Login

समर्पण भाग १

समर्पण करता आलं पाहिजे

नीलिमा ताईंना आज अस्वस्थ वाटत होतं. त्या सुमेधाच्या आठवणीत एवढ्या व्याकुळ झाल्या होत्या, की त्यांना अगदी घाम फुटला. त्यांनी सुनेला आवाज दिला. पाणी आणायला सांगितले. सून आणि मुलगा तात्काळ बाहेर आल्यावर सोफ्यावर बसलेल्या नीलिमा ताईंना तिथेच झोपवले.
काही वेळातच त्यांना बरे वाटायला लागले. कारणही तसेच होते.
आज त्यांना झोपेतच सुमेधाने आवाज दिल्याचा भास झाला. त्यांनी त्यांच्या सुनेला सांगितले की आज सकाळी मला दाराची कडी वाजवून सुमेधाने, आई! म्हणून हाक मारली. मी सुद्धा तिला आवाज दिला.
नंतर लक्षात आले, की सुमेधा तर आपल्यातून दूर निघून गेली, अनंताच्या प्रवासाला!
असा प्रवास की जिथून कोणीच परत येऊ शकत नाही. त्या पुन्हा पुन्हा तिचाच विचार करायला लागल्या.
त्यांना सुद्धा आता हे जग नश्वर वाटायला लागले. जगणे हे कस्तुरी प्रमाणे! आपण त्याच्या मागे पळत सुटतो. आपली सर्व नाती त्यांना क्षणभंगुर वाटायला लागली. आपण या मायेच्या पसाऱ्यात गुंतलेलो आहोत. यातून आपली सुटका नाही का? की असंच आठवणीत जगायचं?
नीलिमाताईंच आता होय झालं होतं. ऐंशी वर्षे वयाच्या नीलिमाताई त्यांना दोन मुलं, एक मुलगी, तिचं नाव सुमेधा.
त्यांच्या जीवनसाथीने सुद्धा त्यांची साथ सोडलेली होती.
त्यांचे शेंडेफळ असलेली सुमेधा. त्या तिच्या आठवणीतच रमायच्या.

सुमेधा लहानपणापासूनच साधी सरळ देखणी. तिने शाळेत असताना पासूनच तिच्या शिक्षिकेला आदर्श मानलं होतं. तिची शिक्षिका तिला खूपच आवडायची. तिचं प्राथमिक शिक्षण तिच्या गावातच असणाऱ्या शासकीय शाळेत झालं होतं.
तिची शिक्षिका चुणचुणीत सुमेधाला नेहमी शाळेत पुढे करायची. त्यामुळे तिच्यात नेतृत्वगुण सुद्धा आलेले होते.
अशी सुमेधा मोठी झाल्यावर मी सुद्धा शिक्षिका होईल असं तिचे स्वप्न होते.

ते स्वप्न तिचे पूर्ण करण्यासाठी खेड्यातून शहरात येणं गरजेचं होतं. तिने शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर अर्ज सादर केला. तिच्या गुणापत्रिकेवरील गुणांमुळे तिला लवकरच शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाला.
प्रशिक्षणासाठी ती वसतिगृहात राहू लागली.
प्रशिक्षणातील शिस्तबद्ध जीवन तिला खूप आवडायला लागलं.
वसतिगृहातील तिला नेमून दिलेली कामे ती मनापासून करीत असे. तिने अभ्यासात स्वतःला कुठेही मागे ठेवले नाही.
तिचं वागणं, बोलणं अगदी सरळ साधं. सरळ मार्गी. कुणाच्याही अध्यात ना मध्यात. अभ्यासात रमणारी, वाचनाचं वेड असणारी, अशी ती.

गावातीलच तिच्या मैत्रिणींनी सुद्धा शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज सादर केलेले होते. त्यांना सुद्धा शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाला. त्या सुद्धा वसतिगृहातच राहायला लागल्या. त्यामुळे हिची मैत्रिणींशी चांगली गट्टी जमली.
प्रशिक्षणा दरम्यान तिच्या मैत्रिणींना शहरात येऊन पंख फुटले. त्या स्वैर पणे वागू लागल्या. त्यांनी सुमेधाला सुद्धा त्यांच्याकडे खेचले.
एकदा तिची मैत्रीण शुभदा तिला म्हणाली, ए सुमेधा! चलतेस का मुव्ही पाहायला? आज आपण क्लासला ब्रेक मारू. एक दिवस क्लास मध्ये उपस्थिती नाही दर्शविली तर काहीही फरक पडत नाही. असं म्हणून शुभ दाने तिला मुली पाहायला तयार केलं. ती सुद्धा त्यांच्याबरोबर मुव्ही पाहायला गेली.
असं नेहमीच घडायला लागलं. आज मूवी, उद्या हॉटेल. सर्वजणी अभ्यास सोडून मजा करायला लागल्या.
घरून मागविलेली रक्कम अपुरी पडायला लागली. तिचा भाऊ गावात शेती करायचा. शेतकऱ्याचे जीवन कसं असतं हे आपणाला ठाऊक असतं. कधी शेतमालाला भाव कमी मिळतो. राब राब राबून सुद्धा हक्काची भाकरी सुखाने मिळत नसते.
त्यात घरात अनेक विवंचना असतात. शिक्षणासाठी पैसा कसातरी जमा करावा लागतो.
तिच्या भावाला तिला दर महिन्याला विशिष्ट रक्कम पाठवावी लागत असे. तशात तिची पैशाची मागणी आता वाढत चाललेली होती.
भावाला हे झेपत नव्हतं. तरीही त्याने कुटुंबाची जबाबदारी म्हणून व लहान बहिण, तिला नोकरी लागेल, या आशेने तो तिला दर महिन्याला विशिष्ट रक्कम पाठवायचा.
नीलिमा ताई घरकाम करून भजन मंडळात सहभागी व्हायच्या. त्यात त्या नेहमी आपला आनंद शोधाय च्या.
अशा कुटुंबातली मुलगी सुमेधा मैत्रिणींच्या संगती मुळे आपल्या ध्येयापासून भरकटली. ती तिच्या ध्येयापासून दूर जाऊ लागली.

वसतिगृहाच्या अधीक्षकांनी या चौघी मैत्रिणींना समज दिली. वसतिगृहातून काढून टाकण्याची ताकिद दिली.

एकदा त्यांच्या कॉलेजमध्ये प्रेरणात्मक व्याख्यान ठेवण्यात आलेले होते. असे नेहमी च वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान त्या कॉलेजमध्ये घेतल्या जात असे. जेणेकरून भावी शिक्षक चांगले नवीन पिढी संस् जेकारी घडविणारे बनले पाहिजेत, हा मुख्य उद्देश त्या विद्यालयाच्या प्राचार्यांचा होता.
व्याख्यान देणारे वक्ते सुद्धा खूप अनुभवी होते. बोलता बोलता त्यांनी एक छोटी गोष्ट प्रशिक्षणार्थ्यांना सांगितली.की... बघा

एक मुलगा गुरे राखत होता. तो दररोज गुरे चारायला जंगलात न्यायचा. त्याचा तो नित्यक्रम होता. दररोज जंगलात गुरांचा कळप न्यायचा. गुरे चरायला सोडून त्यांच्यावर तो दुरून लक्ष ठेवायचा.

एके दिवशी जंगलात गुरांचा कळप चरत असताना, त्या कळपातील एक गाय भरकटली. ती खूप दूर जंगलात गेली. आणि कळपातून दिसेनाशी झाली.
तेवढ्यात त्या गुराख्याला कळले की आपली एक गाय कळपातनाही. आता मालक आपल्यावर रागावतील. मालकाला आता काय सांगणार? त्याला आता काही सुचेना. तो तसाच गाय शोधण्यासाठी जंगलात पुढे पुढे गेला. त्याला ती गाय एका दरीच्या जवळ चरताना दिसली.
मुलगा त्या गाई मागे जोरात पळाला. गाय सुद्धा दरीच्या पुढे पळाली. मुलाने त्या गाईला पकडण्यासाठी दरीवरून जोरात छलांग मारली. गाईला पकडले, व कळपातआणून सोडले.
हे सर्व एक राजा दुरून पहात होता. एक छोटा मुलगा दरी वरून छलांग लगावतो काय, आणि गाईला पकडून आणतो काय, राजाला खूप आश्चर्य वाटलं.
राजा त्या गुराख्याजवळ गेला. त्याला म्हणाला, की तू जी आता छलांग दरी वरून मारलीस, तशीच तू मला आत्ता मारून दाखव. मी माझ्या जवळील सर्व सोन्याची आभूषणे तुला देऊन टाकीन.
मुलाने त्या राजाला काय उत्तर दिलं असेल?

सर्व विद्यार्थी ही गोष्ट ऐकण्यात तल्लीन झालेले होते. एकाही विद्यार्थ्यांने यावर उत्तर दिले नाही.
व ते त्यावर म्हणाले, की तो गुराखी राजाला हे म्हणाला, की राजन! मी जेव्हा माझ्या गाईला पकडण्यासाठी जी उडी मारली, ते माझं ध्येय होतं. ते माझं लक्ष्य होतं. त्या ध्येयासाठी मी पूर्णतः स्वतःला झोकून दिलेलं होतं. तुम्ही मला आता त्यासाठी बक्षीस देणार आहात. परंतु ध्येयासाठी काम करण्यात एक वेगळाच आनंद असतो. त्याची एक वेगळी च ताकद असते. जे की बक्षीसामध्ये नाही.

हे व्याख्यान ऐकत असताना सुमेधाचे मन सुद्धा एकाग्र झाले होते. ती हे व्याख्यान तल्लीन होऊन ऐकत होती.
तिला स्वतःला अपराधी वाटायला लागले.


तिला या व्याख्यानामुळे काय दिशा मिळाली पाहूया पुढच्या भागात
©®chhaya raut..

0

🎭 Series Post

View all