Login

सांग कधी कळणार भाग ३

चांगलं समजत होते; पण चांगलेच रंग दाखवायला लागली.
गेल्या भागात आपण पाहिलं की, किशोर माधवीला मॅसेज करतो. तरीदेखील ती त्याच्या तब्येतीची विचारपूस करत नाही. ती त्याला गुड नाईट म्हणते. ती त्याला टाळते. आता पाहू पुढे.

किशोरला माधवीच्या वागण्यातला फरक सहज लक्षात आला; कारण ती असं कधीच वागत नव्हती. तो आजारी पडला की, त्याची विचारपूस करायची. त्याला औषध, जेवण सारं वेळेवर द्यायची. मात्र आज तिने एकदाही तब्येत कशी आहे म्हणून विचारलं नाही. उलट झोप लागली आहे म्हणाली. आज त्याला प्रकर्षाने जाणवत होतं, कधी तो आजारी पडला तर, ती त्याची सतत विचारपूस करायची. त्याच्या अवतीभोवती असायची. त्याला जे खावंसं वाटतं ते बनवून द्यायची.
आज त्याला ते सारं आठवत होतं. तिचं ते प्रेम,काळजी सारं दिसायचे. गेल्या वेळेस आजारी पडला होता तेव्हा ती रात्रभर जागीच होती. सतत त्याचा ताप गेला की, नाही चेक करत होती. त्याच्यासाठी फळं आणली होती, ज्यूस बनवून देत होती. डॉक्टरांनी जसं पथ्यपाणी सांगितले होते, तसेच ती त्याला देत होती. जेव्हा त्याला बरं वाटलं तेव्हा ती देखील खुश झाली.

त्या माधवीमध्ये आणि आजच्या माधवीमध्ये खूप मोठा फरक जाणवत होता.
काळजी करणारी माधवी बदलली होती.
आपण कुठे चुकलो? हा विचार तो करत होता.

ती त्याला झोपते म्हणाली; पण तिला काही केल्या डोळा लागत नव्हता. किशोरच्या विचारात होती. डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते. असं वागताना तिला त्रास होत होता ;कारण तिचा मूळ स्वभाव हा वेगळाच होता.

मनातल्या मनात ती बोलू लागली,

'माधवी, हे तू काय करते आहेस? तू देखील किशोर सारखं वागत आहेस. ज्या गोष्टीमुळे तू दुखावली आहेस आता तू देखील तशीच वागत आहे. असं किती दिवस तू त्याला दुर्लक्ष करणार? आई म्हणते ते बरोबर आहे. त्याच्याशी मन मोकळेपणाने बोललं पाहिजे. उद्याच मी घरी जाते आणि त्याच्यासोबत बोलते. तिच्या डोळ्यासमोर किशोरचा चेहरा येत होता , त्याचा ताप गेला असेल का ? त्याला बरं वाटत असेल ना? आता सारे प्रश्न तिच्या डोक्यात फेर धरू लागले होते. किशोरवर तिने मनापासून प्रेम केलं होतं. त्याने किती जरी दिला दुखावलं, दुर्लक्ष केलं, तरी देखील ती तशी वागू शकत नव्हती. तिचा स्वभाव मायाळू होता. स्वतःपेक्षा ती दुसऱ्याची काळजी जास्त घ्यायची. दुसऱ्याचं दुःख स्वतःच समजून ते दूर करण्याचा प्रयत्न करायची. कितीजरी चांगला स्वभाव असला तरी ह्यावेळी मात्र ती दुखावली होती. किशोर तर तिचा नवरा होता. त्यामुळेच तिला अश्या वेळेस त्याच्या सोबतीची अपेक्षा होती. तिला वाटत होतं, ती जशी काळजी घेते तसंच त्यानेही घ्यावी. पत्नी क्षणासाठी पत्नी असते आणि अनंत काळची माता. पत्नीला माता होता येतं, मग अशावेळेस पतीला पित्या सारखं होता येत नाही का? बाबा जशी काळजी घेतात,जपतात तसं त्याला का नाही करता येत.
अपेक्षा करणं चुकीचं आहे; पण आपल्या माणसाकडून अपेक्षा करणार नाही तर कोणाकडे अपेक्षा करणार?

स्वावलंबी होती ती, स्वतःच्या पायावर उभी,पैश्याने सगळं विकत घेता येतं होतं विकत घेता येत नाही ती जीव लावणारी माणसं.

तिने आईचा चेहरा पाहिला. आई झोपली होती.
'आई, तू बरोबर बोलत आहेस. मी किशोरसोबत बोललं पाहिजे, नाहीतर मी त्याच्यापासून दूर जाईल. मला नातं हवं आहे. मी जरूर बोलणार.'

उद्या घरी जाते हा विचार करून ती झोपी गेली.

सकाळी उठली आणि ती आईला म्हणाली,
"आई आज मी घरी जाते तु जे काल म्हणाली ते मला पटलं."

"मला माहित होतं तू माझ्या बोलण्याचा नक्कीच विचार करशील." आई तिच्या गालावर हात फिरवत म्हणाली. तिने आईला घट्ट मिठी मारली.

किशोरला काहीच खबर न देता ती घरी गेली किशोर आणि त्याची आई शांता दोघेही होते.

ती बॅग ठेवायला रूममध्ये गेली. किशोर तिला पाहून खरंतर खुश झाला होता.
तो देखील तिच्या मागे गेला.

"माधवी, तू तर मला सरप्राईज दिले, काल तर काहीच म्हणाली नाही आणि असं आज अचानक आली."

"हो माझ्या ऑफिसच्या खूप सुट्ट्या झाल्या त्यामुळेच मी आले. जास्त दिवस सुट्ट्या घेऊ शकत नाही."

किशोरला अपेक्षित होतं की, त्याची तब्येत बरी नाही म्हणून ती त्याच्यासाठी आली असावी; पण तिला ऑफिसला जायचं होतं म्हणून ती आली होती. त्याचा हिरमोड झाला. त्याला वाटलं आता तरी त्याच्या तब्येतीची विचारपूस करेल; पण तसं न करता ती किचनमध्ये गेली.

किशोर तिला फार आशेने बघत होता.

माधवीने कधीच असं केलं नव्हतं, आज ती दुर्लक्ष करत होती. तिचं बदललेलं वागणं किशोरला काही केल्या पचत नव्हतं

शांताला तर आधीच माधवीचा राग आला होता. ती तिच्याशी जास्त बोलत देखील नव्हती. माधवीला कल्पना आली होती.

आई म्हणून त्या त्यांच्या ठिकाणी योग्यच होत्या पण शेवटी माधवी देखील दुखावली होती त्यामुळेच ती अशी वागली होती.

जेवण वगैरे झाल्यावर माधवी पुन्हा रूममध्ये जाऊन बसली. बाहेर शांता आणि किशोर होते.

शांता किशोरला म्हणाली, "किशोर, तुझं बायकोच्या बाबतीत नशीब फुटकं निघालं. विचार केला होता तुझं लग्न झालं की, तू तुझ्या संसाराला लागशील. आमचं ओझं कमी होईल; पण हे माधवीचं वागणं बघून आता आमच्या जीवाला काळजी लागून राहील बघ.
तुझ्या बाबांसोबत इतके वर्ष संसार केला; पण हे असं कधीच वागले नाही. नवऱ्याला त्रास होत असताना कुठे जायची हिंमत झाली नाही. चांगली चांगली म्हणता, आता चांगलेच रंग दाखवायला लागली आहे."

"आई, मी माधवीशी बोलतो." किशोर म्हणाला.

दोघांचं बोलणं रुममध्ये बसलेली माधवी ऐकत होती. तिलाही तेच हवं होतं. त्याच्याशी मनातलं बोलायचं होतं.
क्रमशः
अश्विनी ओगले.