Login

संसार भातुकलीचा भाग ३(अनोखी प्रेम कहाणी)

अनोखी प्रेमकथा
"बाबा..तुम्हाला काय वाटते म्हणजे अर्पिता जेंव्हा बोलत होती तेंव्हा तुम्ही सुद्धा होतात ना म्हणून विचारतोय! तिच्या बोलण्यातून काही कळलं का तुम्हाला?" विक्रांतने ड्राईव्ह करतच विचारले.

" काही कळलं नाही बघ, पण खर सांगू..मला अर्पिता फार आवडली आहे. मी तिला बऱ्याचदा भेटलो होतो पण कधी मनात विचारच डोकावला नाही की तिला तुझ्यासाठी मागणी घालावी. आता विचारलं तर तिचं उत्तर आधीच नाही अस बोलली आहे." एक मोठा उसासा घेत गणपतराव म्हणाले
***********
फोनच्या रींगमुळे अर्पिता तिच्या तंद्रीतून बाहेर आली.

"हॅलो.."फोन उचलून कानाला लावत अर्पिता म्हणाली.

"हॅलो, अर्पिता ऐक ना..एक काम होत.. म्हणजे बघ तुला जमेल का?" विक्रांत म्हणाला.

"हा बोल ना" अर्पिता म्हणाली.

"आमच्या ऑफिसमधे एक प्रोग्राम आहे आणि मान्यवरांना गिफ्ट काय द्यायचं तेच सुचत नव्हत म्हणून मग मी फुलांची किंवा तुळशीची रोप द्यावी का? अस सुचवलं आणि ते सगळ्यांना आवडल म्हणून मग तुला जमेल का हे विचारायला फोन केला होता."विक्रांत म्हणाला.

"हो, जमेल की. न जमायला काय आहे. माझ आवडत काम आहे. तुम्हाला कधी आणि किती हवेत ते सांगा. मागच्या टेरेस वर बरीच झाड आहेत त्यातून देता येतील आपल्याला." अर्पिता म्हणाली.

"फाईन देन, तुला काय लागेल ते सांग आपण संध्याकाळी जाऊन घेऊन येऊया म्हणजे पॉट वैगरे काही लागेल ना म्हणून!" विक्रांत म्हणाला.

"हो चालेल. मी जेवण वैगरे आटोपून घेते आणि मग भेटते." अर्पिता म्हणाली.

"अं..नाही नको, म्हणजे जेवण बनवू नको आपण बाहेरच डिनर करूया. आधी सामान घेऊ मग डिनर करून घरी येऊ." विक्रांत म्हणाला.

"हो चालेल." अर्पिता म्हणाली आणि फोन ठेवून ती घरातली इतर काम आवरून घेऊ लागली.

"शिवू..आज संध्याकाळी आपण बाहेर जायचं. बाबा तू आणि मी.!" अर्पिता आनंदाने म्हणाली.

"कुठे मम्मा?" आनंद मिश्रित आश्चर्याने शिवंण्याने विचारलं

"कुठे ते माहीत नाही पण बाबाने सांगितल आहे आज आपण डिनरसाठी बाहेर जातोय." अर्पिता म्हणाली.


"ये..यिपी..मम्मा मी आज आईस्क्रिम पण खाणार आणि बाबाला सांगून नवीन डॉल पण घेणार आणि माझ्या डॉलसाठी नवे कपडे पण घेणार." खुश होऊन शिवू म्हणाली.

"हो हो सगळ घे. चल आता थोडावेळ झोप मग मी संध्याकाळी तुला उठवते." लेकीला कडेवर घेत तिचा पापा घेऊन अर्पिता म्हणाली.

संध्याकाळी दोघी मायलेकी छानशा तयार झाल्या. अर्पिताने कॅब बुक केली आणि दोघीही डिनरसाठी निघाल्या.

गाडी त्याच हॉटेल बाहेर थांबली जिथे विक्रम आणि अर्पिता पहिल्यांदा भेटलेले असतात.

"आपण आधी पॉट घेऊन मग डिनर केलं असत ना!" अर्पिता म्हणाली.

"पॉट मी घेऊन आलोय आता फक्त डिनर करू आणि मग बीच वर राऊंड मारु. चालेल ना प्रिन्सेस?" शिवूला उचलून घेत त्याने विचारलं.

"हो बाबा.. मला तिकडे गेल्यावर तू काठीवाली कुल्फी घेऊन देशील ना पण!" खोटा खोटा चेहरा बनवत शिवूने विचारलं.

"हो, का नाही देणार पण त्याआधी छान पोटभर जेवाव लागेलं. आमची प्रिन्सेस तर खूपच हुशार आणि गुड गर्ल आहे. हो की नाही ग मम्मा!" अर्पिताकडे बघत विक्रमने विचारलं.


"हो मग, आहेच हुशार..चला आधी जेवून घेऊया आणि मग काठीवाली कुल्फी खायला जाऊया." अर्पिता म्हणाली.

तिघांनीही हॉटेलमधे जेवण केलं आणि मग बीचवर फिरायला गेले. तिकडे कुल्फी आणि म्हातारीची केस खाऊन तिघेही निघाले.

गाडीत बसल्यावर पुन्हा त्या हॉटेल समोरून जात असताना अर्पिता भूतकाळात गेली.
*******************
"बाबा, सॉरी मला खरच वाटल होत मी तुमची मुलगी नाही. आता सगळ्या गोष्टी समजल्या आहेत मला त्यामुळे आता मी लग्नाला तयार आहे. या गोष्टी नंतर बाहेर पडून तुम्हाला त्रास नको म्हणून मी लग्नाला नकार देत होते."अर्पिता म्हणाली.

