Login

सनईच्या सुरात गुपित...भाग 5

नात्यात गोडवा ठेवायचा असेल तर भूतकाळात गुरफटायचं नाही
सनईच्या सुरात गुपित...भाग 5


सायली आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहू लागले.

"आईला हे माहीत होतं का?" अनिरुद्धने विचारलं.

"कदाचित... पण तिने कधी बोलून दाखवलं नाही. ती नेहमी शांत होती. जणू तिला सगळं समजत होतं पण तरीही तिने मागे पाहिलं नाही."

सायली आणि अनिरुद्ध परत घरी आले.
सरस्वती दिवाणखान्यात पुस्तक वाचत बसल्या होत्या.

"काय रे कुठे गेला होतात तुम्ही दोघे? असे कुणाला काहीही न सांगता."

"आई आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं आहे." अनिरुद्धने म्हणताच त्या थोड्या संभ्रमित झाल्या.

"काय झालं? कशाबद्दल बोलायचं आहे?"

"रामकृष्ण.." अनिरुद्ध बोलला.

"तुम्हा दोघांचं काय चाललंय? संपला तो विषय आता मला त्यावर चर्चा नको."

"पण आई."

"अनिरुद्ध तुम्ही दोघेही थकून आला आहात खोलीत जा आणि फ्रेश व्हा."

सायलीने थेट तो पेपर त्यांच्यासमोर ठेवला.

"आम्हाला माहीत आहे की रामकृष्णजींचा मृत्यू अपघात नव्हता."


सरस्वतीने तो कागद पाहिला पण त्यांच्या चेहऱ्यावर फारसा बदल जाणवला नव्हता.

"तुम्हाला हे आधीच माहीत होतं ना?"

"हो." त्या हळू आवाजात म्हणाल्या.

"मग तुम्ही कधी बोलला नाहीत?"

"कारण त्याने काही फरक पडला नसता मुली. माझं भूतकाळात अडकून राहणं योग्य नव्हतं. मी माझ्या नवऱ्याशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. काही गोष्टी फक्त काळापुरत्या असतात, त्या उगाळत राहणं योग्य नाही."


सायली आणि अनिरुद्ध गप्प बसले. त्यांना समाधान वाटलं की त्यांच्या आईने आपल्या आयुष्याचा योग्य मार्ग निवडला होता.

सायलीने पुढे होऊन सरस्वतीचा हात हातात घेतला.

"आई तुम्ही खूप मजबूत आहात."

सरस्वतीने हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला.

"आयुष्य हेच शिकवतं बाळा. कधीही मागे बघून दुःखात अडकायचं नाही पुढे बघायचं."


रोहनच्या लग्नाच्या तयारीला वेग आला. जुन्या आठवणींच्या गोंधळातून थोडं थोडं स्पष्ट झालं होतं.

सायली आणि अनिरुद्धने एक नवीन गोष्ट शिकले होते.

"नात्यांमध्ये गोडवा ठेवायचा असेल तर भूतकाळात गुरफटायचं नाही तर वर्तमानाचं सोनं करायचं"


सायली आणि अनिरुद्धने रामकृष्णच्या मृत्यूबाबत एक मोठं रहस्य उलगडलं होतं. पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरित होते. तरीही घरात आता नवीन सुरावट वाजत होती रोहनच्या लग्नाची.

रोहनच्या लग्नाच्या तयारीने संपूर्ण घर भारावून गेलं होतं. सगळं घर रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजलं होतं. अंगणात केशर आणि गुलाबांच्या पाकळ्यांचा सडा घातलेला होता. मंडपात हलकासा उटण्याचा सुगंध दरवळत होता. लग्नाची वाद्यं, हलकासा गजर आणि नातेवाईकांचे आनंदी आवाज घरभर घुमत होते.

सरस्वती आज एक वेगळ्याच भावविश्वात होत्या. त्यांनी आपल्या हाती एक पत्र घेतलं होतं, तेच जे त्यांनी देव्हाऱ्यात ठेवलं होतं. त्या पत्रात काय होतं, हे फक्त त्यांनाच माहीत होतं. त्या पत्रातील शब्द त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा चमकले.
"माफ कर सरस्वती."


सायली आपला शालू सावरत मांडवाच्या समोर उभी होती. सगळं सुरळीत चाललं होतं पण तिच्या मनात अजूनही ते पत्र घोळत होतं.

"तुम्हाला असं नाही वाटत का अनिरुद्ध रामकृष्णजींनी जे लिहिलंय, ते काहीतरी मोठं सांगतंय.
"
अनिरुद्धने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं,

"सायली आजचा दिवस फक्त आनंद साजरा करण्याचा आहे. आपण हे रहस्य नंतर उलगडू. आधी रोहनच्या लग्नाचा आनंद लुटूया."

सायलीने हसून मान डोलावली. खरंच आजचा दिवस फक्त आणि फक्त साजरा करायचा होता.

ढोल-ताशांचा गजर, गाण्यांचा ताल आणि नाचणाऱ्या नातेवाईकांनी संपूर्ण वातावरण गजबजून गेलं होतं. रोहन घोड्यावर बसलेला होता, केसांवर गुलाबाच्या माळा आणि कपाळावर टिकली लावलेली. तो आनंदाने सगळ्यांकडे बघत होता.

सरस्वती आपल्या नातवाला अश्रूपूर्ण डोळ्यांनी पाहत होत्या. त्या आठवणींमध्ये गुरफटल्या होत्या, कधी तो छोटा असताना त्याला मांडीवर घेतलेले, कधी शाळेच्या पहिल्या दिवशी डोळ्यात पाणी आणून त्याला सोडलेलं आणि आता तो एका नवीन जबाबदारीकडे पाऊल टाकत होता.

सायली आणि अनिरुद्ध हसत होते, एकमेकांना पाहत होते. त्यांच्यासाठी हा केवळ रोहनच्या लग्नाचा दिवस नव्हता तर त्यांच्या स्वतःच्या नात्याच्या समजुतीचा एक टप्पा होता.

रोहन आणि अनिकाने मंगलाष्टकांमध्ये एकमेकांना वरमाला घातल्या आणि त्या क्षणी सनईचे सूर पूर्ण घरभर गुंजले.

लग्नाच्या त्या सोहळ्यात प्रत्येकाच्या मनात काही आठवणी होत्या. काही आनंदाच्या, काही वेदनांच्या, पण त्या क्षणी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती, नवीन नात्यांची सुरूवात...

सायली सरस्वतींच्या जवळ गेली आणि हलक्या आवाजात विचारलं,

"आई तुम्ही त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं?"

सरस्वतीने हळूच तिचा हात हातात घेतला आणि हसत म्हणाल्या,

"काही गोष्टी फक्त मनात ठेवायच्या असतात बाळा."

पण सायलीच्या मनात त्या पत्रातील शब्द पुन्हा एकदा उमटले.
"माफ कर सरस्वती."

सायलीच्या हृदयात धस्स झालं.

"अनिरुद्ध हे बघा." ती धावतच त्याच्याकडे गेली.

अनिरुद्धने तो कागद वाचला आणि तोही गोंधळला.

"कोणाचं असेल हे?"
"रामकृष्णजींचं असावं असं वाटतंय... पण त्याने हे का लिहिलं असेल?"

त्याचवेळी सायलीच्या मनात एक कल्पना चमकली.

"अनिरुद्ध आपण रामकृष्णजींच्या कुटुंबाबद्दल माहिती शोधूया, कदाचित त्यांच्या घरच्यांना काही माहीत असेल."

अनिरुद्धने मान डोलावली.

"हो ते योग्य ठरेल."

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर


सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेज वर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.


🎭 Series Post

View all