Login

सनईच्या सुरात गुपित...भाग 3

प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नव्हे तर ते त्याग पण असतं
सनईच्या सुरात गुपित...भाग 3

सायली आणि अनिरुद्ध दोघेही सायंकाळी सरस्वतीच्या खोलीत त्यांच्याशी बोलायला गेले, त्या खोलीत नव्हत्या.

"अरे आई कुठे गेली असेल?"

"अंगणात असतील त्यांना यावेळी अंगणात बसायला आवडतं."

"चल.."

दोघेही अंगणात गेले.

त्या अंगणात आपल्या जुन्या झोपाळ्यावर बसल्या होत्या, जिथे त्या रोज संध्याकाळी बसत असत.

"आई तुम्ही इथे बसला आहात आणि आम्ही तुम्हाला घरभर शोधतोय."

"काय ग काय झालं? आज माझ्या नावाचा गजर का वाजतोय."


"नाही सहजच."

"तुम्हाला काही बोलायचं असेल तर बसून घ्या आधी."
दोघेही बाजूला असलेल्या बाकावर बसले.

"काय म्हणताय बोला."

"आई असं काही विशेष नाही, सहज गप्पा मारायला आलो. किती भरभर दिवस जातात ना, आता रोहनचंच बघ ना इवल्याश्या पावलांनी घरभर हुंडळायचा आणि आता लग्न होणार तुझ्या नातवाचं." अनिरुद्धने बोलायला सुरुवात केली.

"हो बघता बघता दिवस वर्ष उलटून जातात, आपण तिथेच असतो." सरस्वती भावुक झाली.

"आई तुमच्या बालपणीच्या काही आठवणी असतील तर सांगा ना, आम्हाला आवडेल ऐकायला." सायली पटकन बोलली.


"आज तू निवांत कशी? एरवी कामात गुंतली असतेस." सरस्वतीने गमतीने टोमणा मारला.

"तुमच्या लाडक्या लेकी आहेत किचनमध्ये, बघूया आज काय खायला मिळतं."


"अरे देवा." अनिरुद्धने डोक्यावर हात ठेवला.

"म्हणजे आज वेळेवर जेवायला मिळेल की नाही शंकाच आहे."

"काय रे अनिरुद्ध या घरात काय फक्त तुझीच बायकोच सुगरण आहे."


"तस नाही आई, मी सहज बोललो."

"आई तुमच्या बालपणाविषयी सांगा ना." सायलीला विषयाला हात घालायचा होता पण डायरेक्ट कसं विचारणार म्हणून आढेवेढे घेऊन तिने विचारलं.


"बालपण मस्त गेलं, अयशोआरामात गेलं. सगळ्या सुखसुविधा मिळाल्या, कधीही कुठली कमी होऊ दिली नाही घरच्यांनी."

"आणि कॉलेज लाईफ?" सायलीने लगेच विचारलं.

"तुला काय माझी कुंडली खोलायची आहे का?" सरस्वतीने हसून विचारलं.


"नाही हो आई मलाही उत्सुकता लागून राहत आहे."

सायलीने हळूच विचारलं,
"आई कुणी रामकृष्ण नावाचा तुमच्या ओळखीचा आहे का?"

सरस्वतीने हलकंसं हसत त्यांच्या कपाळावर हात फिरवला.

"कुठे ऐकलंस हे नाव?"

अनिरुद्धने थोडं धाडस करत सांगितलं,

"आई आम्हाला तुझी पत्रं सापडली."

सरस्वती काही वेळ स्तब्ध झाल्या. मग त्यांनी खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाल्या,

"तुम्ही हे जाणून घ्यावं असं मला कधी वाटलं नव्हतं, पण हो रामकृष्ण माझं पहिलं प्रेम होतं."

सायली आणि अनिरुद्ध दोघंही ऐकत राहिले.

"मी आणि रामकृष्ण खूप जवळ होतो. पण माझ्या वडिलांना हे मान्य नव्हतं. त्यांच्यासाठी प्रतिष्ठा आणि समाज काय म्हणेल हेच महत्त्वाचं होतं. शेवटी त्यांनी माझं लग्न तुमच्या बाबांशी लावून दिलं आणि मी ते स्वीकारलं."

"पण तू कधीच काही सांगितलं नाही." अनिरुद्ध म्हणाला.

"कारण तुमच्या बाबांशी लग्न झाल्यानंतर मला कधीही मागे वळून पाहावंसं वाटलं नाही. त्यांनी मला खूप प्रेम दिलं. आयुष्यभर एक चांगला जोडीदार दिला. मग जुन्या आठवणींमध्ये गुंतून राहून काय उपयोग?"

सायलीने सरस्वतीचा हातावर आपला हात ठेवला.

"आई, तुम्ही कधी रामकृष्णजींना भेटलात का?"

सरस्वतीने मंद हसू दिलं.

"कधी नाही. पण कधीकधी मी विचार करते तो कुठे असेल? कसा असेल?"

त्या शांतपणे आकाशाकडे पाहत राहिल्या.

त्यांना त्याची एक कविता आठवली.

"अल्लड मी वाऱ्यासवे
चारी दिशांना वाहू दे
लाटांवरचे तरंग वेचीत
स्वप्न सागरी जाऊदे

निजेन मिठीत तुझ्या
चांदण्या मोजीत मग
दाटून येईल गारवा
आभाळी धुक्याचे ढग"

सरस्वती तिच्या जुन्या आठवणीत रमली.

दोघेही हळूच उठून त्यांच्या खोलीत गेले.

सायली आणि अनिरुद्ध त्या रात्री खूप बोलले.
बऱ्याच वर्षानंतर ते असे गप्पा मारत बसले होते.

"आपल्या आयुष्यात काही गोष्टी मागे राहतात पण त्या आपल्या आयुष्याचा भागच असतात," अनिरुद्ध म्हणाला.

सायलीने हसून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

"हो आणि कधी कधी जुन्या आठवणी आपल्याला नव्याने प्रेम शिकवतात.आईंनी पहिलं प्रेम विसरून नवी घडी बसवली, त्या त्यातच अडकून राहिल्या असत्या तर बाबांना कधीच सुखात ठेऊ शकल्या नसत्या. कधीकधी प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं तर प्रेम म्हणजे त्यागही असतो आणि हे करायला पण धाडस लागतं."


"खरं आहे सायली, आईला याचा त्रास तर नक्की झाला असणार पण तरीही तिने स्वतःच दुःख बाजूला ठेवून ती या घरात आली आणि बाबांसोबत संसार थाटला."

त्या रात्री दोघांनी सरस्वतीच्या जुन्या प्रेमकहाणीला शांततेत श्रद्धांजली वाहिली. त्या गोष्टीमध्ये वेदना होती पण त्याच वेळी त्यांच्याही नात्याला नव्याने एक गोडवा मिळाला होता.
आता रोहनच्या लग्नाच्या तयारीला नवीनच उत्साह होता. जुन्या गुपिताने काही क्षणांना हलकासा गहिवर आणला पण शेवटी सगळं काही प्रेमातच विरून गेलं.


क्रमशः


सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेज वर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

🎭 Series Post

View all