Login

सनईच्या सुरात गुपित...भाग 11

देशमुख वाडा आता नाहीसा झाला होता
सनईच्या सुरात गुपित...भाग 11

सायलीने फोटो पुन्हा पाहिला. एका कोपऱ्यात हलकासा मिटलेला शिक्का दिसत होता 'देशमुख वाडा, १९७५'.

"हा वाडा अजून अस्तित्वात असेल का?" सायलीने विचारलं.

"हेच शोधायचंय आणि जर हा नष्ट झाला असेल, तर त्याचं रहस्य अजूनही कुठेतरी दडलेलं असेल."

त्या रात्री अनिरुद्धने वकील देशपांडेंना पुन्हा फोन केला.

"देशमुख वाड्याचं तुम्हाला काही माहिती आहे का?"

"काही नाही." देशपांडे यांनी तत्परतेने उत्तर दिलं.

"पण सर तो वाडा माझ्या आजोबांचा होता आणि आता कुणीतरी त्याचा उल्लेख करून धमक्या देतंय."
फोनच्या पलिकडून काही क्षण शांतता पसरली. मग देशपांडे हळू आवाजात म्हणाले,

"तुम्ही हे गुपित खरंच शोधू इच्छिता?"

"हो."

"तर मग सावध राहा अनिरुद्ध, काही गुपितं उघड करणं धोकादायक ठरू शकतं."

फोन कट झाला.

सायलीने काळजीने पाहिलं.

"ते असं का म्हणाले?"

अनिरुद्धच्या मनात विचारांचं वादळ उसळलं. कदाचित या वाड्याच्या गूढ रहस्यात त्यांच्या कुटुंबाच्या भूतकाळाचं एक भयंकर सत्य दडलेलं होतं.

सायली आणि अनिरुद्ध अजूनही त्या फोन कॉलच्या धक्क्यातून सावरत नव्हते. देशपांडेंनी दिलेली सूचनाच पुरेशी होती,
"सावध राहा."

त्याचवेळी रोहन आणि अनिका आपल्या नव्या आयुष्याचा आनंद घेत होते. समुद्रकिनारी फिरून आल्यानंतर ते दोघं थकून घरी आले.

"कसं वाटलं?" सायलीने हसून विचारलं.

"मस्त.. पण अजून कुठेतरी बाहेर फिरायला जावंसं वाटतंय," अनिका उत्साहाने म्हणाली.

"मग दुसऱ्या आठवड्यात गेटवे किंवा माथेरानला जाऊ," रोहनने ठरवल्यासारखं सांगितलं.

सायली त्यांच्याकडे पाहून हलकंसं हसली. आयुष्याच्या या टप्प्यावर दोघेही नवीन सुरुवात करत होते आणि त्यांना कुठलाच तणाव नव्हता. त्यांच्यासमोर काही गूढ नव्हतं काही रहस्य नव्हतं फक्त प्रेम आणि नवीन आशा होती.

पण अनिरुद्ध आणि सायलीसाठी हे शक्य नव्हतं.

सायलीने मनातल्या मनात ठरवलं हा देशमुख वाडा आणि त्याचं रहस्य शोधायचं.

दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध आणि सायली जुन्या रेकॉर्ड्स तपासण्यासाठी नगरपालिका कार्यालयात पोहोचले. त्यांनी देशमुख वाड्याच्या नोंदी शोधण्याचा प्रयत्न केला.

एक वृद्ध कारकून तिथे बसलेला होता.

"देशमुख वाड्याबद्दल माहिती हवी होती." अनिरुद्धने विचारलं.

तो वृद्ध काही क्षण विचारात पडला आणि मग त्याने एक फाईल काढली.

"देशमुख वाडा... १९७५ मध्ये एका वादग्रस्त प्रकरणामुळे बंद झाला होता." तो म्हणाला.

सायलीने उत्सुकतेने विचारलं,
"कसला वाद?"

"माहित नाही, पण काहीतरी भीषण घडलं होतं. त्या काळात तिथे पोलिसांचं लक्ष होतं आणि अचानक एका रात्री संपूर्ण वाडा रिकामा झाला. पुढे काही वर्षांनी तो पाडला गेला."

"आता त्या जागेवर काय आहे?"

वृद्धाने एक कागद बाहेर काढला आणि त्यांनी दिलेलं गावाचं नाव पाहिलं.

"अहो ही तर आता एका मोठ्या रिसॉर्टची जागा आहे. ‘गोल्डन हॅरिटेज रिसॉर्ट’ नावाने ओळखली जाते."

अनिरुद्ध आणि सायली एकमेकांकडे पाहतच राहिले.

"म्हणजे आता त्या वाड्याचा मागमूसही उरलेला नाही?"

"तसं म्हणता येणार नाही साहेब." वृद्धाने कुजबुजत सांगितलं.
"लोक म्हणतात की त्या जागेवर काहीतरी अदृश्य अस्तित्व आहे काही लोक तिथे रात्री जाण्याचं टाळतात."

सायलीच्या अंगावर काटा आला.
"आपल्याला तिथे जावं लागेल." अनिरुद्ध ठाम स्वरात म्हणाला.

सायलीने त्याचा हात धरला.
"हो... हे गुपित उलगडल्याशिवाय आपल्याला शांतता मिळणार नाही."

त्या रात्री रोहन आणि अनिका आपल्या गोड नव्या संसाराच्या स्वप्नांमध्ये होते तर अनिरुद्ध आणि सायली एका भयावह रहस्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत होते.


सायली आणि अनिरुद्ध घरी पोहोचले पण त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता गोल्डन हॅरिटेज रिसॉर्ट. त्या जागेवर आधी देशमुख वाडा होता जिथे काहीतरी भीषण घडलं होतं.

सायलीने लॅपटॉप उघडला आणि रिसॉर्टबद्दल माहिती शोधू लागली.

"हे रिसॉर्ट पंधरा वर्षांपूर्वी बांधलं गेलंय पण इथल्या काही रिव्ह्यूज विचित्र आहेत."

अनिरुद्धने जवळ येऊन स्क्रीनवर पाहिलं. काही ग्राहकांनी लिहिलं होतं की, रात्रीच्या वेळी काहीतरी अस्पष्ट आवाज येतात, भिंतींवर विचित्र सावल्या दिसतात आणि काहींना तर कुणीतरी मागे उभं असल्यासारखं वाटतं.


"याचा अर्थ अजून काहीतरी तिथे शिल्लक आहे." अनिरुद्ध पुटपुटला.

सायलीने विचारलं, "आपण तिथे जायचं?"

"हो, आपण त्या रिसॉर्टमध्ये थांबायचं आणि स्वतः पाहायचं की तिथे नक्की काय आहे."

सायली थोडीशी घाबरली, पण तिनेही निश्चय केला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी...

अनिरुद्ध आणि सायली गोल्डन हॅरिटेज रिसॉर्टमध्ये पोहोचले. रिसॉर्ट आलिशान होतं पण काहीसं रहस्यमयही वाटत होतं. मुख्य हॉलमध्ये जुनी पेंटिंग्ज होती जणू त्या भूतकाळातील काहीतरी सांगू पाहत होत्या.
त्यांना रिसेप्शनवर एक मध्यमवयीन मॅनेजर भेटला.

"हॅलो, वेलकम टू गोल्डन हॅरिटेज तुमचं बुकिंग कन्फर्म आहे. तुम्हाला कोणता खास रूम नंबर हवा आहे का?"

अनिरुद्धने थोडा विचार केला आणि विचारलं,

"तुमच्या इथली सर्वात जुनी खोली कोणती आहे?"

त्या प्रश्नाने मॅनेजरचा चेहरा थोडा उतरला.

"सर १०७ नंबरची खोली ही सर्वात जुनी आहे पण काही लोक तिथे थांबायला तयार नसतात."

क्रमशः

सदर कथेचे लिखाण सुरू आहे सगळे भाग वाचण्याकरिता पेजला नक्की फोल्लो करा.


🎭 Series Post

View all