Login

समुद्र पेटला- 3

मराठी कथा

"अग, कामात होते, सॉरी..." मी म्हणाले
"मी किती आवाज देत होते तुला, तुला ऐकूच आलं नाही."
"कधी गं ?" मी सिस्टरांकडे पाहिले.
त्यांनी नकारात्मक मान हलवली
"अग... आत्ता नाही गं बाई...त्यादिवशी..."
प्राजक्ता हात डोक्यामागे नेत म्हणाली
"कोणत्या दिवशी ?" मी कपाळावर आठी घालत विचार करू लागले
"त्यादिवशी गं... रात्री...समुद्राच्या पाण्यात मी भिजत होते...आणि ते तिघे...मी ओरडत होते, आई...आई गंsss..."
मी तिच्याकडे पाहत होते
"आई गंsss...." ती जोरात ओरडली आणि रडायला लागली
"समुद्राचा आवाज खूप मोठा असतो...इतका मोठा...आई गंssss
मी समुद्र आहे...समुद्र..." प्राजक्ता जोरजोरात ओरडत होती, रडत होती.
सिस्टरांनी तिच्या पाठीवर हात ठेवला, तिने तो झटकून टाकला
मी उठले, तिच्या जवळ गेले. तिच्याच्या डोक्यावर हात ठेवला. तिने थडाथडा मला मारायला सुरुवात केली.
"तू दुष्ट आहेस...तू का आली नाहीस ? मला खूप त्रास झाला ग माये..." ती स्वतःला मारून घेऊ लागली.
मी तिचे हात घट्ट पकडले. तिने जोरात हिसडा दिला.
"आई...तुला माहीत आहे का, इथं...इथं कुशीत दुखत राहतं गं माझ्या, मंदराचल पर्वत ठेवला आहे कुणीतरी इथं...फिरवत आहेत...फिरवत आहेत...समुद्रमंथन चालू आहे. हलाहल बाहेर येत आहे बघ...कंठ निळा झाला आहे...हे बघ..." ती मान उंचावून गळ्यावरून बोट फिरवायला लागली.
मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात खोलवर पाहू लागले. तिच्या डोळ्यातून सरसर अश्रू वाहत होते. समुद्राच्या लाटा आभाळाला भिडत होत्या. माझ्याही नकळत अश्रू वाहायला लागले
"धीर धर बाळ..." मी म्हणाले
ती माझ्या कुशीत शिरली. रडू लागली...रडू लागली."
सिस्टर डोळे पुसत होत्या. बराच वेळाने ती शांत झाली.
"मी जाते...संध्याकाळी मला भेट मग घरी जा" मला म्हणाली
मी मान डोलावली.
"हा सैतानाचा डोळा फेकून दे आई...तुला त्रास होईल"
मी पेपरवेट हातात घेतला
"सैतानाचा डोळा इथं असतो...अगदी इतक्या जवळ बरं का आई..." ती डोळ्यासमोर हात धरत म्हणाली
"मी आधी डोळे मिटून घेतले होते. सैतान माझ्या आत आला ना आई, तेव्हा घाबरून एकदा उघडले होते...इतक्या जवळ आला होता त्याचा डोळा."
"प्राजु...कुणी केलं ? मला नावं सांग ना बाळा ?"
"सैतान गं आई...सैतान नाव त्याचे..."
"किती जण होते बाळ ?"
"सैतान खूप रूप घेतो आई... एक-दोन-तीन...हजार...लाख...खूप रूप घेतो आई...असा समुद्रात शिरतो आणि ढवळून काढतो तळापासून..."
प्राजक्ताकडे पाहवत नव्हते. आधी वाटत होतं, तिने बोलायला हवं...नाहीतर ती पूर्ण वेडी होईल...आता वाटत होतं, तिने शांत बसायला हवं...नाहीतर मी पूर्ण वेडी होईल...
"आई...ऐक...समुद्रात ना खूप मासोळ्या होत्या आनंदाच्या, हसण्याचे मोठे मोठे मासे होते. सैतान समुद्रात शिरला आणि ते मासे किनाऱ्यावर फेकले गेले. तडफडून-तडफडून मरुन गेले. मी पाहत होते ना, त्यांना मरताना..."
"माया..."
अचानक दार उघडून डॉक आत आला. प्राजक्ता दचकली. मला अजूनच बिलगली.
"आई...हा बघ सैतान..." ती घाबरून किंचाळायला लागली.
"सॉरी...सॉरी...मी जातो..." डॉक बाहेर गेला
माझ्या कुशीत भीतीने थरथरत्या प्राजक्ताला मी थोपटत होते.
"आई...मी जाते...संध्याकाळी मला भेटून जा"
"हो बाळा"
सिस्टरांचा हात धरून ती गेली.
मी डॉकच्या केबिनमध्ये गेले.
"डॉक..." मी त्याच्यासमोर बसत म्हणाले
"येस...मी आत्ता फोनच करणार होतो तुला. इतकी पॅनिक का झाली होती ती ?"
"चालायचं, नंतर झाली शांत, मला म्हणाली आहे, संध्याकाळी भेटायला ये."किंचित हसत मी म्हणाले
"डॉक, तिचा मामा येईल का परत भेटायला. मला बोलायचं आहे त्याच्याशी." मी पुढे म्हणाले
"फोन लावू या आपण. पण मला आधी सांग, काही बोलली का ती ?"
"नाही डॉक, पण हळूहळू बोलेल."
"तिच्या मामाला भेटलो की मी, काही घेणेदेणे नसल्यासारखा वागत होता. इतके कसे कोरडे असतात गं माया"
"डॉक, तू सुधारणार नाहीस बघ. मामा काय... आई-बाप, पोटची लेकरं, सगळीच नाती क्रूर होतानाच पाहत आहोत की आपण"
"हो गं माया, पण सवय होत नाही ना"
"आणि होणार पण नाही" मी हसत म्हणाले
डॉकने तीनदा तिच्या मामाला फोन लावला, उचलला गेलाच नाही. हे होणार होतं, याचा अंदाज होताच...तरीही वाईट वाटत राहतं...मानवी मनाचा थांग नाही. हे फक्त प्राजक्ताला कळलं...
मी समुद्र आहे...!!
संध्याकाळ कलत आली तरी आज काम संपत नव्हते. अगदी आठकडे काटा गेला तेव्हा डॉक केबिनमध्ये आला.
"माया, किती वेळ चालणार आहे तुझं..."
"उरकत आलं आहे, दहा मिनिटं फक्त, तू बस ना...कॉफी मागवू मस्त.."
डॉक आत येऊन बसला, रिसेप्शनला फोन करून कॉफी मागवली.
"प्राजक्ता केस काय म्हणतेय ??" डॉकने विचारलं
"दुपारी बोललो ना आपण ?"
"तू म्हणालीस ना, संध्याकाळी भेटायला बोलावलं आहे तिने"
"डॉक, डॉक्टर कोण आहे ? मी का ती ? तिने बोलावले म्हणून मी जायला हवे का ? मला योग्य वाटेल तेव्हा मी जाईन."
"बरोबर आहे माया तुझं, पण मला वाटतं तू तिला थोडा वेळ देत जा..."
"आणि काय करू ?"
"माया...तुला काहीच वाटत नाही का गं त्या मुलीसाठी ?"
"काय उत्तर देऊ डॉक ?" मी खिन्नपणे म्हणाले
"मला एक सांग...ट्रीटमेंट देणे, समुपदेशन करणे याशिवाय मी काय करणार ? पोलिसांचे प्रकरण तिच्या मामाला मान्य नाही. मुळात त्याला ही पोरगी नसली तरी चालेल."
"माया..."
"थांब...डॉक मला सांग, कितीही आतडे तुटले तरी आता वेळ निघून गेली आहे ना ? जरा लवकर आणली असती तर काही करता आले असते. तू तिची केस स्टडी केली आहेस. मी काही सांगायची गरज नाही."
कॉफीचा घोट घेण्यासाठी मी थांबले
"हे सगळं डॉक्टर म्हणून माया...माणूस म्हणून..."
"माणूस म्हणूनही हेच उत्तर आहे डॉक...अरे, ती मला आई...आई...म्हणत आहे...आई म्हणूनही मी हेच उत्तर देईन. नाती बदलली,भूमिका बदलल्या म्हणून वास्तव बदलत नाही डॉक..."
"माया..."
क्रमशः


🎭 Series Post

View all