चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलद लेखन स्पर्धा
जलद लेखन स्पर्धा
आई की सासू भाग ४
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, तुषारने आईला सांगितले की, स्वयंपाक बनवण्यासाठी बाई बघ. मीनाताईंना हा निर्णय मान्य नाही. वाईट वाटून त्यांनी रडायला सुरुवात केली आहे. आता पुढे...
तुषार म्हणाला,
"आई, तुझा विचार करुनच मी स्वयंपाकाला बाई लाव असे म्हटले. आजपर्यंत तू करत आलीस, सुनेच्या हातचे आयते खायचे भाग्य तुझ्या नशिबात नाही. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना कुठे मिळतात?"
"का नाही मिळत? तुझ्या मावशीची सून सगळे उरकून जातेच ना कामाला. तीही करतेच ना नोकरी."
"अगं, ती ठाण्यातल्या ठाण्यात नोकरी करते. तिची नोकरी अकरा ते पाच अशी आहे. शिक्षिका आहे ती. घरापासून शेअर रिक्षाने जाते ती.
अशी कुणाशीही कुणाची तुलना करायची नाही. हे मी तुला सांगायला तू काय अडाणी नाहीस. ती बाई लवकरात लवकर बघ. तोपर्यंत मला काही काम सांग, मी मदत करतो."
अशी कुणाशीही कुणाची तुलना करायची नाही. हे मी तुला सांगायला तू काय अडाणी नाहीस. ती बाई लवकरात लवकर बघ. तोपर्यंत मला काही काम सांग, मी मदत करतो."
"का? आजवर आई किती राबते ते दिसले नाही का? बायको आल्यावरच दिसले?" मीनाताई धुसफुसत म्हणाल्या.
"मुळीच नाही. आजवर तुला मदतीची गरज कधी भासली नाही. तुझी तू सगळी कामे उरकत होतीस. आता तुझी सुनेकडून कामाची अपेक्षा आहे, ती करू शकत नाही म्हणून मी तुला विचारले, इतकेच. यावरुन लगेच मी बाईलवेडा झालो असे अनुमान काढू नकोस." तुषार असे म्हणाला तेव्हा मीनाताई शांत बसल्या, तरीही मनातून त्या नाराजच होत्या.
शुक्रवारी रात्री प्रज्ञा आणि मृगयाची गडबड चालली होती.
"आमचा ग्रुप उद्या सप्तशृंगी गडावर चालला आहे. मी पण जाणार आहे. मृगया तू येणार आहेस का?"
"हो, मीही येणार आहे वहिनी." मृगया म्हणाली. दोघींची उद्याच्या प्रवासाची आवराआवरी बराच वेळ चालली होती. तिने तुषारला आधीच कल्पना दिली होती.
सकाळी लवकर उठून त्या दोघी आपले आवरुन सहा वाजताच गेल्या. मीनाताईंनी नाश्त्याला पोहे बनवले. ते तिघेजण नाश्ता करत असताना मीनाताई उसाणल्या,
"आज सुट्टी होती, किमान आजतरी घरात काही मदत केली असती तर गेली गडकोट पालथे घालायला. आपले आता लग्न झाले आहे, आपण माहेरी नाही याचे तरी भान असले पाहिजे म्हणते मी."
यावर तुषार काही बोलायच्या आधी बाबा म्हणाले,
मुलगी बघायला गेलो होतो तेव्हा तू तिला विचारले होते ना, की काय छंद आहे म्हणून? तेव्हा तिने सांगितले होते की, तिला गिर्यारोहण करायला आवडते. मग तेव्हाच याला नापसंती दर्शवायला हवी होती. त्यानंतर तिने आपल्याला होकार द्यायचा की नाही हे ठरवले असते.
तू कुठल्या काळात वावरतेस? तुझे लग्न झाले तेव्हा जी परिस्थिती होती ती तुझ्या डोक्यात आहे का? तेव्हाच्या आणि आजच्या काळात जमीन आसमानचा फरक झालाय. मुली आज स्वतःच्या हिमतीवर मुलांच्याही पुढे गेलेत. त्यांना असे चौकटीत बंदिस्त करायला गेलीस तर पस्तावशील.
नशीब मान की तुझी सून वेगळे रहायचेय म्हणत नाही. उलट आज मृगयालाही आपल्यासोबत घेऊन गेली. त्या तुझ्या मैत्रिणीची विद्याची सून लग्नानंतर चार दिवसांत नवऱ्याला घेऊन घराबाहेर पडली. काळानुसार वागायला शिक.
हुशार, कर्तबगार सून हवी असेल तर घराची जबाबदारी उचलण्याची मानसिक तयारी हवी. ती नसेल तर मुलाला आणि सुनेला त्यांचा स्वतंत्र संसार थाटून द्यावा. बोल, तुला यातले काय करायचे आहे? निर्णय तुलाच घ्यायचा आहे. घरात रुसवेफुगवे झालेले मला आवडणार नाहीत. त्यामुळे यापैकी कुठला निर्णय घ्यायचा तो तू घे." एवढे बोलून बाबांनी तुकडा पाडला.
आई म्हणून निर्णय घ्यायचा की सासू म्हणून याचे स्वातंत्र्य त्यांनी मीनाताईंना दिले होते. तुषार शांतपणे खाली बघून पोहे खात होता. बाबांनी त्याच्या उरावरचे फार मोठे ओझे उतरवले होते. तो आईशी एवढ्या स्पष्टपणे बोलू शकला नसता.
"मावशी ओ मावशी, घरात हायेत का?" सकाळी सकाळी कोण हाक मारतेय म्हणून तुषार बाहेर आला तर मीनाताई दरवाज्यात उभ्या होत्या आणि त्या बाईला सांगत होत्या,
"आमची सुनबाई सकाळी साडेसात वाजता जाते. त्याच्याआधी डबा तयार झाला पाहिजे. त्यामुळे पावणेसातला तरी आमच्याकडे आले पाहिजे. भाज्या मी निवडून ठेवेन, पण संध्याकाळी आमच्यात भाकरी लागतात. करता ना तुम्ही भाकरी? काम मात्र स्वच्छ हवे. पैशाचे काय ते बोला. आत्ताच ठरवूया म्हणजे उद्यापासून स्वयंपाकाला याल."
हे ऐकल्यावर तुषार गालातल्या गालात हसला. मीनाताईंच्यातली आई जिंकली होती.
हे ऐकल्यावर तुषार गालातल्या गालात हसला. मीनाताईंच्यातली आई जिंकली होती.
समाप्त.©® सौ.हेमा पाटील.
कथा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा