सूर्य अस्ताला जात होता. सर्वजणी तलावाकाठी जमू लागल्या होत्या. प्रचंड विस्तार असणाऱ्या वनात लाखो मोहिनी एकत्र आल्या होत्या. मावळणाऱ्या सूर्यानिशी वनातील अंधार दाट होत होता. अरुंधती अजूनही आपल्याच तंद्रीत होती. आदिराची चाहूल लागताच सर्वजणीनी हात जोडून तिला वंदन केले. आदिरा मागोमाग येत ताहिरानेसुद्धा तिचे आसन ग्रहण केले. दाटलेल्या शांततेचा भंग करत अलकनंदाने तिथे प्रवेश केला. तिच्या हातात तलम वस्त्रात गुंडाळलेला ग्रंथ होता. तिने तो ग्रंथ मध्यभागी एका खडकावर ठेवला व तलम कापडाची गाठ सोडून ती मागे झाली.
“युवराज्ञी, माझ्यामते हा आपणासमोरील शेवटचा पर्याय आहे.”
सर्वजणी उत्सुकतेने ग्रंथाकडे पाहू लागल्या. अपेक्षेप्रमाणे वन काळोखाच्या अधिराज्याखाली जाताच ग्रंथाची पाने आपोआप पालटू लागली होती.
“पुन्हा एकदा सुडचक्र.. सुडचक्राचे नवे वलय..”
ग्रंथातील रिकाम्या पानावर निळीशार अक्षरे उमटू लागली होती. म्हणजेच मधुरिमाने दिलेला संकेत ग्रंथाच्या पानांवर उमटत होता. अचानक ग्रंथावर उमटत असणारी ती अक्षरे अलकनंदा वाचत होती. तिने “वलय” पर्यंत वाचताच अचानक आदिरा ओरडली.
“थांबा. अलकनंदा, एकही शब्द पुढे वाचू नका.”
आदिरा त्वरित आसनावरून उठली व तिने तो ग्रंथ बंद केला. ग्रंथ अक्षरे उमटत असल्यावर अचानक बंद करणे घातक ठरणार होते. आता तो ग्रंथ पुन्हा मधुरिमाच्या इच्छेखेरीज किंवा तिच्या स्पर्शाखेरीज उघडणार नव्हता. तो ग्रंथ उघडता येईल इतकी ताकद तिथे इतर कोणत्याही मोहिनीत नव्हती. आदिराच्या या कृत्याने राज्ञी आपणापाशी पोहचवू पाहत असलेला संदेश लुप्त होऊन जाईल, हे जाणून असल्याने सर्वजणी तिच्याकडे एकटक पाहत होत्या. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलेले होते.
“युवराज्ञी अशाने रा..”
पद्मिनी राज्ञीचा उल्लेख करणार एवढ्यात आदिराने हातानेच तिला थांबवलं.
“एकही शब्द नाही, पद्मिनी. त्वरित आपापल्या स्थानी प्रस्थान करा. आम्हांला कोणाचेही काहीही ऐकून घेण्याची इच्छा नाही.” आदिरा कठोर स्वरात म्हणाली.
“परंतु...”
“निघा. लगेच.”
आदिरा अतिशय क्रोधित दिसत होती. आदिराच्या स्वरातील हुकूम पाहून सर्वजणी आपापल्या स्थानी परतू लागल्या. अलकनंदानेही ग्रंथ पूर्वव्रत व्यवस्थित बांधत प्रस्थान केले. ताहिराने आदिराला काही विचारण्यास पुढे पाऊल टाकले असता आदिराने तिच्याकडेही एक तीव्र कटाक्ष टाकला. त्या कटाक्षाबरोबर आपण इथून गेले पाहिजे हे लक्षात घेऊन ताहिरानेही प्रस्थान केले. एकच उसासा सोडत आदिरा पुन्हा आपल्या सिंहासनावर बसली.
“आम्ही एवढयाही मूढ नाही, की तू येथे आली आहेस हे आम्हांला उमजू नये. तुझ्या अस्तित्वाची जाणीव इतर कोणालाही होत नसेल, तरी आमच्यापासून तू सुप्त राहू शकणार नाहीस. आम्ही मोहिनींची राज्ञी तुला आदेश देतोय, की तू त्वरित आमच्यासमक्ष यावेस. अथवा...” आदिरा हुकुमी स्वरात बोलत होती.
“अथवा काय?”
त्याहून प्रचंड कठोर आणि हुकुमी आवाज घुमला. भयाण अंधारात तिचा आवाज वनात निनादू लागला होता. वनात विविध ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक मोहिनीला आज तिचा आवाज ऐकू येत होता. सर्वांनाच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी, असे जणू त्या नवयौवनेला वाटत होते. प्रचंड तीव्रता आणि हुकुमी ताकद असणारा तो स्वर होता.
