चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
संहार.
" आई, साक्षी कुठे आहे आहे? अजून का नाही आली? अकरा वाजले. थोड्या वेळाने बाबा येतील, ती दिसली नाही तर ओरडतील."
छोट्या बहिणीला घरी यायला उशीर झाला म्हणून विवेक आपल्या आईला विचारू लागला.
छोट्या बहिणीला घरी यायला उशीर झाला म्हणून विवेक आपल्या आईला विचारू लागला.
"ती तिच्या मैत्रिणींसोबत ऑफिसच्या इथे जवळच गरबा खेळायला गेली आहे. मगाशी फोन केला, तेव्हा घरी यायला निघाली होती. अजून आली कशी नाही काय माहीत? तू परत एकदा तिला फोन करून बघ बरं. कुठे राहिली ही पोरगी काय माहित? आता हे आलेत तर उगाच आपल्याला शिव्या पडतील." आई म्हणाली.
आईच्या सांगण्यावरून विवेक साक्षीला फोन केला. त्याने तीन वेळा प्रयत्न केला, पण ती काही फोन उचलत नव्हती. त्याने ते त्याच्या आईला सांगितले. ते ऐकून त्याच्या आईला तिची काळजी वाटू लागली.
" स्कूटी चालवत असेल, मग फोन कसा बघेल आई? येतच असेल ट्रॅफिक मिळालं असेल. येईलच इतक्यात फोन बघितला तर फोन करेल समोरून ती, तू काळजी नको करुस." विवेक त्याच्या आईला म्हणाला.
त्याचं बोलणं चालू असतानाच त्याच्या फोनची रिंग वाजली. त्यावर साक्षीचं नाव होतं. त्याने लगेच फोन उचलून तिला ती कुठे असल्याचं विचारलं, पण त्याला समोरून तिचा आवाज काहीसा गंभीर आणि घाबरलेला त्याला जाणवला.
" साक्षी, काय झालं? सगळं ठीक आहे ना? काय? कुठे? कधी ? आणि कसं? तू ठीक आहेस ना? आता कुठे कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही? सांग मला आम्ही लगेच येतो. तू काळजी करू नकोस. बरं आम्ही आलो लगेच तिथे." इतकं बोलून विवेकने फोन ठेवला.
फोनवरच त्याचं ते संभाषण ऐकून त्याची आई त्याच्यामागे उभी राहून भीतीने थरथर कापत होती. फोन ठेवल्यावर त्याचं लक्ष त्याच्या आईकडे गेलं. ती त्याला इशाऱ्याने काय झाल्याचं विचारू लागली. तिच्या तोंडून शब्दच पडत नव्हते. फक्त डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले होते.
" आई... तू शांत हो आधी, काही नाही झालंय. ती बस स्कूटीवरून पडली थोडसं खरचटलंय बस." विवेक त्याच्या आईची समजूत काढत तिला सांगू लागला.
मग ते दोघे त्वरीतच हॉसिटलमध्ये जाण्यासाठी निघाले. विवेकने त्याच्या बाबांना फोन करून सरळ तिथेच बोलावले.
काही वेळाने विवेक आणि त्याची आई एकत्र हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे साक्षी आणि तिची मैत्रीण जिथे होत्या त्या वॉर्डमध्ये शिरले. तिथे समोरच्या दोन्ही बेडवर साक्षी आणि तिची मैत्रीण पडून होत्या. तिच्या घरचे बाहेरगावी गेले असल्यामुळे तिच्या घरी अजून तरी, त्यांनी कळवले नव्हते.
विवेक आणि त्याची आई त्यांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करू लागले. त्यांच्या मागून त्यांचे बाबा देखील तिथे आले.
त्यांना हे कळताच त्यांच्या मनात भीती दाटून आली. तिथे पोहोचून त्या दोघी सुखरूप असल्याचं कळताच त्यांना समाधान वाटले. ते सगळ कसं झालं ह्या बद्दल त्यांनी त्या दोघांशी विचारपूस केली. तेव्हा त्या गरबा खेळून येत असताना त्यांची स्कुटी खडी वरून घसरली आणि त्यामुळेच त्या खाली पडल्याचं त्यांनी त्यांना सांगितले.
साक्षीच्या कपड्यांवर रक्त बघून ते सुरुवातीला घाबरले, पण हाताला झालेल्या जखमेतून येणारं रक्त कपड्यांना लागल्याचं तिने त्यांना सांगितलं.
शेवटी मुली सुरक्षित आहेत ह्यासाठी त्यांनी देवाचे आभार मानले. त्यांच्या आई बाबांना ते पटलं, पण विवेकला बहुतेक ती गोष्ट पटत नव्हती. कारण त्याला त्या दोघींच्या चेहऱ्यावर वेगळीच भीती दिसत होती. बाबा आत्ताच कामावरून आल्यामुळे विवेकने त्यांना आई सोबत घरी जायला सांगितले. त्या दोघींसोबत तो तिथे थांबणार असल्याचं त्याने त्यांना सांगितले. त्याच्या बोलण्याला होकार देत ते दोघे त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेले.
" साक्षी, आता मला खरं खरं सांग नक्की काय झालं? कशा पडलात तुम्ही दोघी? नक्की पडलाच की आणखीन काही झालंय?" आई बाबा निघून जाताच विवेक काहीसा गंभीर होऊनच त्याच्या बहिणीला प्रश्न विचारू लागला.
त्याचे प्रश्न ऐकून त्या दोघी भीतीने एकमेकींकडे पाहू लागल्या. विवेक त्यांच्याकडे एकटक पाहत त्यांच्या उत्तराची वाट बघत होता. साक्षीला तिच्या भावाची सवय चांगलीच माहीत होती. सत्य ऐकल्याशिवाय तो काही गप्पा बसणार नव्हता.
" दादा, हे खरं आहे की आम्ही स्कुटी वरून पडलो, पण ते खडीमुळे नाही तर काही विचित्र विकृत बुद्धीच्या वाईट वृत्तीच्या लोकांमुळे." विवेकाचे प्रश्न ऐकून साक्षी त्याला म्हणाली.
" कोण ती लोकं? आणि काय केलं त्यांनी?" साक्षीचं उत्तर ऐकून विवेक आणखीन गोंधळला. म्हणून त्याने पुन्हा तिला प्रश्न केले.
" दादा, झालं असं की आईला मी लवकर येणार आहे असं सांगून गेले होते, पण किती ही प्रयत्न केला तरी आम्हाला तिथून लवकर निघता आलं नाही. शेवटी मग तिथे कसं तरी आम्ही तिथून निघाललो. आधी मी तिला तिच्या घरी सोडून मग घरी येणार होते, पण जेव्हा आम्ही विजया नगर ह्या रस्त्यावर आलो, तेव्हा तिकडच्या एका रस्त्या शेजारी काही मुलं त्यांच्या गाडीवर बसून सिगारेट ओढत होते, त्यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. तिथे आजूबाजूला दूरदूर पर्यंत आणखीन कोणीच नव्हतं. समोर एक बिल्डिंग होती, तिथे पण रात्रीचे खाली कोणीच नव्हते.
आमची स्कुटी त्यांच्या समोरून जात असल्याचं त्यांना कळताच त्यांनी आम्हाला मोठ मोठ्याने आवाज देऊन थांबवलं. मला वाटलं काही काम असेल म्हणून थांबवलं असेल, पण ते तिघे मुलं होते ते आमच्या जवळ येऊन आमची छेड काढू लागले, आमच्याशी फालतू गोष्टी करू लागले. मी चालू स्कूटीला लगेचच रेस दिला आणि आम्ही तिथून निघालो, पण ते काही ऐकेना झाले. ते त्यांच्या दोन बाईक वरून आमचा पाठलाग करू लागले.
पाठलाग करता करता ते जास्त वेगाने आमच्या समोर येऊन थांबले. ते अचानक समोर आल्यामुळे माझा तोल गेला आणि आम्ही खाली पडलो. ते उतरून आमच्या जवळ येऊ लागले. आमच्या जवळ येऊन आमच्यावर हात टाकणार तोच पेट्रोलिंग पोलिसांची गाडी तिथून जाताना दिसली आम्ही दोघींनी त्यांना आवाज दिला. पण ते आमच्या इथे येई पर्यंत ते तिघे तिथून लगेच पळून गेले." साक्षीने सगळं सविस्तर विवेकला सांगितलं. तिचं ते बोलणं ऐकून विवेकने डोक्याला हात लावला.
"कोण होते ते हरामखोर? मी बघतोच त्यांना आणि मी तुला अशा प्रसंगासाठीच मागच्या रक्षाबंधनाला एक लहान चाकू सोबत ठेवायला दिला होता त्याचा तरी वापर करायचा ना." विवेक तिला म्हणाला.
" तेव्हा नाही सुचलं रे दादा, कोणी नव्हतं तिथे आम्ही अतिशय घाबरून गेलो होतो, काय करावं सुचलं नाही नशीब पोलिस तिथे वेळेवर आले आणि तू पण नको काही करुस उगाच आपल्याला त्रास देणार ते त्यांचा हा धंदाच आहे प्लीज." साक्षी विवेकला म्हणाली.
त्याने तिच्या बोलण्याला होकार दिला आणि त्यांना थोडा वेळ आराम करायला सांगून विकी सवयीप्रमाणे समोर फोन घेऊन कानात एअरफोन लावून आजच्या ठळक बातम्या बघू लागला.
" नमस्कार, फास्टेस्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार विजयानगर ह्या परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना तीन मुलं बेशुद्ध अवस्थेत पडलेले सापडले. मुख्य म्हणजे त्यांच्या अंगावर जागोजागी चाकूचे वार त्यांना आढळले त्यातल्या त्यात जास्त करून त्यांच्या तिघांच्याही प्रायव्हेट पार्टला जास्त प्रमाणात जखमा झालेल्या आहेत. चाकूने मांड्यांवर वार आणि अशा प्रकारचे बरेच वार त्यांच्या शरीरावर त्यांना दिसून आले. त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं.
तिथल्या आजूबाजूच्या लोकांशी चौकशी केल्यावर पोलिसांना कळलं की, ते तिघे गुंड वाईट प्रवृत्तीचे होते. ते तिथून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत होते, त्यांच्या सोबत वाईट गोष्टी करत होते, त्यामुळे तिकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे की, अशा राक्षसांना धडा शिकवायला नवरात्रीच्या दिवसात देवीने स्वतः येऊन त्यांना चांगलाच धडा शिकवला. ते वार देवानेच तिच्या हत्याराने त्यांच्यावर करून त्यांना जन्माची अद्दल घडवली त्यांचा संहार केला आणि त्या सर्व लोकांनी मनापासून देवीचे आभार मानले."
फोन मध्ये ती बातमी ऐकून विवेक थक्क झाला.
फोन मध्ये ती बातमी ऐकून विवेक थक्क झाला.
" साक्षी, मी तुला दिलेला तो चाकू कुठे आहे गं?" विवेकने विचारले.
" काय माहित रे दादा, बहुतेक आम्ही जिथे पडलो तिथे माझ्या बॅगमधून बाहेर रस्त्यावर पडला असावा." इतकं बोलून ती त्याच्याकडे बघत स्मित करू लागली.
समाप्त.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा