Login

संघर्ष... जीवनाचा

Sangharsh Jivnacha


संघर्ष...
संघर्ष... जीवनाचा

वाईट काळ प्रत्येकावर येतो. यावर कोणी विजय मिळवतो तर कोणी खचून जातो. जेव्हा वाईट परिस्थिती आपल्यावर ओढवते. तेव्हा कोणी समजवणारं सांगणारं सोबत पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं पण मूळात त्या काळातच कोणी जवळ नसतं. एकटेपणा त्यात आपल्याला झोंबून टाकतो. आपल्या मस्तिष्काचा ताबा वेगवेगळ्या विचारांनी घेतलेला असतो, वेगवेगळे पण फक्त नकारात्मक विचार असतात. अशात कुणालाही एकच मार्ग आढळतो तो म्हणजे आत्महत्येचा.

पण आत्महत्या केली की सगळं संपलं, मग यात संघर्ष काय? जीवन संपलं म्हणजे संघर्ष संपला.

संघर्ष केल्याशिवाय जीवनात आनंद मिळत नसतो.
द्वेष, विरोध, टीका झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. पण विजयी होण्यासाठी या संघर्षाला समोरं जावं लागतं आणि त्यावर मात करावी लागते.

म्हणूनच विजयाच्या दिशेने घोडदौड करण्यासाठी प्रयत्न करावे, संघर्षावर मात करावी.
आयुष्यात काही चांगले मिळवायचे असेल तर संघर्ष तर करावाच लागणार. पण या संघर्षावर मात करत, आपली मानसिकता सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे.


‘जिंदगी हर कदम एक नई जंग है’ हे गाणं तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जीवन म्हटलं की त्यात संघर्ष आलाच, सुख-दुःखाचे प्रसंग, फायदा-तोट्याचे खाचखळगे आलेच.


होरपळणार्‍या उन्हाळ्यानंतर मनाला आणि शरीराला थंडावा देणारा पाऊस येतोच. तसाच संघर्ष हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो कधीतरी संपणारच.

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर संघर्ष तर करावाच लागणार. पण या संघर्षाच्या काळातही काही वेळा आपले मानसिक संतुलन ढळू लागते.
निराशा येते, कधीकधी तर असा प्रश्नही पडतो की एवढे कष्ट, संघर्ष करूनही आपल्याया यश का मिळत नाही?
आणि मग आपण आपला संघर्ष थांबवायचा विचार करतो. पण लक्षात ठेवा टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.


आपल्या सर्वांनाच हा मानसिक, आर्थिक संघर्ष करावा लागत आहे. पण हे रडत करत बसायचं, की यावर मात करत पुढची वाटचाल करायची, हे आपणच ठरवायचे आहे.

संघर्षातूनच माणूस चांगल्या गोष्टी शिकतो. जसे की सोन्याला तापवून त्याच्यापासून सोनार सुंदर दागिना तयार करतो. तसेच जीवनातील संघर्ष, संकटे हे आपल्याला मजबूत बनवतात.

आयुष्यात संघर्ष आला की आपण हतबल होतो. पण अश्या परिस्थितीवरही विजय मिळवत यशस्वी होता येतं.


तुम्ही-आम्ही चांगल्या गोष्टी जशा स्वीकारतो तसा संघर्षही आनंदाने स्वीकारला पाहिजे.
त्यावर विजय मिळवला पाहिजे. जीवनातील संघर्षाला स्वीकारत यशोशिखर गाठलेल्या कित्येक व्यक्तींची उदाहरणे आपण वाचतो, पाहतो.
संकटे आल्यावर निर्माण होणार्‍या मानसिक संघर्षावर विजय मिळवता यायला हवा.

कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, 
जीवनात कोणतीही घटना, प्रसंग, संघर्ष हे कायमस्वरूपी नसतात, याची खूणगाठ मनाशी बांधून ठेवावी. जे आज आहे ते उद्या नसणार आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.
आज जी परिस्थिति आहे ती उद्या बदलणार आहे. अंधार्‍या रात्रीनंतर तेजस्वी प्रकाश असणारा दिवस उगवतोच. त्यामुळे चांगली-वाईट स्थिति स्वीकारून पुढची वाटचाल करावी.


नकारात्मक विचारांना बळी पडू नये,
कोणतीही वाईट घटना घडली की आपण त्याचा दोष इतरांना देतो.
स्वतःल मनस्ताप करून घेतो आणि त्यामुळे नकारात्मक विचारांची साखळी तयार होते आणि मग त्यातून चुकीची कृती घडते.
त्यामुळे लोक द्वेष करू लागतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मनात नकारात्मक विचारांना थारा देवू नका, त्याच्या आहारी जाऊ नका आणि विचाराना तुमच्या मनाचा ताबा घेवू देवू नका.

नकारात्मक विचारांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करावा.
तुम्ही एक जीवंत माणूस आहात, तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता, त्या आत्मसात करून प्रगति करू शकता. ‘परिवर्तन’ ही मनुष्याला मिळालेली देणगी आहे. त्याकडे स्वतःचे जीवन बदलण्याची, आणखी चांगले करण्याची संधी मिळते.
आयुष्यात येणार्‍या संघर्षामुळे व्यक्ति त्यातून मार्ग काढत यशस्वी होतो. मानसिक आणि शरीरिकरीत्या कणखर बनतो.

अडचणी आणि संकटे सतत आपल्या आयुष्यात येतच असतात. आपण त्यातून काय निवडायचे ही आपली जबाबदारी.
त्या संकटांना घाबरायचं, की त्यांना झुगारून त्यातून मार्ग काढत यशस्वी जीवन जगायचे हे आपल्यावर अवलंबून आहे.

सगळं काही चांगलं आहे आणि आणखी चांगलं होणार आहे, हा दृढनिश्चय बाळगायचा.

पळताना थोडी ठेच तर लागणारच पण शर्यत जिंकल्यानंतरच्या विजयाचा महोत्सव त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त मोलाचा आहे.

आयुष्यात शर्यत जिंकायची असेल तर नकारात्मक विचारांना आयुष्यात जागा देऊ नका.
संघर्ष करत रहा, यश नक्की मिळेल.