सनईच्या सुरात गुपित...भाग 4
त्या रात्री दोघांनी सरस्वतीच्या जुन्या प्रेमकहाणीला शांततेत श्रद्धांजली वाहिली. त्या गोष्टीमध्ये वेदना होती पण त्याच वेळी त्यांच्याही नात्याला नव्याने एक गोडवा मिळाला होता.
आता रोहनच्या लग्नाच्या तयारीला नवीनच उत्साह होता. जुन्या गुपिताने काही क्षणांना हलकासा गहिवर आणला पण शेवटी सगळं काही प्रेमातच विरून गेलं.
सायली त्या रात्री झोपेतही शांत नव्हती. सरस्वतीच्या शब्दांचा तिच्या मनावर प्रभाव पडला होता.
"आयुष्य पुढे जातं पण काही आठवणी मागे राहतात. त्यांचा मागोवा घेत बसलो तर वर्तमान हातातून निसटतो."
पण सायलीला जाणवत होतं तिच्या सासूबाई काहीतरी लपवत होत्या. त्या रामकृष्णबद्दल इतक्या सहज बोलल्या पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भावना होती दु:ख आणि अपराधीपणासारखी..
सकाळी अनिरुद्ध उठून पेपर वाचत होता पण सायलीच्या मनात वेगळंच चालू होतं. सगळ्या आपापल्या कामात व्यस्त आहे हे बघून सायली स्टोअररूममधल्या कपाटाजवळ गेली आणि पुन्हा ती लाकडी पेटी काढली. अजून काही सापडतं का हे पाहण्यासाठी तिने संपूर्ण ट्रंक चाळली.
आणि मग तिला एक कागद सापडला.
आणि मग तिला एक कागद सापडला.
रामकृष्ण यांचा मृत्यू...
तिने घाईघाईने पेपर उचलला, ती एका जुन्या वृत्तपत्राची कटिंग होती.
"प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. रामकृष्ण देशमुख यांचे अपघाती निधन. त्यांच्या अचानक जाण्याने समाजसेवा क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे."
सायलीच्या हातून तो कागद गळून पडला.
"अनिरुद्ध" तिने घाईघाईने त्याला बोलावलं.
"काय झालं?" तो पेपर खाली ठेवत उठला.
हे बघ रामकृष्णजींचा मृत्यू झालाय आणि हे आपल्याला आईने सांगितलं नाही."
अनिरुद्धने तो कागद वाचला आणि काही वेळ स्तब्ध बसला.
"म्हणजे... आईला कदाचित माहिती होतं?"
"आपल्याला त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे अनिरुद्ध. त्यांच्या मृत्यूबद्दल कुणाकडून तरी विचारायला पाहिजे."
अनिरुद्धने गंभीरपणे मान डोलावली.
"आपल्या मामा-मावशींकडून काही माहिती मिळेल का?"
"पण अनिरुद्ध.."
"काय झालं."
"मला काहीतरी मिसिंग वाटतंय, काहीतरी असं आहे जे आपल्या नजरेस पडत नाही आहे."
"सायली तू अतिविचार करू नको बघु आपण काय करायचं."
अनिरुद्धच्या मावशीकडे जाऊन चौकशी करायची अस ठरलं आणि दोघेही दुसऱ्या दिवशी त्यांच्या मावशींकडे गेले.
मालतीमावशी या कुटुंबातल्या जुन्या गोष्टी जाणणाऱ्या होत्या. त्या सरस्वतीला जवळून ओळखत होत्या आणि त्यांच्या तारुण्यातल्या काळातही त्यांचा सहभाग होता.
मालतीमावशीचं सगळीकडे लक्ष असायचं, मानलेली बहीण असली तरी बहिणीवर अफाट प्रेम त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीकडे त्या लक्ष द्यायच्या.
मालतीमावशीचं सगळीकडे लक्ष असायचं, मानलेली बहीण असली तरी बहिणीवर अफाट प्रेम त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीकडे त्या लक्ष द्यायच्या.
"काय मग आज इकडे काय काम काढलंय?" त्या दोघांना पाणी देत मावशी बोलल्या.
"मावशी ते आम्ही इथे जवळचं आलो होतो तर मग विचार केला तुम्हालाही भेटून जावं." अनिरुद्ध अडखळत बोलला.
"एवढा मोठा झालास पण अजूनही खोटं बोलता येत नाही."
मावशीने मस्करी केली.
तिघेही हसले.
"मावशी.." तो समोर काही बोलणार मावशीने अडवलं.
"आधी मी काहीतरी खायला आणते."
"मावशी नको काही, तुम्ही बसा ना." सायली हळूच बोलली.
"रामकृष्ण देशमुख?" सायलीने विषयाला हात घातला.
"काय?" मालतीमावशी आश्चर्यचकित झाल्या.
"मावशी बरोबर ऐकलंत, आम्हाला रामकृष्ण देशमुख यांच्या बद्दल जाणून घ्यायचं आहे."
"काय जाणून घ्यायचे आहे? आणि हे आता का आणि कशासाठी?"
"मावशी प्लिज सांगा ना आणि सगळं खरंखरं सांगा.
मालतीमावशीने सायलीच्या प्रश्नावर थोडा वेळ विचार केला.
"हो, सरस्वती आणि तो खूप चांगले मित्र होते."
"फक्त मित्र?" अनिरुद्धने सरळ विचारलं.
मावशी एक क्षण गप्प राहिल्या.
"हो पण... तसं म्हणावं तर ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. पण लग्नाची वेळ आली तेव्हा सरस्वतीच्या वडिलांनी नकार दिला आणि रामकृष्णही हट्टी होता, तो म्हणाला,
'मी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवेन. मी मोठा झाल्यावर परत येईन आणि सरस्वतीला मागणी घालेन.' पण..."
सायली आणि अनिरुद्ध दोघंही आतुरतेने पुढचं ऐकू लागले.
"तो परत आलाच नाही. तो सामाजिक कार्यात गढून गेला. समाजासाठी त्याने स्वतःला वाहून घेतलं. सरस्वतीनेही आपलं लग्न स्वीकारलं आणि तिच्या संसारात गुंतली. पण एक दिवस..."
"एक दिवस काय?"
"रामकृष्णचा अपघात झाला, लोक म्हणतात तो अपघात नव्हता, त्याचं काम काही लोकांना नको होतं. त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळे तो काही लोकांना आडवा येत होता. पण कुठलेच पुरावे नव्हते..."
सायली आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहू लागले.
"आईला हे माहीत होतं का?" अनिरुद्धने विचारलं.
"कदाचित... पण तिने कधी बोलून दाखवलं नाही. ती नेहमी शांत होती. जणू तिला सगळं समजत होतं पण तरीही तिने मागे पाहिलं नाही.
क्रमशः
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेज वर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा