संसार भातुकलीचा भाग २(अनोखी प्रेम कथा)

अनोखी प्रेम कहाणी
काही न बोलता कसलासा बहाणा करून विक्रांत तिकडून निघून गेला. मुलाच्या मनात अर्पिताने केंव्हाच जागा केली होती हे गणपतरावांना समजायला उशीर लागला नाही. कसलीही वाट न बघता गणपतरावांनी विक्रांतसाठी अर्पिताला मागणी घातली.

अर्पिताने तिच्या वडिलांचं आणि विक्रांतच्या वडिलांचं बोलण ऐकलं आणि ती पुढे आली.

" तुम्हा मोठ्यांमधे मी बोलते त्यासाठी सॉरी..पण मला हे लग्न मान्य नाही. मी हे लग्न करू शकत नाही."

"पण का? काही कमी आहे का माझ्या मुलामधे?"

"नाही काका, अस काही नाही पण मला तुमच्या मुलासोबतच काय पण इतर कुणासोबतच लग्न करायचं नाही." डोळ्यातलं पाणी लपवत अर्पिता म्हणाली.

"बाळा, का अस बोलतेस? हे बघ विक्रांतला मी खूप चांगल ओळखतो. दिवा घेऊन शोधला तरी असा मुलगा तुझ्यासाठी भेटणार नाही." मधुकरराव म्हणाले.(अर्पिताचे बाबा)

"मान्य आहे बाबा पण तरी मला लग्न करायचं नाही. प्लीज बाबा मला समजून घ्या." हात जोडून डोळ्यातलं पाणी पुसत अर्पिता तिथून निघून गेली. लांब उभा असणारा विक्रांत हे सगळ बघत होता. अर्पिताच्या डोळ्यातले अश्रू त्याने पाहिले होते पण ते कशासाठी हे त्याला माहीत नव्हत.

*********

"बाबा.. आज थोडासा वेळ माझ्यासाठी काढशील का? मला बाबा वर एक एसे (निबंध) लिहायचा आहे. माझा बाबा हिरो असला तरी त्याला त्याच्या प्रिन्सेससाठी वेळच नसतो म्हणून मग काय लिहू हा विचार करत होते. तू लवकर येऊन मला थोडी हेल्प करशील का प्लीज. मम्माच्या फोनवरून तुला फोन करून विचारणार होते पण मम्मा फोनला हात लावू देत नाही ना म्हणून इकडून व्हॉईस मॅसेज केला." घरच्या लँडलाईन वरून व्हॉईस मॅसेज टाकत शिवंण्या म्हणाली.

दुपारी लंच ब्रेक मध्ये विक्रांत व्हॉईस मॅसेज ऐकतो आणि घरी जाताना खेळणी आणि चॉकलेट्स घेऊ जातो. शिवंण्या गॅलरीत उभी राहून तिच्या बाबाची वाट बघत होती. तिला वाट बघताना बघून अर्पिताचा जीव मात्र लेकीसाठी तळमळत होता. आजही विक्रांत वेळेवर आला नाही तर लेकीचा हिरमोड होईल म्हणून मनोमन ती देवाला विनवत होती.

"बाबा..."

विक्रांतची गाडी बघताच शिवंण्या धावत धावत बाहेर गेली.
खास तिच्यासाठी लवकर आलेल्या बाबाला बघून शिवंण्या खूपच खुश झाली होती. नाश्ता, जेवण आणि निबंध लिहून झाल्यावर आज दोघे बाप लेक एकमेकांच्या कुशीत विसावलेले बघून अर्पितला गहिवरून येते. दोघांची अलाबला घेत त्यांच्या अंगावरच पांघरून नीट करत ती सुद्धा झोपी जाते.

"थँक्यू विक्रांत!" अर्पिता

"थँक्यू फॉर व्हॉट?" विक्रांत

"काल लवकर येऊन शिवू सोबत जो टाईम स्पेंड केलास त्यासाठी!" अर्पिता

"ओ कम ऑन..माझी मुलगी आहे ती आणि मी बाहेर असतो किंवा घरी आल्यावर फोन घेऊन बसतो म्हणजे मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही अस नाही. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यातून बाहेर पडायला मला थोडा वेळ लागेलच. आय होप तू समजुन घेशील मला." विक्रांत म्हणाला

"हो नक्कीच, तुला हवा तितका वेळ घे पण त्यासोबत वेळ सुद्धा दे इतकंच माझं म्हणणं आहे. काल तुम्हा दोघांना एकत्र बघून छान वाटल म्हणून थँक्यू म्हणाले." अर्पिता

"ठीक आहे. मी प्रयत्न करेन." कॉफीचा मग टेबलवर ठेऊन विक्रांत त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन निघून गेला.

नेहमीसारखी काम आवरून अर्पिता तिच्या गॅलरीतल्या बागेत जाते. रोपांशी गप्पा मारत त्यांना गोंजारत अगदी मनापासून त्यांना पाणी देत असते. पाणी देऊन निघतांना तिची नजर पडते ती त्या गुलाबावर ..जो सगळ्यांपासून लपू पाहत होता. बऱ्याच फांद्यांच्या मधून हलकेच बाहेर बघणारा तो गुलाब. अलगद तिने खुंटला..फिकट गुलाबी रंग आणि त्याचा धुंद करणारा मंद सुगंध. एखाद्या भारीतल्या परफ्यूमला सुद्धा लाजवेल असाच. ओंजळीत असणारा गुलाब तिने देवाच्या चरणाशी वाहिला आणि तिचा कॉफीचा मग घेऊन ती पुन्हा गॅलरीत येऊन बसली. गॅलरीत विखुरलेल्या काही पाकळ्याचा सुगंध अजूनही तसाच होताच. डोळे मिटून तो सुगंध मनात साठवून घेत असताना नकळत तीच मन भूतकाळात गेलं.

*****************
"काका, काही झालं आहे का? नाही म्हणजे त्या अश्या रडत गेल्या म्हणून विचारल!" विक्रांत म्हणाला

"नाही..म्हणजे हो, पण नेमक काय झालंय ते मलाही माहित नाही." मधुकरराव म्हणाले

"मी बोलू का त्यांच्याशी? "विक्रांतने विचारलं

"नाही नको. मी बोलतो तिच्याशी आणि मग गणपतला कळवतो. गणपत चल मी आहेराच पाकीट देऊन निघतो. " मधुकरराव म्हणाले

"हो चालेल, पोरीला जास्त काही बोलू नको आणि नक्की काय झालं आहे ते तिला विचार. तिच्या कलेने घे." गणपतराव हलकेच पाठ थोपटत म्हणाले.

"बाबा, काय झालं असेल तिला? माहित नाही का पण तिच्या डोळ्यात दुःख, त्रास, वेदना..सगळच दिसत होत. काका सुद्धा म्हणाले काही बोलू नको." विक्रांत म्हणाला

"बेटा, थांब त्याला बोलुदे. आपण वाट बघू आणि मधुकर बोलला आहे ना तो कळवेल असं मग आपण थांबुया. चल स्टेजवर जाऊन नव्या जोडप्याला आशीर्वाद देऊन येऊ." विक्रांतला समजावत दोघेही स्टेज वर गेले.

"अर्पिता.. बाळा काय झालं? तुला विक्रांत आवडला नाही का? अग तस असेल तर सांग. मी कुठलीही जबरदस्ती करणार नाही तुझ्यावर आणि तुला दुसरं कोणी आवडत असेल तर तस सांग. हे बघ बाळा तुला चांगल माहीत आहे तुझा बाप जात पात मानत नाही. माझ्या लेकीच्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे." मधुकरराव लेकीला आश्वस्त करत म्हणाले.

"बाबा एक विचारू?" अर्पिता म्हणाली

"हो, विचार ना!" मधुकरराव म्हणाले

"बाबा, मी कुणाची मुलगी आहे?माझे बाबा कोण आहेत?" अर्पिताने विचारलं

"अग, हा काही प्रश्न झाला का? तू माझीच मुलगी आहेस." थरथरत्या हाताने तिचे अश्रू पुसत मधुकरराव म्हणाले.

"बाबा, खर सांगा. मला माहित आहे सगळ आणि या गोष्टी बाहेर पडू नये म्हणून मला कधीच आणि कुणाशीच लग्न करायचं नाहीये." अर्पिता म्हणाली

"नाही अर्पिता..तू चुकतेस. जो निर्णय तू घेतला आहेस तो तुझ्यासाठीच योग्य नाही. तुला सत्य माहीत असलं तरी तुला वाटत तस काहीच नाही. तू माझीच मुलगी आहेस." मधुकरराव म्हणाले

"का खोटं बोलताय बाबा!" अर्पिता म्हणाली

"मी खर बोलतोय अर्पिता.. मीच तुझा बाबा आहे. तू हे सगळ आज का बोलतेस आणि विचारतेस मला माहित नाही पण तुला अर्धसत्य माहीत आहे म्हणून तुला अस वाटते मी तुझा बाप नाही. मला एक गोष्ट खरी खरी सांगशील!" मधुकरराव म्हणाले

"हो" अर्पिता

"तुला कधी वाटल मी तुझ्याशी चुकीचं वागलो आहे. तुला कुठली गोष्ट करू दिली नाही." मधुकरराव म्हणाले

"नाही बाबा.. कधीच नाही." अर्पिताने बाबांचे दोन्ही हात हातात घेऊन उत्तर दिले.

"मग आजच माझ्या बाप असण्यावर प्रश्न का विचारलास.का तुला विचारावं वाटल की तू कुणाची मुलगी आहेस!" मधुकरराव नाराजीच्या स्वरात म्हणाले.

"सॉरी बाबा..चुकले मी पण बाबा.." अर्पिता बोलता बोलता थांबली.

"अजूनही पण आहेच का?बर चल आज तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो मी. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली की मग तरी लग्नाला तयार होशील ना? " मधुकरराव म्हणाले

"हो बाबा." अर्पिता म्हणाली

"आज तुला सगळ सत्य सांगतो. मी ठरवलं होत यासगळ्यापासून तुला लांब ठेवायचं पण आज तुझी इच्छा आहे ना सगळ जाणून घेण्याची आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुला तुझा बाप मी नाही.. अस वाटतेय म्हणून आज सगळ सत्य तुला सांगेन. तुझे सगळे गैरसमज सुद्धा दूर होतील.

********
"बाबा..तुम्हाला काय वाटते म्हणजे अर्पिता जेंव्हा बोलत होती तेंव्हा तुम्ही सुद्धा होतात ना म्हणून विचारतोय! तिच्या बोलण्यातून काही कळलं का?" विक्रांतने ड्राईव्ह करतच विचारले.

"अस काही कळलं नाही बघ, पण खर सांगू मला अर्पिता फार आवडली आहे. मी तिला बऱ्याचदा भेटलो होतो पण कधी मनात विचारच डोकावला नाही की तिला तुझ्यासाठी मागणी घालावी. आता विचारलं आहे तर तिचं उत्तर आधीच नाही आहे." एक मोठा उसासा घेत गणपतराव म्हणाले
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे.




🎭 Series Post

View all