(‘संमोहिता- सुडचक्राचे नवे वलय’ ही कथा मोहिनी या कथेचे अंतिम पर्व आहे. मानवी मोहामुळे मोहिनींचा मानवी जगाशी संबंध आला. आता त्यांच्या तीन पिढ्या मानवांशी जोडल्या गेल्या आहेत. यात राजसिंहासनासाठी अनेकजण एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहेत. मोहिनींना एका भयाण सुडचक्राला तोंड द्यावे लागणार आहे. संमोहिता कथा समजण्यासाठी कृपया मोहिनींचे पहिले पर्व वाचावे.)
___________________________________
प्रचंड शांतता पसरलेली असतानाच त्या वृक्षाचं एक पान तलावात पडलं. अतिशय शांतता असल्याने तितक्याशा आवाजाने अरुंधतीची तंद्री तुटली होती. विचलित मनानेच अरुंधती तिथून उठली. तिला आपल्या मागे कोणीतरी असल्याचे जाणवले. तिने मागे वळून पाहिले. मागे अलकनंदा चिंतातुर चेहऱ्याने उभी होती.
“काय झाले अरुंधती? एवढी कोणत्या विचारांत व्यस्त होतीस?”
“काही नाही. राज्ञीनी फक्त आपल्या खांद्यांवर जबाबदारी देऊन जाणे योग्य नव्हते, असे वाटत आहे.”
“राज्ञींचा निर्णय चुकीचा ठरणे अशक्य आहे, अरुंधती. त्यांना कदाचित खात्री असावी, की युवराज्ञी आपल्या कर्तव्यात चुकणार नाहीत.”
“युवराज्ञी आपल्या कर्तव्याला चुकल्याच आहेत, अलकनंदा. त्या जे कंकण आणायला गेल्या होत्या, ते कंकण मायावी शक्तीने हस्तगत केले आहे आणि आपल्या अस्तित्वाची निशाणी असणारा शेलाही त्या सांभाळू शकल्या नाहीत.” अरुंधती खिन्न मनाने म्हणाली.
आपल्या मुलीला इतके महत्वाचे युवराज्ञीपद मिळूनही तिने केलेली चूक तिला मान्य नव्हती. कारण आपल्या मुलीच्या जीवाइतकाच लाखो मोहिनींचा जीव तिच्यासाठी महत्वाचा होता.
“माता.”
आदिरा तिथे आली होती.
“प्रणाम युवराज्ञी.”
अलकनंदा आणि अरुंधती तिला प्रणाम करत होत्या.
“माता, आम्ही आपली पुत्री म्हणून आपल्यापाशी आलो आहोत. आम्हांला कृपा करून सांगा, की मोहिनींना आणि स्वतःला वाचविण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नाही का?”
“आदिरा, आपले रक्षण करण्यासाठी कितीतरी पर्याय शोधता आले असते; परंतु आपल्या आयुष्यातील कोणतीही निशाणी आपण मानवी जगात सोडून येऊ शकत नाही. तो शेला जर कोणत्या दुष्ट प्रवृत्तीच्या हाती लागला, तर तीही तुम्हांला वनाबाहेर जाण्यास भाग पाडू शकते.” अलकनंदा गंभीरपणे म्हणाली.
“परंतु, आम्ही अजाणतेपणी ते केले. कदाचित आम्ही वेगाने पळ काढला नसता, तर आम्ही आज आपणासमोर नसतो.”
“मला कळले नाही आपणाला काय म्हणायचे आहे.”
“आदिराला काही काळापासून एक अदृश्य शक्तीच्या वावराचा आभास होत आहे आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही, की तिचे अस्तित्व इतर कोणालाही जाणवत नाही. अगदी मलाही नाही.” अरुंधती गंभीरपणे म्हणाली.
“आपण याआधी मला कल्पना का दिली नाहीत? कदाचित मला हे ज्ञात असते, तर कंकण आणायला मी स्वतः आले असते. असो, आपण मला तिचे वर्णन सांगू शकाल का युवराज्ञी?” अलकनंदाने आदिराला विचारले.
“आम्हीही तिला पाहिले नाही. मात्र सतत तिचे डोळे आमच्यावर रोखलेले आहेत. आमच्या बुद्धीवर ती सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे अथवा वाऱ्याच्या वेगाने ती आमचा पाठलाग करीत आहे असा आभास होतो.”
“आदिरा, तू युवराज्ञी आहेस; परंतु एक परिपूर्ण मोहिनी नाहीस. मोहिनींच्या राज्ञीखेरीज प्रत्येकाजण संमोहित होऊ शकतो. तूही याला अपवाद नाहीस. कदाचित मायावी शक्ती संमोहन जाणत असेल, तर आपणासाठी हा संघर्ष कठीण प्रस्थापित होऊ शकतो.”
“युवराज्ञी, अरुंधती अगदी सत्य कथन करीत आहेत. मला तर एकच पर्याय दिसतोय. उद्या रात्री आपण मोहिनींच्या साम्राज्याचे गूढ विशद असणाऱ्या आपल्या ग्रंथात राज्ञीचा काही संकेत उमटला आहे का पाहू. कारण प्रबळ संकट असेल, तर त्या संकेत दिल्याशिवाय राहणार नाहीत. उद्या रात्री आपण सर्व पुन्हा इथेच एकत्र येऊ.” अलकनंदाने उपाय सुचवला होता.
“उचित आहे. आपणाला मान्य आहे का, युवराज्ञी?" अरुंधतीने विचारले.
“हो, आमची अनुमती आहे.”
अलकनंदा व अरुंधती सर्वांना संदेश देण्यासाठी तिथून रवाना झाल्या. आदिरा मात्र विचलित मनाने दूरवर कोठेतरी पाहत होती.
“स....स्स....sssssss ”
आदिराने चमकून मागे पाहिले. आपल्याजवळून एक वाऱ्याची झुळूक गेल्याचा तिला आभास झाला. कोण असावे याचा विचार करण्याचा प्रयत्न ती करू लागली. मात्र मनात असूनही त्याबद्दलचा विचार तिला करता येत नव्हता. ती जी कोणी होती, ती आदिराच्या मेंदूवर अधिपत्य प्रस्थापित करू पाहत होती. ती आदिराला विचार करूच देत नव्हती. शेवटी कंटाळून आदिरा तिथून निघून गेली.
___________________________________
वाऱ्याची झुळूक दूरवर येऊन एका पठारावरील गुहेपाशी थांबली होती. ती झुळूक नसून क्षणांत वाऱ्याच्या रूपात स्वतःला बदलू शकणारी नवयौवना होती. दूरवरील त्या जंगलातून ती आता जे ऐकून आली होती त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले होते. संथ पावले टाकत तिने गुहेमध्ये प्रवेश केला. ती गुहा नसून दुसऱ्या जगात जाणारा मार्ग होता जणू! तिने गुहेच्या दुसऱ्या मुखातून बाहेर प्रवेश केला. ते एक सुंदर जग होते. सर्वत्र हिरवळ पसरलेली होती. मोहिनींच्या वनासारखे वसलेले ते एक सुंदर वन होते. वनाची सीमा थेट सागरापर्यंत जाऊन संपत होती. तिच्या प्रवेशाची चाहूल लागताच वनाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कार्यात व्यस्त असणाऱ्या तिच्या साथीदार तिच्यासमोर आल्या. सर्वजणी तिच्याकडे कुतूहलाने पाहत होत्या. तिच्याकडून काहीतरी कळणार, हे तर नक्की होती. तिने त्या सर्वांकडे पाहून स्मितहास्य केले. तिच्या हास्याबरोबर तिचे विलक्षण सुंदर नेत्र प्रचंड तेजाने चमकले.
“हो. आम्ही वायुरूपात जाऊन आलो आहोत त्या मोहिनींच्या साम्राज्यात. आम्ही त्यांच्यासाठी अज्ञात आहोत. त्या आमच्याबद्दल काहीही जाणत नाहीत. त्या
आम्हांला एक अदृश्य मायावी शक्ती समजतात. आम्हांला तर त्यांची दया आली. कोण समजावणार त्यांना, की आम्ही मायावी नाही अतिमायावी आहोत? आमच्या विद्यांना या जगात तोड नाही. आम्ही या विश्वाची अनभिषिक्त सम्राज्ञी आहोत.”
आम्हांला एक अदृश्य मायावी शक्ती समजतात. आम्हांला तर त्यांची दया आली. कोण समजावणार त्यांना, की आम्ही मायावी नाही अतिमायावी आहोत? आमच्या विद्यांना या जगात तोड नाही. आम्ही या विश्वाची अनभिषिक्त सम्राज्ञी आहोत.”
सर्वांनीच अत्यानंदाने माना डोलावल्या.
“मात्र हो. त्या सतत कोण्या राज्ञीचे नाव घेऊन आदिराला युवराज्ञी म्हणत होत्या. त्या राज्ञी कोण आहेत, त्यांची शक्ती काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. त्या ज्या कोणाला राज्ञी म्हणत होत्या, ती व्यक्ती अस्तित्वात आहे का हे कळणे आवश्यक आहे. आम्हांला उद्या रात्री सर्व जाणून घ्यायला तिथे जावेच लागेल. आमच्या शक्ती तिथे गेल्यावर लुप्त होतात. आम्ही त्यांच्यापैकी कोणावर वार करू शकत नाही आणि ना ही आम्ही आमच्या मूलरूपात तिथे प्रवेश करू शकतो. मात्र वायुरूपात आजप्रमाणे तिथे प्रवेश करणे अशक्य प्रतीत होत नाही.”
स्वतःशीच हसत तिने त्या सर्वांना आश्वस्त केले. त्या ही तिच्या अफाट शक्तींची कल्पना असल्याने आनंदित होत आपल्या कामांमध्ये व्यस्त झाल्या. तीही आपल्या शयनकक्षाकडे निघून गेली. शयनकक्षातून त्या सर्वांना अज्ञात असणारा एक मार्ग उघडत तिने प्रस्थान केले.
_______________________
क्रमशः.
क्रमशः.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा