संसार भातुकलीचा भाग१०अंतिम(अनोखी प्रेमकथा)

अधुरी प्रेम कहाणी
"शांत व्हा मिस्टर देसाई. आता तुमच्या मिसेसना मानसिक आधाराची गरज आहे. सध्या आम्ही त्यांना अंडर ऑब्जर्वेशन ठेवत आहोत. तुम्ही तुमच्या माणसांना बोलावून घ्या. प्लीज मिस्टर देसाई..भावनांना आवर घाला आणि समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करा." डॉक्टर म्हणाल्या

"विक्रांत..अरे काय झालं अचानक? आणि अर्पिता कशी आहे?" गणपतरावांनी विचारलं.

"बाबा..बाबा.."विक्रांत त्याच्या बाबांना मिठी मारून रडू लागला.

"विक्रांत..अरे काय झालं? बोल ना काहीतरी! अर्पिता कशी आहे?"मधुकररावांनी हलकेच त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारल.
अर्पिताचे आईबाबा पण तिथेच होते. विक्रांत मात्र फक्त रडत होता. अर्पिताची आई पण घाबरली.

"जावई.. अहो बोला ना काहीतरी. काय झालंय? कुठेय माझी लेक. अहो जीव घाबराघुबरा होतोय आता." अर्पिताची आई म्हणाली.

"आई, अर्पिता..बाबा, अर्पिताला ब्रेन ट्युमर झालाय आणि बाबा...तो लास्ट स्टेजवर आहे. बाबा आता आपण काहीच करू शकत नाही."विक्रांतचा गळा दाटून आला.

अर्पिताचे आई बाबा तर मटकन खाली बसले. अर्पिता आय.सी.यू मधे होती. तिच्यावर उपचार सुरू असले तरी त्याचा कितपत उपयोग होईल हे कुणालाच माहीत नव्हत.

तीन दिवस अर्पिता हॉस्पिटलमधे होती. स्टेबल असली तरी तिच्या जीवाची खात्री नव्हती. शिवू पण तिला हॉस्पिटलमधे भेटायला आली.

"मम्मा..तू लवकर बरी हो. मी तुला प्रॉमिस करते मी अजिबात त्रास देणार नाही तुला. गुड गर्ल सारखी वागेन. तुझ सगळ ऐकेन, पण मम्मा तू लवकर बरी हो. आपल्या घरात तुझ्याशिवाय छान नाही वाटत. तुला माहित आहे बाबाने तुझ्यासाठी फास्ट ठेवला आहे. तू लवकर बरी होऊन घरी आली ना की मग बाबा फास्ट सोडणार. मम्मा मी पण तुझ्या फेव्हरेट बाप्पाकडे प्रे केलं आहे." शिवंण्या अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"माझी लाडूबाई किती मोठी झाली. गुड गर्ल सारखं बोलतेय. पिल्लू ऐक ना, मम्मा जर घरी आली नाही ना तर तू बाबाची आणि तुझी काळजी घ्यायची. काय..मला प्रॉमिस कर. तू स्वतःची पण काळजी घेशील आणि बाबाची पण." हात पुढे करत अर्पिता म्हणाली.

"प्रॉमिस मम्मा..आय लव्ह यू..अँड गेट वेल सून."अर्पिताच्या गालावर ओठ टेकवत शिवंण्या म्हणाली.
अर्पिताने थोडंसं हसून पुन्हा डोळे मिटले.

काही वेळाने तिला पुन्हा जाग आली तेंव्हा तिने नर्स कडून एक पेपर आणि पेन मागून घेतला. काही वेळासाठी हाताची सलाईन काढायला सांगून तिने त्या पेपर वर काही लिहायची सुरुवात केली. लिहिता लिहिता तीच डोकं जड झाल. कसबस पेपर वर शेवटचे शब्द लिहून तिने एकच किंकाळी फोडली.

"आई ग sssss "
तिच्या आवाजाने नुकतीच बाहेर गेलेली नर्स पुन्हा धावत आत आली. तिने पाहिलं तर अर्पिताची कंडीशन खराब झाली होती.
डॉक्टरांनी सगळ्या मशीन चेक केल्या. अर्पिताच्या श्वासाची गती वाढत चालली होती.
विक्रांत एका बाजूला उभा राहून अस्वस्थ होत सगळ बघत होता. तो हतबल होता.

असंख्य वायरींमधे गुंडाळून बेडवर निपचित पहुडलेली ती.. मॉनिटरवर होणाऱ्या टिकटिक वर नजर ठेऊन हातातल्या नोटपॅड वर काहीतरी लिहिणाऱ्या नर्स कडे भिरभिरत्या नजरेने बघत होती. नाकातून टाकलेली नळी असह्य वेदना देत होती. तोंडाला लावलेला ऑक्सिजन मास्क, एका हाताला सलाईन आणि एका कोपऱ्यात उभ राहून तिला बघत डोळ्यातील पाणी पुसणारा तो. त्याच्याकडे बघून हलकेच स्माईल देत डोळ्यांची एकदाच उघडझाप करून तिने डोळे बंद करून घेतले..मॉनिटरवर वरखाली असणारी रेषा टीsss असा आवाज करत सरळ झाली होती...नर्सने एकदम सगळ्या मशनी काढून व्यवस्थित ठेवायची सुरुवात केली. डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यावर चादर ओढली आणि त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटून सांगितल.
"आय एम सॉरी...आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.."
विक्रांत जागीच कोसळला. नर्सने त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. थोड पाणी पिऊन तो वॉशरूमकडे गेला. तोंडावर पाण्याचे शिबके मारले आणि बाहेर येऊन त्याने घरी फोन लावला.

"बाबा..बाबा..अर्पिता आपल्याला फसवून गेली. बाबा..पुन्हा आपली शिवू एकटी पडली. मी एकटा पडलो बाबा..मी एकटा पडलो."बोलता बोलता त्याच्या हातून फोन खाली पडला.

भिंतीला रेलत रेलत तो खाली बसला. दोन्ही पाय लांब करून भिंतीला डोकं टेकून तो रडू लागला. वॉडबॉयने त्याला आधार दिला. विक्रांत त्या वॉडबॉयला मिठी मारून रडू लागला त्याने सुद्धा त्याला मोकळं होऊ दिल. एवढ्यात घरची सगळी माणस आली. शिवंण्या कामवाल्या ताईंसोबत घरीच होती.
मधुकररावांनी सगळी फायनल प्रोसेस करून अर्पिताची बॉडी ताब्यात घेतली. अँब्युलन्समधे तिची बॉडी चढवली. पाठीमागून एक नर्स येऊन त्याच्या हातात एक घडी केलेला पेपर देऊन म्हणाली.

"मिसेस देसाई मगाशी यात काही लिहीत होत्या." घडी घातलेला पेपर तिच्या हातात देऊन ती नर्स निघून गेली.
पेपर वर ओठ टेकवून त्याने तो खिशात ठेवला. विक्रांतच्या ऑफिसमधून त्याचे सर आणि इतर कलिग्ज आले. शिवंण्याला ताई मावशीने सगळ नीट समजावून सांगितलं.

अर्पिताची बॉडी जशी घरी आणली तशी शिवंण्या तिला बिलगून रडू लागली.

"मम्मा..तू बाप्पाकडे नीट जा हा.. आणि तिकडे गेलीस की आम्हाला विसरू नको. मम्मा..मला आणि बाबाला तुझी खूप आठवण येईल. वी विल मिस यू मम्मा.. लव्ह यू. अर्पिताला मिठी मारून शिवंण्या म्हणाली.

अंतिम सोपस्कार करून सगळे घरी आले. आंघोळ करून फ्रेश झाल्यावर विक्रांतला चिट्ठीची आठवण झाली.


डियर विक्रांत,

आता कुठे आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती. खरतर मला खूप जगायचं होत तुझ्यासोबत अगदी आपले केस पांढरे होईपर्यंत पण बघ ना देवाला ते मान्यच नव्हत. आधीची सहा वर्ष फक्त तडजोड करण्यात घालवली मी. ज्या गोष्टी आत्ता क्लिअर केल्या त्याच आधी केल्या असत्या तर जाताना गाठीशी बऱ्याच आठवणी घेऊन गेले असते. असो..पाच दिवसांच्या सिमला मधल्या आठवणी आणि याआधी आलेले चांगले क्षण माझ्यासोबत घेऊन जातेय. आपल्या शिवूवर लक्ष ठेव. तिचा नीट सांभाळ कर. पुन्हा लग्न कर अस मी म्हणणार नाही किंवा त्या कुठल्याच बंधनात तू इतर कुणासाठी अडकाव अस मुळीच बोलणार नाही. तुला जेंव्हा सहचारिणीची गरज भासेल तेंव्हा नक्कीच त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यात येऊदे. तोवर स्वतःची माझ्या आईबाबांची अर्पिता ताईंच्या बाबांची आणि आपल्या शिवुची काळजी घे. तू खंबीर रहा. मी असेन तुझ्यासोबत. जेंव्हा जेंव्हा तुला एकट वाटेल ना..तेंव्हा गॅलरीत असलेल्या माझ्या सगळ्या झाडांच्या सोबत जाऊन बस..मी तुला तिथेच भेटेन.
माझ्याकडुन जी चूक झाली त्यासाठी खूप खूप सॉरी.
विक्रांत..आय लव्ह यू
तुझीच….
अर्पिता

विक्रांत चिठ्ठी वाचून झाल्यावर पुन्हा तिची घडी घालतो. त्या चिठ्ठीला ओठ टेकवून छातीशी लावतो. शिवूच्या खोलीत जाऊन तिच्या उश्याजवळ असलेला त्या तिघांचा फोटो आणि ती चिठ्ठी दोन्ही कवटाळून रडत असतो.

"अर्पिता..मी चुकलो. मी खरच चुकलो..मला माफ कर अर्पिता." विक्रांत हुंदके देऊन रडू लागतो. इतक्यात पाठीमागून सगळे येतात.

विक्रांत उठ..सावर स्वतःला. तुला आता आई आणि बाबा दोन्ही बनायचं आहे. आम्ही आहोत तुझ्यासोबत." विक्रांतची आई म्हणाली.

"आई..माझ्याच सोबत हे सगळ का? आई मी..मी प्रॉमिस करतो. शिवूला खूप छान संभाळेन मी. तिला आईची कमी नाही पडू देणार." आईच्या कुशीत शिरून तो अगदी लहान मुलांसारख रडू लागला.

जगायचं राहून गेलं होत आणि वेळही हातून निघून गेली होती. उरल्या होत्या फक्त आठवणी.

(आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर नवरा बायको दोघांनी मिळून मात करायची असते. एकमेकांना वेळ द्यायचा असतो. आपल आयुष्य किती आहे हे कुणालाच माहीत नसत. मीपणा जवळ करू नका.)

समाप्त..
©® श्रावणी लोखंडे.


🎭 Series Post

View all