संसार भातुकलीचा भाग ८( अनोखी प्रेमकथा)

अधुरी प्रेम कहाणी
"विक्रांत..अजूनही वेळ गेली नाही. चूक प्रत्येकाच्या हातून घडते. ही चूक जर तुझ्या हातून घडली असती तर.. तू सुद्धा चुकला आहेस. हयात नसलेल्या बायकोवरच्या प्रेमापोटी दुसऱ्या बायकोचा हक्क आणि अधिकार हिरावला आहेस. दोघांनी एकमेकांना वेळ द्या. नात्याची नव्याने सुरुवात करा. झाल्या गेल्या गोष्टी मागे सोडा. विक्रांत.....अर्पिता आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती आणि कायम राहील पण आपल्या एका लेकीमुळे दुसऱ्या लेकीला त्रास झालेला आम्हाला अजिबात आवडणार नाही." अर्पिता आणि विक्रांतचा हात हातात घेऊन गणपतराव म्हणाले.

"बर हे बघा... येत्या दोन दिवसात शिवूला नाताळची रजा पडेल ना.. तर मी विचार करतोय तिला काही दिवस गावी घेऊन जाऊया. असही तिला पण गावी खूप आवडत. गाई गुरांमधे शेळ्यांमधे ती छान रमते. मधुकर..तुझ काय मत आहे यावर?" गणपतराव म्हणाले.

"मस्तच..मला आवडल हे. गणपत, मी काय म्हणतोय मी पण येतो की मग चार दिवस माझ्या नातीसोबत खेळायला. चालेल का?" मधुकरराव म्हणाले.

"अरे चालेल काय..धावेल. हे बघा, अर्पिता आणि विक्रांत. नाताळची सुट्टी आहे तर आम्ही शिवुला घेऊन जातोय आणि हे ठरल. तुम्ही तुमचा वेळ घालवा. एकमेकांना समजून घ्या. हवं तर जरा बाहेर जाऊन या. शिवुला चांगली वीसेक दिवस सुट्टी असेल ना. एक काम करा. आठ दिवस बाहेर जावा. चार दिवस घरी थांबा आणि मग शिवूला घ्यायला याल तेंव्हा गावी चार दिवस रहा. आम्हाला पण तेवढं बर वाटेल. काय मधुकर...वीस दिवसांचा हिशोब बरोबर लावला ना?" गणपतरावांनी विचारलं.

"एकदम बरोबर." मधुकरराव म्हणाले.

"ये...मी गावी जाणार..मी गावी जाणार..मी गावी जाणार. " शाळेतून घरी आलेली शिवंण्या आनंदाने उड्या मारत म्हणाली.

"शिवू..तू कशी आलीस बाळा?" अर्पिताने काळजीने विचारलं.

"अग मम्मा, आपल्या कामवाल्या ताई मावशी आहेत ना त्यांच्यासोबत आले मी. मम्मा, मी खरच आजोबाबांसोबत गावी जायचं का? सांग ना मम्मा." अर्पिताची हनुवटी पकडुन लाडीकपणे शिवंण्या तिला विचारत होती. अर्पिता काही न बोलता एक नजर विक्रांतकडे बघते तसा लगेच प्रश्नांचा मोर्चा विक्रांतकडे वळवत पुन्हा शिवंण्या म्हणाली.

"बाबा, तू खरच मला गावी पाठवणार? सांग ना! " शिवंण्याने पुन्हा तेच विचारलं.

"तुला जायचं आहे का? "विक्रांतने विचारलं.

"हो. "इवलूसा चेहरा करत ती म्हणाली.

"बर मग जा..पण अजून टू डेज स्कूल आहे ओके.."विक्रांत म्हणाला.

"ये... आजोबाबा मी गावी येणार.."आनंदाने उड्या मारत शिवू गणपतरावांच्या गळ्यात पडली. तिला नीट उचलून घेत ते तिच्या खोलीकडे गेले.

"विक्रांत आणि अर्पिता..तुम्ही पण आता कुठे जायचं ते ठरवा आणि खरच थोडा वेळ द्या एकमेकांना. आपल्या आयुष्यात जोडीदार किती महत्वाचा असतो हे त्यांना विचार ज्यांना त्यांची सोबत नाही. थोडे दिवस एकमेकांपासून लांब राहिलात तरी तुम्हाला समजेल आपल्याला एकमेकांची किती गरज आहे ते.
तुमच्या लग्नापासून सगळ्या गोष्टी अर्पिता तुला वेळच्या वेळी आणून देते ना.. तुझी प्रत्येक गोष्ट वेळेच्या आधी पूर्ण होते ती अर्पिता आहे म्हणून. हवं तर आम्ही चार दिवस आमच्यासोबत तिला घेऊन जातो. तू विचार कर आणि ठरव." थोड करड्या स्वरात मधुकरराव म्हणाले आणि ते ही शिवूच्या खोलीत निघून गेले.

इकडे मात्र दोघेच एकमेकांपासून नजर चोरून उभे होते. कोणी काहीच बोलेना. शेवटी विक्रांतने पुढाकार घेतला.

"सिमलाच्या दोन तिकीट बुक करतो पाच दिवसांसाठी.. तुझ पासपोर्ट आणि इतर डॉक्युमेंट मला दे म्हणजे ऑनलाईन प्रोसेस करून घेतो लगेच. सुट्टीसाठी मेल केला आहे सरांना.. माझ्या सुट्ट्या पेंडींग आहेत त्यामुळे सुट्टीचा इशु होणार नाही. वीस दिवसांची सुट्टी टाकली आहे. मी खोलीत जातोय. कॉफी घेऊन ये आणि मग डॉक्युमेंट पण दे. " मोबाईल मधे बघतच एखाद्या मशीन प्रमाणे सगळ्या गोष्टी बोलून विक्रांत खोलीकडे निघून गेला पण तो जे काही बोलला ते ऐकून अर्पिता मात्र फार खुश झाली. तिने तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्याची सुरुवात सुद्धा केली.
******************
"काका आणि बाबा..थँक्यू सो मच. अर्पिता ताईंचे बाबा असलात तरी आज माझे बाबा असल्यासारखे माझ्या पाठीशी ठाम उभे राहिलात. दोघांनाही खूप खूप थँक्यू. मी एकदा चुकले असले तरी पुन्हा आता अस कधीच होणार नाही खरच. मिलिंद माझी माफी मागायला आले होते. माझा पाय अडखळून मी पडणार होते तेवढ्यात त्यांनी सावरलं आणि.."अर्पिता बोलायची थांबली.

"आता जे झालं त्याला पाठी सोड. त्याने सिमलाची तिकिटे काढली आहेत ना मग जावा मस्त मज्जा करा. दोघांच्या मनात एकमेकांविषयी काही अडी असेल तर ती ही दूर करा आणि पुन्हा इकडे याल ते एकमेकांना एकमेकांसाठी सुपूर्त करूनच या..काय!" भुवया उडवत गणपतराव म्हणाले.

"हो बाबा." अर्पिता म्हणाली.


"मम्मा..माझी बॅग कधी पॅक करायची? चल लवकर. टू डेज नी मी जाणार आहे ना. मम्मा.. माझ्या छोटु वासरूसाठी चॉकलेट पण हवेत हा आणि तू मिल्क मधे टाकतेस ती छान वाली पावडर ती पण दे. मी आणि हम्माच छोटू वासरू आम्ही एका ग्लास मधून ते यम्मी मिल्क पिणार." गावच्या छोट्या वासराबद्दल तिची ओढ बघून सगळेच तिच्या हो ला हो करत गोड हसत होते.

"बाबा..तुम्ही दोन दिवस आहात तर मग आपण इथे बालउद्यान आहे तिथे जाऊया का उद्या? खूप छान आहे!" अर्पिताने जेवणाची पान वाढता वाढता विचारले.

"हो आजोबाबा..आपण जाऊया का? माझी उद्याची स्कूल सकाळची आहे मग मी उद्या पण आज सारखी लवकर येणार. प्लीज जाऊया ना!" शिवंण्या म्हणाली.

"काय ग..तुझी स्कूल नक्की कधीची असते?" गणपतरावांनी विचारलं.

"अहो बाबा..तिची शाळा सकाळचीच असते पण मोठ्या मुलाच्या परीक्षा सुरू होत्या म्हणून काही दिवस तिची शाळा दुपारची होती. कालपासून पुन्हा सकाळची झाली आणि आज खरतर शाळा लवकर सुटणार होती आणि नेमकी मी विसरले. आपल्या कामवाल्या ताई शेजारच्या बिल्डिंग मधल्या मुलीला त्याचवेळी सोडायला जातात. मी दिसले नसेन म्हणून त्या घेऊन आल्या शिवुला."अर्पिता म्हणाली.

"अच्छा! चालेल मग जाऊया उद्या. आज रात्री आपण शिवुची बॅग पॅक करायची आणि मग उद्या थोडंसं फिरून झालं की परवा लगेच आपल्या गावी जायचं." गणपतराव म्हणाले.

शिवंण्या दोन दिवसांनी तिच्या दोन्ही आजोबाबांसोबत गावाला गेली. विक्रांत आणि अर्पिता पण सिमलाला जाण्याआधी थोडी खरेदी करून मग निघाले. दोघांनी एकमेकांना जो हवा तो वेळ दिला. नात्याला आलेली जळमट हळू हळू निघून गेली. सिमलाच्या त्या थंड वातावरणात पाच दिवस एकमेकांना नव्याने ओळखल गेलं. परतीचा प्रवास हा मुंबई पुणे असा होणार होता म्हणून मग मुंबईची फ्लाईट घेऊन दोघेही मुंबई विमानतळावर उतरले. सगळ्यात आधी महालक्ष्मीच दर्शन घेतल मग हाजीअली करून संध्याकाळच्या वेळी दोघेही गेटवे ऑफ इंडियाला आले. भव्य असा तो गेट. फक्त ऐकण्यात आलेला ताज हॉटेल ती पहिल्यांदाच प्रत्यक्ष बघत होती. दोघेही हॉटेलमधे गेले. समोरच असलेले गणपती बाप्पा..तिच्याही नकळत हात जोडले गेले बाप्पा समोर. हळदी कुंकू लावून औक्षण करत त्यांचं झालेलं स्वागत मग दोघे तिथल्या फूड लॉन मधे गेले. तिथे एक कोल्ड कॉफी विथ आईस्क्रिम ऑर्डर करून दोघेही अगदी नव्या कपल सारखे ते एंजॉय करू लागले. तासाभराने दोघेही तिथून निघाले आणि समुद्र किनारी आले. तिथे थोडावेळ बसले. मुंबईच्या समुद्र किनारी येऊन जर भेळ खाल्ली नाही तर काहीच फायदा नाही अस म्हणून विक्रांत भेळ आणायला गेला. विक्रांतकडे बघून एक मोठा उसासा घेत तिने तिच्या डॉक्टरांना कॉल केला.


"हा डॉक्टर बोला. तुमचा मॅसेज पाहिला मगाशी. सोबत विक्रांत होता म्हणून कॉल केला नाही." अर्पिता म्हणाली.

समोरून डॉक्टरांनी काहीतरी सांगितल आणि एकदम अर्पिताच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

"ओके डॉक्टर ठीक आहे. मी उद्याच हॉस्पिटल मधे येते." अस म्हणून अर्पिताने फोन ठेवला.
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे..


🎭 Series Post

View all