संसार भातुकलीचा भाग ४(अनोखी प्रेमकथा)

अधुरी प्रेम कहाणी
वर्गात सगळ्यात जास्त हुशार मीच होतो. सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचो. शालेय, आंतर शालेय खेळात नेहमी सहभाग असायचा माझा. गावातल्या शाळेत सातवी पर्यंत शिकलो कारण तेवढेच वर्ग असायचे. पुढील शिक्षण पाच गाव सोडून सहाव्या गावात. सगळेजण सायकल किंवा बैलगाडीने जायचे. मी मात्र चालत जायचो. पायांना फोड यायचे चालून म्हणून रोज रात्री आई माझ्या पायांना कोमट तेलाने मालिश करून द्यायची. बाबांना पण माझं खूप कौतुक होत. कारण आमच्या झोपडीवजा घरात सोनेरी रंगाच्या चमचमणाऱ्या माझ्या ट्रॉफी होत्या. आई नेहमी त्या ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र तिच्या पदराच्या टोकाने पुसायची. बाबा पण म्हणायचे.. आपण खूप कष्ट करू पण आपल्या लेकाला खूप शिकवू. आपल्यासारखे दारिद्र्य त्या पोराच्या नशिबी नको.

मी शिकलो..खूप शिकलो. स्कॉलरशिपच्या जोरावर मी बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुढे जाऊन आईबाबांना हातभार म्हणून एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केली. अभ्यास आणि काम या सगळ्याची सांगड घालून पुढच्या शिक्षणासाठी लोन घेतल.
बारावी नंतर दोन वर्ष डिप्लोमा आणि मग चार वर्ष डिग्री
बी.ई.कॉम्पुटर. गावी मोठ घर बांधल. दोन गाई आणि दोन बैल घेऊन दिले कारण माझ्या कॉलेजसाठी बाबांनी आमच्या सर्ज्याला विकल होत. आईला मोठ मंगळसूत्र बनवलं कारण सणासुदीचे दिवस असताना आईने गळ्यात काळी पोत घातलेली असायची. सगळी सुख आईबाबांच्या पायाशी घातली. त्यांचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही." विक्रांतने त्याच बालपण आणि इथवर येण्याचा संघर्ष सांगितला.


"म्हणून तर माझं प्रेम आहे तुझ्यावर!" त्याच्या हातावर हात ठेवत अर्पिता म्हणाली.

"अर्पिता..आज मी सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर झालो. सहा आकडी पगार घेतोय पण खरच ग..मी समाधानी नाहीये. काही तरी हातून सुटून जात आहे अस वाटत राहते." विक्रांत म्हणाला.

"विक्रांत..मी नेहमी तुझ्या सोबत असेन. विश्वास ठेव माझ्यावर."अर्पिता म्हणाली.

"विश्वास..तुझ्यावर विश्वास ठेऊ..अर्पिता, नको हे असल काही बोलू. विश्वास काय असतो माहीत आहे तुला. घरात एवढी गरीब परिस्थिती असूनही माझ्या आईने बाबांची साथ कधीच सोडली नाही. त्याला म्हणतात विश्वास. बाबांनी तुझा हात माझ्या हातात दिला होता..त्याला म्हणतात विश्वास. मी एवढं प्रेम केलं तुझ्यावर पण तू काय केलंस? विश्वासघात..अर्पिता..कुठे कमी पडलो होतो मी? एवढं सगळ होऊनही मी तुझ्यासोबत तितक्याच प्रेमाने राहीलो आणि वागलो. शारीरिक संबंध ठेवले कारण ती माझी पण गरज होती. तुझ्यासारख मी बाहेर नाही जाऊ शकत.." काहीशा तूच्छतेने विक्रांत म्हणाला.

"विक्रांत..बस कर.. जे झालं ते चुकून झाल. ."तो क्षण असा आला आणि मी त्यात वाहवत गेले. प्लीज विक्रांत.. "अर्पिता काहीशा गील्ट मधे म्हणाली..आणि तिथून निघून गेली.


"अर्पिता.. का गेलीस मला सोडून? आपल्या शिवुला तुझी गरज होती मग का गेलीस? दोन वर्ष..फक्त दोन वर्ष संसार केलास माझ्यासोबत आणि मला एकट पाडलस. नाही अर्पिता...मी तुला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही." विक्रांत स्वतःशी म्हणाला.

"दुसऱ्या दिवशी पहाटे घरातली सगळी कामं आवरून अर्पिता तिच्या कामाला लागली. बावीस पॉट तिला रेडी करायचे होते. प्रत्येक पॉटला रंग देऊन एक मॅसेज लिहून त्यात माती भरली गेली आणि त्यात तुळशीची रोप लावली. प्रत्येक पॉटला एका बॉक्स मधे ठेऊन लाल रंगाची रिबीन बांधून ते सगळे पॉट अर्पिताने टेबल वर व्यवस्थित लावून ठेवले. तिसऱ्या दिवशी विक्रांत ते सगळे पॉट ऑफिसमधे घेऊन गेला. सगळ्यांना गिफ्ट खूपच आवडले.

"अर्पिता..मी उद्या बाहेर जातोय यायला उशीर होईल." विक्रांत म्हणाला आणि निघूनही गेला.
*************
"विक्रांतशी लग्न करून मी चूक तर नाही केली ना?" अर्पिता म्हणाली.

"नाही बेटा.. तू चूक नाही केलीस. तुझ्याबद्दल जे त्याला माहीत नाही ते त्याला समजल पाहिजे पण तू ते सांगायला तयार नाहीस." मधुकरराव म्हणाले.

"खरतर तुम्हाला काका म्हणायचं की बाबा हेच समजत नाही पण..ऐका ना..मी शिवूची आई म्हणून कुठेच कमी पडत नाहीये मग तरी हा अस का वागतोय?" अर्पिता म्हणाली

"अर्पिता माझी लेक..एकुलती एक लेक. लाडाकोडात वाढवली तिला. मी तसा अनाथच होतो. माझी माणस होती पण बाबांचा पैसा आपल्याच माणसांनी लुबाडला आणि त्यांना भिकेला लावली. बाबांसोबत जे घडलं ते मी स्वतः पाहिलं होत. आई तर घरातल्यांच्या त्रासाला कंटाळून केंव्हाच आम्हाला सोडून गेली. आत्महत्या केली होती तिने. बाबांना पण हृदयविकाराचा झटका आला त्यात ते गेले. आमच्या घरात मी एकटाच मोठा होत होतो. घरातल्या माणसांशी मी बोलायचो नाही. विक्रांतचा बाप माझा जिवलग मित्र. त्याची आई नेहमी माझ्यासाठी डब्बा द्यायची. त्याची परिस्थिती पण इतकी चांगली नव्हती. मी शिक्षण अर्धवट सोडून मजुरी करायला लागलो. विक्रांतच्या बाबाच लग्न झालं होत. वहिनी म्हणजे एकदम भारी. दोन वर्ष होतो मी गावात. विक्रांतचा जन्म झाला आणि मी त्याला बघून मुंबईत निघून गेलो. तिकडेच बिल्डिंग वर माझ्यासोबत मजुरी करणाऱ्या एका मित्राने मला एकदा मुंबईच्या रेड लाईट मधे नेल. तिथे लोक कशासाठी जातात हे मला माहीत होत. उसळत रक्त होत अंगात. मी पण पैसे देऊन मजा करून घेतली. त्याच गर्दीत एकदा ती भेटली. हातवारे आणि अश्लील इशारे करून बोलवत होती.
खूप सुंदर होती. मी तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. तिने माझा हात पकडुन एका खोलीत नेल मला. माझ्या अंगावरचे कपडे काढले पण जेंव्हा ती स्वतः नग्न होत होती त्यावेळी मी तिला अडवल आणि तिला विचारलं.

"लग्न करशील माझ्याशी?"
ती बावरली..गोंधळली. मी तिला विचारलं हे तू कशासाठी करतेस. तेंव्हा तिने सांगितल तिच्या घरातल्यांना..ती मुलगी होती म्हणून नकोशी झाली. मी तिच्याकडून वचन घेतल. माझा स्पर्श झाला की तू पुन्हा कुठल्याच पुरुषाचा स्पर्श करून घेणार नाहीस. तिने पण होकार दिला. त्यानंतर ती पुन्हा कुणाशी एकरूप नाही झाली. माझ्याकडुन तिला दिवस गेले. मी मुंबईचा कामधंदा सोडून तिला घेऊन पुन्हा गावी गेलो.

विक्रांत सहा सात महिन्यांचा असेल. गणपत आणि वहिनी दोघांनी आमचं रीतसर लग्न लावलं. मी गावीच शेतीची कामं करू लागलो. तिचे दिवस भरले आणि गावातल्या सुईणीने तीच बाळंतपण केलं. एक गोंडस मुलगी घरी जन्माला आली. नाव ठेवलं अर्पिता.. माझी अर्पिता..
पैश्या वरून तिच्यात आणि माझ्यात रोजचं वाद व्हायला लागले. माझी कमाई तिला अपुरी पडायला लागली. वायफळ हौस मौज करता यायची नाही. अर्पिताच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी ती घर सोडून पळून गेली. मी समजून गेलो ती कुठे गेली ते. तिला घ्यायला किंवा समजवायला मी माघारी नाही गेलो. माझ्या अर्पिताचा बाप आणि आई.. दोन्ही मीच झालो. बायकोने तोंड काळं केलं म्हणून लोक माझ्याकडे तुच्छतेने बघू लागले. माझ्यातच काही कमी असेल अस माघारी बोलू लागले म्हणून अर्पिताला घेऊन मी पुन्हा गाव सोडलं. यावेळी गाव सोडलं ते कायमच. होती नव्हती थोडी जमीन ती आणि घर दोन्ही विकून गेलो. पुण्यात येऊन तिथे स्थायिक झालो. छोटंसं घर घेतल आणि काम शोधल.
अर्पितामुळे आयुष्याला नव नाव मिळालं. तिची इवली इवली पावल त्या छोट्या घरात घरभर फिरू लागली. पै पै जोडून तिला शाळेत घातलं. लेक माझी हुशार होती. मी पण एका कंपनीत कामाला लागलो. नवीन कामात खूप पैसा मिळत होता. तेच पैसे जोडून मी स्वतःचा धंदा सुरू करायचं ठरवलं. पोळी भाजी केंद्र सुरू केलं आणि अर्धवट राहिलेलं माझं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं.
गणपत आणि वहिनी दोघांना मी इकडे बोलावलं होत पण त्यांना त्यांचं गाव सोडायच नव्हत. माझा व्यवसाय हळू हळू वाढत गेला. माझी लेक पण मोठी होत होती. अगदी आईचा चेहरा... नाक, डोळे अगदी आईसारखे.

अर्पिता हळू हळू मोठी व्हायला लागली. माझी आई कुठे आहे? ती कशी दिसायची असे प्रश्न तिला पडू लागले. मी तिला नेहमी सांगायचो तुझी आई देवाघरी गेली. पण मग तिचा पुन्हा प्रश्न असायचा..आई देवाघरी गेली मग तिचा फोटो का नाही?
क्रमशः
©® श्रावणी लोखंडे..

🎭 Series Post

View all