Login

समुद्र पेटला-4

मराठी कथा
"काय... माया तू खूप बदलली, आधी किती हळवी होतीस, पण आता...कठोर झाले आहे, होय ना ?" मी हसत म्हणाले
"नाही...आय लव्ह यु..."डॉक म्हणाला
"डॉक..."
"ओक्के...सॉरी...सॉरी...चल कॉफी संपव, आपण निघू या"
"येस...लव्ह यु टू डॉक...चल, आज बाहेर डिनर करू मस्त..." मी म्हणाले
डॉकने जोरदार शीळ घातली. मला हसू आवरेना. कॉफी संपवली, पर्स उचलली आणि मी निघाले तर धाडकन केबिनचे दार उघडले गेले
"आई, तू दुष्ट आहेस..." दारात उभी राहत प्राजक्ता ओरडली. बाईसाहेबांचा मूड फारच बिघडलेला होता. पण डॉकला बघून फार घाबरली नाही हे महत्वाचे होते.
"सर...मला बोलायचं आहे आईशी..."
"तोही डॉक्टर आहे, त्याच्यासमोर बोलली तर जास्त फायदा होईल ना प्राजु..."
"नो...मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे."
"आत्ता खूप उशीर झाला आहे. तुझं जेवण झालं का ? औषध घेतलं का ? आत्ता आराम कर, उद्या बोलू या." मी म्हणाले
"तुला कितीवेळा सांगितले, हा सैतानाचा डोळा फेकून दे..." तिने त्वेषाने तो पेपरवेट खिडकीतून बाहेर फेकून दिला.
"झालं तुझ्या मनासारखं ? आता शांत हो...उद्या बोलू या आपण" मी तिला म्हणाले
"नाही, मला आत्ता बोलायचं आहे."
"मला घरी जायचं आहे."
"मला आत्ताच बोलायचं आहे"
"मला घरी जायचं..."
"तू बोल तिच्याशी...मी थांबतो माझ्या केबिनमध्ये" माझं बोलणं मध्येच तोडत डॉक म्हणाला
त्याक्षणी मला प्रचंड संताप आला. प्राजक्ता माझी केस होती. त्यात लक्ष घालण्याचा, मला सल्ला देण्याचा डॉकला काहीच अधिकार नव्हता. हे त्याचे नेहमीचे होते...तो ठरवून करत नाही हे मलाही मान्य होतेच की, पण अजाणता का होईना, माझ्या कामात त्याची ढवळाढवळ होते हे मला कधीच रुचले नाही
"सॉरी माया...पण..."
"तुम्ही जा सर...आई फार रागीट आहे की तू...असे रागावतात का आपल्या नवऱ्यावर ? सर बिचारे गरीब आहेत स्वभावाने." प्राजक्ता हसत म्हणत होती.
हिला येऊन जेमतेम चार दिवस झाले होते. सगळं तर कळत होतं. माझं आणि डॉकचं नातं... माझा स्वभाव...डॉकचा स्वभाव...हिला वेडी का म्हणावं ?? आणि सकाळी तर डॉकला बघून ही घाबरली होती. सैतान, सैतान म्हणून किंचाळत होती. आणि आत्ता तो बिचारा झाला होता.
"जा तू...मी बोलते हिच्याशी." मी म्हणाले
"आई, रागवत जाऊ नकोस गं... तू रागावली की भीती वाटते."
"बोल...काय बोलायचे आहे ?" माझा राग अजूनही शांत झाला नव्हता.
"आई...तुला माहीत आहे का, मी तुला आई का म्हणते ?"
मी नकारार्थी मान हलवली
"मला तरी कुठं माहीत आहे ?" ती अतिशय गंभीरपणे म्हणाली आणि मग खळखळून हसायला लागली.
"आतून वाटलं गं, माझी आई असती ना, तर तुझ्यासारखी असली असती. काही नाती अशीच ठरतात, माझे वडील सांगायचे, जन्मोजन्मीच्या गाठी असतात. कुठल्या तरी जन्मात आपले नाते असते, तिथलं काही कर्ज असतं. म्हणून भेट होते. नाहीतर बघ ना...या अफाट विश्वात मोजकीच माणसे का जवळ येतात ?" ती मला म्हणाली
"काय करायचे तुझे वडील ?"
"भिक्षुकी करायचे गं. खूप पोथ्या-पुराण वाचले होते. छोटीशी बाग होती, नारळ-पोफळी-आंबा-भात..."
"मग, कधी गेले..."
"मी दहा वर्षांची होते गं, देवघरात पूजा करत होते, तिथंच कलंडले. काही कळलंच नाही गं"
"आणि आई...?"
"ती तर मला जन्म देतानाच..." तिच्या डोळ्यात पाणी तरारलं. घशात हुंदका दाटला होता.
"अगदी एकटी झाले गं मी..." ती रडायला लागली.
"मग मामाने त्याच्या घरी आणलं. तिथल्या शाळेत शिकायला लागले. बी. कॉम. केलं आहे मी. खूप भारी नाही बरं का, पण खूप कष्टातून केलं आहे गं. लोकाच्या दारात राहून शिकणे सोपे नसते. बाकी काय सांगू ?"
किती शहाण्यासारखे बोलत होती ती.
"तुला सांगू आई, मला समुद्र खूप आवडतो. लहानपणापासून त्याचीच तर सोबत होती. त्या रात्री पण तो सोबत होता, मला वाचवण्यासाठी धावून धावून येत होता. पण काय करणार ना ? तीन सैतानांसमोर त्याचं काही चाललं नाही गं. असा सारखा कोसळत होता, आमच्यामध्ये. मग मी ठरवलं, मी समुद्र झाले."
"नक्की काय झालं होतं तेव्हा ?"
"आई...नको ना..." ती दाताखाली ओठ दाबत म्हणाली
"हे बघ बाळ..."
"आई...ऐक ना, ते सैतान कोसळले माझ्या अंगावर...रक्ताच्या लाटा उसळत होत्या. सगळे या समुद्राच्या तळाशी वडवानल पेटला होता. वरून तितकं जाणवत नाही गं, थंडगार भासतो. पाणी पेटत ना आई, तेव्हाचे दुःख समुद्र जाणे."
"प्राजु..."
"आई...माझा मामा मला इथं फेकून गेला. त्याला मी कधीच नको होते. फार स्वार्थी आहे तो. माझ्या वडिलांनी ठेवलेली छोटीशी इस्टेट केव्हाच त्याने त्याच्या नावावर करून घेतली आहे. मला इस्टेटीचा कधीच मोह नव्हता आई...प्रेम हवं होतं. इस्टेट देऊन प्रेम मिळेल असं मला वाटलं होतं. नाही मिळालं. समुद्राला सगळे ओरबाडत राहतात. तरी तो देत राहतो."
"वेळ आली तर समुद्र जीव पण घेतो. त्याच्यावर झालेला अन्याय सहन करत नाही तो. अति झालं की त्याचं रौद्र रूप दाखवून देतो. गावच्या गाव उद्धवस्त करतो. असंख्य सैतान लाटेखाली चिरडून टाकतो." मी तिच्याच भाषेत म्हणाले
तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. मी माझी नजर थेट तिच्या नजरेला भिडवून तिच्याकडं पाहत होते.
"जगबुडी झाली तरी मनूची नौका तोच समुद्र तारतो आई..." ती हसत म्हणाली
"नव्याने सुरुवात करायची तर जुने वाईट आहे नष्ट करावे लागते हे समुद्राला कळते." मी म्हणाले
"लायकीचा मनू दिसत नाही तेव्हा जुने नष्ट करता येत नाही आई...समुद्राला मर्यादा असतात." ती म्हणाली
"मनू दिसणारच हा विश्वास ठेवून समुद्र शांतपणे वाट पाहत राहतो." मी म्हणाले
"तुम्हाला समुद्र शांत दिसतो, आतून पेटलेला असतो." ती म्हणाली
"कितीही पेटला असला तरी वाट पाहणे सोडत नाही तो"
"समुद्राला आत्महत्या करता येत नाही, म्हणून तो वाट पाहतो असे गोंडस नाव दिलं जातं."
"समुद्राने विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर कसे शक्य होईल ?" मी थेट वर्मावर घाव घातला
क्रमशः

🎭 Series Post

View all