Login

सांग कधी कळणार भाग ४ अंतिम

संसार दोन चाकावर चालतो
गेल्या भागात आपण पाहिले की, माधवी सासरी परत येते. सासरी येऊन देखील ती किशोरची विचारपूस करत नाही. जरा ती अलिप्तच वागत असते. शांताला राग येतो. किशोरला तिचं वागणं जरा वेगळं वाटतं. शांता याबाबत किशोरला बोलते. तो माधवीशी बोलणार असतो. आता पाहू पुढे.

दिवस कसा निघून गेला कळलंच नाही. माधवी आल्यापासून शांतच होती. ती जास्त बोलत नव्हती. नेहमीच बडबड करणारी माधवी एकही शब्द बोलायला मागत नव्हती. रात्रीची सगळी कामं आवरून, माधवी रूममध्ये गेली. किशोरही आला.

"माधवी, तिथे आई कशी आहे?" तिचा हात पकडत म्हणाला.

"हो आई बरी आहे." माधवी अंगावर चादर घेत म्हणाली.

"बरं झालं तू माहेरी जाऊन आली, तितकंच तुला फ्रेश वाटलं असेल. सारखं काम करून तू देखील दमतेच."

"किशोर, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. किशोर मला खूप झोप लागली आहे. मी झोपते. असेही उद्या मला सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचं आहे. चल गुड नाईट."
तिने डोळे बंद केले.

आता मात्र किशोरला राहवलं नाही.

"माधवी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अशी अचानक तू माहेरी गेली आणि काल मी मॅसेज केला तर तेव्हाही तुला झोप लागली होती. मला असं वाटलं होतं माझी तब्येत बरी नाही हे कळल्यावर तू येशील; पण तू आली नाही आणि आल्यावर देखील एका शब्दाने माझ्या तब्येतीची विचारपूस केली नाही. माधवी तुझ्या वागण्यात मला फरक जाणवतोय आणि त्याचा मला त्रास होतोय."

माधवी उठून बसली.

"किशोर, होतोय ना त्रास? मलाही असाच त्रास झाला. तुला आठवतय मी आजारी पडले होते, मलाही ताप आला होता, अंग थरथरत होतं. आज जशी तू अपेक्षा करत आहेस, तुझ्या तब्येतीची विचारपूस करावी, तुझी तब्येत बरी नाही हे समजल्यावर मी तुझ्यापाशी यावं, अगदी तशीच अपेक्षा मी तुझ्याकडून केली होती ; पण तू काय केलं माहित आहेस ? तू माझ्याकडे साफ दुर्लक्ष केलं. मला इतका त्रास होताना देखील तू ऑफिसमध्ये निघून गेला. मी जेवले की नाही? औषध घेतलं की नाही? एकदाही फोन करून तू मला विचारलं नाहीस. रात्री जेव्हा घरी आला, तेव्हा देखील तुला झोप लागली होती. फक्त डॉक्टर कडे जा इतकंच काय ते कर्तव्य तू पूर्ण केलं. इतकं कोरडपणे तू कसा वागू शकतो? मला इतका त्रास होत असताना देखील तू काहीच न झाल्याच्या अविर्भावात वावरत होता. मला फार एकटं वाटत होतं. त्यावेळेस असं वाटत होतं तू माझ्या जवळ बसशील, माझा हात हातात घेशील, माझ्या डोक्यावरून हात फिरवशील; पण तसं काहीच झालं नाही. राग आणि दुःख दोन्हीही भावना उफाळून आल्या. मला तुझ्याशी बोलायची देखील इच्छा होत नव्हती. खरंच खूप राग आला होता किशोर.

किशोर माझी आई जेव्हा आजारी पडायची, तेव्हा माझे वडील घरातील प्रत्येक काम करायचे. जेवण, भांडी, अगदी लादीसुद्धा. मला माहित आहे तुला घरातली कामं येत नाही ;पण कमीत कमी माझ्यासोबत तर राहू शकत होता. तू ते देखील केलं नाही. मला खरंच प्रश्न पडतो आहे. माझ्या प्रेमातच कमी राहिली? मी ह्या नात्याला न्याय देऊ शकले नाही ? आता मला असं वाटतंय मी स्वतःला गृहीत धरलं किंवा मी तुला समजून घेण्यात चूक केली. का मी अपेक्षा ठेवल्या ? ह्या सगळ्यामुळे मी दुखावले आहे आणि म्हणूनच मी माहेरी गेले होते. मी आजारी असताना तू माझ्यासोबत राहावं, हे खरंच तुला सांगावं इतका लहान आहेस? ही गोष्ट माझ्या जिव्हारी लागली किशोर. जेव्हा पण तू आजारी पडला , तेव्हा मी तुझी नेहमीच काळजी घेतली. ते सारं केलं ते तुझ्या प्रेमाखातर केलं. माझा स्वार्थ नव्हता.

लग्न झाल्यापासून मी स्वखुशीने सारी जबाबदारी स्वीकारली आहे, सर्व काही मनापासून करते आहे; पण जेव्हा मला गरज आहे तेव्हा तू नाहीस ही गोष्ट वेदनादायी आहे.
संसार हा दोन चाकावर असतो ना? तो दोघांनी सावरावा लागतो. एकाने किती जरी प्रयत्न केले, तरी दुसऱ्या चाकाने त्याचं कर्तव्य निभावलं पाहिजेच. नाही तर फरफट होते. तर संसाराची गाडी कशी चालणार? आणि मी खरंच सांगते मला फार गळून गेल्यासारखं झालं. जी गोष्ट मी आनंदाने करत होते, त्या गोष्टीतून रसच निघून गेला. माझी माणसं, माझ्या माणसाच्या गरजा ह्या माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत ; पण माझ्या माणसांच्या आयुष्यात माझं स्थान कुठेच नाही हे जाणवल्यावर मला त्रास होणार की नाही? हे तूच सांग?"

माधवी सगळं बोलून शांत बसली, हे सारं बोलत असताना तिचा आवाज कातर झाला होता. किशोरला सगळं ऐकून वाईट वाटलं. त्याला जाणीव झाली, जे तो वागला होता ते खरंच चुकीचं होतं; कारण जेव्हा माधवीने दुर्लक्ष केलं तेव्हा त्याला फार वाईट वाटलं होतं.

त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला "माधवी, मी जे वागलो ते चुकीचं वागलो. त्यादिवशी मी तुझ्यासोबत पाहिजे होतो; पण मी निघून गेलो. खरंच माझी चूक झाली. खरंतर तुला मी गृहीतच धरत आलो. तू चुकीचं बोलत नाहीये, तू सगळं काही मनापासून करते आहे ;पण मी हे विसरून गेलो तू माझी बायको आहे, तुझ्याही काही अपेक्षा आहेत आणि नवरा म्हणून त्या पूर्ण करायची जबाबदारी ही माझी आहे. मी मनापासून तुझी माफी मागतो. हे असं मी पुन्हा कधीच वागणार नाही. यापुढे तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्या पाठीशी उभा राहील. पुन्हा तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही. खरंच प्रॉमिस. प्लीज मला माफ कर." त्याचेही डोळे भरून आले होते.

आणि दोघांचा संवाद ऐकणारी शांता तिचे देखील माधवीविषयी मत बदलले होते.
समाप्त.
अश्विनी ओगले.
कथा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर करा.
संसार दोघांचा तर जबाबदारी देखील दोघांनी घ्यायला हवी नाही का? नाहीतर एकाचीच फरफट होत राहते. संसार सुखाचा न होता दुःखाचा होतो.