दोन्ही कार पार्क करून पाचहीजण बंगल्यात आले. काही काळापूर्वीच्या प्रसंगापेक्षा फारच वेगळं काहीतरी ते पाहत होते. अवंतिकाचे डोळे जणू आग ओकत असावेत अशा प्रकारे लाल झाले होते. ओंकारला तिने भिंतीला एका हाताने दाबून धरले होते. त्याच्या दोन्ही दंडांवर सुंभाने वळल्याइतके मोठे रॅश उमटले होते. अनन्याने धावत जात त्या दोघांना बाजूला केलं.
“तू वेडी झाली आहेस का, अवि? खरोखर जीव घेणार आहेस का त्याचा?”
“हो. मी कालच त्याला शेवटचा इशारा दिला होता, की माझ्या वाटेला जायचं नाही. नाहीतर माझ्याकडून त्याला दुखापत होऊ शकते.” अवंतिका भेसूर स्वरात म्हणाली.
अवंतिकाच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर अनन्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने अवंतिकावर हात उगारला. अभिषेक तिला थांबवणार इतक्यातच अवंतिकाने अनन्याचा उगारलेला हात घट्ट पकडला व अनन्याच्या नजरेला नजर देत ती बोलू लागली.
“मी चुकीची नाही. तुम्ही असं का वागता हेच मला समजत नाही. त्यामुळे मला कानाखाली मारण्याची हिंमतही करू नकोस.”
अवंतिकाच्या नजरेत हुकुमी ताकद होती. अनन्याचा हात झटकत अवंतिका आपल्या खोलीत निघून गेली. अनन्या धसका घेतल्यासारखी सोफ्यावर बसली. तिला विश्वासच बसला नव्हता, की ती तिच्याच मुलीला पाहत होती. ही अवंतिका वाटतच नव्हती. दारातच उभे असलेले सुमित आणि इतर सर्व आत आले. सुमित आणि अभिषेक खूप आधीपासूनच मित्र असल्याने आराध्या आणि अवंतिकाही खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. तसं पाहता आराध्या वयाने थोडी लहान असली, तरी फार समजूतदार होती. आराध्याने संध्याकडे पाहिले आणि विचारले.
“मॉम, मी अविच्या खोलीत जाऊ का? मी तिच्याशी बोलल्यावर तिला बरं वाटेल.”
“काही हरकत नाही, बाळा. फक्त काळजी घे.” संध्याही धास्तावलेली होती.
संध्या आणि सुमितला आराध्याचा स्वभाव खूप चांगला माहित होता. आराध्या अतिशय शांत व डोळ्यांत प्रचंड प्रेम असणारी मुलगी होती. तिच्या डोळ्यांत एका प्रकारची जादू होती असे म्हटले तरी चालेल. ती सहज कोणालाही शांत करू शकायची. तिचे काळेभोर डोळे सहज कोणालाही तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेण्यास भाग पाडायचे. आराध्या वरती गेल्यावर संध्या अनन्यापाशी येऊन बसली. अभिषेक आणि सुमित ओंकारजवळ गेले. संध्याने ओंकारला पाणी आणून दिले.
“ओंकार, मला सविस्तर सांग नक्की काय झालं इथे?” सुमितने विचारलं.
“जास्त काहीच नाही. आज आम्ही मम्मा आणि डॅड आले नाही म्हणून बाहेर बागेमध्ये चालत होतो. पाच मिनिटापूर्वी आम्ही परत आलो. घरात आल्यावर मला अविच्या डोळ्यांचा रंग बदललेला वाटला. तिचे थोडेसे केशरी असल्यासारखे वाटले.”
“काय? केशरी?”
अनन्या धक्क्यातच होती.
“हो मम्मा आणि मी अविला ते सांगितलं. तिला विचारलं की काय झालं नक्की? तर ती माझ्यावरच चिडली. तिने असा गैरसमज करून घेतला, की मी तिला भूत वगैरे समजतोय; पण माझं असं काहीच इंटेन्शन नव्हतं. मी खरोखरच तिच्या डोळ्यांचा एक वेगळाच रंग पाहिला होता. मी तिला हेही विचारलं, की ती आय लेन्स वगैरे वापरते का? तर तिने मला भिंतीला दाबून धरलं. मला कळलंच नाही तिच्यात अचानक एवढी ताकद कुठून आली?”
ओंकारच्या दंडावरील वळ पाहून अभिषेकही साशंक झाला होता. त्याने चिंतातुर नजरेने सुमितकडे पाहिले. सर्वचजण आपल्याकडे पाहत आहेत हे पाहून सुमित म्हणाला,
“काळजी करू नका. अवंतिकाला जरा शांत होऊ दे. मग मी बोलतो तिच्याशी.”
अनन्या आणि संध्या जेवणाच्या तयारीसाठी स्वयंपाकघरात निघून गेल्या. अभिषेक फर्स्ट-एड बॉक्स आणायला गेला, तर सुमित ओंकारशेजारी सोफ्यावर बसून गूढ विचारात गुंतला होता.
___________________________________
आराध्या अवंतिकाच्या खोलीपर्यंत आली. तिने दरवाजावर नॉक केले.
“अवि, मी आत येऊ का?”
अवंतिकाने तीक्ष्ण नजरेने वर पाहिले व आराध्याला पाहून तिने पुन्हा मान फिरवली. आराध्या मात्र स्वतःहून आत आली व तिने दार आतून लॉक केला. अवंतिका चिडली तर तिचा आवाज बाहेर जाऊ नये या उद्देशाने, दार लॉक करून ती पलंगावर बसलेल्या अवंतिकाजवळ येत गुडघ्यावर खाली बसली. अवंतिका तिच्याकडे पाहू लागली.
“अवि...”
आराध्याचा आवाज मेंदूला जणू आदेश देत असावा अशा रीतीने अवंतिकाने आराध्याच्या नजरेत पाहिले. अवंतिकाला आपल्या डोक्यावरील भार हलका होत असल्याचा आभास होत होता. आपण सर्व तणावापासून दूर आहोत असे तिला भासू लागले होते.
“अवंतिका, तुला कशावरून राग आला आहे?”
“माझ्या डोळ्यांचा रंग बदलतो असं ओम म्हणत होता. त्याच्यामते मी भूत आहे. मला त्याचा खूप राग येत होता.”
अगदी यंत्रवत अवंतिका उत्तरे देत होती.
“अवंतिका, लक्षात घे. ही नॉर्मल गोष्ट आहे. लेन्स न वापरता किंवा भूत वगैरे नसतानाही डोळ्यांचा रंग बदलू शकतो. माझ्याकडे पहा. मी तर नॉर्मल आहे अशी तुझी खात्री आहे ना?”
“हो.”
“हे बघ. माझ्या डोळ्यांचा रंगही बदलतो.”
आराध्याचे काळेभोर डोळे गुलाबी होऊ लागले होते. तिच्या डोळ्याच्या आत सारे विश्व सामावले गेले असावे इतके गहिरे तिचे डोळे भासत होते. आराध्याच्या डोळ्यांत पाहताना अवंतिका पूर्णतः हरवून गेली होती. अवंतिकाच्या मेंदूवर आपला अंमल स्थापन झालेला जाणवताच आराध्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटले.
“आता विसरून जा, अवंतिका. तू का रागवलीस, कोणावर रागवलीस हे विसरून जा. मी तुझ्याजवळ का आले, ते विसरून जा. मी तुला ओळखते आणि तूही मला ओळखतेस. मात्र आपल्यातला होणारा हा संवाद विसरून जा.”
आराध्या अवंतिकावर संमोहनाचा प्रयोग करत होती आणि संमोहनाची ताकद खरंच खूप अफाट असते. आराध्याच्या डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या अफाट संमोहन शक्तीने अवंतिकाच्या मेंदूवर पुरता कब्जा केला होता. आराध्याच्या डोळ्यांतील प्रचंड प्रेममय संमोहन अवंतिकाच्या रोमारोमात सळसळणाऱ्या रागाला लुप्त व्हायला भाग पाडत होते. काही क्षणांत अवंतिका मूर्च्छित होऊन पलंगावर पडली व एक सुंदर हास्य करत आराध्या खोलीतून बाहेर आली. आराध्या जिना उतरत खाली आली. बराच वेळ झाल्याने सर्वजण वाटच पाहत होते.
“काय बोलणं झालं आराध्या? अवि काही बोलली का तुला? ओरडली नाही ना तुझ्यावर?” अनन्याने काळजीने विचारलं.
“नाही काकू. आम्ही फक्त बोलत होतो; पण तेवढ्यात ती थकव्यामुळे बोलता बोलता झोपी गेली. मला तिला डिस्टर्ब करावं वाटलं नाही. म्हणून मी खाली आले. मला वाटतं आता ती ठीक आहे. डिनरची वेळ झाल्यावर आपण तिला हाक देऊ.”
“ठीक आहे, बेटा. तू बस. थोड्या वेळाने आपण डिनर करून घेऊ.” संध्या तिच्याकडे पाहून हसत म्हणाली.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा