Login

समलिंगी...

एका... वेगळ्या विषयावर एक नजर...
समलिंगी...


मालू!...आज डब्यात काय आहे ग?.....प्रियाने शाळेच्या मधल्या सुट्टीत मालिनीला विचारले..

काही नाही ग!..... आपल नेहमीचच चपाती भाजी!.....पिऊ! तूझ्या डब्यात काय आहे?... .अपना भी वही हाल हे यार!..... प्रिया म्हणाली.... तिच्या या वाक्यावर दोघीही खळखळून हसल्या...


मालिनी आणि प्रिया लहानपणा पासूनच्या एकदम जिवलग मैत्रिणी..... दोघीही उच्चमध्यमवर्गीय कुठूंबातल्या आणि एकाच सोसायटी मध्ये राहणाऱ्या....

दोघींचे वडील जॉबला एकाच कंपनीत त्यामुळे त्यांचे एकमेकांचे कौटुंबिक संबधही अतिशय चांगले ......

मालिनी आणि प्रिया दोघीही अभ्यासात फारच हुशार... पाहिली ते नववी पासुन कधी प्रियाचा पहिला नंबर येई तर कधी मालीनीचा... वर्गात त्यांचीच एकमेकींशी स्पर्धा असे .यंदा त्यांचे दहावीचे वर्षे त्यामुळे दोघीही अगदी कसून मेहनत करत होत्या.....


अभ्यासात जरी त्यांची स्पर्धा असली तरी त्यांची मैत्री बाकी पक्की होती... दोघीही कधी एकमेकां शिवाय राहत नसत.....


मालीनीला एक लहान भाऊ होता... प्रिया मात्र एकुलती एक होती......


आई!.... मी प्रिया कडे जाते ग!अभ्यासाला! ..आणि तिच्याचकडेच झोपेन! ...मालिनी आईला सांगुन निघुन गेली...


मालिनी आणि तिच्या लहान भावाला अभ्यासाला वेगळी खोली होती..... तशी प्रियालाही अभ्यासासाठी वेगळी खोली होती त्यामुळे दोघींना चांगला आभ्यास करता येई... दोघीही रात्री बऱ्याच उशिरा पर्यंत अभ्यास करीत....


दहावीत प्रियाला ९४% तर मालिनीला ९५% मार्क मिळाले.... दोघींनीही नव्वदी पार केल्यामुळं.. प्रिया मालिनी व त्यांच्या घरच्यांना देखिल खुप आनंद झाला...


दोघींनाही डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी एकाच कॉलेज मधे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला......


दोन वर्षात बारावीची परीक्षा झाली दोघीही अव्वल गुणांनी पास झाल्या....

दोघींनीही एकाच मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला.... आता त्यांच्या शेवटच्या वर्षाचे थोडेच महिने राहिले होते.... दोनचार दिवस कॉलेजला सुट्टी होती... म्हणून त्या घरी आल्या होत्या...



मालू!....आपल्या बद्दल घरी कस सांगायच ग?..... सोसायटीच्या बागेतील बाकावर बसल्या बसल्या प्रियाने विचारले....

पिऊ!..... मलाही काही सुचत नाही ग!....पण आज ना उद्या हे घरी सांगावच लागेल!....


पिऊ!आपण समलिंगी आहोत!.... आणि आपल्याला लग्न करून एकत्र राहतात तसं रहायचं आहे!.... हे ऐकून घरचे होकार देतील?.... मालिनी चिंतेत म्हणाली......

मालू!.....फॉरेन कंट्री मध्ये एक वेळ ठीक आहे..... मात्र आपल्याकडे ते शक्य नाही ग!

खरं आहे पिऊ!.... आपल्याला लोकं विकृत समजतील ग!.... विकृत !!


मालू!...पण आपण दोघीही एकमेकांशिवाय राहु शकत नाही त्याच काय?....


पिऊ!.... मग काय आज घरी या विषयी घरी सांगायच?..


मालू!....आपल्याला एकत्र राहायचे आहे ना? ...मग आज ना उद्या ही हिंमत आपल्याला करावीच लागेल!...


ठीक आहे पिऊ!..... मग आज होऊनच जाऊ दे! ....मग काय होईल ते बघु...... दोघीनीही एकमेकांच्या हातात हात देत निश्चय केला!.....




आई!...... तुझ्याशी जरा बोलायचे होत मला! ....अग!.. मग बोल ना? . .त्यांत संकोच कसला? मालिनीची आई म्हणाली.....

आई!.... संकोच म्हणजे संकोच आहेच ग!....कारण तुला मी जे सांगेन ते ऐकून तुला कदाचित धक्का बसेल!......


समजले!..... तु एखाद्या मुलावर प्रेम करतेस आणि तुला त्याच्याशीच लग्न करायचे आहे!.... बरोबर ना?.... मालिनीच्या आईने अंदाज करून विचारले .....


हो!...... मी.. प्रेम करते आणि मला त्याच बरोबर राहायचे आहे.... पण तो मुलगा नसून मुलगी आहे!.....




मम्मी! ....मला तुला काही सांगायच आहे!...... अग पिऊ! ..मग बोल ना!.....

मम्मी! ...मी जे बोलणार आहे ते ऐकून तुला वेगळ फिल होईल कदाचित?.....

ओके!...... म्हणजे तूझा बॉयफ्रेंड आहे तर?... प्रिया च्या मम्मीने विचारले ...

हो! मम्मी! आहे.... पण बॉयफ्रेंड नाही गर्लफ्रेंड आहे!... आणि मला आयुष्यभर तिच्याच सोबत रहायचे आहे!.....




अग मालिनी!.....काय बोलतेस तु ? ....तुला वेड बीड तर नाही ना लागल?...

कोण आहे ती मुलगी? ...आणि तुमचे कधीपासून चाललेत हे सगळे चाळे?..... आईने रागा रागात मालिनीला विचारले.. ..

आपली प्रिया!.... आम्ही दहावीला होतो तेंव्हा पासुन...

आणि आम्ही पुढे एकत्र रहायचे ठरवलेय.....मालिनी काहीशी ठासून उत्तरली....


अग मालिनी! ...तु काय बोलतेस हे तूझ तुला तरी कळतेय का?.. ...तूझ्या वडिलांना संगितले तर जीव घेतील तूझा.. समजले? आणि बाहेर लोकांना माहीत झाले तर ते काय म्हणतील?

आई!..... मला याची पर्वा नाही....आम्ही दोघींनीही ठरवलंय काहीही झाल तरी पुढे एखाद्या मुला सोबत लग्न न करता आपण एकत्र रहायचे म्हणजे रहायचं!



पिऊ!.... काय बोलतेस तु?.... तु लेस्बिअन आहेस?....प्रियाच्या आईने आश्चर्याने विचारले....

हो!...मम्मी! मी लेस्बिअन आहे!आणि आम्ही भविष्यात एकत्र राहण्याच ठरवलंय! ...प्रिया देखिल ठासून म्हणाली.....


हॅलो !....मालिनीची आई!... आता तुम्हांला मालिनी काही बोलली का?....

हो! ताई!......बघा ना ताई!... काय? काय?? स्वप्न पाहीली आपण आपल्या पोरींनबाबत...आणि यांनी काय? रंग उधळलेत!...मालिनीची आई डोळ्यांतील आसव पुसत म्हणाली...

संध्याकाळी हे कामावरून आल्यावर आपण चौघ आपल्या सोसायटीच्या बागेत भेटून ठरवू पुढे काय करायचे ते?..... प्रियाची मम्मी म्हणाली..



मी काय म्हणते!..... माझी एक मैत्रीण आहे! डॉ. मीरा देशपांडे म्हणून!... ती सायकॅट्रिस्ट आहे. ती काहीतरी मार्ग काढेल यातुन!..... प्रियाच्या मम्मीने संध्याकाळी बागेत त्या चार जणांच्या मीटिंग मध्ये प्रस्ताव ठेवला....

यावर मालिनीचे आई वडील आणि प्रियाच्या वडिलांनी होकार दिला..


हॅलो!....मीरा!..... अग मी नंदू बोलतेय!...... ओ! ...हो!...काय ग!.... फार दिवसांनी आठवण झाली या जिवलग मैत्रिणीची! डॉ. मीरा जरा चिडवीत म्हणाली...


हो!..... तसंच एक महत्वाच काम होत तुझ्याकडे !....काळजी स्वरुपात प्रियाची मम्मी बोलली...


नंदू!....मला माहिती आहे ग!... तु कामाशिवाय कधी फोन केला आहेस का कधी?.... एनीवे!...बोल काय झाल?


प्रिया च्या मम्मीने....मालिनी व प्रिया ची सर्व हकीकत डॉ. मीराला सांगीतली.....

नंदू!... ठीक आहे!.... तु काळजी करु नकोस!... उद्या संडेच आहे.. तुम्ही दोघं प्रियाला घेऊन माझ्या क्लिनिक वर साडे अकरा पर्यत या!.... आणि हो!... प्रियाला याची अजिबात कल्पना देऊ नकोस समजल?.... ठेवते फोन बाकी उद्या बोलू.. बाय!


या! या!!..... नंदू! अँड फेमिली... आज कसा काय रस्ता विसरलीस...माझ्या क्लिनिकचा? प्रियाला काही संशय यायला नको म्हणून मीरा म्हणाली....


बसा!... बसा!!.. काय घेणार?... चहा, कॉफी की थंड मागवू?... . मीराने जरा वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला .....


पाच दहा मिनटं बोलल्या वर.... मीराने प्रियाच्या मम्मी पप्पांना जरा बाहेर बसण्यास संगितले..


बोल!.... प्रिया!... कशी चाललीय तुझी..... डॉक्टरी पढाई ?.....चांगली चाललीय मॅडम! .....

अग! मला मॅडम काय म्हणतेस?..... मी तूझ्या मम्मीची खास मैत्रीण! ...आम्ही एकत्र कॉलेजला होतो.....आणि होस्टेलला एकच रूम मधे राहायचो..... त्यामुळे तु मला मावशी म्हण......एकेरी नावाने... जस्ट लाईक फ्रेंड!...ओके!

प्रिया!.... नंदू बोलली मला तूझ्या प्रॉब्लेम बद्दल!

प्रॉब्लेम!.......मला काय प्रॉब्लेम?...... प्रॉब्लेम त्यांना आहे!..... त्यांचा विरोध आहे मला!... प्रिया थोड्या रागात म्हणाली..... मीरा तज्ञ असल्याने समजली की, प्रिया सर्व तयारीनिशी येथे आली आहे...


ठीक आहे!.... तु आणि मालिनी आता मॅच्युअर आहात !...पाच सहा महिन्यात तर डॉक्टर व्हाल!..... पण तुमच्या विषयी आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांच काय?


मावशी! त्यांनी आम्हांला डॉक्टर बनवण्याच स्वप्न पाहिले होते!... ते तर आम्ही पुर्ण करणारच आहोत ना! मग?


प्रिया!....मी त्या स्वप्नां विषयी नाही बोलत आहे!...

मग ?


प्रिया!.... डॉक्टरकीच ते एक स्वप्न झाल!.....बाकी तुमच लग्न.... तुम्हांला होणारी मुलं... या विषयी म्हणतेय मी!.....


