विषय : तिचं आभाळ
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, किचनची खिडकी उघडल्या बरोबर दोघं आत आली. एका आडोश्याला बसुन दोघही खिडकी उघडण्याची वाटच पहात होती. त्या दिवसापासून त्यांची धावपळ सुरु झाली.
वाळलेल्या काड्या, चिंध्या, पानं, कापूस, पिसं अशा अनेक वस्तू दोघही रोज चोचीमधून घेऊन यायला लागली. सारखा चिचिवाट वाढू लागला. बघता बघता घरट आकार घेऊ लागलं असावं.
अर्थात आमच्या संमतीचा, सोय किंवा गैरसोयीचा कसला काही प्रश्नच नव्हता. त्यांना जागा आवडली होती हेच महत्वाचं होतं. हळू हळू घरटं आकार घ्यायला लागलं. चिमणा चिमणीचा मुक्काम घरट्यात जास्त वाढू लागला.काही दिवसानंतर तर चिमणीच घरा बाहेर जाणं पूर्णपणे थांबलं. बऱ्याच वेळा ते घरट्यातच असत. अधे मधे चिमणा बाहेर जाई. किडे, अळ्या असं काय काय चिमणीला खायला आणत असे. त्या वेळी चिमणी तिची चोच प्रेमाने चिमण्याच्या चोचीत घालत असे. कधी त्याच्या इवल्याशा पिसाऱ्यात चोच खुपशीत असे. असा दोघांचा संसार सुरू झाला होता.
आता एखाद्या गरत्या बाई सारखी ती सारखी घरातच बसून असायची. कदाचीत घरट्यात पिल्ल झाली असावी. चिमणा न चुकता तिच्या साठी काही न काही खायला घेऊन यायचा.आकाशाची स्वप्न पाहात पाहात त्या दोघांचा संसार सुखात सुरु होता.
काही दिवसानंतर अचानक सकाळी सकाळी घरात नाजूक आवाजात किलबिल ऐकू आली.तो आवाज एव्हढा मधुर होता की एक अनामिक आनंद सगळ्या घरभर पसरला.
चिमणीच्या घरट्यात पंख नसलेले , मोठे मोठे बाहेर ठळक बटबटीत बंद डोळ्यांचे , मोठ्या वाटणाऱ्या चोचींचे , फक्त केविलवाण्या आवाजात ओरडणारे लाल भडक रंगाचे चार पाच मांसल गोळे होते. त्यांना फक्त ओरडता येत होतं.
पिल्लं कुठलीही असो त्यांच्या आगमनाने आनंदच आनंद होतो. आमच्या घरात सगळ्यांना पण एक वेगळंच अप्रूप या गोष्टीचं सुरु झालं. चिमणीच बाहेर जाणं पूर्णपणे थांबलं होतं. चिमणा काही काही घेऊन यायचा. नंतर त्याची एकट्याची मेहनत कमी पडायला लागली. सतत येरझारा करून करूनही भागेना, मग पिल्लं थोडी मोठी झाल्यावर चिमणीने घरट्यातून बाहेर पडून संसाराला हातभार लावायचं ठरवलं. पिल्लांना त्यांच्या भाषेत काय सांगितलं कुणास ठाऊक. सकाळी सकाळीच दोघं बाहेर पडायची आणि दुपारी परत कोवळ्या अळ्या, किडे, घेऊन यायचे. त्यांची चाहूल लागली की पिल्लं आवाज करत आपल्या चोची उघडत. मग ती दोघं त्या सगळ्यांना चोचीत चोच घालून भरवत. मला अजून एक गोष्ट समजली नाही की जेवण तर ते देत होते पण पाणी कसं पाजत असतील ? का त्या काळात त्यांना पाण्याची गरजच लागतं नसावी. देव जाणे.
हळू हळू, पिल्लं मोठी होऊ लागली. घरट्या बाहेर माना काढायचा प्रयत्न करू लागली. आमच्या वर चिमणा चिमणीचा ही बराच विश्वास बसला असावा. किंवा आम्हाला फार महत्व देण्याची गरज नसावी असं त्यांना वाटत असावं.
पिल्लं आता हळू हळू घरट्या बाहेर यायला लागली. चिमणीची जबाबदारी खूप वाढली होती. त्यांना आता उडायला शिकवायचं होतं. घरट्यातले दिवस संपले होते.
मग त्यांचा उडायचा अभ्यास सुरु झाला.त्यांच्या उडण्याच शिक्षण बघणं खूप आनंदाचा भाग असायचा. आई शेवटी आईच असते. प्रत्येक पिल्लाला ती स्वतः उडून दाखवायची. पिल्लं सुरवातीला खूप घाबरायची. उडण्या पेक्षा खुरडत चालणं त्यांना सोपं आणि सुरक्षित वाटायचं. पण चिमणीला ते मान्य नसायचं. ती वारंवार प्रयत्न करायला लावायची. आकाशाची स्वप्न दाखवून उडवायला शिकवायची. असं शिक्षण सुरु होतं
आणि सगळच उध्वस्त करणारा तो भयंकर दिवस उजाडला.....
( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी
लेखक: दत्ता जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा