समुद्र पेटला-2

मराठी कथा
दवाखान्याची सुरुवात केली, तेंव्हापासून या सोबत आहेत. डॉकइतक्या हळव्या नाहीत त्या, पण मग हिच्याच बाबतीत का ?
"सॉरी मॅम...माझ्या लेकीसारखी..."
मी काहीच बोलले नाही. नजर पण हटवली नाही.
"सॉरी मॅम..."त्या पुटपुटत बाहेर गेल्या
मी समोर पाहिले. प्राजक्ता खुर्चीत बसून टेबलावरच्या पेपरवेटमध्ये बारकाईने काहीतरी पाहत होती.
"काय पाहत आहेस ?" मी हळुवारपणे तिला विचारलं
"सैतानाचा डोळा आहे बघ यात..." ती मला म्हणाली
"मला अरे-कारे म्हणाली, हे जरा खटकले का मला ?"
"तुझं नाव काय आहे ?" मी विचारले
"नावात काय आहे ? मी समुद्र आहे समुद्र..." ती तिचे बाहू पसरत म्हणाली
"तुला आवडतो का समुद्र ?" तिने मला विचारले
अशा आवाजात विचारले की, काळजाला जो हिसका बसला, थेट तिथं...मी आणि डॉक...कॉलेजात शिकत असताना तासन्तास बीचवर...समुद्राला न्याहाळत...दोघांना आवडणारा तो समुद्र...ओह माय गॉड... म्हणून डॉक जास्त हळवा झाला आहे का ??
"बोल की...आवडतो का तुला समुद्र ?"
"हो..."माझे एकाक्षरी उत्तर
"समुद्र होणे सोपे नसते बरे का ? तुला व्हायचं का समुद्र ??" तिने मला विचारलं
"कसं व्हायचं ?" मी विचारलं
ती एकदम शांत बसली. डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. हाताच्या अस्वस्थ हालचाली सुरू झाल्या. छातीवरची ओढणी पुन्हा-पुन्हा नीट करायला लागली. केसांवरून हात फिरवायला लागली.
"सिस्टर..."तिने जोरात आवाज दिला.
पाटील सिस्टर लगबगीने आत आल्या. बाहेरच उभ्या असाव्यात.
"सॉरी मॅम...ते, काल रात्रभर ती खूप रडत होती, ओरडत होती ना..."
प्राजक्ता आपल्या दोन्ही हातात सिस्टरांचा हात धरून बसली.
"जा, आत्ता घेवून..." मी म्हणाले
"प्राजु...चल बाळा..." तिचे डोळे पुसत सिस्टर तिला उठवू लागल्या
ती त्यांचा हात धरून दारापर्यंत गेली. थांबली, पुन्हा वळून माझ्याकडे आली. माझ्या खुर्चीच्या दोन्ही हातांवर हात ठेवले. वाकून थेट माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली,
"मी तुला आई म्हणू ?"
मी काहीच बोलले नाही.
"या दोन दगडांच्या मध्ये ही कपार आहे ना आई, तिथं एक प्रेत कुजत आहे, बरेच दिवस झाले." आपल्या दोन वक्षात बोट ठेवत ती म्हणाली
माझ्या अंगावर सरसरून काटा आला
"समुद्र खूप सुंदर दिसतो ना ? पण त्याला खूप सोसावं लागतं."
मी तिच्या गालावर ठेवण्यासाठी हात पूढे केला तेवढ्यात ती ताठ उभी राहिली.
"मी समुद्र आहे...समुद्र..."
ती निघून गेली. मी हतबद्ध होऊन बसले होते. त्या मुलीची वेदना...मला तटस्थ राहता येत नव्हतं. मी कसे उपचार करणार होते. माझी ही अवस्था, डॉकचे काय झालं असणार ??
समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून मी एका दमात रिकामा केला. खुर्चीवर मागे रेलून डोळे मिटून बसून राहिले.
कितीतरी रुग्ण, त्यांच्या कितीतरी कहाण्या...न संपणारी ही वेदना...सतत अंगावर येत राहिली. माणसाचे हे मन...त्यात काय आणि किती साठवलेले असते याला अंत नाही...खरंच एखादया समुद्रासारखे तर आहे हे मन...!
प्राजक्ता स्वतःला समुद्र का म्हणत असेल बरं ??
मी डोळे उघडले, लॅपटॉपवर पुन्हा तिची केस वाचू लागले.
पाशवी बलात्कार करून हिच्या दाराबाहेर फेकले होते....हिने त्यांची नावे कधीच सांगितली नाहीत. फक्त तिघे होते असे नंतर तिच्या बोलण्यातून आले होते. कुठं घडले, कसे घडले, कुणी केले...कशाचाच तपशील पोरीने सांगितला नाही. सहा महिन्यात एकदा विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न...एकदा मनगटावरची नस कापून घेण्याचा प्रयत्न...
स्वतःशी बडबड...चिडचिड... स्वतःला मारून घेणे... कात्रीने स्वतःचे केस कापले होते...
सगळं वाचून झाले. हाती फारसे काही लागले नव्हते. मी एक सुस्कारा सोडला आणि पुढच्या कामाला वळले.
दोन दिवस रोजचा दिनक्रम चालू होता. मी मुद्दाम प्राजक्ताला भेटले नव्हते. तिसऱ्या दिवशी पाटील सिस्टर केबिनमध्ये आल्या.
"मॅम...प्राजक्ताला तुम्हाला भेटायचे आहे."
माझ्या ओठावर मंद स्मित आले
"पाठवा..."
"प्राजु..." सिस्टरांनी तिथून आवाज दिला
मी चमकून त्यांच्याकडे पाहिले.
"माझ्या परवानगीच्या आधीच आली होती का ती ?" मी जरा जरबेच्या स्वरात विचारले
"सॉरी मॅम...तिने फार हट्ट केला..." सिस्टर पुटपुटत म्हणाल्या
"अहो..." मी अजून काही म्हणेपर्यंत ती आत आली. धाडकन खुर्चीवर बसत तिने माझ्याकडे रागाने पाहिले. सिस्टर तिथंच उभ्या राहिल्या
"काय झालं रागवायला ?"
"तू मला भेटायला का आली नाहीस...चार दिवस झाले." तिने थेट आरोप केला
"चार नाही दोन..."
"दोन का..?? मला वाटलं चार...सूर्य, चंद्र वेगात पळत राहतात गं... मग या समुद्राला भरती येते...लाटा उसळत राहतात, पार आभाळाला भिडतात. कधी-कधी हे देहाचे किनारे उद्धवस्त होतात."
ती शांत बसली. नाक लालबुंद झाले होते. डोळ्यातून पाणी वाहायला लागले.
"तुला माहीत आहे का आई...आपल्याच लाटांनी आपल्या किनाऱ्याला समुद्र जखमा करतो अग... हे बघ अशा..."
उजव्या हाताची नखे डाव्या हातावर रोवत तिने कोपरापासून मनगटापर्यंत ओरखडे ओढले
"प्राजक्ता..." मी आवाजाची पट्टी वाढवत म्हणाले
"सैतानाचा डोळा असतो ना आई, खूप दिवसांपासून तुमच्यावर लक्ष ठेऊन असतो. तुम्हाला कळतच नाही." पेपरवेट हातात घेत ती म्हणाली.
"तू कशाला ठेवला आहे हा सैतानाचा डोळा ? फेकून दे" पेपरवेट गोल गोल फिरवत ती म्हणाली
"नक्की देईन..." मी म्हणाले
"आई, तू खूप दुष्ट आहेस. मला भेटायला का आली नाहीस ?" ती पुन्हा संतापली
क्रमशः


🎭 Series Post

View all