"हरकत नाही बाळा. उद्या विक्रांतला भेटून घे. मी गणपतला फोन करून सांगतो मग तुम्ही भेटा आणि बोला. ठीक आहे!" मधुकरराव म्हणाले.

"हो बाबा ठीक आहे!" अर्पिता म्हणाली.
***********
"हाय.. " रिक्षामधून उतरून समोर आलेल्या अर्पिताला विक्रांत म्हणाला.

"हाय.." अर्पिता केसांना कानामागे सरकवत उत्तरली.

"जाऊया आतमध्ये? " विक्रांतने विचारलं.

"हो.." नजर झुकवत अर्पिता म्हणाली.
दोघेही एकमेकांकडे चोरून बघत होते. काही न बोलता एकमेकांकडे बघत दोघांनी कॉफी संपवली आणि नंबर अदलाबदली करून दोघेही निघाले.
*********
गाडीचा ब्रेक लागला तशी अर्पिता भानावर आली.
लक्ष गेलं तेंव्हा..छोटी शिवू केंव्हाच तिला मिठी मारून झोपली होती.

"दे घेतो मी तिला!" विक्रांत म्हणाला.
अर्पिताने पण शिवूला विक्रांतकडे दिलं आणि ती बाहेर पडली. आत जाऊन विक्रांतने शिवुला बेडवर अलगद झोपवलं आणि अर्पिताकडे कॉफी मिळेल का म्हणून विचारलं. अर्पिताने पण लगेच हो म्हणत कॉफी बनवली.

"हम्म..कॉफी." कॉफीचा मग समोर धरत अर्पिता म्हणाली.

"थँक्यू! बस ना उभी का आहेस?" विक्रांत म्हणाला.

खुर्ची ऍडजस्ट करून अर्पिता बसली आणि तिने स्वतःचा कॉफी मग हातात पकडला.

"आज माझ्याकडे गाडी आहे, चांगला थ्री बी एच के चा फ्लॅट आहे, अकाऊंट मधे भरगोस रक्कम आहे, पण समाधान नाही ग!" विक्रांत एकटक बाहेर बघत कॉफीचा एक घोट घेत म्हणाला.

"अस का बोलतोस विक्रांत?" अर्पिता त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

"मी लहान होतो. आईबाबा शेती करायचे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नव्हत. इतर मुलांना शाळेत जाताना बघून खूप वाईट वाटायचं. मी नेहमी बाबांना विचारायचो आपण एवढे गरीब का? बाबा म्हणायचे आपण शेतकरी आहोत ना..म्हणून आपण गरीब आहोत. आई मात्र जिद्दी होती माझी. आई म्हणायची आपण गरीब नाही उलट खूप श्रीमंत आहोत. आपल्या जीवावर सगळी दुनिया जगते. आपण शेती करायची सोडली तर लोक काय खाणार..आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण गरीब असू पण अन्न धान्यावाचून कधीच गरीब नाही राहू शकत. सावकाराने पैसे दिले नाहीत तर काही फरक नाही पडणार आपल्याला पण सावकाराला आपण अन्न पुरवठा केला नाही तर तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासमवेत उपाशी राहील. म्हणून सगळ्यात जास्त श्रीमंत कोणी असेल तर तो शेतकरी. आपला सगळ्यांचा लाडका बळीराजा..दुनिया शेतकऱ्याला किंमत नाही देत पण शेतकरी किती किमती आहे हे दुनियेला माहीत नाही.
आईने भाजीपाला विकून थोडे पैसे जमवले होते आणि मग तिने आमच्या शिर्के गुरुजींना विनवणी करून माझा दाखला शाळेत करून दिला.
मी पहीलीच्या वर्गात गेलो. आईने तिच्या साडीची पिशवी शिवून दिली होती. हाताने टाके मारतात तसेच टाके मारून शिवलेली पिशवी त्यात वह्यांची लहान मोठी पान जोडून दोन वह्या पण टाके मारून शिवून दिल्या होत्या. फाटलेले आणि वेगवेगळ्या रंगाच्या चिंध्या लावलेले शाळेचे कपडे आणि साडीची शिवलेली पिशवी बघून सगळे माझ्यावर हसायचे. दोन महिन्यांनी शाळेत वह्या पुस्तके वाटप झालं तेंव्हा मला नवीन कोरी पुस्तक कशी दिसतात हे समजल. त्या पुस्तकांची नवीन पान आणि त्याचा तो सुगंध मला फार आवडायचा..

वर्गात सगळ्यात जास्त हुशार मीच होतो. सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचो. शालेय, आंतर शालेय खेळात नेहमी सहभाग असायचा माझा. गावातल्या शाळेत सातवी पर्यंत शिकलो कारण तेवढेच वर्ग असायचे. पुढील शिक्षण पाच गाव सोडून सहाव्या गावात. सगळेजण सायकल किंवा बैलगाडीने जायचे. मी मात्र चालत जायचो. पायांना फोड यायचे चालून. रोज रात्री आई माझ्या पायांना कोमट तेलाने मालिश करून द्यायची. बाबांना पण माझं खूप कौतुक होत. कारण आमच्या झोपडीवजा घरात सोनेरी रंगाच्या चमचमणाऱ्या माझ्या ट्रॉफी होत्या. आई नेहमी त्या ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र तिच्या पदराच्या टोकाने पुसायची. बाबा पण म्हणायचे.. आपण खूप कष्ट करू पण आपल्या लेकाला खूप शिकवू. आपल्यासारखे दारिद्र्य त्या पोराच्या नशिबी नको.
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे.

0

🎭 Series Post

View all