Login

संमोहिता (मोहिनी पर्व २) भाग ३

कथा रहस्यमयी दुर्धरवनाची!
          शरीरातून काहीशी अंगाराची लहर सणसणत जावी, तसे खाडकन तिने डोळे उघडले. तिच्या निळ्याशार नेत्रांत नवीन अनामिक संकटाचा आभास उमटला होता. संकटाचा शोध घेणे तिच्यासाठी अवघड नव्हते. मात्र मोहिनींना आपण संकेत देण्यास गेलो, तर त्याचाच ती प्रतिवार म्हणून वापर करू शकते का ह्याचा शोध लावणे जास्त आवश्यक आहे हे तिला उमजले होते.

“एक नवे वलय.
सुडचक्र यावेळी शमणार नाही आणि यावेळेस मृत्यूचा अविरत तांडव घडला, तरी मी वनात प्रवेश करणार नाही. माझ्या सखी आणि इतर मोहिनी आत्मनिर्भर आहेत. तसेच माझे जीवितकार्य कधीच समाप्त झाले आहे. मी जीवित आहे ते केवळ मोहिनींना शेवटच्या क्षणी माझी गरज भासली, तर मी येईन असे वचन मी दिले आहे. हो. अंतिम क्षणी जर माझ्या अस्तित्वाची, माझ्या शक्तींची आवश्यकता भासली, तर मी उभी राहीन.
मात्र..
त्यांना त्यांचा लढा स्वतःच लढावा लागणार आहे.
कारण त्यांच्या जीवीतकार्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. यावेळेस मी कालचक्राला माझ्यासमोर झुकण्यास भाग पाडणार नाही. जाग्या व्हा.
सुडचक्र कधीच पेटले आहे."

________________

सकाळ झाली होती. भर उन्हाळ्यातसुद्धा मळभाचे वातावरण होते. अक्षरशः आळस आल्याने अनन्या अजूनही पलंगावरून उठायला तयार नव्हती. तिने बाजूला पाहिलं. कोणीही न दिसल्याने अभिषेक सकाळ सकाळीच मीटिंगसाठी गेला असणार, हे तिच्या लक्षात आलं. आता तर काही काळजीच नाही अशा प्रकारे ती पहुडली होती.

“आज रविवार असूनही ह्याला कसली मीटिंग आली कोण जाणे?”अनन्या झोपाळलेल्या स्वरात म्हणाली.

इतक्यात वस्तू पडल्याचा किंवा फेकून दिल्याचा आवाज तिच्या कानावर पडला. एवढी आदळआपट ऐकून ती दचकून उठली.

“अरे देवा! मी विसरलेच, की ही महाराणी पण घरात आहे.” अनन्या स्वतःशीच म्हणाली.

अनन्या जवळजवळ धावत बेडरूममधून बाहेर पडली. जिना चढत वरच्या मजल्यावर असणाऱ्या एका खोलीचा दरवाजा तिने उघडला. क्षणांत खाली वाकली नसती, तर फेकले गेलेले गजराचे घड्याळ तिच्याच डोक्यावर आदळले असते.

“अवि, काय करतेस तू? कितीदा सांगितलं आहे तुला, की रागात वस्तूंची नासधूस करू नकोस.” अनन्या रागीट स्वरात म्हणाली.

“तू काही बोलू नकोस, मम्मा. तुझ्याचमुळे होतंय हे सगळं. तो अतिशहाणा माझा सगळं सामान उपसून ठेवतो आणि तू त्याला काहीही बोलत नाहीस. आता मला माझी जर्नल मिळत नाही आहे. शोधून दे तूच.” अवंतिकाही तितक्याच रागीट स्वरात म्हणाली.

“मूर्ख मुली, जर्नल भेटत नाही म्हणून तू गजराचं घड्याळ, फुलदाणी हे सगळं तोडलंस?” अनन्या अवंतिकाच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली.

तिच्याकडे रागीट नजरेने पाहत अनन्या उभी राहिली. शेवटी काहीच पर्याय नाही हे लक्षात आल्याप्रमाणे, तिने जर्नल शोधायला सुरुवात केली. अनन्याला जर्नल शोधताना पाहून अवंतिका शांत होऊन पलंगावर बसली. तिच्या चेहऱ्यावर त्रासिकपणा स्पष्ट उमटला होता. भरपूर शोधाशोध केल्यावर अनन्याला कपाटाच्या खाली तिची जर्नल सापडली. भेटलेली जर्नल पलंगावर फेकत अनन्याने अवंतिकाकडे पाहिले.

“पुढच्या वेळेपासून तोडफोड न करता वस्तू शोधत जा आणि हा जो पसारा केला आहेस, तो लगेच आवर. आवराआवर करताना जर काही तोडलंस तर बघ.”

अनन्या फारच चिडली होती; पण अवंतिकाला त्याचा किंचितही फरक पडत नव्हता.

“मम्मा, परत ओंकार माझ्या खोलीत आला ना तर तू बघ. मी तुला सांगून ठेवतेय, मी त्याला बदडेन.” अवंतिका आपली नजर तीक्ष्ण करत म्हणाली.

अनन्या अवंतिकाकडे एक कटाक्ष टाकत अक्षरशः रागातच बाहेर पडली. स्वतःशीच पुटपुटत ती स्वयंपाकघरात आली.

“आजतर अभिला सांगितलंच पाहिजे. त्याचं मुलांकडे अजिबात लक्ष नाही. ही दोघे मिळून जीव घेतील माझा एक दिवस! किती ती भांडणं आणि काय? ह्या ओंकारलाही येऊच दे घरी. आज बघतेच दोघांना. एकतर आधीच बाहेरचं वातावरण खराब आहे, त्यामुळे मूड खराब आहे. त्यात ही महाराणी घरी असली, की मला जरा शांत बसू द्यायची नाही.” अनन्या स्वतःशीच पुटपुटत होती.

बडबडतच भाजी चिरत तिने स्वयंपाकाला सुरुवात केली.

अभिषेक–सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या एका नामांकित कंपनीचा मालक होता. कंपनीच्या अनेक ब्रॅंचेस आणि इतर कंपन्यांसोबत असणारे मेजर डील्स यामुळे सतत व्यस्त आयुष्य असणारा व्यक्ती होता; परंतु तितकाच मनमिळावू, हसतमुख व्यक्ती. शहराच्या मुख्य भागात त्याचा एक सुंदर बंगला होता. त्याची पत्नी अनन्या. अनन्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होती. त्यामुळे अजूनही अवास्तव खर्च, उगाचच काहीतरी खरेदी करणे किंवा हॉटेलमध्ये लंच/डिनर ह्याला तिचा सक्त विरोध असायचा. तिच्या समजूतदार स्वभावामुळे त्यांचा सुखी संसार होता. दर रविवारी अभिषेकचा पूर्ण दिवस घरी छोटी-छोटी काम करण्यात, मुलांसोबत आणि अनन्यासोबत गप्पा मारण्यात जात असे; पण आज काही कारणानिमित्त तो भल्या सकाळीच (सहाच्या सुमारास) बाहेर गेला होता. अनन्या आणि अभिषेकने लग्नानंतर दोन मुले दत्तक घेतली. स्वतःची मुले नाहीत ह्यामुळे स्वतःला दोष देणारी अनन्याही कालांतराने मुलांमध्ये रमून गेली. ओंकार— हा त्यांचा मोठा मुलगा. ओंकार शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला होता. त्याचा स्वभाव जितका गोड, तितकाच मस्तीखोर होता. बाहेर शांत आणि अभ्यासू वागणारा ओंकार, घरात तितकाच वात्रट आणि मस्तीखोर होता. ओंकारला सर्वात जास्त अवंतिकाला छळायला आवडायचे. अवंतिका– ही ओंकारची धाकटी बहीण होती. सख्खी बहीण नसूनही त्याचे अवंतिकावर फार प्रेम होते. दोन्हीही मुलांना घरात कधीही आपण दत्तक असल्याचे भासले नाही. अवंतिकाला तर सर्वजण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे.
अवंतिकाचा स्वभाव मात्र फार विचित्र होता. इतर वेळेस हसतमुख असणारी अवंतिका एखादी गोष्ट तिच्या मनाप्रमाणे न झाल्यावर रणरागिणीचे रूप धारण करायची. तिचा राग एका सीमेनंतर अफाट वाढत जायचा. रागात तिचा बऱ्याचदा स्वतःवरचा ताबा सुटायचा. ती कोणत्याही क्षणी कोणालाही हानी पोहोचवण्याइतकी भयानक वागायची. तिच्या अशा वागण्याची काळजी वाटल्याने अभिषेक आणि अनन्याने तिला अनेक डॉक्टर्सना, तज्ञांना दाखवले होते. मात्र तिच्या प्रखर स्वभावाचे कारण समजून घ्यायला ते सगळेच अपयशी ठरले होते. बऱ्याच वेळानंतर ओंकारने बंगल्यात प्रवेश केला. हातातली सॅक सोफ्यावर फेकत त्याने अनन्याला हाक मारली.

“मम्मा, जेवायला वाढ पटकन.”

“हो, तू फ्रेश होऊन ये. मी तोपर्यंत जेवायला वाढते."

             अनन्याच्या बोलण्यावर मान डोलवत ओंकार जिना चढून डावीकडे असणाऱ्या आपल्या खोलीत निघून गेला. काही वेळानंतर ओंकार डायनिंग टेबलजवळ आला. त्याला बसायला सांगून अनन्याने अवंतिकाला हाक मारली. जवळजवळ धावतच अवंतिका खाली आली व खुर्चीवर बसत तिने ओंकारकडे पाहून एक खुन्नस दिली.

“मम्मा, ही बघ माझ्याकडे कशी खुन्नसने पाहतेय. काय गं? तुला मोठ्या भावाशी कसं वागायचं हे शिकवायला हवंय का आता?” ओंकार मुद्दाम तिला डिवचत म्हणाला.

पुन्हा भांडण सुरू झालेलं पाहून अनन्याने नाराजीनेच खांदे उडवले व ती स्वयंपाकघरात निघून गेली.

“मोठा भाऊ आणि तू? हे बघ ओंकार, मी आज भांडायच्या मूडमध्ये नाही. मी तुला शेवटचा इशारा देतेय. परत माझ्या खोलीत जायचं नाही. नाहीतर...”

“नाहीतर काय, प्रिन्सेस?” शेजारील खुर्चीवर बसत नुकताच आलेला अभिषेक अवंतिकाकडे पाहू लागला.

“अदरवाईज आय विल हर्ट हिम, डॅड.” (नाहीतर... माझ्याकडून त्याला हानी पोहोचेल, डॅड.) अवंतिकाच्या डोळ्यांत आणि स्वरात प्रचंड राग होता.

“हेच चाललंय सकाळपासून, अभि. आय विल हर्ट हिम म्हणे. अवि, वागणं बोलणं सुधार जरा.” अनन्या कुकर डायनिंग टेबलवर आपटत म्हणाली.

अभिषेकने तिला डोळ्यांनीच शांत राहायचा इशारा केला. अनन्या अधिक भडकली असती, तर अवंतिकानेही ऐकून घेतलं नसतं. अवंतिकाला कोणीही आपल्यावर रागावलेलं अजिबात आवडायचं नाही.

“असं बोलणं चुकीचं आहे, अवि. काहीही झालं तरी तो तुझा मोठा भाऊ आहे. तू त्याचा आदर ठेवला पाहिजेस. राईट प्रिन्सेस?” अभिषेक काळजीने अवंतिकाकडे पाहत म्हणाला.

“हो डॅड. मीही तेच समजावत होतो.” ओंकार बत्तीशी दाखवत म्हणाला.

अवंतिका काही बोलणार इतक्यात जोरात वाहणाऱ्या वाऱ्याने खिडकीची दारं एकमेकांवर आदळली आणि अवंतिका अगदी लक्षपूर्वक बाहेरील आकाशाकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरील आणि नजरेतील बदल अभिषेक आणि अनन्याच्या नजरेतून सुटला नाही. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या अवंतिकाकडे पाहिल्यावर ओंकारलाही तिच्या नजरेतील बदल जाणवले. तिचे सगळे विश्व त्या आकाशात सामावले असावे अशा नजरेने ती बाहेर पाहत होती. तिची नजर काळ्या ढगांनी भरून आलेल्या त्या आकाशात एवढी गुंतली होती, की तिच्या पापण्याही लवत नव्हत्या. ती आपली नजर एक सेकंदही इकडेतिकडे हलवत नव्हती. ओंकारने न राहवून तिच्या खांद्याला हात लावला.

“अवि..अवि.. अगं लक्ष कुठे आहे तुझं?”

“अं.. न...नाही. सहज बाहेर पाहत होते.” अवंतिका पुन्हा नजर जेवणाकडे वळवत म्हणाली.

मात्र तिच्या चेहऱ्यावर खिन्नपणा आला होता. जणू त्या आकाशाला पाहण्यापासून तिला विलग व्हायचं नव्हतं. एरव्ही भांडणात न थकणारी अवंतिका काही क्षणांत शांत झाली होती. शांतपणे वाढलेलं जेवण जेवून ती आपल्या खोलीत निघून गेली.

“अभि, तू पाहिलंस का? हे पहिल्यांदाच नाही होत आहे.” अनन्याच्या बोलण्यातील काळजी वाढली होती.

“हो. तिच्या नजरेत आकाशासाठी प्रचंड प्रेम आहे.” अभिषेकही चिंतातुर होऊन म्हणाला.

तसे तर लहानपणापासून अवंतिकाला भरून आलेल्या आकाशाकडे पाहायला फार आवडायचं; पण आज तिचं आणि त्या आकाशाचं काहीतरी गहिरं नातं असल्यासारख्या भावना तिच्या चेहऱ्यावर होत्या आणि हे पहिल्यांदा होत नव्हतं. गेले काही महिने अवंतिकाच्या वागण्यात प्रचंड बदल होऊ लागला होता. अचानक खूप राग आणि अचानक एकदम गप्प होऊन जाणे असे काहीसे विचित्र ती वागू लागली होती आणि ही गोष्ट त्या तिघांच्याही नजरेतून सुटली नव्हती.

“आपण तिच्याशी बोललं पाहिजे, अभि.”

“हो. तिला थोडा आराम करू दे. संध्याकाळी बोलूच आपण.”

“ओम, काहीही झालं तरी तू तिला काही बोलू नकोस आणि मुळात तिच्या खोलीत शिरू नकोस.” अनन्या हात जोडत म्हणाली.

“सॉरी मम्मा. मी तर फक्त मस्ती करत होतो. मी यापुढे काळजी घेईन.” ओंकार समजूतदारपणे म्हणाला.

वातावरणातील ताण हलका करण्यासाठी ओंकारने मोबाईलवर छानसं गाणं लावलं; परंतु अनन्या मात्र संध्याकाळची वाट पाहत भलतीच अस्वस्थ झाली होती.
__________________________________
क्रमशः.
0

🎭 Series Post

View all