Login

समांतर रेखा भाग 3

नात्यांच्या अगतिकतेमध्ये होरपळणाऱ्या प्रेमाची अनोखी कथा...
राधिकेचं बाळ चंद्रकलेप्रमाणे वाढू लागलं पण राधिकाला वाटायचं कोणीतरी आपल्या बाळाला आपल्यापासून दूर नेऊ पाहतेय. त्यामुळे ती सगळ्यांकडे नेहमी संशयाने पहायची.

"माझ्या लाडक्या बाळाला मी कशी लपवू? माझ्या या काळजाच्या तुकड्याला कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना?" अशी बोलत राहायची. अति प्रेमापोटी त्या आईच्या मनात सगळ्यांबद्दल संशय निर्माण झाला. तिला कोणावरही विश्वास वाटेना. क्षणभर सुद्धा ती आपल्या बाळाला दूर करायला तयार नसायची. त्याचं कुणाला काही करू द्यायची नाही.

इकडे अर्चना बाळासाठी तळमळायची, रडायची. तिला वाटायचं,

'हे बाळ म्हणजे आपल्या नवऱ्याचा पुनर्जन्म आहे. त्यामुळे आपला त्याच्यावर पूर्ण हक्क आहे.'

पण तिची धाकटी जाऊ राधिका मात्र तिला बाळाच्या जवळ फिरकू देखील द्यायची नाही. मनातली तळमळ अर्चना दिरासमोर बोलू शकली नव्हती. तिला ठाऊक होतं,

'राधिकाने बाळाचा नऊ महिने भार वाहीला आहे. बाळंतकळा सोसून त्याला जन्म दिला आहे. बाळासाठी रोज रात्र-रात्र ती जागते आहे. अंगावर दूध पाजते आहे. ती बाळाची आई आहे त्यामुळे बाळावर तिचा सर्वस्वी हक्क आहे.'

पण हे सगळं खरं असूनही बाळाला जवळ घेण्यासाठी, त्याच्या स्पर्शासाठी, त्याच्या गालावरच्या तीळाकडे डोळं भरून पाहण्यासाठी अर्चना तळमळत राहायची.

पण राधिका मात्र आपल्या बाळाला सतत जवळ घेऊन बसायची. पदराखाली झाकून ठेवायची. तिच्या दोघी मुली मात्र काकू आल्यापासून खाण्यापिण्यासाठी सुद्धा आईला हाक मारत नव्हत्या, जणू अर्चना काकूचं त्यांची आई झाली होती. त्या काकूभोवती पिंगा घालत. स्वतःहून आईकडे यायच्या सुद्धा नाहीत पण त्याचं राधिकेला मुळीच दुःख नव्हतं. मुलींची जबाबदारी पूर्णतः अर्चनावर सोपवून ती आपली आपल्या नवीन बाळात दंग होती.

फक्त राधिकाच्या आंघोळीच्या वेळी, जेवायला खायला बसली की, बाळाला जाऊबाईंच्या मांडीवर खेळायला देत असे. थोडा वेळ तरी बाळाचा सहवास लाभेल, त्यासाठी ती वेळ गाठण्यासाठी अर्चना कोण धावपळ करी. बाळाला मांडीवर घेतल्यावर ती सगळ्या जगाला विसरून जाई. एकदा बाळाला मांडीवर घेतलं की मग अर्चना जावेच्या दोन लहानग्या मुलींना देखील लांब करत असे. घराच्या कोपऱ्यात एखाद्या एकांत ठिकाणी बाळाला घेऊन बसत असे. त्याच्या गालावरच्या तीळावर हात फिरवत बसे. त्याच्या गालाचे अगणित मुके घेत असे. बाळाला बघितलं की अर्चनाला आपल्या आणि आपल्या नवऱ्याच्या सहजीवनातील असंख्य गोड स्मृती आठवत असत. गालावरच्या तिळाची त्यात अधिक भर पडे. अनेक मोहवेडे प्रसंग त्या तिळामुळेचं घडलेले तिला आठवत आणि मग ती मनमोकळं हसत असे.

बाळ मांडीवर असले की अर्चनाचा सगळा जीव त्याच्या ठाई गोळा व्हायचा. गरज नसली तरी अर्चना उगाचचं बाळाचे कपडे बदलायची, त्याच्या कोवळ्या मऊसूत जावळावरती हात फिरवायची, बाळाच्या गोऱ्या गोऱ्या मऊ अंगाचा स्पर्श तिच्या अंगावर काटा फुलवून जायचा. बाळ नुसत जवळ असलं तरी अर्चनाच्या अंग अंगात वात्सल्याचा पूर लोटायचा. बाळाची उटणं लावून अंघोळ झाल्यावरती तर त्याच्या अंगाचा ताजा गंध तिच्या रंध्रा रंध्रात भिनून जायचा. अर्चनाची पत्नीत्वाची भूक, आईपणाची भूक बाळाच्या सानिध्यात पेटून उठायची तिला वाटायचं,

'आपल्याला आता वेड लागेल कि काय? आपण ह्या बाळाच्या प्रेमात ठार वेड्या होऊन जाऊ.'

बाळ मांडीवर झोपलं तरी त्याला पाळण्यात ठेवायला तिचं मन व्हायचं नाही. कितीतरी वेळ ती तशीच मांडीवर बाळाला घेऊन बसून राहायची. कधीतरी नंतर मग हळूच पाळण्यात ठेवायची. त्याला नाजूक हाताने झोका द्यायची. पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे ती डोळे भरून बघत राहायची. धाकट्या जावेचा डोळा चुकवून झोपलेल्या बाळाच्या कपाळावर अलगद ओठ टेकवायची. बाळ रडू लागलं की पाळणा हलवत बाळासाठी अंगाई म्हणायची. तिचा गोड आवाज ऐकून मग शेवटी धाकटी जाऊ सुद्धा गप्प होऊन जायची. बाळावरच्या अवाजवी प्रेमापोटी दोघी जावा एकमेकींचा मत्सर करू लागल्या, वाद वाढू लागले आणि त्यात नेहमी शेवटी विजय बाळाच्या आईचाचं व्हायचा.

तिसरा भाग क्रमशः........
©️®️सायली पराड कुलकर्णी
0

🎭 Series Post

View all