प्रातःकाळ झाली होती. काही शक्तींचे चालू असलेले प्रयोग थांबवत ताहिरा वृक्षाखालून उठून उभी राहिली. आदिराची भेट घेण्याच्या उद्देशाने आदिरा राहत असलेल्या वृक्षाखाली ती जाण्यास निघाली. इतकी वर्षे होऊन आदिराला महालात प्रवेश मिळाला होता. मात्र कंकण हरवल्याने आपण मिळणाऱ्या मानसन्मानाला पात्र नसल्याचे सांगत, आदिरा पुनश्च एका वृक्षाखालीच निवास करीत होती.
“तू कोठे जात आहेस का?” ताहिराने कुठेतरी जात असलेल्या आदिराकडे पाहून विचारलं.
“हो, वनाच्या मध्यभागात जातेय. कदाचित मी न सांगूनही आपण सगळ्या परत एकत्र येणार हे मी जाणते.”
“मग आपण समवेतच जाऊया.”
ताहिरा आणि आदिरा जंगलाच्या मध्यभागी असणाऱ्या तलावाकाठी आल्या होत्या. आदिराच्या तर्कानुसार सर्वजणी तेथे जमून तिचीच प्रतीक्षा करत होत्या.
“युवराज्ञी, आपली आज्ञा असेल तर मी आपणाला एक उपाय सुचवू इच्छिते.”
“आम्ही आपल्या उपायाच्या प्रतीक्षेत होतो, अलकनंदा.” आदिराच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले.
“आपण सर्वांनी मिळून मोहिनींच्या संपूर्ण साम्राज्याभोवती प्रचंड शक्तीकवचाचे निर्माण करावे. जेणेकरून वनक्षेत्राच्या बाहेरील वायूचा कणदेखील आतमध्ये शिरकाव करू शकणार नाही.”
“परंतु अशाने वनातील प्राणीमात्रांना हानी तर पोहोचणार नाही ना?”
“नक्कीच नाही, ताहिरा. केवळ शक्तीबद्ध असल्याने बाहेरील सूक्ष्म कणही वनात प्रवेश करु शकणार नाही.”
आदिराची संमती मिळताच सर्वजणी प्रचंड शक्तीकवचाचे निर्माण करण्यासाठी वनाच्या विविध ठिकाणी रवाना झाल्या. आदिरा आणि ताहिराही वनाच्या मुख्य प्रवेशाच्या दिशेने रवाना झाल्या.
________________________________________
ती आपल्या वनातील एका फुलाला हातात घेऊन तिच्या साथीदारांसमोर स्तब्ध उभी होती. तिच्या साथीदारांना तिची अवस्था लक्षात येत होती. त्या सर्वजणी तिच्या बोलण्याची वाट पाहत होत्या.
“मोहिनींकडे काहीतरी गुप्त ताकद आहे खरी. आमच्याहीपेक्षा अफाट आणि अनंत ताकद असणारे काहीतरी गुपित आहे; परंतु आज त्या आदिराला आमच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याने आमचे लक्ष्य दूरच राहिले. हे कंकण नक्की कोणाच्या हातातील असावे?”
ती आपल्या हातात असणारे मोहिनींच्या राज्ञीचे कंकण निरखत होती.
“आदिराच्या हातातील हे कंकण असते, तर एवढ्या जीवानिशी तिने ह्या कंकणाला वाचविण्याचा प्रयत्न केला नसता. असे काही असावे का त्या मोहिनींकडे, जे आमच्या ताकदीला शह देऊ शकेल?”
ती स्वतःशीच विचार करत म्हणाली.
///परंतु आपली ताकद तर अफाट आहे.///
“सत्य; परंतु त्या सतत आदिराचा उल्लेख युवराज्ञी म्हणून करत होत्या. म्हणजे कोणीतरी नक्कीच आहे, जी त्यांची राज्ञी आहे. तिच्या अस्तित्वामुळे त्या निर्धास्त आहेत.”
तिने अगदी योग्य तर्क लावला होता.
/// तशी कोणी असती तर आपणाला आतापर्यंत उमजल्याशिवाय राहिले नसते.///
“हो. कदाचित आदिराला जाणवले असावे, की त्या व्यक्तीचे नाव समक्ष येणे मोहिनींसाठी घातक ठरू शकते. म्हणूनच तिने काल सर्व मोहिनींना मूकपणे प्रस्थान करण्याचा आदेश दिला. आमच्यापासून कितीही काही लपवू पाहाल, तरीही आम्ही जिंकल्याशिवाय रहाणार नाही. मोहिनींचे ते विशाल साम्राज्य आणि हे महान शक्ती असणारे राजसिंहासन केवळ आमचे आहे.”
तिच्या हातातील फुले चुरगळुन बाजूला फेकून देत तिने आपल्या शयनकक्षाच्या दिशेने प्रस्थान केले. शक्तीकवचाच्या निर्माणामुळे तिच्या येण्याला काही काळ तरी प्रतिबंध उत्पन्न होऊ शकतो याची मोहिनींना खात्री होती. मात्र तिच्या शक्तींचा अंदाज नसल्याने तिच्यावर वार करणे किंवा रणनीती आखणे सध्यातरी योग्य नव्हते. तिच्या अस्तित्वामुळे मधुरिमा त्यांच्यापर्यंत पोहचवू पाहत असलेला संदेशही वाचत आला नव्हता. एकदा मिटलेला तो ग्रंथ पुन्हा राज्ञीच्या इच्छेखेरीज उघडणार नव्हता. मधुरिमाचे जीवितकार्य कधीच समाप्त झाले होते. मात्र मोहिनींच्यापैकी कोणाच्यातही शक्तींचे परिपूर्णत्व नसल्याने ती चिरंजीवी रूपाने साम्राज्य रक्षणासाठी जिवंत होती. आजही ती वेळ पडल्यास साम्राज्य रक्षणाकरिता परतली असती; परंतु कोणत्याही मोहिनीचे रक्षण करणे तिच्या हातात नव्हते. स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच लढणे प्रत्येकीला भाग होते. पुन्हा एकदा मोहिनींच्या संमोहित साम्राज्याचा मानवी जगाशी संबंध जोडला गेला होता आणि संकटे... ती मात्र अजूनही सर्वांच्या जाणीवेपासून दूर होती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दुपारी अडीचच्या सुमाराला सुमित अभिषेकच्या ऑफिसमध्ये आला होता. दारावर नॉक करत त्याने अभिषेकला आत येण्याबाबत विचारलं.
“हं. ये ना सुमित. तुझीच वाट पाहत होतो.”
“या.”
सुमितसोबत एक त्याच्याच वयाची तरुणी आणि अवंतिकाच्या वयाचीच एक मुलगी केबिनमध्ये आली.
“सॉरी अभि. अरे तुझ्या घरी आपण संध्याकाळी जाणार. त्यानंतर परतायला किती उशीर होईल सांगता येत नाही. म्हणून संध्या (पत्नी) आणि आराध्या (मुलगी) सुद्धा माझ्यासोबत आल्या आहेत.”
“अरे असुदे.” (संध्या आणि आराध्याकडे पाहत) “बसा ना तुम्हीही.”
सर्वांसाठी कॉफी ऑर्डर करून अभिषेकने बोलायला सुरुवात केली.
“तर सुमित मला तुझ्याशी अविबद्दल बोलायचं होतं. तू अविला पाहिलंच आहेस. अविचा राग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कधीकधी तिच्या रागाची मला आणि अनन्याला फार भीती वाटू लागते. आकाशात काळे ढग दाटले ना, की ती डोळ्यांची पापणीही न लवता बाहेर पाहत बसते.”
“ही तुला सायकॉलॉजीकल केस का वाटली, अभि?” सुमितने विचारलं.
“म्हणजे तुझ्यामते ही सायकॉलॉजीकल केस नाही आहे का?” अभिषेक घाबरून म्हणाला.
“घाबरू नकोस. अगदी तसं नाही; पण अवंतिकासोबत बोलून घेणं फार गरजेचं वाटतंय. कदाचित काहीतरी वेगळं असं जे आपल्याला कळत नाही; पण तिला जाणवतंय.”
“सुमित, तूही भूत वगैरे असं काही सांगण्याच्या प्रयत्न करत आहेस का?”
“नाही अभि; पण अशा काही पॅरानॉर्मल (अलौकिक) गोष्टी आहेत ज्या आपल्या समजेच्या बाहेर आहेत. अशा गोष्टींशी संबंध असणाऱ्या व्यक्तींनाच फक्त त्या गोष्टींच्या अस्तित्वाची जाणीव होते. इतरांना आभासही न होता.”
“खरं आहे, अभिषेक दादा. खरंतर तुम्ही अवंतिकाबद्दल जी लक्षणं सांगितली आहेत ना, अशीच लक्षणं माझ्या एका मैत्रिणीच्या तोंडून मी ऐकली होती. तिच्या शेजारी राहणाऱ्यांसोबत असंच काहीसं झालं होतं.” संध्या चिंतीत होऊन म्हणाली.
“असं म्हणजे काय झालं होतं?” अनन्या दार उघडून आत येत म्हणाली.
अनन्याच्या अचानक येण्याने सर्वजण दचकले. आज दुपारी सुमित ऑफिसमध्ये येणार आहे हे माहित असल्याने, अनन्याला राहवलं नाही. ती अभिषेकच्या ऑफिसमध्ये आली होती आणि केबिनच्या दार उघडत असताना संध्या सांगत असलेली गोष्ट तिच्या कानावर पडली. अनन्या येऊन संध्याच्या बाजूला बसली आणि तिच्याकडे उत्सुकतेने पाहू लागली.
“आरु बेटा, तू थोडा वेळ बाहेर बसतेस का? थोडं ऑफिस बघ फिरून कसं वाटतं.”
“हो मॉम.”
आराध्या बाहेर निघून गेली; पण तिच्याही लक्षात आलं की आपण ऐकू नये म्हणून संध्याने आपल्याला बाहेर जायला सांगितले.
“माझ्या मैत्रिणीचं कुटुंब शहराबाहेर कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी राहतं. त्यांच्याशेजारी प्रसिद्ध व्यापारी कुटुंब राहायचं. विक्रमदेव राठोड म्हणून व्यापारी होते. त्यांच्या कुटुंबातील बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला; मात्र कारण कळू शकलं नाही. शेवटी त्या घरात त्यांचे दोन मुलगे, मोठी सून, धाकटी सून आणि त्यांच्या दोन मुली एवढेचजण वाचलेले. त्यांच्या मुलींनाही असेच भास व्हायला सुरूवात झाली होती. सतत आकाशाकडे पाहत राहणं किंवा आपल्यामध्ये काही सुपरपॉवर्स आहेत असं वाटणं. काही दिवसानंतर ते पूर्ण कुटुंब तिथून गायब झालं m. ते सर्वजण कुठे गेले, जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला? हे कोणालाच माहित नाही; पण त्यांचा बंगला मात्र कायमचा बंद झाला.”
“काहीतरीच काय संध्या? अशा दंतकथांवर विश्वास ठेवत जाऊ नकोस. पॅरानॉर्मल गोष्टी असतात यावर तर माझाही विश्वास आहे; पण हे सारासार खोटं वाटतंय.” सुमित वैतागत म्हणाला.
“माझी मैत्रीण आणि तिचं कुटुंब अजूनही तिथे राहतात सुमित. माझी मैत्रीण तर ह्या गोष्टींवर विश्वासही ठेवत नव्हती; पण तिने हे प्रत्यक्ष घडताना पाहिलं आहे.”
“आपण हा विषय थांबवूया. आधी आज तुम्ही आमच्या घरी या. अविची अवस्था बघून मग आपण चर्चा करू, की पुढे काय करायचं आहे.”
सर्वांनी माना डोलावल्या. अभिषेकला अवंतिकाचा बदलणारा स्वभाव सायकॉलॉजीकल केस वाटत होती, तर अनन्या आणि संध्या मात्र अजूनही राठोड कुटुंबाच्या विचारातच गुंतल्या होत्या. सुमितला मात्र जाणवलं होतं, की राग किंवा चिडचिडेपणा इथपर्यंत ठीक आहे. आकाशाबद्दल असं प्रेम, गूढ बोलत राहणं ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे.
____________________
क्रमशः.
क्रमशः.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा