अमेय आणि प्राचीच्या सुखी संसाराला एका मल्टी नॅशनल कंपनीतील त्यांच्या चांगल्या नोकरीची मजबूत जोड होती. या दोघांच्या जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे त्यांची अवघी पाच वर्षांची गोंडस कन्या, निधी. धावपळीच्या या करिअरच्या जगात, निधीला प्रेम आणि संस्कार देण्याचं महत्त्वाचं काम अपर्णा बाई म्हणजे अमेयची आई, नेटाने करत होत्या.
अपर्णा बाईंना घरातील दैनंदिन कामांची चिंता नव्हती. एक मदतनीस बाई घरात येऊन सगळी साफसफाई, भांडीकुंडी आटपून जायची. पण खरी जबाबदारी सुरू व्हायची ती निधी शाळेतून घरी परतल्यावर. सोसायटीच्या मुख्य गेटपर्यंत शाळेची व्हॅन यायची, तिथून कामाला येणाऱ्या ताई निधीला तिच्या घरी, म्हणजे अमेय-प्राचीच्या फ्लॅटमध्ये आणून सोडायच्या.
घरात पाऊल ठेवताच निधीचा पहिला शोध असायचा तो म्हणजे तिची लाडकी आजी.
" आजी ! मी आले ! " निधी
"अगं ! माझी सोनपरी आली ! थांब, हात-पाय धु आणि बघ, आज मी तुझ्या आवडीचं काय बनवलंय ! " अपर्णा बाई प्रेमाने म्हणत.
आजी-नात दोघी एकत्र जेवण करायच्या. निधी शाळेतल्या तिच्या 'गंमत-जंमत' गोष्टींचा खजिना आजीसमोर रिकामा करायची.
"आजी, आज टीचरने एका माकडाची गोष्ट सांगितली ! ते माकड अस्वल ...!"
निरागस आणि उत्साहाने भरलेल्या तिच्या गप्पा ऐकून अपर्णा बाईंना खूप आनंद होई. जेवण झाल्यावर तिचे कपडे बदलणे, थोडावेळ तिच्याशी खेळणे आणि मग अपर्णा बाई तिला शांतपणे थोडावेळ झोपवत असत.
संध्याकाळ झाली की, सोसायटीतील क्लब हाऊसच्या दिशेने त्यांचा मोर्चा वळायचा.
" निधी, आता मित्र मैत्रिणीन सोबत खेळून ये." अपर्णा बाई तिला म्हणल्या.
" हो आजी ! " निधी
क्लब हाऊसच्या हिरवळीवर आणि कट्ट्यांवर अपर्णा बाई त्यांच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसायच्या. त्यांच्या आयुष्यातले अनुभव, देवाणघेवाण, सुख-दुःखाच्या गोष्टी चालत. तर निधी तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या खेळांमध्ये रमून जायची. सायंकाळची ती वेळ म्हणजे अपर्णा बाई आणि निधी, दोघांसाठीही त्यांच्या-त्यांच्या विश्वात रमण्याची एक सुंदर संधी होती.प्राची ऑफिसमधून थोडं लवकर निघायची. ती थेट क्लब हाऊसपाशी यायची.
" निधी ! चल बच्चा , आता घरी जायचं." प्राची ने तिला हाक मारली. निधी खेळण्यातून पटकन बाहेर यायची नाही.
" मम्मा! अजून पाच मिनिटं प्लीज ! " निधी म्हणाली.
प्राची हसून तिला जवळ घ्यायची आणि समजूत घालायची,
" चल, उद्या लवकर येऊ, आता शुभ करोती म्हणायचं आहे, नंतर अभ्यास करायचा आहे."
प्राची आणि निधी घरी परतल्यावर अपर्णा बाई मैत्रिणींसोबत जवळच्या गजानन महाराजांच्या मठात जायच्या. थोडावेळ शांतपणे तिथे बसून त्या देवाची आराधना प्रार्थना करत आणि मग घरी परतत.
हा दिनक्रम गेली दोन वर्षे अखंड आणि सुरळीत सुरू होता. अमेय आणि प्राची निश्चिंत होते, कारण घरी त्यांची आई, त्यांच्या मुलीला प्रेमाने सांभाळत होती.
सगळं काही व्यवस्थित सुरू असताना एक दिवस, मठातून घरी परतत असताना अपर्णा बाईंना एका भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. रस्त्यावर सांडलेल्या रक्ताने आणि लोकांच्या गर्दीने शांत संध्याकाळ सगळ काही विस्कटून गेली. अमेय आणि प्राचीला फोन आला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने हॉस्पिटल कडे धाव घेतली.
अपर्णा बाईंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून चिंताजनक बातमी दिली. अपघातात त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्वरित ऑपरेशन करणे आवश्यक होते.
ऑपरेशन यशस्वी झाले, पण अपर्णा बाईंना आता अंथरुणावरून उठणेही सोपे नव्हते. त्यांना स्वतःच्या दैनंदिन कामांसाठीही मदतीची गरज भासू लागली. निधीला सांभाळणं, तिचं जेवण-कपडे करणं, तिला खाली घेऊन जाणं – या सगळ्या गोष्टी अशक्य झाल्या होत्या.
हॉस्पिटलच्या खोलीत, आईच्या चेहऱ्याकडे पाहत असताना, अमेय आणि प्राचीच्या डोळ्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं.
" प्राची, आता निधीचं कसं करायचं ? आईला तर स्वतःचं काम करायलाही किती त्रास होतोय. तिने सांगितलेली मदतनीस आता फक्त घरकाम करते, पण निधीला पूर्णवेळ कोण सांभाळणार ? "
अमेय ने प्राचीला काळजीने विचारले.
अमेय ने प्राचीला काळजीने विचारले.
" हो, मलाही तेच टेन्शन आहे. आता आईला पूर्णपणे आराम करायला हवा. पण निधी... तिला तर आजी शिवाय करमत नाही. आणि सकाळी शाळेची वेळ..." प्राची दीर्घ श्वास घेऊन म्हणाली.
" स्मिता, तिला मदतीला बोलवू शकलो असतो, पण ती स्वतः प्रेग्नन्ट आहे. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली आहे. तिला अशा परिस्थितीत त्रास देणं बरोबर नाही." अमेय विचारतो.
" अरे समीर दादा लंडनला आहे. तो आला असता मदतीला. पण त्याला कसं बोलणार." प्राची म्हणाली.
"आणि तुझे आई-वडील..." अमेय ने विचारले.
प्राचीच्या डोळ्यात पाणी तरळले.
प्राचीच्या डोळ्यात पाणी तरळले.
" माझ्या आई-वडिलांना यूकेला जाऊन जेमतेम चार दिवस झाले आहेत. माझ्या मावशीची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने जावं लागलं होतं. त्यांना तिथून पटकन परत बोलावणं… मला त्यांना लगेच फोन करायची हिम्मत होत नाहीये." प्राची म्हणाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा