भेटेपर्यंत त्याच्याभोवती सुरक्षाकवच राहील.


शूलपाणि : हे चालेल. तुला या अनुष्ठानात माझी काही मदत लागणार आहे का?


पिंगलाक्ष : हो! मी तुला त्याविषयी कळवेन आणि हो ही माळ भैरवीच्या गळ्यात घाल. प्रत्येकवर्षी मी अशी माळ तिला देत जाईन. या माळीने तिची ऊर्जा व शक्ती नियंत्रणात राहतील.


शूलपाणि : ठीके! तू सावध रहा आणि गरज असेल तर निवृत्तीला बोलवून घे.


पिंगलाक्ष : हो तू म्हाळसाकडे लक्ष दे आणि तिला फुलासारखे जप!


शूलपाणि : हो चल येतो मी!


शूलपाणि निघून गेल्यावर पिंगलाक्ष थोडा वेळ थांबून पुन्हा जेजुरी गडाला प्रेमाने न्याहाळतात आणि अचानक त्यांच्या डोळ्यासमोर ताराने भंडाऱ्याला हात लावल्याचे दृश्य येताच ते तातडीने तिथून निघतात.