Login

समजुतीने घेवू या भाग 3 अंतिम

समजुतीने घेवू या
समजुतीने घेवू या भाग 3 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

विषय - आपलेच दात आपलेच ओठ

सगळी वाटणी झाली.

आता तरी घरात शांती नांदेल अशी आशा आहे. माधव विचार करत होता.

"आम्ही कोणाकडे जेवायच? " सासुबाई म्हणाल्या.

"ते तुमच तुम्ही ठरवा आई, बाबा." माधव म्हणाला.

" पंधरा दिवस इकडे, पंधरा दिवस तिकडे. " त्यांनी ही ठरवल.

" ठीक आहे. "

निशाच्या लग्नाचे नवीन भांडे तिने वेगळया रॅक मधे ठेवले. किराणा अर्धा अर्धा केला. थोडसं आवरून ती ऑफिसला गेली. आज ती खुश होती. स्पष्ट दिसत होतं.

रमा नेहमीप्रमाणे काम करत होती. तिने स्वयंपाक केला. आवरून झाल. रात्रीच जास्त करायचं नव्हतं. सात वाजता तिने गरम खिचडी केली. सकाळची पोळी भाजी होती.

नेहमीप्रमाणे आठ वाजता निशा आली. तिने काहीतरी पार्सल आणलं होतं.

सगळे जेवायला बसले.

"नितीन, निशा चला." सासुबाई बोलवत होत्या.

"तुमच होवू द्या." निशा म्हणाली.

"तुम्ही जे केल असेल ते घ्या. बरोबर बसु."

"नाही..." ते आले नाहीत. आत बसुन त्यांनी खाल्लं.

पंधरा दिवस झाले.

सासुबाईंनी सकाळी निशाला सांगितलं. "आजपासून आमचा ही स्वयंपाक कर."

ती तोंड वाकड करून किचन मधे गेली.
"नितीन मला हे जमणार नाही. वहिनी घरी असतात. त्यांना करायला काय हरकत आहे. "

नितीन लगबगीने बाहेर आला.

" वहिनी तुम्ही आई बाबांच करा. निशाला सगळं काम देवू नका."

"ठरल्या प्रमाणे तुमचा नंबर आहे." रमा म्हणाली.

"हो पण निशा जॉबला जाते. तुम्ही घरी असता."

" म्हणजे काय? घरी काम नसतात का? निशा एक तास आधी उठली तरी तीच आवरेल."

" ती बिझी असते. तुम्हाला काय समजणार आहे म्हणा. " नितीन म्हणाला.

" लग्नापूर्वी मी पण जॉब करायचे. अशिक्षित नाही. " रमा ही म्हणाली. शब्दाने शब्द वाढत गेले.

" शांत बसा. जस ठरल आहे तस करा. निशा तुला आमच कराव लागेल. " सासुबाई म्हणाल्या.

रमा रूम मधे आली. माधव तयार होत होता. तिची चिडचिड सुरू होती.

"काय झाल रमा?"

"बघितल का नितीन भावोजी कस सारख मलाच बोलतात. तुम्ही घरात लक्ष ही देत नाही किंवा निशाशी बोलत ही नाहीत. त्यांना समजत नाही का? माझा नवरा एवढा चांगला वागतो. " रमा म्हणाली.

" दुर्लक्ष कर. तू तुझ ठरल्या प्रमाणे वाग. चिडचिड नकोय. तब्येत खराब करू नकोस. त्या दोघांकडे दुर्लक्ष कर. " माधव म्हणाला.

" कस दुर्लक्ष करू?" रमा म्हणाली.

" ते घरात नाही अस समज. तुला वाटत ते काम करत जा. जास्त विचार करू नकोस. "

" ठीक आहे. " त्या दिवसापासून रमा शांत झाली. ती गम्मत बघत बसायची. काहीही करा. मधे बोलायची नाही. निशाचा स्वयंपाक सुरू असताना किचन मधे जायची नाही.

आयत खायची सवय असलेली निशा आता दोघी वेळच करत होती. भाजी पोळी तर कधी फक्त खिचडी. ती ऑफिसला गेल्यावर रमा आई बाबां सोबत जेवायला बसत होती. त्यांना तिने केलेला गरम वरण भात देत होती.

"आई तुम्ही माझ्यात रहा." रमा म्हणाली.

"असू दे बघू ती कस करते."

निशाला बर्‍यापैकी समज आली होती. एकटीने करण अवघड असत. सोबत रहायला हवं पटल होतं. वेगळी भाजी केली तर ती रमाला देत होती. बबलू साठी खाऊ आणत होती. रमा ही कधी कधी तिच्या पोळ्या करुन घेत होती.

रमा एक आठवडा माहेरी गेली. त्या काळात निशाने सगळ्यांच नीट केल. माधव सांगत होता. रमाला बर वाटलं.

आज ऑडिट होतं. निशाला घरी यायला वेळ झाला. नितीन तिला घ्यायला गेला होता. अकरा वाजले होते. हॉटेल ही जवळ जवळ बंद होते. दोघ घरी आले.

"तुमच जेवण टेबल वर आहे. निशा फ्रेश होवुन ये मी ताट करते." रमा म्हणाली.

तिला आश्चर्य वाटलं. दोघ जेवले. दुसर्‍या दिवशी रमा कामात होती. निशा आली.

"भाजी होत आली आहे. पाच मिनिट. गॅस मोकळा करून देते. तू स्वयंपाक करून घे तुला जायचं असेल ना." रमा म्हणाली.

"ताई हे वेगळा स्वयंपाक करणं नको. आपण रोजच्या संध्याकाळच्या स्वयंपाक साठी बाई लावू. सकाळी दोघी मिळून करू. संध्याकाळी बबलू तुम्हाला करू देत नाही. मला ही ऑफिस हून आल्यावर कंटाळा येतो. बाईचे पैसे मी देईन. " निशा म्हणाली.

" चालेल. घरी विचारवं लागेल. " रमा म्हणाली.

नाश्ता करतांना निशाने विषय काढला. आई, बाबा हो म्हणाले.

दोघींनी समजुतीने घेतलं. घरात पूर्वी सारखी शांतता होती. संध्याकाळी दोघींना वेळ मिळत होता. रमा वॉक साठी गेली होती. बबलू आई बाबां जवळ खेळत होता. निशा रस्त्यात दिसली. दोघी पाणी पुरी खायला गेल्या. हसत परत आल्या. भांडून उपयोग नाही त्यांना समजल होतं.

🎭 Series Post

View all