सांग कधी कळणार भाग २

बायकोने नवऱ्याकडून अपेक्षा ठेवूच नये
गेल्या भागात आपण पाहिले की, माधवीचा नवरा किशोर आजारी असताना देखील ती माहेरीच होती. तिच्या आईला सुमनला हे पटत नव्हतं. कारण काय आहे हे आईला जाणून घ्यायचं होतं. आता पाहू पुढे.

"आई, माझं लग्न झाल्यापासून मी सर्व जबाबदारी स्वखुशीने घेतली आहे. सारं काही मन लावून करते. किशोरला कोणतीही गोष्ट कमी पडू नये याची मी खबरदारी घेते. निवांतपणा हा नसतोच. सकाळी लवकर उठून डबा, बाकीची कामं सारं आवरून ऑफिसला जाते. पुन्हा घरी आले की, जेवणाची तयारी.
गेल्या महिन्यातही किशोरची तब्येत बरी नव्हती. ऑफिसमध्ये माझी महत्त्वाची मीटिंग होती, तरी देखील मी रजा काढली आणि त्याची काळजी घेतली. कारण माझ्यासाठी तोच महत्त्वाचा होता, कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं हे मला चांगलं माहित आहे. दिवस रात्र त्याच्यासोबत बसून राहिले. त्याचे औषध, जेवण सारं काही वेळेवर दिलं. हे सगळं मी का केलं? कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. केवळ जबाबदारी म्हणून मी हे केलंच नाही. तो आजारी असताना माझं मन कशातच लागत नव्हतं. कधी एकदाचा तो बरा होतो आहे असं झालं होतं.

गेल्या आठवड्यात अचानक माझी तब्येत खराब झाली. पावसात भिजल्यामुळे मला ताप, सर्दी खोकला झाला. ताप खूप होता मला बसवत देखील नव्हतं. मी झोपूनच होते. त्यात माझे पीरियड्स देखील आले मला प्रचंड त्रास होत होता. माझ्या अंगात उभं राहण्याचं देखील त्राण नव्हतं. मला अपेक्षा होती माझी अशी अवस्था आहे, तर किशोर घरी राहील सुट्टी घेईल ;पण त्याने तसं केलं नाही. तो ऑफिसला निघून गेला आणि जाताना म्हणाला. आपल्या फॅमिली डॉक्टर कडून औषध घेऊन ये. आई मला इतकं वाईट वाटलं, माझ्या अंगात त्राण देखील नव्हता. मला बसवत देखील नव्हतं. हे किशोरला काहीच दिसलं नाही का?

आई, मला त्यादिवशी तुझी खूप आठवण आली. मी आजारी असले की, तू आणि बाबा किती काळजी घ्यायचे. मी आजारी पडले की, तू उपाशी राहायची. तुझ्या त्या मायेच्या स्पर्शाची खूप आठवण येत होती. असं वाटत होतं लगेच तुझ्याकडे निघून यावं, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं. तू मला नेहमीप्रमाणे गोंजारावं. किशोर असूनदेखील मी एकटी पडले. मी त्या दिवशी कसंबसं जाऊन औषध आणलं. बाहेरून जेवण ऑर्डर केलं.
झोपून राहिले. किशोर जेव्हा रात्री आला तेव्हा, त्याने औषध आणलं का? इतकंच विचारले.
तो बाहेरून येतानाच जेवून आला.
माझी माफक अपेक्षा होती, त्याने विचारपुस करावी. मी जेवली का? मला बरं वाटतंय का? पण तो तर सरळ झोपून गेला,म्हणे ऑफिसमध्ये खूप काम होतं. दमला होता.

राहून राहून मला एकच प्रश्न सतावत होता.
त्याला माझा त्रास दिसलाच नाही का? परक्या व्यक्तीने वागावं असंच वागला.

दुसऱ्या दिवशी माझा ताप उतरला नाही. मला खूप अशक्त वाटत होतं. ताप आल्यामुळे चेहरा उतरला होता, तरी तो ऑफिसला निघून गेला.
जाताना म्हणाला , आराम पडला नाही तर पुन्हा डॉक्टरकडे जा.

त्याने माझ्यासोबत यायला हवं होतं,तो आलाच नाही.
माझ्यासोबत तो पाहिजे होता;पण तो नव्हताच.
माझ्या मनात त्याच्याविषयी जे प्रेम आहे, ते त्याच्या डोळ्यात मला दिसलं नाही. त्याच्या वागण्यातून,कृतीतून मला जाणवलं ते. मीच मूर्ख होते आई. त्याला सर्वस्व मानून बसले.
मी स्वतःला गृहीत धरलं. जे मी सगळं करत होते ते केवळ कर्तव्य म्हणून करत होते? त्यापलीकडे काहीच नव्हते का?

लग्न का करतो आपण?

आपला जोडीदार आपल्या सुखदुःखात नेहमी पाठीशी असतो. जोडीदार म्हणजे रणरणत्या उन्हात सावली. ती सावली बनण्याच्या प्रयत्न मी नेहमी केला. मी कुठेच कमी पडले नाही. तरी किशोर माझ्याशी असा वागला. ही गोष्ट माझ्या जिव्हारी लागली आहे आई. खरंच रडू येतंय आणि रागही येत आहे. त्याला समजून घेण्यात मीच चुकले.
त्याच्या आयुष्यात माझं स्थान काय म्हणून आहे? हे मी जाणलेच नाही. गुंतत गेले. खरंच आई मी चुकले. त्याला मी सर्वस्व मानलं, स्वतःला मी महत्व दिलं नाही."

हे सारं बोलत असतांना ती रडत होती.

तिच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं, तिला किती वाईट वाटलं आहे.

सुमनला हे सगळं ऐकून वाईट वाटलं.

"माधवी, बघ तुझं म्हणणं बरोबर आहे. आजारी माणसाला सोबतीची गरज असते; पण बघ हे सगळं तू त्यांच्याशी बोलली का? तुझी बाजू त्यांना समजली पाहीजे. पुढच्या वेळेस ते असं करणार नाही." समजावण्याच्या सुरात ती म्हणाली.

"आई, ह्या गोष्टी बोलाव्याच लागतात का? त्याला समजायला हवं ना?"

"बघ तू म्हणते ही गोष्ट तुझ्या मनाला लागली आहे आणि म्हणूनच तू दुखावली आहेस. जिथे संवाद संपतो तिथे नातं पोकळ व्हायला वेळ लागत नाही. एकदा बोलून घे."


रात्री तिला किशोरचा मॅसेज आला.

"माधवी, मी तुला खूप मिस करतोय. तू कधी येणार आहेस?"

तो मॅसेज बघून तिला रहावलं नाही.

'किशोर, मी देखील तुला मिस करते;पण तू मला दुखावलं आहेस.' तिचं मन हेच बोलत होते.

तिनेही मॅसेज केला
"दोन दिवसात येईल. बाय झोप लागली आहे. झोपते."

त्याला वाटलं नेहमीप्रमाणे ती त्याच्या तब्येतीची विचारपूस करेल,भरभरून बोलेल; पण तसं झालं नाही.
क्रमशः