संसार भातुकलीचा भाग ५(अनोखी प्रेमकथा)

अधुरी प्रेम कहाणी
अर्पितामुळे आयुष्याला नव नाव मिळालं. तिची इवली इवली पावल त्या छोट्या घरात घरभर फिरू लागली. पै पै जोडून तिला शाळेत घातलं. लेक माझी हुशार होती. मी पण एका कंपनीत कामाला लागलो. नवीन कामात खूप पैसा मिळत होता. तेच पैसे जोडून मी स्वतःचा धंदा सुरू करायचं ठरवलं. पोळी भाजी केंद्र सुरू केलं. गणपत आणि वहिनी दोघांना मी इकडे बोलावलं होत पण त्यांना त्यांचं गाव सोडायच नव्हत. माझा व्यवसाय हळू हळू वाढत गेला. माझी लेक पण मोठी होत होती. अगदी आईचा चेहरा. नाक, डोळे अगदी आईसारखे.
अर्पिता हळू हळू मोठी व्हायला लागली. माझी आई कुठे आहे? ती कशी दिसायची असे प्रश्न तिला पडू लागले. मी तिला नेहमी सांगायचो तुझी आई देवाघरी गेली. पण मग तिचा पुन्हा प्रश्न असायचा..आई देवाघरी गेली मग तिचा फोटो का नाही?
मी तिला सांगितल..तुला आठवण नको यायला म्हणून नाही लावला. शेवटी एकदिवस जे घडायचं तेच घडल. कुठल्याश्या कामानिमित्त ती पुण्यात आली. पोळीभाजीच दुकान बुधवार पेठेच्या एक किलोमिटर आधी होत. ती आणि तिच्यासोबत तिच्या सारख्या आणखी सात आठ जणी होत्या. मोठ्या सुमो गाडीतून सगळी उतरली आणि समोरच्या चहा टपरीवर चहा पिण्यासाठी गेली. एवढ्या वर्षांनी पण मी तिला बरोबर ओळखलं. आहे तशीच होती. सुंदर..निखळ सुंदर..पुन्हा तिच्या प्रेमात पडावं अशीच. अलीकडे ती आणि पलीकडे मी..आणि एखाद्या सिनेमाप्रमाणे आमची अर्पिता आमच्या दोघांच्या मधोमध होती. बाबा बाबा करणारी अर्पिता.. तिच्या नजरेस पडली आणि क्षणात तिची नजर माझ्यावर खिळली. निरखून बघत होती मला. मी नजर चोरून घेतली आणि अर्पिताला उचलून सरळ दुकानात आलो. दुकानात आराम करण्यासाठी मी एक पोटमाळा काढला होता त्या पोटमाळ्यावर अर्पिताला चढवलं. शेवटी ती दुकानात आली.


"मधुकर.. तू इथे? आणि..आणि ती मुलगी कोण? मी पाहिलं तू घाई घाईत तिला आत घेऊन गेलास. मधुकर..म्हणजे ती अर्पिता..आपली अर्पिता!" ती म्हणाली

"आपली नाही..माझी. माझ्या एकट्याची अर्पिता आहे ती." मधुकरराव म्हणाले.

"नाही मधुकर..तुझी एकट्याची कशी असेल ती. मी जन्म दिलाय तिला. नऊ महिने माझ्या रक्ताच पाणी केलं तिच्यासाठी. एवढ्या कळा सोसल्या, मरणाच्या दारातून परत आले होते आणि तू आता म्हणतोस तुझी एकट्याची आहे ती! नाही मधुकर." ती म्हणाली.

"हे सगळ तुला आता आठवल? जेंव्हा सोडून गेली होतीस तेंव्हा हा विचार नाही आला का तुझ्या मनात? एवढं तान्ह बाळ टाकून गेलीस. तुझ्या पायी अख्या गावात माझी शी थू झाली. माझ्या पाठी बोलणारी लोक समोर टोमणे मारून बोलू लागली. तुझ्यामुळे मी घरदार विकून इथे आलो आणि आता तू नात जोडतेस. काही गरज नाही माझ्या लेकीला तुझ्यासारख्या आईची. माझ्या लेकीचा बाप पण मीच आणि आई पण मीच आहे. समजल!" मधुकरराव आवाज चढवत म्हणाले.

"मधुकर..बाजूला हो. मला माहित आहे आता ज्या मुलीला तू उचलून आत घेऊन गेलास ती माझी लेकच आहे. हो बाजूला." त्याला धक्का मारून बाजूला करत ती आत गेली.
किचनमधून छोट्या लाकडी जिन्यावरून वर चढून ती वरती गेली. गादीवर बसून अभ्यास करणाऱ्या अर्पिताला उचलून खाली आली. अर्पिताला मिठी मारून ती ओक्साबोक्शी रडायला लागली. तिच्यातील मातृत्व जाग झालं. अर्पिताला घेऊन जाणार म्हणून ती हट्टाला पेटली. नऊ वर्षाची माझी अर्पिता गोंधळली आणि रडायला लागली. मी अर्पिताला तिच्यापासून हिसकावून घेतल. तिच्या सोबतच्या सहा सात जणी त्या पण तिथे आल्या. खूप आरडा ओरडा सुरू झाला. रस्त्यावर बघ्यांची गर्दी व्हायला लागली. पोलिसांनी येऊन गर्दी कमी केली आणि तेंव्हा कुठे सगळ शांत झालं. आठ दिवस रोज ती दुकानात येऊ लागली. एव्हाना सगळीकडे समजल होत दुकानात येणारी बाई माझ्या मुलीची आई आहे आणि ती वेश्या आहे. दुकानावर ग्राहकांची गर्दी कमी व्हायला लागली. आयुष्याची घडी नीट नेटकी होत असतानाच सगळा धंदा.. ठप्प झाला. शेवटी दुकान तीन महिने बंद केलं. जी रक्कम होती त्यात तीन महिने घालवले. अर्पिताची परीक्षा झाली तसा लगेच तिचा दाखला काढून आणला. सोलापूर मधल्या कन्या शाळेत तीच नाव घातलं नुसत शाळेत नाही तर तिकडेच तिची होस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा केली. मी पण दुकानाची जागा बदली केली. घरापासून दुकान बरच लांब पडत होत म्हणून मग घर भाड्याने दिलं आणि मी मात्र नवीन दुकानात रहायला लागलो. घराचं भाड आल की तेवढे सगळे पैसे मी अर्पिताला
मनी ट्रान्स्फर मधून पाठवायचो. अर्पिताने तिकडे गेल्यानंतर दोन तीन वर्षांनी पुन्हा तिच्या आईबद्दल विचारलं. मी नेहमीच उत्तर दिलं. शाळा संपल्यावर अर्पिताने कोल्हापुरात यायचं ठरवलं. तिकडे कॉलेज करून एका फर्म मधे ती कामाला जायला लागली. वर्षातून फक्त दोनदा मी माझ्या लाडक्या लेकीला भेटायला जायचो पण ती मात्र महिन्यातून दोन तीन फेऱ्या मरायची. बाप म्हणून पाचशे रुपये मी तिला दिले की ती पण लेक म्हणून नवीन कपड्यांची जोडी घेऊन द्यायची आणि म्हणायची.. बाबा तुम्ही फक्त माझ्यासाठी करता कधी तरी केलेली कमाई स्वतःसाठी पण खर्च करत जावा. एवढी मेहनत करून फाटकी चप्पल घालून येता.. एवढे चटके सोसलेत आता आणखी नको. तेंव्हा वाटायचं माझी लेक आता मोठी झाली.

अर्पितासाठी तळमळणाऱ्या तिने पुन्हा एकदा माझा पाठलाग केला आणि मी अर्पिताला भेटायला कुठे जातो ते पाहिलं. अर्पिताच्या कॉलेजला सुट्ट्या लागणार होत्या. साताऱ्याला मित्राच्या मुलीचं लग्न होत त्या लग्नाला तुला पण यायचं आहे हेच सांगण्यासाठी मी गेलो होतो. तशी अर्पिता अधून मधून यायची घरी पण रात्रीची यायची आणि रात्रीची जायची तस मीच सांगितल होत तिला आणि नवीन दुकान आधीपेक्षा मोठ असल्याने जागा जास्त होती. शिवाय मागे पण एक दरवाजा होता. माहित नाही का पण मी अर्पिताला लपवून ठेवू लागलो. अर्पिता नेहमी विचारायची बाबा अस का करता? पण मी तिला काहीबाही कारणं सांगून वेळ मारून न्यायचो. यावेळी अर्पिता साताऱ्याला येण्याआधीच ती भेटली. अर्पिताच्या मनात माझ्या विरुध्द बरच काही भरल तिने. अर्पिता जेंव्हा लग्नात आली तेंव्हाच विक्रांत सुद्धा आला होता.
विक्रांतला अर्पिता आवडली हे आम्हाला समजायला वेळ लागला नाही. गणपतने तिथेच अर्पिताला विक्रांत सोबत लग्नासाठी मागणी घातली. अर्पिताने लग्नाला नकार दिला.
आम्ही सगळेच धक्क्यात होतो तिने अस का केलं म्हणून. जेंव्हा मी जाऊन तिला विचारलं तेंव्हा तिने मला प्रश्न केला. मी कुणाची मुलगी आहे? माझे बाबा कोण आहेत?
त्याचवेळी मी समजलो काहीतरी गोम आहे. माझ्या लग्नापासून ते तिच्या जन्मानंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी मी तिला सांगितल्या. पुरावा म्हणून डॉक्टरांची चाचणी पण करतो हे सुद्धा सांगितल तेंव्हा कुठे तिचा माझ्यावर विश्वास बसला.
दुसऱ्या दिवशी विक्रांतला भेटून तिने लग्नासाठी होकार दिला पण त्याआधी ती कुणाची मुलगी आहे आणि काय हे सगळ तिने विक्रांतला सांगितल कारण तिला कुठल्याच खोट्यावर नवीन नात्याची सुरुवात करायची नव्हती. विक्रांतला फक्त अर्पिता महत्वाची होती तिचा भूतकाळ नाही ज्यात तिचा काहीच दोष नव्हता. मोजक्याच माणसात विधिवत दोघांचं लग्न झालं. गणपत आणि माझी मैत्री आणखी एका नात्यात घट्ट बांधली गेली. माझ्या लेकीचा सुखाचा संसार व्हावा इतकंच वाटत होत. प्रत्येक बापाची इच्छा असते लेकीचा संसार सुखाचा व्हावा. अर्पिताने काम सोडलं आणि संसारात रमली.

दोन वर्षांनी अर्पिताला दिवस गेले. मी आजोबा होणार कळताच लागलीच तिला भेटायला गेलो. विक्रांतची आई आता त्यांच्या सोबत रहायला आली. अर्पिताचे सगळे लाड..तिचे डोहाळे सगळ काही वहिनींनी अगदी आई असल्या प्रमाणे पुरवले. माझी लेक आई होणार होती. खूप खुश होतो आम्ही सगळे. डोहाळे जेवण होत त्याच दिवशी अचानक अर्पिताच्या पोटात दुखू लागलं. आम्ही तातडीने तिला दवाखान्यात नेल आणि..पुढे जे नको होत तेच घडलं..

क्रमशः

©® श्रावणी लोखंडे.

🎭 Series Post

View all