Login

सामर्थ्य भक्तीचे : वेळ पुनर्मिलनाची - भाग सहा

खंडोबावर अगाध श्रद्धा असलेले म्हाळसा आणि सदाशिव एका दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे एकमेकांपासून वेगळे होतात आणि भगवंताच्या एका कार्यासाठी पुन्हा जन्म घेतात. या जन्मात म्हाळसा आणि सदाशिव एक होतील का? काय असेल त्यांचे कार्य? हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचत रहा!
बराच स्वतःशीच विचारविनिमय करून झाल्यावर तारा त्या भंडाऱ्याला हात लावायचे ठरवते. ती त्या दिशेने जाणार इतक्यात छोटा मार्तंड तिच्या हाताचे एक बोट धरतो. हे पाहून ताराच्या चेहऱ्यावर हसू पसरते आणि ती मार्तंडच्या डोक्यावरून हात फिरवत ‘राजा, मी कुठेच जात नाहीयेय, इथेच आहे. तू झोप हा निवांत’ असे म्हणते आणि घरात काम करणाऱ्या श्यामाची बायको, गोदाने आणलेला नाश्ता खाते. खातानाही तिची नजर त्या लाल बटव्यावर जाते. आता मात्र तिची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे तिने घासावर घास मारले आणि त्यावरच गटागट पाणी पिऊन लागलीच तो लाल बटवा हातात घेते. त्या बटव्यातील भंडारा हातात घेताच तिच्या हाताला चटका बसतो. तिच्या तोंडून निघणारी किंकाळी ती तोंडातच रोखून धरते. कारण तिच्या आवाजामुळे मार्तंड उठला तर त्याला घेता येणार नाही. स्वतःला सावरत ती तो भंडारा परत बटव्यात भरते. तिच्या हाताला असहय्य असा दाह होत होता. ती तसाच हात घेऊन टेबलाच्या खणांमध्ये ठेवलेले औषध काढते आणि ते हातावर लावते. काही क्षणातच तिचा डोळा लागतो.

काही वेळाने झोपेतच तिच्या डोळ्यांसमोर काही अपरिचित चेहरे येतात. त्यातील एका दृश्यात धुरकट परिचित वाटणारे असे चेहरे तिला दिसतात आणि तिच्या हाताचा दाह वाढू लागतो. अचानक तिला असहय्य अशा वेदना हाताला होऊ लागल्याने ती झोपेतून उठून बसते. तिला इतक्या वेदना होत असूनही तिच्या तोंडून जराही आवाज निघत नाही कारण तिच्या आवाजाने मार्तंड उठेल. ती विचारच करत होती की काय करावं? इतक्यात दरवाजा जोरात उघडला जातो. त्या आवाजासरशी ती दचकते आणि हात मागे लपवते.

पिंगलाक्ष : तारा, तुझा हात दाखव पटकन!

तारा : तुम्हाला कसं समजलं?

पिंगलाक्ष : यावर आपण नंतर बोलूच पण आधी हात दाखव त्यावर उपचार करायला हवेत.

त्याचं हे बोलणे ऐकून गोदा आणि रखमाबाईचा गोंधळ उडतो. त्या काही बोलणार इतक्या पिंगलाक्ष त्यांना रोखतात. त्यांची नजर पाहून घाबरलेली तारा लागलीच हात पुढे करते. तिचा तो भाजलेला हात पाहून गोदा व रखमाबाईच कायपण तारापण घाबरते.

तारा : हे एवढं कसं वाढलं? आणि इतकी आग का होतेय हाताची?

पिंगलाक्ष : तारा, सगळं सांगतो जरा शांत बस!

असं बोलून पिंगलाक्ष त्यांच्या शबनम बॅगेतील एक बटवा काढतात आणि त्यातील पितळेची छोटी पण सुंदर अशी डबी काढतात. त्यातील लेप त्यांनी ताराच्या हातावर लावताच तिला वाटणारा दाह कमी होतो. गोदा तिला पटकन पाणी प्यायला देते.

रखमाबाई : बाबा, डॉक्टरला बोलावायची गरज आहे का?

पिंगलाक्ष : काही गरज अर्ध्या तासात हात बरा होईल. तारा तुला सांगितलं होतं की त्या भंडाऱ्याला हात लावायचा नाही तरी तू त्याला हात का लावलास?

पिंगलाक्ष : माझं चुकलंच पण मला खरच हात लावण्यापासून राहवलं नाही.

पिंगलाक्ष : रखमाबाई, मला तुमच्या दोघींशी महत्त्वाचे बोलायचे आहे. गोदाताई तुम्ही आमच्यासाठी चहा आणाल का? अगदी आरामात आणलात तरी चालेल?

पिंगलाक्ष बाबांना या दोघींशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे जे आपल्यासमोर बोलता येणार नाही हे गोदाला समजताच ती लगेच खोलीतून बाहेर पडते व खोलीचे दार लावून घेते.

पिंगलाक्ष : गोदाला फोड करून न सांगता समजलं की तिची उपस्थिती मला इथे नको आहे पण तारा तुला तर मी फोड करून सांगितलं होतं की त्या भंडाऱ्याला हात लावायचा नाही. तरीही तू हात लावलास??

त्यांच्या नजरेतील राग पाहून रखमाबाई आणि तारा दोघीही बसल्या जागीच गार पडतात. तारा ‘आता आपलं काही खरं नाही’ असाच विचार करून घाबरते. तेवढ्यात रखमाबाई थोडा धीटपणा दाखवत तिची बाजू घेतात.

रखमाबाई : मी काय बोलते बाबा, आता तिला माफ करा. ती पुन्हा असं नाही करणार!

पिंगलाक्ष : ही वेळ मीच पुन्हा येऊ देणार नाही.

रखमाबाई : म्हणजे?

पिंगलाक्ष : सांगतो. तारा मार्तंडला घेऊन ये आणि तो भंडाऱ्याचा बटवाही घेऊन ये. तुला सांगतो त्या भंडाऱ्यात काय फरक आहे ते?

त्यांनी असं बोलताच ‘यांना आपण काय विचार करतो हे कळतं की काय?’ असा विचार तारा मनातल्या मनात करते. ती बटवा पिंगलाक्ष यांच्या हातात देत मार्तंडला घेऊन त्यांच्यासमोरच्या सोफ्यावर बसते. तेव्हाच पिंगलाक्ष बटव्यातील भंडाऱ्याला स्पर्श होईल इतका मार्तंडचा हात त्यात घालतात. तत्क्षणी डोळे दिपवून टाकणारा एक सोनेरी प्रकाश त्यातून बाहेर पडतो. हे पाहून पिंगलाक्ष लागलीच बटव्यातून मार्तंडचा हात काढतात. मार्तंडच्या हाताला काहीही न झाल्याचे पाहून तारा व रखमाबाई चकित होतात.

पिंगलाक्ष : हा भंडारा खुद्द खंडोबाने म्हाळसाला दिला होता. हा भंडारा कधीच संपत नाही अशी या भंडाऱ्याची ख्याती होती. भूत-पिशाच्च असू दे किंवा साधारण-असाधारण आजार या भंडाऱ्याने बरे होतात. हा भंडारा खूप शक्तिशाली आहे पण याचा वापर फक्त आणि फक्त म्हाळसाच करू शकते. दुसऱ्या कोणी या भंडाऱ्याला हात लावला तर काय होतं याचा तुला अनुभव आलाच आहे. तुला तरी खूप साधी-सोपी शिक्षा मिळाली कारण तुझ्या मनात पाप नाही आणि तू मार्तंडची आई आहेस आणि अजूनही काही गोष्टी आहेत त्या मी वेळ आल्या कि तुला सांगेनच.

तारा : तुम्ही म्हणालात की हा भंडारा म्हाळसाचा आहे तर मग मार्तंडला का त्रास झाला नाही?

पिंगलाक्ष : कारण मार्तंड कोण आहे हे या भंडाऱ्याला माहिती आहे. तो म्हाळसाचा सदाशिव आहे पण त्याला फक्त त्या भंडाऱ्याला स्पर्श करण्याची आणि कपाळावर लावण्याची अनुमती आहे त्याचा वापर करण्याची नाही. कारण या भंडाऱ्याचा शक्ती स्रोत हा म्हाळसा आहे. तिलाच फक्त याचा वापर कसा करायचा हे माहिती आहे.

रखमाबाई : जसा म्हाळसाचा शक्तीस्रोत हा भंडारा आहे तसाच सदाशिवचा शक्तीस्रोत असेल ना?

पिंगलाक्ष : हो आहे ना! त्याची निस्सीम खंडोबावरची भक्ती आणि म्हाळसावरच प्रेम हीच त्याची शक्ती होती. गतजन्मी सदाशिव हा अनेक शक्ती, विधी, मंत्र अशा सगळ्या गोष्टींचा ज्ञाता होता आणि त्यात तो प्रवीण होता. समोरच्या माणसाचा चेहरा बघून त्याला त्याचे भूत-भविष्य आणि वर्तमान समजायचे. अगदी साधा होता तो! मनात कोणतेही कपट नाही, कुणाशी उगाच वाद घालणं नाही आणि मारामारी तर त्याहून नाही आणि त्याच्या अगदी उलट म्हाळसा होती. मात्र या जन्मात दोघेही आगीचे गोळे असणार आहेत. त्यामुळे मी थोडा चिंतीत झालो आहे पण खंडोबा नक्कीच याचेही प्रयोजन केले असणार आहे.

तारा : हा जर म्हाळसाचा भंडारा आहे तर तो तिच्याजवळ असायला हवा ना? मग तो इथे का आहे?

पिंगलाक्ष : हा भंडारा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हाळसा म्हणजेच भैरवी आणि हा भंडारा एकत्र असेल तर त्यांच्या जीवाला धोका आहे. कारण जसा म्हाळसा आणि सदाशिवचा जन्म झाला तसाच या भंडाऱ्याला मिळवण्याचा अट्टाहास असणाऱ्या सूर्यभानचाही जन्म होणार आहे आणि मुळात त्याचा गुरु, कृपाल अजूनही जिवंत आहे. त्यामुळे भैरवी आणि भंडारा दोन्ही धोक्यातच आहेत. भंडारा नसेल तर तो भैरवीला पळवून नेऊ शकत नाही आणि म्हणून मग हा भंडारा मार्तंडजवळ राहील असे आम्ही ठरवले. हा भंडारा इथे राहिला तर, मार्तंडला गतजन्म लवकर आठवेल. यावेळी मार्तंड आणि भैरवी सूर्यभान आणि कृपालचा विनाश तर करणार आहेतच पण त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचे कार्य त्यांच्या हातून घडणार आहे. या भंडाऱ्याला हात लावल्यावर जशी तुझ्या डोळ्यासमोर विविध प्रसंग आले तसेच मार्तंडच्या येतील त्यातूनच त्याला त्याचा गतजन्म कळणार आहे. आता तुमच्या दोघींच्या लक्षात बऱ्याच गोष्टी आल्या असतील. तेव्हा आता जपून वापरा. बारा दिवस झाले की मार्तंडला खंडोबाच्या मंदिरात न्यायचे आहे आणि त्याच दिवशी त्याचे नामकरण करायचे आहे.

रखमाबाई : हो सगळं अगदी रीतीप्रमाणे होणार आहे. तारा हे सगळं आपल्यातच राहील याची काळजी घे. मार्तंडवरही धोका असेल. बाबा, मी सुरक्षा वाढवेन या वाड्याची फक्त बारसे होऊन जाऊ द्या.

पिंगलाक्ष : मार्तंडच्या सुरक्षेबाबत मी काहीतरी विचार केला आहे. यावर दादासाहेब आले की बोलून घेऊ. गोदा काही येत नाही मी निघतो आता खोलीत!

ते एकवार निजलेल्या मार्तंडच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. बॅगेतून एक डबी काढून ते ताराच्या हाती देतात. तेवढ्यात गोदा चहा घेऊन खोलीत येते.

पिंगलाक्ष : हो…अगदीच आरामात आलीस तू! तारा यातील लेप रात्री मार्तंड रडू लागला तर लाव आणि तुलाही अस्वस्थ वाटलं तर तूही लाव. हात बघू तुझा!

ताराचा हात बघून तारा, गोदा आणि रखामाबाईंना धक्का बसतो. हात भाजल्याचे कोणतेच व्रण अथवा जखम नव्हती. त्या तिघींचे चेहरे बघून पिंगलाक्ष यांना हसू येते.

पिंगलाक्ष : चहा पिऊन घ्या थंड होतोय तो! गोदा आजचा बेत अगदी झणझणीत कर!

सगळे खोलीतून निघून गेल्यावर तारा ‘पिंगलाक्षदादा कुणी साधे सुधे व्यक्ती नाहीत हे तर माझ्या ध्यानी आलंय. मार्तंडला घडवताना मला खूप गोष्टींची काळजी अगदी काटेकोरपणे घ्यावी लागणार आहे. खूप वाचन आणि दादांचं मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे. त्याहूनही
महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये अनेक बदल घडवावे लागतील. माझ्या लेकासाठी मी जमेल ते सगळं करेन.‘ असा मनोमन निश्चय करते.


जगताप यांच्या बाजूच्या गावातील जंगलात अग्नी कुंडासमोर बसलेला व्यक्ती चेहऱ्यावर क्रूर हसू घेऊन आकशाच्या दिशेने पाहतो आणि “यावेळी मी तुला जिंकू देणार नाही. मी पूर्ण तयारीनिशी उतरलो आहे. तुझा कोणताच गण काही करू शकणार नाही. अगदी तो पिंगलाक्ष आणि साथीदारसुद्धा! हाहाहाहा”

इकडे वाड्यात खिडकीत उभे असलेले पिंगालाक्ष गालातल्या गालात हसतात. “तू कितीही तयारीनिशी उतर, मी तुला जिंकूच देणार नाही. फक्त माझी म्हाळसा मोठी होऊ दे मग बघ तुझं काय करतो ते!” असे बोलून ते शांत होतात आणि जमिनीवर गोधडी अंथरून झोपी जातात.

©® प्रणाली प्रदीप