काय ग मावशी!.... तु स्वतः डॉक्टर आहेस ना?... मग?... मी आणि मालिनी आम्ही शारीरिक द्रुष्टीने सक्षम आहोत... गरज लागली तर ..ती किंव्हा मी.... आणि वाटलं तर आम्ही दोघीही कृत्रिम गर्भधारणा करु ना त्यांत काय विशेष?....


ओ!...... प्रिया!... याचा अर्थ तुम्ही सगळी तयारी केलीय म्हणजे?...... चल ठीक आहे.. मुलांच जाऊ दे!....पण समाजाच काय?......


मावशी! समाजाचे काय काम असते?.... तो तर बोलणारच! म्हणून काय आपल्याला जे आवडते.... आपल्याला ज्यात सुख समाधान आहे.... ते करायचे नाही?... ..

प्रिया!..... तुम्ही दोघीही मॅच्युअर चांगल्या शिकलेल्या..... भविष्यात डॉक्टर होणार आहात!... डॉक्टर म्हणजे एक आदर्श..... तुमच्या अश्या कृत्याने बाकीही तुमचा आदर्श घेतील?.... आणि असच जर पुढे चालु राहिले तर... निसर्गचक्र बिघडेल!.... ...


काय ग मावशी?..... दुसर कोणी बोलल असत तर ठीक!... तु तर स्वतः सायकॅट्रिस्ट आहेस ना! मग किती लोकांची मानसिकता असते ग अशी!... एक टक्क्याच्याही खाली...... आणि त्यांत समाजबंधन झूगारून देऊन एकत्र राहणाऱ्यांची तर त्याहून कमी..... मग कस काय निसर्गचक्र बिघडेल?

प्रिया!...पण हे अनैसर्गिक आहे!

मावशी!... एखादा नवरा दारू पिवून कधी बायकोवर तीची इच्छा नसतांना जबरदस्ती करतो ते नैसर्गिक?..... चारपाच लोकं एखाद्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतात तो नैसर्गिक?...


प्रिया! तु म्हणतेस ते बरोबर आहे! ...पण तो विषय वेगळा आहे ग!....


प्रिया!.... मग याचा अर्थ काहीही झाल तरी तुम्ही एकत्र राहणार तर?....


हो!.... काहीही झाल तरी!आमचा निर्णय पक्का आहे!....समाज काहीही म्हणाला तरी!... आम्हांला ज्यात आनंद मिळतो तेच आम्ही करणार!.....फायनल!! प्रिया एकदम आवेशात म्हणाली....


मीराने टेबलावरची घंटी बजावली व प्रियाच्या आई-वडिलांना आत पाठवायला संगितले...

नंदू!... तुम्ही सगळे चहा घ्या ना!......प्रिया काय हुशार आहे बाबा!.... मी माझ्या परीने तिला संगितले.... आता काय तो निर्णय त्यांनाच घेऊ दे!... मीरा चहा पिता पिता.. म्हणाली!....


मीरा!... चल आम्ही निघतो.. काय असेल तर कळवीन तुला!.... टेक केअर... बाय!... असे सांगुन तिघे क्लिनिक मधुन बाहेर पाडली....


हॅलो !....नंदू!.... पोचलीस का घरी? ....आज प्रिया बरोबर बराच वेळ बोलले..... तिच्याशी बोलतांना मला आपल्या कॉलेज आणि हॉस्टेल मधील ते आपले दिवस आठवले.....शेवटी तुझीच मुलगी ती!..... तूझेच हॉर्मोन्स आहेत तिच्यात!..... फक्त फरक इतकाच आहे की,.... तुला समजाची भीती वाटायची!..... प्रियाला..मात्र समाजाची अजिबात फिकीर नाही!...



(कथा पुर्णपणे काल्पनिक असुन...यातील पात्र देखिल काल्पनिक आहेत.... यांत काही साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा )

(कथा मोबाईल वर टाईप केल्याने काही चुका आहेत त्या बद्दल माफी असावी..)

लेखन: चंद्रकांत घाटाळ
0