सांज वेडी भागली....(शेवटचा भाग)

All Happily Ever
निलांजना रागातच जाऊन स्पृहाला आपल्या कुशीत घेतले आणि अरिंजयला बोलली, "तू समजतोस काय स्वतःला? मी तुला टाळतेय म्हणून तू आज माझ्या मुलीला इजा पोचवलीस. जेव्हा पहावं तेव्हा मला स्पृहाचा बाबा व्हायचं आहे म्हणून माझी मागणी घालत होतास आणि आज तुझ्यामुळे माझ्या बाळाला लागलं आहे. तुला काय वाटतं की वेगवेगळे गिफ्ट देऊन बाबा होता येतं..? तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्यापासून आणि माझ्या मुलीपासून दूर रहा. तू  तिला कधीही  भेटायचे नाही. तुझा माझ्या स्पृहावर काहीही हक्क नाहीये."

    तिचे शेवटचे वाक्य ऐकून अरिंजयची आई पटकन खुर्चीवरून उठली आणि तिच्यापाशी येऊन बोलली, "काय बोललीस गं तू ? माझ्या अरिंजयचा तुझ्यापेक्षा जास्त हक्क आहे स्पृहावर. आजवर तो गप्प बसून होता पण..."

    "आई जाऊ दे तो विषय.. आपण थांबवू हा विषय. निलांजना मी नाही येणार तुमच्यात." अरिंजय डोळ्यातील पाणी अडवत बोलला.

   "नाही अरिंजय मी तुला रोज दुःखात बघू शकत नाही. एकदाचा काय सोक्षमोक्ष लावू दे मला." असे बोलून त्या आतल्या खोलीत जाऊन काही कागदपत्र आणि एक फोटोफ्रेम घेऊन आल्या. स्पृहाला सावरत तिने पेपर वाचायला सुरुवात केली तोच तिच्या पायातले त्राणच निघून गेले. ती तशीच मटकन खुर्चीवर बसली. तिच्या वहिनीने स्पृहाला स्वतःकडे घेतले. ती वारंवार ते पेपर्स आणि फोटो पाहून अरिंजय आणि त्याच्या आईकडे आळीपाळीने पाहत होती.

  "ताराकाकू हे नेमकं काय आहे ? मला काहीच कळत नाहीये.  जे काही लक्षात येत आहे ते पण अर्धवटच आहे. अरिंजय तू तरी सांग हे काय आहे.?" निलांजना आर्जवाच्या सुरात बोलली.

   "आजपासून पाच वर्षांपूर्वी माझ्या अरिंजयचा पण खूप छान संसार फुलला होता. त्याची बायको आर्या आणि आणि ही आमची गोड चिमणी. हुबेहुब अरिंजयची कार्बन काॅपी.. तिचं पण नाव स्पृहा होतं.  त्या दिवशी खूप जास्त पाऊस होता. हे तिघेही थिएटरला गेले होते, लहान मुलांसाठी पिक्चर लावला होता तो पहायला. दुसरीकडे तू नवर्‍याचे पितळ उघडे पडले म्हणून तू रात्रीची तुझ्या स्पृहाला घेऊन गाडीने येत होती. तेव्हा एका मोठ्या मालवाहू ट्रकने तुम्हा दोघांच्या गाडीला धडक दिली होती. तू स्पृहा, आर्या आणि आमची चिमणी चौघींना गंभीर दुखापत झाली होती. तुम्हाला दवाखान्यात  पोचवले होते. आर्याने तर तत्क्षणी जीव सोडला आणि चिमणी ब्रेन डेड झाली होती. नावाला श्वास सुरू होते. तू बेशुद्ध होतीस आणि स्पृहाच्या हृदयाला धक्का बसला होता वाटते. मला ते नीट कळत नाही. तिला दुसर्‍या हृदयाची गरज होती. तेव्हा माझ्या अरिंजयने स्वतःच्या बाळाचे अस्तित्व रहावे म्हणून स्पृहाला तिचे हृदय दिले. त्यानंतर तू याच सोसायटीत रहायला आलीस. तो वारंवार स्पृहाला दुरूनच पाहत असायचा. जेव्हा तो स्पृहाला पहायचा त्याला आमची चिमणी सोबत आहे असेच वाटायचे. त्याकरता त्याने  हाय कोर्टात चांगली प्रॅक्टिस असुनही त्याने ते कोर्ट सोडून district कोर्टात प्रॅक्टिस करू लागला. हळूहळू त्याने चिमणी आता अस्तित्वात नाही हे स्वीकारले होते पण त्याच्यातल्या बापाचे मन हिच्यासाठी कळवळू लागले. मान्य आहे तो तुझ्यात पण गुंतला, पण त्याने स्पृहाला लेकीच्याच जागी ठेवून प्रेम केले. अगं तो तुझ्यासकट तिचा स्वीकार करत होता ना. तरी तू त्याला असे बोललीस. हे बघ अरिंजयशी लग्न करायचे नसेल तर नको करूस पण स्पृहापासून त्याला दूर करू नकोस. " अरिंजयची आई बोलल्या.

   इकडे अरिंजय डोळ्यातील अश्रू पुसत त्याच्या खोलीत निघून गेला आणि त्याच्या साईड टेबलवरील फ्रेम हातात घेऊन हताश होउन बसला होता. निलांजना आज पहिल्यांदाच त्याच्या खोलीत आली होती. तिच्या कडेवर स्पृहा झोपेतून नुकतीच उठली होती पण जखमेमुळे जरा चुळबूळ करत होती.

"अरिंजय स्पृहाला जरा  त्रास होतोय." निलांजना बोलली.

अरिंजय तसाच हातातील फ्रेम गादीवर ठेवत ताडकन उभा राहीला आणि बोलला, "काय झालं माझ्या बाळाला ? दवाखान्यात न्यायचे आहे का ? थांब मी गाडी काढतो."  आणि तो खोलीबाहेर जाऊ लागला तोच निलांजनाने त्याला अडवले.

  "स्पृहाला तिच्या बाबांकडे जायचे आहे. तिच्या अरिंजय बाबांकडे. घे.. सांभाळ तुझ्या लेकीला...माझ्या लेकीच्या बाबा तिला लहानाचं मोठं करायला मला आयुष्यभर साथ देशील ना? " असे बोलून तिने स्पृहाला त्याच्या ताब्यात दिले.

त्याने मानेने होकार दिला आणि त्याच्या  डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. त्याने त्याच्या लेकीला एका कडेवर घेतले आणि एका बाजूने त्याच्या भावी सहचारिणीला मिठीत घेतले.

  "आई तो बघ सनसेट. बाबा तू पण बघ.सूर्योबा त्याच्या घरी चालला." स्पृहा कुतूहलाने बोलली.

"करेक्ट सूर्योबा त्याच्या घरी चालला जसं माझं पिल्लू त्याचा घरात आहे." असे बोलून त्याने लेकीच्या माथ्यावर ओठ टेकवले.

इकडे अरिंजयच्या आईने सवयीने सायंकाळी रेडीओ लावला तर रेडिओवर गाणे सुरू होते.....

मारवा ही संपला
अन सांज वेडी भागली...
सोबती तव राहण्याची
आस वेडी लागली...

समाप्त
~ऋचा निलिमा

( ह्या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. जर कुणीही कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. )
 




🎭 Series Post

View all