संसार भातुकलीचा भाग ९(अनोखी प्रेमकथा)

अधुरी प्रेम कहाणी
"हा डॉक्टर बोला. तुमचा मॅसेज पाहिला मगाशी. सोबत विक्रांत होता म्हणून कॉल केला नाही." अर्पिता म्हणाली.

समोरून डॉक्टरांनी काहीतरी सांगितल आणि एकदम अर्पिताच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

"ओके डॉक्टर ठीक आहे. मी उद्याच हॉस्पिटल मधे येते." अस म्हणून अर्पिताने फोन ठेवला.

*************
"डॉक्टर आल्या आहेत का?" अर्पिताने रिसेप्शनिस्टला विचारले.

"हो आल्या आहेत. तुमचं नाव?" रिसेप्शनिस्टने विचारलं

"मिसेस. अर्पिता देसाई. प्लीज डॉक्टरांना सांगा मी आली आहे. स्पेशल अपॉइंटमेंट घेतली आहे मी त्यांची." अर्पिता म्हणाली.


"ओके मॅडम, तुम्ही बसा मी विचारून सांगते." रिसेप्शनिस्ट म्हणाली आणि तिने लगेच इंटरकॉम करून अपॉइंटमेंट बद्दल सांगितल. तस डॉक्टरांनी लगेच सांगितल.

"पाठव त्यांना आत." डॉक्टर म्हणाल्या

"मिसेस देसाई. तुम्ही जावा. " रिसेप्शनिस्ट म्हणाली.
थँक्यू. तिचे आभार मानत अर्पिता आत गेली.

"येऊ का?" अर्पिताने दारातूनच विचारलं.

"हो या, बसा." डॉक्टर म्हणाल्या.

"मिसेस देसाई..हे तुमचे रिपोर्ट. मिसेस देसाई तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे. या फिल्मध्ये हा जो मोठा वर्तुळाकार ठिपका आहे ना... तो ट्युमर आहे. तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे आणि तो ही शेवटच्या टप्प्यात. मी कोणतीच खोटी आश्वासने देणार नाही. आता कोणतीही ट्रीटमेंट करून काही उपयोग होणार नाही. तुमच्याकडे किती महिने, किती दिवस किंवा किती तास राहिलेत हे ही माहित नाही. इतकंच सांगेन उरलेले जे दिवस आहेत ते आनंदाने आणि भरभरून जगा. "डॉक्टर तिच्या बाजूच्या खुर्चीत बसून तिला थोपटत शांतपणे म्हणाल्या.
अर्पिता मात्र निशब्द झाली होती. डोळयातून अश्रू धारा वाहत होत्या. पाच दिवसांपूर्वी नात्याची नव्याने झालेली सुरुवात आठवून अचानक तिचं डोकं जड झाल. सुखावर पडलेलं दुःखाचं विरजण ती अनुभवत होती. डॉक्टरांनी तिला काही औषध लिहून दिली. अर्पिता हॉस्पिटल मधून निघाली आणि सरळ बाप्पाच्या मंदिरात गेली.

"आता कुठे सुखाने ओंजळ भरली होती आणि तू लगेच ती ओंजळ रीती केलीस. का अस केलस? आत्ता कुठे सुखाने दारत पाऊल टाकलं होत पण ते सुद्धा इतक्या मोठ्या दुःखाला सोबत घेऊन आल.
निदान किती काळ आहे ते तरी सांगायचं होत. तेवढे दिवस भरभरून जगले असते पण आता येणारा प्रत्येक क्षण मरणाची भीती घेऊन येणारं. बाप्पा..आता तुझ बोलावणं येणारच आहे तर एकच विनंती करते. मला फक्त पंधरा दिवस दे.
तुझ्यापुढे पदर पसरते.. भीक मागते मी. फक्त पंधरा दिवस दे." गुढघ्यावर बसलेली अर्पिता साडीचा पदर बाप्पाच्या गाभाऱ्यात खाली जमिनीवर पसरून म्हणाली.

"पोरी.. आपल्या वाट्याला जे भोग येतात ते भोगावेच लागतात.मरण कुणाल चुकलं नाही. ज्याने जन्म घेतला आहे तो एकदिवस मरणार आहेच. हीच नियती आहे हाच निसर्गाचा नियम आहे.मृत्युचक्र कधीच थांबत नसत. अग बाळा..तुला माहित तरी आहे तू मरणार आहेस ते पण काही जणांना तर त्यांचं मरण माहीतच नसत. हे घे.. बाप्पाचा प्रसाद. जेवढे दिवस आहेस तेवढे दिवस आनंदाने जग." मंदिरातील पुजारी बाबा म्हणाले.बाप्पाच दर्शन घेऊन अर्पिता घरी आली.

घरी येऊन बघते तर विक्रांतने घरात छान छोटे छोटे दिवे लावले होते. घरात तिच्या आवडीच्या चाफ्याचा सुगंध दरवळत होता. घराच्या मध्यभागी येताच. तिच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. डोळ्यात आसू आणि ओठांवर हसू अशी अवस्था झाली. कुठलाही विचार न करता अर्पिताने धावत जाऊन विक्रांतला मिठी मारली. त्याचेही हात तिच्याभोवती घट्ट झाले. डोळ्यातल्या अश्रूंनी सगळी मळभ नाहीशी झाली. त्याने तिची हनुवटी तर्जनिने वर केली आणि मग तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेत तिच्या जवळ जाऊ लागला. ती ही त्याच्या जवळ जाणार होती इतक्यात तिला डॉक्टरांचे शब्द आठवले. तिने विक्रांतला दूर लोटलं. ती पळत पळत तिच्या खोलीत गेली. विक्रांतला वाटल ती लाजून वर गेली असेल कारण असा क्षण त्यांच्यात याआधी कधीच आला नव्हता. तिच्या परवानगी शिवाय फक्त स्वतःची कामवासना पूर्ण करत आला होता तो.
रुममध्ये गेल्यावर बघते तर काय? रूम सुद्धा संपूर्ण फुलांनी सजवली होती. एका बाजूला एक टेबल त्यावर एक केक होता. ज्यावर लिहिलं होत. न्यू बिगिनिंग आणि हार्ट काढले होते. दुसऱ्या बाजूला आय लव्ह यू चा टॅग आणि त्याखाली एका चॉकलेट वर अर्पिताच नाव. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली होती. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला आणि ती जागीच कोसळली.
आतमध्ये आलेल्या विक्रांतने हे सगळ पाहिलं आणि त्याने लगेच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर घरी आले. त्यांनी चेक केलं. स्ट्रेसमुळे अर्पिताचा बीपी लो झाल्याकारणाने तिला चक्कर आली होती अस डॉक्टरांनी सांगितल. काही औषध लिहून दिली आणि ते निघून गेले.

"अर्पिता..आय एम सॉरी. तुला हे सगळ आवडल नाही का? म्हणजे सॉरी. मला वाटल होत तुला सगळ खूप आवडेल म्हणून ते मी.." विक्रांत अर्पिताचा हात हातात घेत म्हणाला.


"नाही विक्रांत अस काही नाही. उलट खूप छान केलस सगळ. माझा आवडता चाफा.. आपले कितीही वाद असेल किंवा बोलत नव्हतो तरी तुला माझी आवड लक्षात राहिली हेच खूप आहे माझ्यासाठी. आत्ताचं बोलशील तर..तुझ हे सरप्राइज खूप आवडलं मला. मी एवढी मोठी चूक करून सुद्धा तू मला आणखी एक संधी दिलीस त्यातच सगळ काही आल." अर्पिता म्हणाली.

"चुकलो तर मी पण होतोच की. मीच आधी तुला सगळ्या गोष्टी दिल्या असत्या तर तुझ्याकडून चूक झालीच नसती. आणि आता झाल्या गोष्टींवर बोलण्यापेक्षा आपण आता नव्याने आयुष्य जगूया आपल्या शिवू सोबत."विक्रांत म्हणाला.

"हो, झाल्या गोष्टी आता आठवून काहीच उपयोग होणार नाही. असही माझ्याकडे फार दिवस नाहीत." अर्पिता पटकन बोलून गेली.

"काय?? फार दिवस नाहीत म्हणजे?" प्रश्नार्थक नजरेने त्याने विचारल.

"अरे म्हणजे आपण उद्या गावी जाणार ना. मग शिवू इकडे आली की वेळ कसा मिळणार आपल्याला. अस बोलायचं होत. "कशीबशी स्वतःची बाजू सावरत अर्पिता म्हणाली.

"अच्छा ते होय. त्याची काळजी नको करू. आपल गावच घर काय लहान आहे का? एवढा मोठा बंगला बांधला आहे तो कुणासाठी. एक काम कर, आपण उद्या जाणार आहोतच ना मग तुझ्या आईबाबांना पण फोन कर आणि बोलावून घे. आपण छान मज्जा करूया तिकडे."विक्रांत म्हणाला.

"त्याची काही गरज नाही, कारण सकाळीच मधुकर काकांचा फोन आला होता. ' तुझ्या आईबाबांना पण बोलावलं आहे आम्ही इथे, तुम्ही उद्या लवकर निघा. अर्पिता म्हणाली.

"मग ठीक आहे. घरी काय खाऊ घ्यायचा आहे तो उद्या जाताना वाटेत गाडी थांबवू आणि घेऊ." विक्रांत म्हणाला.

दोघांच्या गप्पा सुरू असताना अचानक अर्पिताला खोकला आला आणि त्यासोबतच रक्ताची उलटी सुद्धा. विक्रांत हे सगळ बघून घाबरला. अर्पिता त्याला धीर देत म्हणाली.

"काळजी करू नको. मी ठीक आहे." हे बोलतांना सुद्धा तिला धाप लागत होती आणि बोलता बोलता तिला अचानक चक्कर आली.

विक्रांतने तिला अलगद दोन्ही हातात उचलून घेतल आणि गाडीत मागच्या सीटवर झोपवलं. विक्रांत ड्राईव्ह करायला पुढे बसला. ज्या हॉस्पिटलमधे अर्पिताने रिपोर्ट काढले होते त्याच हॉस्पिटलमधे विक्रांत तिला घेऊन गेला. गावी फोन लावून त्याने बाबांना कळवल.

"मिस्टर देसाई..मिसेस देसाई या ब्रेन ट्युमरच्या लास्ट स्टेजवर आहेत. आजच मी त्यांना त्यांचे रिपोर्ट दाखवले होते. त्यांना ट्युमर चा त्रास कधी सुरू झाला हे समजल नसावा किंवा त्यांनी ते नॉर्मल समजून लाइटली घेतल असावं. आता आपण फक्त आहे तितका वेळ त्यांना आनंदी ठेऊ शकतो बस.."डॉक्टर म्हणाल्या.

"ब्रेन ट्युमर! नाही डॉक्टर, अस नाही होऊ शकत.ट्युमर असा लास्ट स्टेजवर थोडीच समजतो. तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल." विक्रांत म्हणाला.

"शांत व्हा मिस्टर देसाई. आता तुमच्या मिसेसना मानसिक आधाराची गरज आहे. सध्या आम्ही त्यांना अंडर ऑब्जर्वेशन ठेवत आहोत. तुम्ही तुमच्या माणसांना बोलावून घ्या. प्लीज मिस्टर देसाई..भावनांना आवर घाला आणि समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करा." डॉक्टर म्हणाल्या
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे.


🎭 Series Post

View all