“अथवा तू आम्हांला हानी पोहचवू शकशील असे वाटते का तुला? आणि हो. मूढच आहेस तू! तुम्ही अत्यंत सुरक्षित समजत असलेल्या तुमच्या या वनात एक यत्किंचित मानव अथवा मोहिनी सोडून इतर कोणीही प्रवेश करू शकत नसताना, आमचा प्रवेश होणे काही सामान्य नक्कीच नाही. हो ना? आमच्या अफाट ताकदीची तुला कल्पना नाही. मोहिनी खूपच सरळ, साध्या वाटत होत्या. तुम्ही साध्या नाही हे नक्की. आज जर तुला आमच्या अस्तित्वाची जाणीव झाली नसती, तर कदाचित तुझा मृत्यू उद्याच रेखला गेला असता. कारण एक गोष्ट मला नक्की उमजली आहे, की तुमची सर्वशक्तिमान ताकद तुमच्याजवळ नाही. परंतु...”
अचानक तिचा आवाज थांबला. यापुढच्या गोष्टी आदिराच्या कानावर घालणे आपल्याला घातक ठरू शकते, हे तिच्या लक्षात आले. कार्य साध्य झाल्याने तिने प्रस्थान केले. तिच्या पुढील आवाजाची आदिरा वाट पाहत होती. ती काहीतरी बोलताना अचानक थांबली, हे आदिराच्या नजरेतून सुटले नाही; परंतु ती आता इथे नाही याची जाणीव तिच्या ज्ञानेंद्रियांना झाल्यावर तिने सर्व मोहिनींना आवाहन केले. सर्वजणी तिच्यासमोर हजर झाल्या. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर प्रश्नाच्या जागी चिंता दिसत होती. कोणत्याही वाईट शक्तीला अडथळा निर्माण करू शकणाऱ्या त्यांच्या वनात इतक्या प्रबळ शक्तीचा प्रवेश वाटते तितकी साधी गोष्ट नव्हती. त्या शक्तीने निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे राज्ञी आपणाला संकेत देऊ शकणार नाहीत, ही गोष्टही त्या सर्वांना उमजली होती. आता केवळ उद्या प्रातःकाळची प्रतीक्षा होती.
कदाचित एक नवी सुरुवात...
एका नव्या सज्जतेने करणे आवश्यक बनले होते.
कदाचित एक नवी सुरुवात...
एका नव्या सज्जतेने करणे आवश्यक बनले होते.
______________________________________
दिवसभर घरातली छोटी-मोठी कामे साफसफाई आटपून अनन्या आणि अभिषेक सोफ्यावर बसले होते.
“अभि, मुलं कुठे गेली रे?” अनन्याने चेहऱ्यावरचा घाम पुसत विचारले.
“नाही माहित गं. मीही तुलाच मदत करत होतो ना? असतील खोलीत किंवा बागेत.”
“कधी कधी वाटतं घरात कामाला दोन-चार माणसं ठेवली असती, तर बरं झालं असतं.”
“मी सुचवलंच होतं ना? पण तुलाच कोणावर पटकन विश्वास ठेवता येत नाही.”अभिषेक हसत म्हणाला.
“हं.”
“काय झालं? तू खूप अस्वस्थ वाटतेयस अनु.” अभिषेक तिचा हात हातात घेत म्हणाला.
तिनेही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
“मला अवंतिकाची सारखी काळजी लागून राहते. स्वतःच्याच तंद्रीत असते ती कधी कधी आणि तिचं ते सारखं आकाशाकडे पाहत राहणं तर मला खूप खटकतं. तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड ओढ आणि अस्वस्थता जाणवते.”
इतक्यात वरच्या मजल्यावरून एका गाण्याचा आवाज आला.
“वरून गाण्यांचा आवाज येतोय म्हणजे दोघंही घरातच आहेत.”
“ओम आणि अवि दोघंही घरात असताना एवढी शांतता कशी काय? आपण वर जाऊन पाहूया.” अनन्या थोडीशी घाबरतच म्हणाली.
अभिषेक आणि अनन्या जिना चढून वर आले. अवंतिकाच्या खोलीला बाहेरून कडी लावलेली दिसत होती. दोघेही ओंकारच्या खोलीकडे वळले. हळूच दार लोटून त्यांनी आत पाहिलं. दोघेही आतील दृश्य अवाक होऊन पाहत होते. अशी काही घटना घरात पहिल्यांदाच घडत होती. अवंतिकाच्या डोक्याला मसाज करत ओंकार गाणं गुणगुणत होता. शेजारी मोबाईलवर गाणी लावलेली होती आणि अवंतिकाही ओंकारच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे पहुडली होती. त्या दोघांनाही अनन्या आणि अभिषेकच्या तिथे असण्याची जाणीवही नव्हती.
“अवि, जागी आहेस का तू?”
“हं. झोप लागत नाही.” अवंतिका डोळे उघडून त्याच्याकडे पाहत म्हणाली.
“एक विचारू तुला? तू चिडचिड करणार नसशील तर विचारेन.”
“ओमि, तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलास रे?” अवंतिका हसत म्हणाली.
“तू काय पाहत होतीस गं खिडकीतून बाहेर? एवढं एकटक पाहण्यासारखं काय होतं त्या आकाशात?” ओंकारने काहीशा चिंतातुर स्वरात विचारलं.
अवंतिकाने एक सुस्कारा सोडला.
“खरं सांगू ओमि, मला कितीतरी दिवस हे कोणालातरी सांगायचं होतं. तसे आपण शत्रू असलो, तरी आपण भावंडं आहोत. त्यामुळे मी तुला सांगू शकते ना?”
“नक्कीच.” ओंकार किंचित हसत म्हणाला.
काय पण उपमा होती. शत्रू!
“मला ना त्या आभाळातले ते काळे ढग आवडतात. काळाकुट्ट अंधार आणि भरून आलेलं आभाळ. किती मस्त ना रे! आजकाल तर याच अंधारात तासनतास बसून रहावं वाटतं. जणू त्या आकाशाशी माझं काही जुनं नातं आहे किंवा हा अंधार माझी ताकद आहे. मला नक्की माहित नाही, की ही भावना काय आहे; पण सूर्याच्या किरणांमध्ये बाहेर फिरण्यापेक्षा असं आभाळ भरून आलेलं असताना, प्रचंड वारा वाहत असताना, भल्या सायंकाळी किंवा दाट काळोख असणाऱ्या मध्यरात्री फिरावं असं मला वाटतं.”
ओंकारला तिच्या तोंडातून हे सर्व ऐकून धक्काच बसला होता. तिचा सूर, तिचा आवाज आणि तिचं उत्तर फारच वेगळं असल्याचं त्याला जाणवलं होतं. याबद्दल बोलताना तिच्या आवाजात प्रचंड बदल झाला होता. तो आवाज त्याला त्याच्या अविचा वाटतच नव्हता.
“ठीक आहे. झोप तू आता. नको जास्त विचार करुस.”
ओंकार कितीतरी वेळ तिला थोपटत होता. तो खूप घाबरलेला होता. कदाचित तो ही तिची उत्तरे विसरून जाण्याच्या प्रयत्नात होता; परंतु दाराबाहेरून ऐकणाऱ्या अभिषेक आणि अनन्याच्या चेहऱ्यावरील भाव मात्र बदलले होते. अनन्या अभिषेकचा हात धरून त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीत येऊन उभी होती.
“अभि, तिला कसलातरी भयंकर त्रास होत आहे. तिला आपल्याला सांगता येत नाहीए.”
“मला वाटतं तू बरोबर बोलत आहेस; पण नक्की काय होतंय तिला, हे मला नाही कळत आहे.”
“अभि, मला माहित आहे की तू भूत वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीस; पण मला तिची लक्षणं तशीच वाटत आहेत.”
“नाही, अनु. अविला काहीतरी मानसिक त्रास होत आहे आणि मला वाटतंय माझ्याकडे अजून एक उपाय आहे.”
“काय? कसला उपाय?”
“माझा क्लासमेट सुमित एक मानसोपचारतज्ञ आहे. आपण अविला आता एका मानसोपचार तज्ज्ञाकडेही दाखवलं पाहिजे. मला वाटतं आपण त्याची मदत घेऊ शकतो.”
“अभि, आकाशाबद्दलचं प्रेम ही मानसिक समस्येची गोष्ट नाही रे. हे माझ्या मनाला नाही पटत आहे.”
“मला माहित आहे; पण त्या निमित्ताने तिच्या शीघ्रकोपी स्वभावाबद्दलही त्याला सांगता येईल. अविचा स्वभाव प्रचंड रागीट बनत चालला आहे.”
“ठीक आहे. हेही करून पाहू.” अनन्या व्यथित होऊन म्हणाली.
तिला फक्त तिची अवंतिका बरी व्हायला हवी होती. मग कोणत्याही मार्गाने का असेना. अवंतिकाच्या उत्तराचा विचार करत ते दोघेही कितीतरी वेळ बाल्कनीत उभे होते.
__________________
क्रमशः.
क्रमशः.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा