संरक्षण भाग तीन

It's A Story Of Lady Struggle

संरक्षण भाग तीन

अंकिता सगळ्यांना घेऊन पार्किंग मध्ये बसली होती. तिने नंदिनिला बोलावले होते पण बरं वाटत नसल्याचे कारण देऊन ती घरातच बसली होती. नंदिनी बसल्या बसल्या देवाचा जप करत होती तशी सवयच होती तिला आणि तिचा आधार ही. तेवढ्यात दारावरची बेल वाजली म्हणून तिने दार उघडले तर समोर निरज उभा होता. तू ऑफिस मध्ये गेला नाहीस ?? तिने दारातूनच त्याला विचारले तसा तो म्हणाला, गेलो होतो पण माझी मीटिंग ची फाईल घरीच विसरली होती ती न्यायला आलो आणि खाली अंकिता भेटली तर ती मुलांना घेऊन जवळच्या गार्डन मध्ये गेली आहे हा निरोप तिने द्यायला सांगितला म्हणून आलो. तिने फोन केला होता पण तू घेतला नाहीस म्हणून मग मीच म्हणालो, मी जातच आहे वर तर देईन तिला निरोप. हो मी मगाशी मंदिरात गेले होते तेंव्हा सायलेंट ठेवला होता मोबाईल तो तसाच राहिला वाटतं. ठीक आहे मी करते अंकिताला फोन नंदिनी म्हणाली तसे तीच्या डोळ्यात निरखून पाहत तू ठीक आहेस ना?? असे निरज ने विचारले तशी नंदिनी ने नजर चोरली आणि हो म्हणत दार लावयला गेली पण निरज ने लगेच दार उघडले आणि सरळ घरात आला. नंदिनी ला त्याच्या अशा वागण्याचा खूप राग आला आणि ती म्हणाली, काय समजतोस कोण तू स्वतःला ?? रादर तुम्ही पुरुष लोक स्वतःला कोण समजता आम्हा बायकांना ?? वाट्टेल तेंव्हा वाट्टेल तसे वागवता येणारे खेळणे वाटतो का तुम्हाला ?? मी सांगतेय ना मी ठीक आहे तर ठीक आहे. का उगाच जबरदस्तीने विचारण्याचा प्रयत्न करतोस ?? आणि नसेनही मी ठीक त्याच्याशी तुला काय करायचे आहे ?? तू तुझी फाईल घ्यायला आलास ना ?? ती घे आणि जा ना ?? ऑफिस मध्ये कामं नाहीत का ?? माझ्या डोक्याला जरा शांतता हवी आहे ती माझ्याच घरात मिळेल का प्लीज स्वतःचे दोन्ही हात निरज समोर जोडत नंदिनी म्हणाली तसे निरज काहीच न बोलता निघून गेला आणि नंदिनी ने दार बंद केले.

नंदिनी आणि कुणाल मध्ये जे काही चालले होते, घरात ज्या अडचणी होत्या त्यात निरज ला इंव्होलवे करण्याची नंदिनी ची इच्छा नव्हती. त्याहूनही तिच्या मनाची घालमेल तिला नीराजला समजू द्यायची नव्हती. नंदिनी चे नशीब आजवर तिला किती चकवा देत आले होते हे तिला चांगलेच माहीत होते. पण आज तिला बेघर होण्याची वेळ आली होती आणि त्याही पेक्षा जास्त तिचा अभी बेघर होणार याच विचाराने तिची मानसिकता खूप बिघडली होती. त्यामुळे सगळ्या परिस्थितीचा राग तिने निरज वर काढला होता याची कल्पना तिला आली होती पण तिच्या अडचणीत तिला निरजला त्रास होऊ द्यायचा नव्हता.

सगळा दिवस नंदिनी ने टेन्शन मध्ये घालवला होता. दोन तीन दिवस असेच निघून गेले होते त्यामुळे नंदिनी थोडी सावरली होती. कुणाल आणि निरज एकाच ऑफिस मध्ये काम करत होते शिवाय निरज कुणालला सिनियर होता आणि आता शेजारी होता त्यामुळे निरज आणि फामिलीला कुणाल ने नाश्ता करण्यासाठी बोलावले होते ते ही नेहमी प्रमाणे नंदिनी ला न विचारता. घरी आल्यावर त्याने तसे सांगितले होते नंदिनी ला त्यामुळे नंदिनी किचन मध्ये गुंतली होती पण जेवण बनवत असताना निरजला कसे फेस करावे ते ही कुणाल समोर हाच विचार तिच्या डोक्यात सुरू होता. तिला आठवत ही नव्हते त्या दिवशी नंदिनी काय काय बोलली होती निरज ला. तेवढ्यात बेल वाजली आणि अंकिता मुलांसोबत नंदिनी ची मदत करण्यासाठी आली. दोघी गप्पा मारत नाश्ता बनवत होत्या तेवढ्यात अंकितला फोन आला म्हणून ती फोन घ्यायला हॉल मध्ये आली आणि तिने सांगितले निरज येणार नाही म्हणतो कारण त्याला महत्त्वाचे प्रँटेशन द्यायचे आहे. त्यामुळे तुम्हीच नाश्ता करून या असे सांगण्यासाठी त्याने फोन केला होता पण तो का येणार नाही याचे कारण नंदिणीला समजले होते. पण कुणाल म्हणाला, मी आणतो त्यांना बोलावून तुम्ही तयारी करा. कुणालच्या अती आग्रहामुळे निरजला येणे भाग पडले.

नंदिनी ने निरज कडे पाहिले तर तो खाली मान घालुन जेवत होता आणि गप्प गप्प च होता. नंदिनी ने सगळ्यांसाठी वडा सांबार आणि रसमलाई बनवली होती. वडा सांबार हे निरज आणि नंदिनी चे फेवरेट होते आणि अभिला ही आवडत होते त्यामुळे बनवले होते तिने. सगळ्यांना नंदिनी आग्रह करून वाढत होती. पण निरज काही मन लावून खात नव्हता हे नंदिनी च्या लक्षात आले होते. सगळे नाश्ता करत होते. अंकिता बसायला तयार नव्हती नंदिनी शिवाय पण मुलांना भूक लागली होती आणि अंकिता ने भरवल्या शिवाय मुलांनी खाल्ले नसते त्यामुळे नंदिनी एकटीच मागे राहिली होती. नंदिनी सगळ्यांना सांबार वाढत होती, वाढत वाढत ती निरज जवळ आली पण त्याला सांबार नको होते त्यामुळे त्याने हात मधे धरला आणि तेवढ्यात नंदिनी ने सांबार ओतले ते नेमके निरज च्या हातावर पडले. सांबार गरम होते त्यामुळे निरज चा हात भाजला. तसा तो ओरडला आणि त्याला भाजल्यामुले कुणाल पण नंदिनी वर वैतागून म्हणाला, अग जरा बघून काम करत जा ना नंदिनी. लगेच निराजने तिची बाजू सावरून घेतली आणि म्हणाला, खरतर मीच हात मधे घालायला नको होता त्यामुळे हातावर पडले सांबार. पण ठीक आहे मी हात धून मलम लावतो,फक्त मलम कुठे आहे ते सांगता का ?? कुणाल कडे पाहून निरज म्हणाला, तसा कुणाल स्वतः उठणार तेवढ्यात निरज ने त्याला थांबवले आणि म्हणाला अभी आणि तुम्ही जेवताय तर उठू नका मी घेतो. इकडे अंकिता मुलांना खाऊ घालत होती आणि कुणाल अभिला भरवत होता त्यामुळे निरज एकटाच मलम लावण्याचा प्रयत्न करत होता पण उज्व्याच हाताला पोलल्याने त्याला ते जमत नव्हते.

तेवढ्यात त्याचा हात कोणीतरी हातात घेतला, त्याने मान वर करून पाहिले तर ती नंदिनी होती. खाली मान घालुन ती त्याच्या हातावर मलम लावत होती पण निरज ने लगेच तिच्या हातातून हात काढून घेतला आणि म्हणाला, काहीच गरज नाही माझ्या जखमेवर मलम लावण्याची. आधी जखमा करायच्या आणि मग त्यावर फुंकर घालायला यायचे कोणी सांगितले आहे त्यापेक्षा जखमाच करू नयेत ना. त्याचे टोमणे नंदिनी ला बरोबर कळत होते पण चूक तिचीच असल्यामुळे ती ऐकून घेत होती. आय एम सॉरी निरज, त्या दिवशी मी तुला जरा जास्तच बोलले, मी तुझ्यावर राग काढायला नको होता. नंदिनी च्या या बोलण्यावर निरज म्हणाला,जरा ?? जरा जास्त बोललीस तू ??
नंदिनी : खूप जास्त बोलले खाली मान घालून नंदिनी म्हणाली. तसा तिचा केविलवाणा चेहरा पाहून निरज म्हणाला हा ठीक आहे. जाऊदे सोडून देऊया तो विषय. नंदिनी ने पुन्हा त्याचा हात हातात घेतला आणि ती मलम लावू लागली, मलम लाभल्यामुळे जखम दुखू लागली तसा निरजने नंदिनी चा हात घट्ट पकडला पण तिच्या हाताच्या नाजूक स्पर्शाने निरज एकदम शांत झाला आणि तिच्याकडे एकटक बघत राहिला. खूप दुखत आहे का रे निरज ?? विचारत नंदिनी ने त्याच्याकडे पाहिले आणि त्याची भेदक नजर पाहून जरा गोंधळून गेली पण क्षणात स्वतःला सावरून तिने पटकन मलम लावले आणि म्हणाली, थोडी आग होईल पण नंतर थंड वाटेल. नाही आता ठीक आहे मी. तू केलेस ना मला माफ नंदिनी च्या या प्रश्नावर तो उत्तर देणार तेवढ्यात आयुष बाबा करत तिथे आला आणि निरजला घेऊन गेला. त्यामुळे नंदिनीला तिचे उत्तर मिळाले नाही.

क्रमशः

🎭 Series Post

View all