सांग कधी कळणार भाग १

बायकोने नवऱ्याकडून अपेक्षा ठेवू नये?
"ह्या आजकालच्या मुली अश्याच आहेत. त्यांना जबाबदारी नको. चार पैसे कमावले की, स्वतःला पुढारलेल्या विचारांच्या समजतात. नवरा आजारी आहे हे समजल्यावर तरी तुझ्या बायकोने यायला हवं ना? काळजीच नाही तर कशाला येणार ती?" शांताच्या तोंडाचा पट्टा सुरू होता.

"आई, मला आराम करू दे." अंगावर चादर घेत किशोर म्हणाला.

"मी आले म्हणून मला माधवीचं वागणं समजलं. माझं एकुलतं एक पोरगं आणि त्याला ही अशी बायको." तिने पदराने अश्रू टिपले. ती बाहेर निघून गेली.

माधवीच्या घरी.
"माधवी हे काय आहे? जावईबापू आजारी आहेत हे कळलं असतांना देखील तू जायचं नाव घेत नाही. नवरा आजारी असताना बायकोन त्याच्याकडे थांबावं, त्याला काय हवं नको हे पाहावं. ही साधी गोष्ट तुला कळत नाही का?" माधवीची आई सुमन तिला बोलत होती.

माधवी निवांत सोफ्यावर बसून चहा घेत होती.
सुमन बोलत होती, तरी ती ऐकून न ऐकल्यासारखं करत होती. आता मात्र सुमनचा पारा चढला.

"माधवी मी तुझ्याशी बोलते आहे. माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. तू का जात नाही?"
सुमन संतापली होती.

"आई किशोर आजारी आहे. हे मला माहित आहे आणि असेही तो काही एकटा नाही. गावावरून सासूबाई आल्या आहेत. त्या घेतीलच त्याची काळजी."

"माधवी तुला काय झालं आहे ? तुमच्या दोघांमध्ये काही बिनसलं आहे का ? प्रत्येक वेळी किशोर किशोर करत राहायची आणि आज तू इतक्या बेफिकरीने कसं वागू शकते? मान्य आहे तुझी सासू आहे तिथे; पण बायको म्हणून तुझं कर्तव्य नाही का? मी हेच संस्कार दिले आहेत का? तू आता लहान नाहीये हे असं वागायला. तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव असायलाच पाहिजे." सुमनचा आवाज वाढला होता.

तिला खरंतर आश्चर्य वाटत होतं. माधवीच्या वागण्यात इतका बदल झाला होता.

"आई , दुपारच्या जेवणाचा बेत काय आहे? काहीतरी छान बनव. पुरणपोळी बनवतेस का? नको, राहू दे त्याला वेळ लागेल. एक काम कर पावभाजी बनव. खूप दिवस झालं तुझ्या हातची पावभाजी खाल्ली नाही." तिने टीव्हीचा रिमोट घेतला आणि टीव्ही चालू केला.

माधवीचं असं वागणं पाहून आता मात्र सुमनचा राग अनावर झाला.

"माधवी, हे काय वेड्यासारखं वागते आहेस? तुला समजतय का ? मी इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलते आहे आणि तुझं काय चाललंय. लग्न झालं आहे तुझं. हे असं लहान मुलीप्रमाणे वागत आहेस. तुला जबाबदारीची जाणीव नाहीच का?"

आता मात्र माधवी अगदी शांत बसली. भरलेल्या आभाळाने मोकळ व्हावं, तसंच आता ती आईपाशी मोकळी होणार होती.

"आई, लग्न माझ्या एकटीचं झालं आहे का ? आणि जबाबदारी, कर्तव्य हे सारं मी एकटीनेच पेलायचं का ? किशोरची जबाबदारी नाही?"

हे बोलत असताना माधवीचा कंठ दाटून आला.
डोळे काठोकाठ पाण्याने भरले. आता मात्र रागात असलेली सुमन शांत झाली. ती पटकन तिच्या बाजूला जाऊन बसली आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली,
" माधवी, काय झालं काही प्रॉब्लेम आहे का?"


"आई, मी नेहमी बघत आले आहे. तू बाबांची,माझी नेहमीच काळजी घेत राहिलीस. घरामध्ये येणारे पाहुणे , मग ते कोणीही असो त्यांचं आदरातिथ्य अगदी मनापासून केलं. आपल्या घरी कधी कोणी पाहुणा आला तर न जेवता कधी गेलाच नाही. तू कधी आजारी पडली, तर बाबा तुझी किती काळजी घ्यायचे. अगदी जेवण सुद्धा स्वतःच बनवायचे. माझी वेणी बांधण्यापासून, माझा शाळेचा डबा, स्वतःचा डबा, तुझ्यासाठी खिचडी सारं किती तन्मयतेने करायचे. हे सारं मनाच्या कोपऱ्यात बसलं आहे. तुला आराम करता यावा म्हणून बेडरूमचा दरवाजा हळूच लावायचे आणि मला म्हणायचे आईला त्रास द्यायचा नाही. आई आजारी आहे. आई मला खूप छान वाटायचं जेव्हा बाबा तुझी अशी काळजी घ्यायचे."

माधवी जे पण बोलत होती, ते खरं होतं. आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. सुमनने देवा घरी गेलेल्या नवऱ्याचा फोटो पाहिला, तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिने पदराने स्वतःचे डोळे पुसले. खरंच नशीबवान होती ती , तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा, माया करायचा. कधी कोणत्या गोष्टीची कमी नव्हती. आजाराचे निमित्त झालं आणि सोडून गेला ; पण आज पुन्हा सारं जसच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं. तो गेल्यापासून तिच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती, ती कधी न भरून निघण्यासाठी. आता तिच्या आयुष्यात तिच्या हक्काची एकच व्यक्ती होती, ती म्हणजे माधवी.

माधवीला संस्कार देण्यात तिने कसलीच कसर सोडली नव्हती. मोठ्या माणसांचा मानसन्मान
करणं, आपल्या माणसांची काळजी घेणे हे सारं ती आईकडूनच शिकली होती. मुळात भावनिक असलेली माधवी तिला कोणाचा त्रास बघवायचा नाही.

किशोरशी लग्न झालं आणि तिने स्वतःला त्याच्याशी एकरूप केलं. सारी जबाबदारी तिने उचलली. चांगली उच्चशिक्षित होती. लग्नानंतरही तिने नोकरी सोडली नाही. नोकरी आणि घर दोघांचाही समतोल ती व्यवस्थित साधत होती. किशोरला चांगले पदार्थ बनवून घालायला तिला आवडायचं.

तिनेही आईच्या पावलावर पाऊल ठेवलं होतं. पाहुणे वगैरे आले की, त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करायची. तिच्या हाताला चव असल्यामुळे पाहुणे देखील तिचं फार कौतुक करायचे. जो तो माधवीचं कौतुक करायचा.
सर्वगुणसंपन्न होती ती मग आज का अशी वागत होती? आईलाही कोडं पडलं होतं.

क्रमश:
कथा लेखन अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all