सनईच्या सुरात गुपित...भाग 1
सायली आणि अनिरुद्धचा तीस वर्षाचा प्रवास आज एका नव्या वळणावर येऊन थांबला होता. हा आयुष्यतील नवीन टर्निंग पॉईंट होता, कारण आता नातं बदलणार होतं.
दोघांच्या आनंदी आणि सुखी परिवारात नवीन पाहुनी येणार होती.
सगळीकडे आनंदी आनंद होता.
सायली स्वयंपाकघरात चहा करत होती आणि बाहेर दिवाणखान्यात गोंधळ चालला होता.
सायलीची एक नजर दिवाणखान्याकडेच होती. तिकडे बघून गालातल्या गालात गोड हसू सुरू होतं. आनंदाचं आणि हसूचं कारणही तसंच होतं.
अनिरुद्ध आणि सायलीच्या मुलाचं रोहनचं लग्न ठरलं होतं आणि घरातली लगबग काही थांबायचं नाव घेत नव्हती.
रोहनच्या मावश्या, आत्या आणि आजी सगळ्या लग्नाच्या तयारीत मग्न होत्या.
"साडी कोणत्या रंगाची घ्यायची गं? मोरपंखी का जांभळी?" रोहनची आत्या (विजया) विचारत होती.
"हे बघ वधूला जरा विचारून घेऊ नाहीतर नंतर म्हणतील जुन्या लोकांनी सगळं ठरवलं." आजी (सरस्वती) मिश्कील हसत म्हणाल्या.
"ये पण मी कुठली साडी नेसू?" रोहनची मावशी (सरोजिनी) बोलली.
"ये तू थांब ग आधी नवरीचं होऊ दे त्यानंतर तुझा नंबर लागेल." विजयाने तिला धक्का दिला.
दोघींचही भांडण सुरू झालं.
"विजू तू नेहमी असंच करते." सरोजिनी ओरडली.
"नाही ग सरू तू कुठलीही साडी नेसलीस ना तू छानच दिसते."
"थट्टा करत आहेस माझी."
"नाही."
"अग अग काय चाललंय तुम्हा दोघींचं, तुम्ही दोघी भेटल्या की गप्पा कमी आणि भांडण जास्त करता." सरू आजींनी मध्यस्थी केली.
तिघीही हसल्या.
"बघितलं का सायली तुझी नणंद आणि बहीण ह्या दोघींचा तुझ्यापेक्षा एकमेकींवर जास्त जीव आहे."
"आई दोघीही तुमच्या छत्रछायेखाली वाढल्या आहेत, तुमचे संस्कार आहेत त्यांच्यावर, तुम्ही त्यांना प्रेम देणे आणि घेणे शिकवलंत."
सायलीने चहा कपात ओतला आणि बाहेर येऊन बघितलं. अनिरुद्ध पेपर वाचण्याच्या बहाण्याने बाजूला बसून सगळं एन्जॉय करत होता.
सगळ्यांच्या हातात चहाचे कप देऊन सायली अनिरुद्ध जवळ गेली.
"तुम्ही काही मदत करणार आहात का? की फक्त पेपर वाचत बसणार?" सायलीने हाताच्या इशाऱ्याने विचारलं.
"मी उत्साहाने पाहतोय, हे पण काही कमी नाही." तो हसत म्हणाला.
"बघता बघता रोहन कधी मोठा झाला कळलंच नाही, इवल्याश्या पावलांनी घरभर हुंदळायचा, सामानाची फेकाफेकी तर विचारूच नका. तुम्हाला आठवतंय पहिल्यांदा सायकल दिली होती तुम्ही त्याला...त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद. हाच आनंद आज दिसतोय मला त्याच्या चेहऱ्यावर सगळं त्याच्या मनासारखं होतंय ना." सायली भावुक झाली.
"त्याच्या मनासारखं झालं आणि तुझ्या मनासारखं?"
"त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे."
"आता घरात सून येणार आहे सासूबाई." अनिरुद्ध चिडवण्याच्या सुरात बोलला.
"हो का, मग आता तुम्ही पण रेडी व्हा सासरेबुआ."
दोघेही हसले.
"काय चाललंय तुम्हा दोघांचं?" रोहन त्यांच्याजवळ येऊन बसला.
"हे काय? तुझ्या हातात काय आहे?"
"बाबा कपाट आवरत होतो ना, हा जुना अल्बम दिसला. बघण्याची उत्सुकता वाढली, म्हटलं चला सोबतच बघूया म्हणून इकडे घेऊन आलो."
"चल मग बघूया."
"बाबा आधी चहा संपवूया थंड झाला तर आई पुन्हा चहा गरम करून देणार नाही अल्बम आपण थोड्यावेळाने बघितला तरी चालेल." दोघेही हसले.
"अच्छा आता तुम्ही दोघे एक टीम झालात तर आता माझी खिल्ली उडवणार का? हे तुमचं बरं असतं तुमच्या दोघांची एक टीम आणि मला एकटीला पाडता."
"नाही आई तसं नाही आधी चहा संपवूया आणि मग तिघेही मिळून अल्बम बघूया, तू पण बस इथे."
तिघांनी बसून अल्बम बघितलं, जुन्या आठवणींना उजाळा दिला.
"छोटासा रोहन आज किती मोठा झाला." सायलीच्या डोळ्यात अश्रू तरळले.
"आई तू पण ना....तुला फक्त बहाणे हवे असतात डोळ्यात अश्रू आणण्याचे. तुझ्या नाजूक, निळ्याभोर डोळ्यांना जरा तरी विश्रांती देत जा. तुझ्या डोळ्यांचे नळ सुरू झाले की झालेच बंद व्हायचं नाव घेत नाही."
"आई तू पण ना....तुला फक्त बहाणे हवे असतात डोळ्यात अश्रू आणण्याचे. तुझ्या नाजूक, निळ्याभोर डोळ्यांना जरा तरी विश्रांती देत जा. तुझ्या डोळ्यांचे नळ सुरू झाले की झालेच बंद व्हायचं नाव घेत नाही."
सायली काही बोलणार तेवढ्यात तिच्या नजरेला एक मोठं जुनं लोखंडी ट्रंक दिसलं. हे तिच्या सासूबाईंच्या सामानातील होतं. अचानक उत्सुकता वाटली, इतकी वर्षं कुणी उघडलीच नव्हती.
"हे बघूया का?" ती अनिरुद्धला म्हणाली.
"अगं, आता कसला उगाच पसारा? पण..हो बघू." अनिरुद्धने ट्रंककडे बघत म्हटलं.
सायलीने जड झाकण उघडलं आणि आत जुन्या साड्या, कपडे, आणि काही वस्तू ठेवल्या होत्या. पण त्या खालच्या एका बाजूला तिला एक नाजूक पेटी दिसली. सुंदर कोरीव काम केलेली लाकडी पेटी.
तिने ती उचलली आणि उघडली... आणि तिच्या डोळ्यासमोर जुन्या प्रेमपत्रांचा गठ्ठा आला.
तिने ती उचलली आणि उघडली... आणि तिच्या डोळ्यासमोर जुन्या प्रेमपत्रांचा गठ्ठा आला.
"अनिरुद्ध हे बघ, कुणाची असतील?" ती थोडी आश्चर्यचकित झाली.
अनिरुद्धनेही पुढे सरसावत एक पत्र उघडलं.
अनिरुद्धनेही पुढे सरसावत एक पत्र उघडलं.
"सायली, हे... आईचं नाव आहे."
सायली आणि अनिरुद्धने एकमेकांकडे पाहिलं. सासूचं कोणतं रहस्य या पत्रांमध्ये दडलेलं होतं?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा