Login

आई की सासू? भाग २

Family Drama
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा लेखन

आई की सासू भाग २

©® सौ.हेमा पाटील.

पहिल्या भागात आपण पाहिले, तुषार व प्रज्ञाचे लग्न झाले आहे. तिने फक्त स्वतःपुरता डबा बनवून नेला आहे. आता पुढे...


लग्न ठरले म्हणेपर्यंत साखरपुडा पण झाला. बाबांचे म्हणणे होते,

"पसंती झाली आहे तर उगाच का थांबायचे? साखरपुडा करुन घेऊ आणि दोन महिन्यांत लग्न करु." याला प्रज्ञाच्या कुटुंबीयांनी पण संमती दर्शवली.

"प्री-वेडिंगसाठी आपण हरिश्चंद्रगडावर जाऊया." प्रज्ञाने हट्ट धरला. तुषार "ठीक आहे" म्हणाला.

" पण मग वर चढताना घामाने चिंब भिजलेले असताना फोटोशूट करायचे का? कसे येतील ते फोटो?"

"वर गेल्यावर मेकअप करायचा ना. पाठीवरच्या सॅकमध्ये मेकअपचे सामान घ्यायचे." प्रज्ञा म्हणाली. तिची गिर्यारोहणाची आवड लक्षात घेऊन तुषार गप्प बसला, मात्र त्याच्या डोक्यात राहून राहून विचार येत होता की, 'घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावर पावडरची थप्पी चढवल्यावर आपला चेहरा कसा दिसेल?'

"आपले ठीक आहे, पण फोटोग्राफर त्याचे सगळे सामान घेऊन एवढा गड चढून यायला तयार होईल का?" तुषारने आपली शंका विचारली.

"ती काळजी तू करू नकोस. आमच्या गिर्यारोहक ग्रुपमध्ये आहे एक फोटोग्राफर. त्याला घेऊन जाऊ." प्रज्ञा म्हणाली. त्यामुळे हरिश्चंद्रगडावर शिक्कामोर्तब झाले.

खरं तर तुषारला टेन्शन आले होते, आपल्याला एका दमात चढणे शक्य होणार नाही हे त्याला माहित होते. त्यावेळी बघू असा त्याने विचार केला. प्रत्यक्षात चढताना त्याला दम लागतोय हे पाहून प्रज्ञाने आपला चालण्याचा वेग मंदावला होता. थोड्या थोड्या अंतरावर ती स्वतः बसत होती. त्याला ऑकवर्ड वाटू नये यासाठी ती प्रयत्नशील होती हे तुषारच्या लक्षात आले. तसेच तिला आपली काळजी आहे हे लक्षात आल्याने तो सुखावला.

गडावर गेल्यावर तिथे केले गेलेले फोटोसेशन पाहून त्याला स्वर्ग ठेंगणा वाटला. खूपच सुंदर आणि हटके झाले होते फोटोसेशन. गड चढल्याचा श्रमपरिहार झाला होता. अगदी मेघांना कवेत घेत आहोत असे वाटत होते. फोटोसाठी टायटॅनिकची पोझ देताना खाली दिसणारी दरी उरात धडकी भरवत असली तरी प्रज्ञाचा सहवास आश्वासक वाटत होता.

लग्न पार पडले आणि मधुचंद्रासाठी दोघे कुलू मनालीला गेले. तिकडून परतल्यावर प्रज्ञा दोन दिवस माहेरी गेली ती रविवारी सायंकाळी आली होती. सुट्टी संपली होती, सोमवारपासून ऑफिसला जायचे होते.

डोंबिवलीहून अंधेरीला जायचे म्हणजे खूपच दूर होते. त्यामुळे ती सकाळी लवकर उठली होती. ती स्वतःचा डबा तयार करत असताना तुषार स्वयंपाकघरात आला होता आणि दोघांमध्ये तो संवाद झाला होता. तुषार त्यावर काहीच न बोलता बाहेर आला, तर आई त्याच्याकडेच पहात होती. तिची नजर चुकवून तो आपल्या रुममध्ये गेला.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होईल पुढे? मीनाताई काय बोलतील यावर? तुषारच्या मनात काय चाललंय? हे जाणून घेऊया पुढील भागात...

0

🎭 Series Post

View all