संसार भातुकलीचा भाग ७ (अनोखी प्रेमकथा)

अधुरी प्रेम कहाणी
"बाबा अहो.. पण  तो घरी आला होता फक्त माफी मागायला मग माफी मागून निघून जायचं होत ना! त्याने आणि त्याच्या कुटुंबाने तिच्यावर आरोप लावले होते. ते पण कधी?  सहा वर्षांपूर्वी. सहा वर्षांनंतर हा माफी मागायला आला. घटस्फोट झाला तेंव्हा तर मोठ्या रुबाबात म्हणाला होता तुझ्यासारख्या छप्पन भेटतील मग का नाही गेला तिकडे. की छप्पन पैकी एकही भेटली नाही त्याला! माझा विश्वासघात केला हिने… वाढदिवस होता हीचा म्हणून लवकर आलो होतो हिला..या बाईला सरप्राइज द्यायला पण..पण मलाच धक्का दिला हिने. आता अस वाटते उगाच हिला माझ्या अर्पिताच नाव दिलं. माझ्या अर्पिताच्या नावाला कलंक लावला हिने..

"बस कर विक्रांत. सारखं आपल माझी अर्पिता..माझी अर्पिता..अरे माझ काही अस्तित्व आहे की नाही. गेली सहा वर्षे तुझ्या सोबत संसार करतेय पण तू एकदा तरी माझ्यासोबत संसार केलास का? प्रत्येकवेळी माझी अर्पिता. मी सुद्धा मूर्ख. तुझ्यावर प्रेम केलं आणि एकदिवस तरी तुला माझं करेन हा विचार करून नेहमी माझी अर्पिता बोलून सुद्धा मी काही बोलले नाही. खरतर ना इथेच चुकल माझं. आधीच अर्पिता हे नाव मी मान्य करायला नको होत. दिवस रात्र फक्त माझी अर्पिता अशी होती, माझी अर्पिता तशी होती. मान्य आहे तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम होत मी कुठे नाकारलं ते... शिवूला सुद्धा माझी मुलगीच मानल..त्यापेक्षा जास्त जपल मी तिला. लग्नानंतर गरोदर राहिले पण ते बाळ सुद्धा नको म्हणालास. का? तर शिवूला अंतर नको म्हणून. त्याही वेळी मी माझ्या मातृत्वाचा त्याग केला. अजून कितीतरी गोष्टी समजून घेतल्या मी. तुझ प्रेम मिळालं पण फक्त रात्री पुरता. माझी इच्छा आहे की नाही याचा काहीच संबंध नसल्यासारखं. मी पण कधी नको म्हणाले नाही का तर नवऱ्या सोबत घटस्फोट घेतला होता तुझ्याकडे पैसा खूप होता उद्या तू मला ही सोडलं तर मी शिवू शिवाय राहू शकले नसते म्हणून ते ही सहन केलं. गुप्तांगावर होणाऱ्या जखमांना औषध लावून बर करता आल रे..पण मनावर झालेल्या जखमा नेहमी रक्तबंबाळच होत राहिल्या." अर्पिता सोफ्यावर बसून हुंदके देऊन रडू लागली.

"विक्रांत..अर्पिता काय बोलतेय? आणि जे बोलतेय ते सगळ खर आहे?" मधुकररावांनी विचारलं.

"बाबा,मी तिला बायकोचं स्थान दिलं आहे." विक्रांत नजर खाली करून म्हणाला.

"बायकोचं स्थान दिलं आहेस म्हणजे नेमक काय केलं आहेस? तिच्यावर उपकार केलेस की शिवू वर?" एक जळजळीत कटाक्ष विक्रांतकडे टाकत मधुकरराव म्हणाले.

"बाबा.."विक्रांत पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याच्या गालावर एक सणसणीत चपराक बसली.

"अरे...नाक कापलंस माझं. अरे नालायक माणसा.. बायको आहे ती तुझी. उपभोग घेण्याची वस्तू नाही. आम्ही त्या पोरीला या घरात घेऊन आलो कारण तिला बाळाची आणि तुझ्या लेकीला आईची गरज होती म्हणून.. पण तू तर खरच तिचा उपयोग करून घेतलास. आम्ही असताना तुझ तिच्याशी प्रेमाने वागणं हे खोटं होत का?" दारातून आत येत गणपतराव म्हणाले.

"गणपत.. अरे तू शांत हो...आणि तू इथे असा अचानक कसा?" मधुकररावांनी विचारलं

"अचानक आलो म्हणून हे सगळ समजल तरी.. आम्हाला दोघांना वाटत होत आमची सूनबाई खुश आहे. तिच्या संसारात आनंदी आहे. अर्पिताला गावच्या भाज्या आवडतात म्हणून हिने घेऊन पाठवल्या होत्या. पोरीच माहेर लांब आहे. तिच्या आईवडिलांना शेती सोडून येता येणार नाही म्हणून हिने घेऊन पाठवले. इकडे येऊन बघतो तर हे सगळ..." डोक्याला हात लावून गणपतराव म्हणाले.

"बाबा,अहो नका त्रास करून घेऊ. मी खरच खुश आहे. मला फक्त माझा वेळ, माझं हक्काचं अस काही हवं आहे विक्रांत कडून. जे मी बोलू शकेन हे माझं आहे. मी अर्पिता ताईंचा राग नाही करत, खरच.. पण मला नाही आवडत सारखी माझी तुलना त्यांच्याशी झालेली." अर्पिता म्हणाली.

"तुझी तुलना तिच्याशी होऊच शकत नाही. कारण तिने तुझ्यासारखी काम कधीच केली नाहीत समजल."विक्रांत चिडून बोलला.

"अरे, तिने केली असेल चूक.. काय बिघडलं मग! नवऱ्याकडून प्रेम मिळत नसेल तर कोणीही अस करेलच की. अर्पिता..तुला याच्यापासून घटस्फोट हवा असेल तर सांग. मी स्वतः तुला याच्यापासून घटस्फोट मिळवून देईन." गणपतराव रागातच म्हणाले.

"गणपत, अरे काय बोलतोयस? लग्न आणि संसार म्हणजे तुला भातुकलीचा खेळ वाटतो का? एकदा डाव मोडला म्हणून दुसरा मांडला आणि दुसरा मोडून तिसरा! मुलांना समजवायच सोडून तू हे काय बोलतोस! अरे अर्पिता मला माझ्या लेकिसारखीच आहे. तिच्या आईवडिलांना या गोष्टी कदाचित माहीत नसतील कारण हे सगळ जर त्यांना माहीत असत तर त्यांनी त्यांच्या मुलीला केंव्हाच नेल असत. अर्पिताने हे सांगितल नाही कारण तिला हा संसार हवाय... आपली नात तिला तिच्या आयुष्यात हवी आहे. बायको,सून आणि आई म्हणून ती कधीच तिच्या कर्तव्यात अपुरी पडली नाही मग अश्यावेळी आपण तिच्या सोबत असण महत्वाचं की तिला या सगळ्यापासून लांब करण! " मधुकरराव म्हणाले.


"काय समजावू मी तिला सांग. विक्रांत.. खर खर सांग. आज सहा वर्ष झाली तुमच्या लग्नाला. एकदा तरी तिला तुझी बायको म्हणून पाहिलं का? मान्य आहे तू बायको म्हणून तिला वरल आहेस पण तो हक्क अधिकार कधी दिलास? रात्री एकरूप होताना तिची परवानगी तिची सहमती विचारलीस? हे संस्कार नाही केले रे आम्ही तुझ्यावर मग तू का चुकलास? गेली सहा वर्षे तू चुकत होतास तरी तिने तुला सांभाळून घेतलं आणि तू तिच्या एका चुकीसाठी एवढे बोल लावतोस. तू जर आधीच तिला आणि आपल्या अर्पिताला वेगळं ठेवलं असत तर आज ही वेळ आली नसती." गणपतराव सौम्य शब्दात म्हणाले.

"बाबा, अर्पिता माझ सगळ काही होती..आहे आणि कायम राहील. मी तिला गमावलं असल तरी तिला माझ्या मनातून जर काढल तर तिच्यासोबत विश्वासघात केल्यासारख होईल. बाबा..मला अर्पिता माझी बायको म्हणून नेहमीच हवी आहे. बाकी गोष्टी बोलाल तर ती एक गरज आहे. मला नाही समजत मी काय करायला हवय. पगार झाला की तिला खर्चाला पैसे देतो. तिची सगळी हौस मौज करतो. काय नाही घरात. सगळ्या सुख सुविधा आहेत. काहीच कमी पडू दिलं नाही आहे मी तिला." विक्रांत म्हणाला. त्याच्या प्रत्येक वाक्यावर प्रत्येक शब्दावर अर्पिताच्या डोळ्यातून पाणी वाहत होत.


"विक्रांत.. पैसा,सुख सुविधा, दागदागिने.. हे प्रत्येक स्त्रीला पाहिजे अस नाही. तुझ्याकडे सगळ आहे आणि ते तू तुझ्या हिमतीने तुझ्या मेहनतीने केलं आहेस याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. पण विक्रांत..काही बायका अश्या असतात ज्यांना फक्त पैसा हवा असतो पण काही बायका आपल्या अर्पिता सारख्या सुद्धा असतात ज्यांना पैसा नाही.. आपला माणूस..त्याचा वेळ.. त्याच्या सहवास, प्रेम आणि आधार याची गरज असते."मधुकरराव म्हणाले.

"विक्रांत..अजूनही वेळ गेली नाही. चूक प्रत्येकाच्या हातून घडते. ही चूक जर तुझ्या हातून घडली असती तर.. तू सुद्धा चुकला आहेस. हयात नसलेल्या बायकोवरच्या प्रेमापोटी दुसऱ्या बायकोचा हक्क आणि अधिकार हिरावला आहेस. दोघांनी एकमेकांना वेळ द्या. नात्याची नव्याने सुरुवात करा. झाल्या गेल्या गोष्टी मागे सोडा. विक्रांत, अर्पिता आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती आणि कायम राहील पण आपल्या एका लेकीमुळे दुसऱ्या लेकीला त्रास झालेला आम्हाला अजिबात आवडणार नाही." अर्पिता आणि विक्रांतचा हात हातात घेऊन गणपतराव म्हणाले.
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे..

🎭 Series Post

View all