संरक्षण भाग पाच

It's Story Of Lady Struggle
संरक्षण भाग पाच

सगळेच पिकनिक मस्त एन्जॉय करत होते. मुले तर इतकी दंगा करत होती की अंकिता आणि नंदिनी त्यांना सांभाळून हैराण झाल्या होत्या. सगळे अडवेंचर मुलांनी पूर्ण केले होते आणि आता राहिले होते फक्त बोटींग. बोटींग करण्यासाठी सगळेच उत्सुक होते, बऱ्याच वेळाने बोटींग साठी नंबर आला आणि सगळेच बोटीत बसले. नंदिनी पहिल्यांदाच बोटींग एन्जॉय करत होती सुरुवातीला तिला जरा भीती वाटत होती पण नंतर मात्र ती छान मजा घ्यायला लागली होती. अंकिता आणि ती एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत मस्त खेळत होत्या आणि मुलांनाही सहभागी करून घेत होत्या. बऱ्याच वेळा पासून खेळल्या मुळे सगळेच भुकेले होते. नंदिनी आणि अंकिता ने सगळ्यांसाठी जेवण तयार करून आणले होते. मंदिरा शेजारी मस्त हिरवेगार लॉन असल्यामुळे सगळे तिथे बसून जेवत होते.

जेवणं आटपली तशी मुले पुन्हा गार्डन कडे वळली आणि कुणाल तिथेच आराम करण्यासाठी टेकला आणि झोपी गेला. अंकिता आणि निरज मुलांसोबत निघाले तशी नंदिनी अंकिता ला म्हणाली, मी मंदिरात जाऊन येऊ का तोपर्यंत बघशील ना अभी कडे ?? अंकिता हसत हो म्हणाली आणि नंदिनी मंदिराकडे वळली.

मंदिर खूप छान होते, त्याही पेक्षा लोभानिय होती तिथली शांतता. बाहेर इतकी गर्दी, गोंगाट असूनही मंदिरात आल्या बरोबर सगळा गोंधळ जणू कुठे गायब झाला होता आणि मनाला प्रसन्न करणारी भयानक शांततेचा अनुभव येत होता. त्यात स्वामींची सुंदर मूर्ती आणि तिथेच सुरू असलेला श्री स्वामी समर्थ हा जप. सगळे काही विसरून नंदिनी ने डोळे मिटले आणि स्वामींचे रुप डोळ्यात साठवून घेत दर्शन घेतले. तिथे मंदिरात बाकी कोणीच नव्हते, एका बाजूला निवांत बसून जप करण्यासाठी जागा होती. नंदिनी तिथे डोळे मिटून जप करत बसली होती.

काय मागतेस इतकं देवाकडे ?? या प्रश्नाने तिने डोळे उघडले आणि बाजूला पाहिले तर निरज तिच्याकडे बघत तिला विचारत होता. तशी ती म्हणाली,मागत काहीच नव्हते, ध्यान करत होते डोळे मिटून. पण तू इथे का आलास?? अंकिता एकटीच सांभाळत आहे का मुलांना ?? त्यावर निरज म्हणाला, नाही खरतर सगळीच मुले दमली आणि पाणी पिण्यासाठी गाडीत बसली आणि तिथेच झोपी गेली. अंकिता पण खूप थकली होती त्यामुळे तिला ही आराम करायचा होता ती पण मुलांसोबत झोपली गाडीतच. पण मला झोप येत नव्हती त्यामुळे इथे दर्शनासाठी आलो आहे. त्याचे उत्तर ऐकून ती म्हणाली, आणि कुणाल ?? तुझा नवरा गार्डन मध्ये मगाशीच झोपला आहे, अजून दोन तास तरी तो उठणार नाही असेच वाटत आहे. अजून काही विचारायचे आहे का मॅडम ?? खाली मान घालुन हात छातीवर ठेवत निरज म्हणाला, तशी नंदिनी म्हणाली नाही काहीच नाही. तू घे दर्शन मी गाडीत जाऊन बसते म्हणत नंदिनी उठली, तसे निरज ने पटकन तिचा हात पकडुन तिला खाली ओढले आणि म्हणाला, काय करणार आहेस तू गाडीत जाऊन ?? सगळे आडवे तिडवे कसेही झोपले आहेत, दार पण बरेच प्रयत्न करून बंद केले आहे मी. त्यात तू कुठे जात बसतेस?? बस ना इथेच. निरज च्या या बोलण्यावर नंदिनी ने आपला हात सोडवून घेतला आणि म्हणाली, असुदे तरीही मी जाते. मी एकटा असताना माझ्या सोबत बसण्याची भीती वाटते हे सांगना नंदू. निरज च्या या बोलण्यावर नंदिनी ने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तू म्हणतोस ते खरं असेलही निरज पण खरतर मी संधी शोधत होते तुला एकट्याला भेटण्याची. नंदिनी च्या या बोलण्यावर निरज खूप खुश होत म्हणाला, बोल ना नंदू, काय बोलायचे होते तुला माझ्याशी ?? मला तुझी माफी मागायची होती निरज. त्या दिवशी मी तुझ्यावर खूप ओरडले त्यासाठी. मलम लावताना मी विचारले होते तुला पण नीट बोलणे झाले नाही. तू मला माफ केलेस ना ?? हे ऐकून निरज चा चेहरा पडला आणि तो म्हणाला, हो ग नंदू, कधीचा विसरून गेलो आहे मी ते सगळच. पण फक्त इतकंच बोलायचे होते तुला ?? निरज च्या या प्रश्नावर हो असे उत्तर देऊन नंदिनी जायला वळली तसा निरज खूप चिडला आणि तिचा हात पकडुन तिला स्वतःकडे खेचून घेत म्हणाला, तू खूप बदलली आहेस नंदू, खूप जास्त. मला तुझ्यात माझी पूर्वीची नंदू दिसतच नाही कुठे. इतकी का बदललीय की मला तुझ्यात वेगळ्याच नंदिनी चा भास होतो आहे ?? निरज सोड मला, काय करतोस तु ?? कोणी पाहिले तर ?? कोणी कशाला कुणाल किंवा अंकिता यापैकी कोणी पहिले तर संसार मोडेल कोणा एकाचा, कळत कसं नाही तुला?? नाही सोडणार आता तर नाहीच सोडणार नंदू, म्हणत निरज ने त्याची पकड मजबूत केली आणि पुन्हा तिला जास्तच जवळ ओढून घेत म्हणाला, होऊदे काय व्हायचं ते पण मला आज तुझ्याशी बोलायचे आहे आणि ते ही आत्ता. का टाळते स मला ?? तू सगळं काही विसरली आहेस का?? पण मी नाही विसरलो काहीच मला.. बास निरज, काय अर्थ आहे का तुझ्या या वागण्या बोलण्याला ?? हो तू म्हणतोस ते खरं आहे मी बदलले आहे आणि परिस्थिती भाग पाडते वेळ पडेल तसे वागायला बोलायला. मी ही बदलले आहे आणि हे तू ही समजून घे. सोड मला जाऊदे म्हणत तिने हात सोडवून घेतला आणि ती मंदिरा बाहेर आली.

गाडीत वाकून पाहिले तर खरच सगळे एकमेकांच्या अंगावर हात पाय टाकून झोपले होते आणि दार उघडायला जागाच नव्हती. त्यामुळे ती पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पिले आणि थोडे पाणी तोंडावर मारून फ्रेश झाली, डोळ्यातील पाणी त्या पाण्या सोबत धून गेले पण मनाचे काय ?? मन मात्र निरज च्या अशा वागण्याचा विचार करत राहिले होते. स्वामी का आला निरज माझ्या आयुष्यात परत ?? नशीब कुणाल आणि अंकिता झोपले होते नाहीतर काय झालं असत ?? विचारानेच तिच्या काळजाचे ठोके वाढले आणि ती खूप पाणी पिल्यावर कशी बशी शांत झाली.

थोड्याच वेळात सगळे उठून फ्रेश झाले आणि चहा घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले. निरज अधून मधून नंदिनी कडे बघत होता तर नंदिनी ने मात्र चुकूनही त्याच्याकडे पाहिले नव्हते. निरज ला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता आणि त्याला नंदिनी ची माफी कशी मागावी हे समजत नव्हते. तिचा स्वभाव बघता, ती लवकर माफ करणार नाही हे स्पष्ट होते पण निरज पण निरज होता. विचारांच्या नादात, गाडी पार्किंग मध्ये येऊन थांबली, आणि सगळे सामान घेऊन उतरले. सगळे लिफ्ट मध्ये गेले, लिफ्ट चालू होणार तेवढ्यात अभी म्हणाला आई माझे शूज मी गाडीतच विसरलो आहे आण ना. निरज अजूनही गाडी जवळच उभा होता आणि इकडे अभी कुणाल च्या कडेवर बसून ऑर्डर सोडत होता. कुणाल खूप थकला आहे अशा आविर्भावात म्हणाला, जा नंदिनी तू घेऊन ये शूज. नाईलाजाने नंदिनी बाहेर आली आणि लिफ्ट वर गेली. नंदिनी गाडी जवळच थांबून निरज कडे न बघताच म्हणाली, इथे अभी चे शूज राहिले आहेत ते ... , हो मी बाहेरच काढत होतो आता पाहिले मी, येणारच होतो वर घेऊन. हे घे म्हणत त्याने वाकून शूज घेतले आणि नंदिनी समोर धरले, तिने ते घेण्यासाठी हात पुढे केले पण निरज ने शूज सोडले नाहीत. म्हणून नंदिनी ने चमकून त्याच्याकडे पाहिले, तर दुपारी मंदिरात मी जे काही वागलो त्यासाठी खरंच सॉरी नंदू, मी असे वागायला नको होते. प्लीज मला माफ कर निरज म्हणाला. हे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी होते, ते पाहून नंदिनी ला कसेतरी वाटले पण इतक्या सहज माफ केलं तर पुन्हा हा अशीच चूक करेल म्हणून ती म्हणाली, इतक्या लवकर माफ नाही करू शकत मी तुला, तुझी चूक मोठी आहे. माझा राग शांत झाला की करेन मी माफ. पण आता नाही, तिने शूज हातातून ओढून घेतले आणि निघून गेली. इकडे निरज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला.

क्रमशः

🎭 Series Post

View all