चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा स्पर्धा
जलदकथा स्पर्धा
आई की सासू?
©® सौ.हेमा पाटील.
" अरे, आज लगेच स्वयंपाकघरात आलीस. छान! काय भाजी बनवलीस? सगळ्यांना पुरेल एवढी बनवलीस ना? माझा पण डबा भरलास का?" तुषारने प्रज्ञाला विचारले.
"मी का बनवायचे सगळ्यांचे जेवण? माझ्यापुरता डबा बनवणार मी. ज्यांना जेवण हवे आहे त्यांनी त्यांचे बनवून घ्यावे." हे ऐकल्यावर तुषार चकित झाला.
" अगं, अशी काय करतेस? माझा डबा कोण बनवणार?"
"या आधी कोण बनवत होते?"
" आई."
" मग आता पण त्याच बनवतील, नाहीतर तुझा तू बनव."
"अगं पण आम्ही तुला पहायला आलो होतो तेव्हा तर सांगितले होतेस की, तुला स्वयंपाक बनवण्याचा छंद आहे म्हणून."
छंद म्हणून कधीतरी बनवणे वेगळे आणि रोज बनवणे वेगळे."
" असं कसं? तू माझी बायको आहेस ना! मग माझा डबा आता तू बनवायला नको का? आजपर्यंत आई बनवत होती. आता माझे लग्न झाले आहे."
"व्हाॅट डू यू मीन बाय लग्न झाले आहे? आपले लग्न झाले आहे म्हणजे मी रोज तुझा डबा बनवून द्यायचा? मला मुळीच जमणार नाही." त्या दोघांचा किचनमध्ये चाललेला संवाद मीनाताई बाहेर हॉलमध्ये बसून ऐकत होत्या.
प्रज्ञा आणि तुषारचे पंधरा दिवसांपूर्वी लग्न झाले होते. दोघांचे अगदी पत्रिका पाहून, ठरवून लग्न झाले होते. मुलगी पहाण्यासाठी तुषार, त्याचे आईबाबा आणि मृगया असे चौघे गेले होते. प्रज्ञा पोहे घेऊन आली आणि समोरच्या सोफ्यावर मृगयाच्या शेजारी बसली.
त्याच्या मनात आपल्या पत्नीविषयी जशी प्रतिमा होती तशीच होती ती. तो सहा फूटापेक्षा जास्त उंच होता, आपली पत्नी किमान साडेपाच फूट उंच असावी यासाठी त्याने कितीतरी मुली नाकारल्या होत्या. प्रज्ञाची उंची पाच फूट सात इंच होती. ती उंची पाहूनच तो हुरळून गेला होता.
बाबांनी तिला," कुठे नोकरी करतेस?" असे विचारले.
"अंधेरीला, ईरा सोल्युशन्स कंपनीमध्ये काम करते." तिने उत्तर दिले.
"स्वयंपाक येतो का?" आईने विचारले.
"हो. मला छंद आहे वेगवेगळे पदार्थ बनवायचा."
"अरे व्वा! छानच की!"
"आणखी काय छंद आहेत?"
"मला गिर्यारोहण करायला आवडते. सुट्टीच्या दिवशी मी सकाळी लवकर उठून बाहेर पडते. पुण्याच्या जवळपासचे सगळे गड-किल्ले मी पालथे घातले आहेत. आमचा दहाजणांचा ग्रुप आहे."
"वाॅव! मला पण आवडते. मी पण माझ्या मैत्रिणींसोबत जात असते. आता तुमच्या ग्रुपमध्ये ॲड होईन. अर्थातच तुला चालणार असेल तर." मृगया चित्कारली.
"चालेल ना! का नाही? तुम्हाला नाही आवडत का?" प्रज्ञाने तुषारला विचारले.
"नाही. मला शनिवार-रविवार घरात शांतपणे घरच्यांसोबत वेळ घालवायला आवडते. आठवडा हेक्टिक गेलेला असतो, मी तर कित्येकदा घराबाहेर पण पडत नाही या दोन दिवसांत." तुषारने सांगितले.
बाकी रंग, रूप, शिक्षण, कौटुंबिक वातावरण या सर्व गोष्टींचा विचार करून तुषारने होकार दिला.
लग्न ठरल्यावर दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. या भेटींच्या दरम्यान कंपनीत मॅनेजर पदावर असलेली प्रज्ञा सगळ्या बाबतीत चटकन निर्णय घेते आणि तो घेतल्यावर त्यावर ठाम राहते हे तुषारच्या लक्षात आले होते.
तुषार आपल्या निर्णयात थोडा लवचिकपणा असावा अशा मताचा होता. लग्न ही तडजोड असते. आपण कितीही म्हटले तरी दोघांचे स्वभाव तंतोतंत जुळणे शक्य नसते हे तुषार जाणून होता. बाकी प्रज्ञाच्या बाबतीत खटकण्यासारखे त्याला काही वाटले नाही, मात्र लग्नानंतर आपल्याला तडजोड करावी लागणार आहे हे त्याच्या लक्षात आले.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
प्रज्ञा असे का म्हणते? मीनाताई यावर काय बोलतात हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
प्रज्ञा असे का म्हणते? मीनाताई यावर काय बोलतात हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा