Login

संमोहिता (मोहिनी पर्व २) भाग १

कथा रहस्यमयी दूर्धरवनाची!
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. त्याचा वास्तवाशी, कोणत्या व्यक्ती अथवा स्थळाशी काहीही संबंध नाही. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. कथा केवळ मनोरंजनात्मक उद्देशाने लिहिण्यात आलेली आहे.

हे कथेचे दुसरे पर्व आहे. पहिले पर्व - मोहिनी अदृश्य संमोहित साम्राज्य

___________________________________

किर्रर्र काळोख दाटलेला होता. वातावरण भयाण शांत भासत होते. पानांची सळसळ ऐकू येत होती. झाडावरून जमिनीवर पडणाऱ्या पानांचाही मोठा आवाज यावा इतकी शांतता होती. अधूनमधून वन्य पशूंचे आवाज ऐकू येत होते. वन्य पशूंचे आवाज त्या जंगलात नवीन नसले, तरी आज ते अतिभयाण भासत होते. वाराही आज काहीसा वेगानेच वाहत होता. तलावाकाठी असणारा तो वृक्ष मात्र स्तब्ध झाला होता. तलावातील पाणी निश्चल होते. इतक्यात जंगलात पावलांचा आवाज घुमू लागला होता. सुकलेल्या पानांवर तिची पडणारी पावले आणि त्याचा ध्वनी मन विचलित करू पाहत होता. जीव मुठीत धरून ती धावत होती. पाहणाऱ्याला लक्षात आले नसते, की ती का धावत आहे. तिच्या मागे कोणीच दिसत नव्हते. आपली वस्त्रे सांभाळत कशीबशी ती धावत होती. तिचा शेला कधीच मागे पडला होता; परंतु तिला भान नव्हते. बेफाम वेगाने धावत तिने सीमेवर पाऊल ठेवले आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. कसलेही भान न राहता ती जमिनीवरच बसली. तिची पावले रक्ताळलेली होती. घामाच्या धारा वाहत होत्या. तिचे मोहक नेत्र अनामिक भीतीने भरून आले होते. तिने आजूबाजूला पाहिले. आपण सुरक्षित असल्याची खात्री पटल्यावर ती शांतपणे उठून उभी राहिली आणि हळूहळू चालत तलावाजवळ आली. तलावाकाठच्या वृक्षाला हात टेकवून ती श्वास मूळस्थितीवर यायची वाट पाहत स्तब्ध उभी राहिली. तलावाच्या पाण्याकडे ती एकटक पाहत होती. इतक्यात तिच्या खांद्याला कोणीतरी पाठीमागून स्पर्श केला आणि तिने दचकून मागे पाहिले.

“काय झाले? इतक्या भयभीत का भासत आहात?”

“त...ते... आम्ही मृत्यूच्या मुखातून परतत आहोत. जवळजवळ प्राण कंठाशी आले होते.”

“ते कंकण घेऊन आलात का?”

“हो. शेल्यात घट्ट बांधून ठेवले होते. त्यामुळे सुरक्षित राहिले आहे.”

“शेल्यात? परंतु तुमच्याजवळ तुमचा शेला कोठे आहे?”

           तिच्या चेहऱ्यावर भय पसरले. पूर्वस्थितीत आलेल्या तिच्या श्वासाची गती पुन्हा वाढली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली होती.

“त...ते...शेला बहुदा धावताना मार्गातच कोठेतरी पडला असावा.”

“अनर्थ. ज्यासाठी सीमा पार करण्याचा उपद्व्याप केला, तेच कारण साध्य झाले नाही.”

“आता काय होईल? मोहिनींना आम्ही वाचवू शकलो नाही तर...”

“तर आपले भविष्य, आपले वर्तमान आणि आपले जीवन उध्वस्त होऊन जाईल.”

“आमच्या हातून एवढा मोठा प्रमाद घडला आहे. आम्हांला ते कंकण पुन्हा घेऊन येणे भाग आहे.”

“आता जवळजवळ मध्यरात्र होत आली आहे. त्यात ही अमावस्या आहे. कशा प्रकारे वाचवणार आहात तुम्ही स्वतःला?”

“पर्याय एकच आहे. एकतर कंकण आणून प्रतिष्ठा राखली जाईल. त्यासाठी आम्हाला प्राणार्पण करावे लागेल. अन्यथा साम्राज्याची प्रतिष्ठा भंग केल्याचा आरोप लागून, आमचे जीवन तसेही दारुण अंतात बदलेल."

“दोन्हीही पर्याय अनुचितच. तुमच्या निर्णयक्षमतेची आम्हांला कीव येत आहे.”

त्या दोघी एकमेकींशी बोलत होत्या. इतक्यात त्यांना मागून पावलांचा आवाज आला.

“काय चर्चा करत आहात तुम्ही दोघी?”

त्या दोघीही मागे वळल्या. त्यांच्या मागे साध्या वेशात ती उभी होती.

“आम्ही कंकण आणू शकलो नाही, माता.”

“आता काय होणार? ह्या तर कंकण मार्गात सोडून आल्या आहेत... आणि शेलाही.”

आपल्या दुःखी नेत्रांनी तिने त्या दोघींकडे पाहिले.

“अनर्थ. सारेच अघटित घडू पाहते आहे. पुत्री, तुझा अंत निश्चित होऊ पाहतोय आणि मी तुला मदत करायला हतबल आहे. कंकण न आणल्यामुळे तर केवळ प्रतिष्ठेला धक्का बसला असता; परंतु तू तुझा शेला मार्गात सोडला आहेस. ती कोण आहे, काय करू पाहतेय हेही आपल्याला माहित नाही. अशा वेळेस तुझ्या अस्तित्वाची एक महत्वाची निशाणी तू मागे सोडून कशी येऊ शकतेस?”

“आम्ही प्राण मुठीत घेऊन आलो आहोत. अजून एक क्षण जरी सीमेबाहेर राहिलो असतो, तरी आज आपणासमोर दिसलो नसतो.”

“तिने येथवर पाठलाग केला का?”

“हो. सीमारेषा नसती, तर कदाचित तिने जीवही घेतला असता.”

“ती येथपर्यंत येऊनही तिचे अस्तित्व आम्हां कोणालाच जाणवले नाही. मग तुलाच कसे जाणवत आहे?”

“ती आम्हांलाही दिसत नाही. केवळ जाणवते. तिच्या अस्तित्वाचा आभास होतो. आम्ही तिच्याकडे अगदी सहज खेचले जात आहोत.”

(एकच उसासा सोडत  )
“असो. तुम्ही दोघीही शांतपणे जाऊन निद्रा घ्या. मी पाहून घेईन काय करायचे. तसे आपण उद्या बोलूच.”

           दोघीही होकारार्थी मान डोलवत निघून गेल्या. त्यांना गेलेले पाहून ती वृक्षाच्या खाली वृक्षाला टेकून बसली. 

“तुम्हांला नाही वाटत, की केवळ माझ्यावर हे सगळे सोपवून तुम्ही जाणे योग्य नव्हते. यांना मी म्हटलेय खरे; परंतु मी कसे सावरणार आहे? त्या अज्ञात शक्तीवर मी कसा आघात करू, जी मला दिसलीही नाही आणि ना ही तिचे अस्तित्व मला जाणवले.”

गुडघ्यावर डोकं टेकून ती स्वस्थपणे तिथेच बसून होती.

.
.
.
.
.
.
.

“सारेच मूढ!
आमचे अस्तित्व शोधत आहात?
काय असते अस्तित्व म्हणजे?
आम्हांला अस्तित्वच नाही.
ना शरीर आहे.
ना सावली.
आम्ही अद्भुत आहोत. केवळ अद्भुत!
तुमच्या या कन्या आमचे काय बिघडवणार?
तुमचेच साथीदार तुमच्याचविरुद्ध आम्हांला साथ द्यायला उभे राहतील आणि त्यांच्याच हातून तुमचा अंत बघायला आम्ही उत्सुक आहोत.
खूप उत्सुक!
हे कंकण आम्हांला ते मिळवून देईल, जे तुमच्या अंताला कारणीभूत ठरेल. नियतीही आता तुमच्याविरुद्ध गेली आहे.”

        तिचे नेत्र तेजाने चकाकले. अमावस्येच्या रात्रीही तिच्या डोळ्यांत प्रकाश भासत होता. क्रूरतेची छटा तिच्या डोळ्यांत योग्यत: उमटली होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तिने एकवार आभाळाकडे पाहिले आणि ती जवळजवळ ओरडली.

“मी येतेय. तुमचा काळ बनून येतेय. काळरात्र परत येतेय.
सुडाचे वलय तयार होतेय.
मी येतेय...”

_____________________________________
क्रमशः.
0

🎭 Series Post

View all