समुद्र पेटला-1

मराठी कथा
समुद्र पेटला...!

आज दवाखान्यात पोहोचायला जरा उशीरच झाला होता. मनोरुग्ण असलेले हे सगळे जीव...वाट पाहत बसतात. एकूण चाळीस रुग्ण आहेत आमच्या दवाखान्यात. मी आणि माझा नवरा...शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरू केलेला हा दवाखाना. रोजच्या उपचारांसोबत काही वेळ यांना देण्याचा आमचा प्रघात आहे. रोज किमान दोन रुग्णांना अर्धा तास वेळ देते मी...!
काल एक नवीन रुग्ण भरती झाला.
"तुला सांगतो माया...आता पन्नाशी आली माझी. इतकी वर्षे आहे या क्षेत्रात, पण असा विलक्षण पेशंट पाहिला नाही. २१ वय आहे त्या पोरीचे...ती म्हणते, मी समुद्र आहे..."
रात्री जेवताना नवरा सांगत होता
"पण असे का डॉक ?" मी विचारले
"हं...."दीर्घ निःश्वास सोडत डॉक म्हणाला
"फार ट्रजिक स्टोरी आहे यार तिची... अनाथ आहे मुलगी, प्राजक्ता नाव...कोकणात मामाकडे राहत होती. गँगरेपची केस आहे. सहा महिन्यांपूर्वी तिघांनी..." डॉकने डायनिंग टेबलवर जोरात हात आपटला.
दोघेही इतकी वर्षे याच क्षेत्रात आहोत, पण डॉक माझ्यापेक्षा जास्त हळवा होता, तसाच राहिला. अनुभवाने मी कणखर होत गेले.
"तेव्हापासून अशी झाली आहे का ?"
"हळूहळू होत गेली म्हणे, आता इथं आणून टाकली आहे."
"मग आपलं बिल कोण देणार डॉक ?"
"२१ वर्षांची कोवळी पोर...तुला बिलाचे पडले आहे माया ?? आपला भावार्थ २३ वर्षांचा आहे, जर दुसरी मुलगी असती तर हिच्याएव्हढी असली असती ना..."
"डॉक, मी फक्त विचारलं, तिला आणून कुणी सोडली ? हिशोबाचे काय होते ?? मामाची परिस्थिती आहे का तेवढी ?"
"मामा आणि गावातले सरपंच आले होते, ते करणार आहेत म्हणे मदत..."
"का ?"
"माया..."
"ओक्के....सॉरी...." मी किंचित हसत म्हणाले
"माया....प्लीज...तू बघ ना ही केस...म्हणजे, मला..." डॉक चाचरत म्हणाला
"कळलं...मी पाहते उद्या..."
दवाखान्यात कार पार्क करून केबिनमध्ये जाताना आदल्या रात्री माझे आणि डॉकचे झालेले बोलणे मनात घोळत होते.
"गुड मॉर्निंग मॅम..." रिसेप्शन काउंटरवरची रेश्मा हसत म्हणाली
"रेश्मा...ये आत..." मी म्हणाले
माझ्या मागोमाग ती आत आली.
"ती काल आलेली पेशंट, काय नाव तिचं ...? प्राजक्ता...तिला पाठवून दे आत."
"येस मॅम" म्हणत रेश्मा निघाली, केबिनच्या दाराकडे जाताना थांबली, वळून म्हणाली
"मॅम, राऊंड ?"
"नंतर....डॉक येईल अर्ध्या तासात...तो बघेल"
"ओके मॅम..."म्हणत रेश्मा गेली
मी लॅपटॉपवर तिची केस पाहू लागले.
प्राजक्ता महाजन :-वय २१
लाडघर :- दापोली
भरती करणार :- शंकर नेने (मामा)
तेवढ्यात दारावर टकटक झाली.
"येस...कम इन..." मी मान वर करत म्हणाले
पाटील सिस्टर आत आल्या. त्यांच्यामागोमाग... प्राजक्ता...नावाप्रमाणेच असलेली गोरीपान, नाजूक प्राजक्ता
"मॅम...ही होईल ना नीट ?" सिस्टर म्हणाल्या
मी त्यांच्याकडे रोखून पाहिले. पन्नाशी ओलांडलेली...
क्रमशः

🎭 Series Post

View all